कर्मफल

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 9 मार्च 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

प्रत्येक कामाचे/कर्माचे काही ना काही उद्दिष्ट असते किंवा एक परिणाम असतो. पण त्या परिणामात न गुंतता मनापासून काम केल्यास ते अधिक गुणवत्तापूर्वक होते. कर्म करण्याची सुंदर प्रक्रिया अनुभवता येते आणि ती समाधानकारक असते, असे आपण मागच्या लेखात कर्मफल या विषयावर मनन करताना पाहिले. त्या लेखात कर्म या शब्दाचा अर्थ चांगले काम, समाजासाठी कार्य, काही मिळवण्यासाठीची धडपड, असा होता. या लेखात कर्मफल या संकल्पनेचा दुसरा अर्थ किंबहुना त्याची दुसरी बाजू आपण पाहूया. 

मुळात कर्म म्हणजे कोणतीही क्रिया/कृती, ज्याला काही हेतू किंवा उद्देश आहे. घरातल्या कामापासून ते देशासाठी काही करायचे मनात असेल, ते ते सारे कर्मच. बसणे, उठणे, चालणे, पळणे, बोलणे, ऐकणे, प्रत्येक गोष्टीचे वेदन, त्याचे संवेदन, त्याचा अर्थ लावणे, समजून घेणे, निर्णय घेणे, कोणाकडून काही घेणे, कोणाला काही देणे अशा साध्या कृती, क्रिया, प्रक्रिया हे सर्व कर्मच. म्हणजेच प्रत्यक्ष कृती अथवा मनात आलेले कोणतेही काम करण्याचा किंवा त्या अनुषंगाने आलेला कोणताही ‘विचार’ हेही कर्मच. 

या प्रत्येक क्रिया प्रक्रियेचे काही ना काही परिणाम ठरलेले असणारच. अगदी साधे उदाहरण. आपण जोरात उभा आडवा हात हवेत फिरवला, आसपास कोण आहे याचा आपण विचार केला नाही आणि तेवढ्यात कोणी तिकडे आले किंवा आपल्या जवळून गेले तर तो हात त्या व्यक्तीला लागेल. हे असे व्हावे हा काही आपला उद्देश नाही. आपण सहज ती कृती केली असेल किंवा हात अवघडला म्हणून मोकळा करायला हालवला असेल. ही एक अगदी साधी वाटणारी कृती, पण तिचाही स्वाभाविक आणि संभाव्य असा परिणाम असणार आहे.  

आणखी एक साधे रोजचे उदाहरण. आपण गाडी चालवत आहोत, एक दोन क्षण आपले लक्ष थोडे हलले. तेवढ्यात पटकन कोणी मधे आले. आपल्याला ब्रेक दाबता आला नाही. आपल्या गाडीची मधे आलेल्या माणसाला धडक बसली, तो पडला, त्याला इजा झाली. आता इथे या प्रसंगात आपण गाडी चालवत आहोत या कृती/कर्माबरोबर ‘एक दोन क्षण लक्ष नसणे’ हेही कर्म आपण करत आहोत, तर रस्त्यावर इकडे तिकडे न पाहता जो कोणी मधे येईल तोही हे ‘असे मधे येण्याचे कर्म’ करत असेल, ज्याचा परिणाम अपघात असणार आहे! तसेच एका शिक्षकाने मनापासून शिकवले, त्यामुळे प्रत्येक विषय छान समजला. मुलांनीही मन लावून ऐकले, त्यांना नीट समजले; यातही कर्म आहे आणि त्याचे परिणाम आहेत. प्रत्येक पावला-पावलावर अशी उदाहरणे सापडतील. म्हणजेच प्रत्येक कर्माचे आपले ध्येय म्हणून, संकल्प म्हणून किंवा उद्दिष्ट म्हणून फक्त परिणाम असतील असे नव्हे, तर त्या पलीकडे त्याचे ‘साहजिक/स्वाभाविक’ असे परिणाम असणार आहेतच! 

या जन्मातल्या कर्माची फळे याच जन्मात फेडायची आहेत, असे एक वाक्य आपण बोलतो, ऐकतो, चित्रपट, कथा, कादंबऱ्या सर्वत्र आढळते. असाच एक हिंदी चित्रपट आहे ‘भ्रम’ नावाचा. त्या चित्रपटाचा विषय असा, की ‘माझ्या कर्माच्या परिणामाचा मला सामना करावा लागेलच असे काही नाही, हे वाटणे हा माणसाचा सर्वात मोठा भ्रम आहे.’ याचे प्रमुख कारण असे की माणूस स्वतःला नेहमीच अपवाद समजतो. म्हणजे त्याला हे जरी आसपास दिसत असले, की कसे वागले की त्याचे काय परिणाम होतात; तरीही ते परिणाम माझ्याबाबतीत होणार नाहीत, मी अधिक काळजी घेईन किंवा मी चांगले मॅनेज करेन असे त्याला वाटत राहते. त्यामुळे आपण दुसऱ्याला त्रास होईल असे काही कर्म करत असलो, (हेतू पुरस्सर किंवा नकळत आपल्या हातून जे घडणार आहे) तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेलच असे नाही. कोणाला उत्तर द्यायचेच झाले, तर ते आपल्या हातून का घडले याचे सबळ कारण अथवा समर्थन आपल्याकडे असेल. म्हणजेच माझ्या कर्माच्या परिणामाचा मला सामना करावा लागेलच असे काही नाही असे वाटते!  

परंतु, हा भ्रम का... कारण समर्थन जरी दिले किंवा समर्पक असे उत्तर देता आले, तरी त्या वागण्याचे जे स्वाभाविक परिणाम आहेत ते झालेले असणारच आहेत. कधीतरी कोणी त्यावर आपल्याला प्रश्न विचारणार आहे, त्याचा जाब विचारणार आहे. आपल्या हातून काही नुकसान झाले असेल, तर त्याची भरपाई करावी लागणार आहे. त्यामुळे किती काळ आपण पळवाटा शोधणार? कुठे ना कुठे त्या कर्मफळाचा सामना करावाच लागणार! 

पण मानवी मन हे सत्य स्वीकारायला तयार नसते. मागेही एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपण स्वतःच्या चुकांसाठी वकील तर  

दुसऱ्याच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो. कर्मफळ भोगावे लागेल यासाठी मुळात ‘ते तसे परिणाम घेऊन येणारे कर्म,’ ज्याला कर्म म्हणायचे ते आहे व आपल्या हातून झाले आहे हेच सत्य आपल्याला समजायला किती वेळ लागतो.

आपल्या हातून कोणी दुखावले गेले... आता खरे तर आपल्याला पक्के वाटत असते, की आपण दुखावत नसतोच कधी, आपण तर स्पष्ट आणि परखड बोलत असतो. पण त्याने समोरचा दुखावला जाण्याची शक्यता असते! बर हेही मान्य करू.. तरी आपल्या त्या बोलण्याचे परिणाम तर असतीलच ना. काय काय संभाव्य परिणाम होऊ शकतील. एक तर जो दुखावला गेला, तो आपल्याला अद्दल घडवायची वाट पाहील किंवा लगेच भांडण करून मोकळा होईल किंवा मोठ्या मनाने माफ करेल. अशीही शक्यता की जो दुखावला गेला, तो काहीच करणार नाही. पण नंतर कधीतरी तिसराच आपल्याला त्याच पद्धतीने दुखवेल. त्याही पुढे.. नंतर कधी आयुष्यात वेगळेच असे काही घडेल, की आपण दुखावले जाऊ. या शेवटच्या दोन शक्यता अशा आहेत, की सरळ सरळ आपल्या वागण्याचे ते परिणाम असे म्हणता येणार नाही. परंतु, जर विचार केला तर ज्या दुःखातून नकळत आपण दुसऱ्याला जाऊ दिले आहे, ते दुःख आपल्याला भोगावे लागते आहे हे पटेल.  

हा अनेक धर्मग्रंथातून मांडला गेलेला विषय आहे. त्यामुळे पुन्हा तो ‘आपल्याला समजणार नाही’ असे वाटण्याची शक्यता आहे. पण प्रत्येक सामान्य मनाने सुज्ञ आणि शहाणे होऊन विचार करावा असाच हा विषय आहे. आता यावर लगेच प्रश्न येण्याची शक्यता, की ठीक आहे, आपण कोणाला दुखावले अथवा मी कोणाचे वाईट केले आणि आपले काही वाईट झाले किंवा आपण दुखावले गेलो तर समजू शकतो. पण जर मी न दुखावतासुद्धा समोरचा मात्र मला दुखावतो आहे, माझा अपमान करतोच आहे, माझे नुकसान करतोच आहे, ते कसे? 

आता एकतर इथे आपली बाजू खरी असेल आणि तरी आपल्याला ती मांडता येत नसेल, आपण आपल्या बाजूने विश्वासाने उभे राहू शकत नसू, आपल्यावर होणारे वार आपल्याला परतवता येत नसतील, तर परिणामतः समोरच्याला स्फुरण चढून तो आपल्याला त्रास देत असेल. म्हणजे आपण योग्य शब्दांत आपली बाजू ठामपणे मांडून त्याला उत्तर देऊ शकत नाही याचे ते फल आहे. जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला आपले मत, भूमिका समर्थपणे सादर करता यायला हवी, तेही एक कर्मच. मग जर हे कर्म उत्तम घडले नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागणारच. इथे मला जमत नाही, माझा स्वभाव नाही, असे मुळमुळीत बोलून चालत नाही. दुर्बलतेचे आणि मूर्खपणाचेही फळ भोगावे लागते. अक्कल हुशारीने वागायला आपले हात कोणी धरलेले नसतात. परंतु, आपल्याला वाईटपणा घ्यायचा नसतो आणि कोणी मला फसवायला किंवा दुखवायलाही नको असेही वाटत असते. असे दोन्ही बाजूंनी आपले खरे होणार नाही. 

म्हणूनच एक गोष्ट मनात मान्य करायला हवी, की जे आपण ठरवू, करू, निर्णय घेऊ; त्याचे निश्चित असे परिणाम असणार आहेत. ते नेमके काय असतील याचा थोडा फार अंदाज येईल. जे स्वाभाविक असतील ते आपल्याला समजून घ्यायला हवेत. तिथे स्वतःला अपवाद न समजता योग्य ती काळजी घ्यायला हवी किंवा स्वतःवर ताबा मिळवायला हवा आणि ज्या परिणामांचा अंदाज येणार नाही ते कर्म करण्याच्या सुरुवातीला नाही समजणार. जे काही आपल्या बाबतीत होत आहे, कळत 
नकळत त्यासाठी कुठेतरी आपण 
जबाबदार आहोत ते स्वीकारता येईल, मान्य करता येईल. बर हे परिणाम मागच्या जन्मातल्या चुकांचे परिणाम, पापांची प्रायश्चित्त असेही लगेच म्हणायला नको. नाहीतर मग आपल्यात सुधारणा करणे कठीण होईल. 

जे जे आपल्या आयुष्यात चांगले वाईट घडेल, ते याच जन्मातील कर्माचे फलित. याच जन्मात आपण जे वागत आलो आहोत. मग तो चांगुलपणा असेल, दुष्टपणा असेल, मूर्खपणा असेल, आपले अज्ञान असेल, आंधळेपणाने केलेले कृत्य असेल, स्वतःवर जरा जास्त विश्वास ठेवून इतरांनी सूचना देऊनही न ऐकल्याने आपण केलेले चुकीचे कृत्य असेल.. त्याचेच हे स्वाभाविक किंवा प्रथमदर्शनी न दिसून येणारे, परंतु आपल्याच कर्माचे असणारे हे परिणाम असतील. हे जितक्या लवकर समजेल, पटेल तितके आपण शहाणे होत जाऊ हे नक्की. 

संबंधित बातम्या