दृष्टी ते समदृष्टी

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 16 मार्च 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

मध्यंतरी कोणीतरी बोलताना सहज असे म्हणून गेले, ‘बरे झाले आपण या विषयावर बोललो. खूप नवीन गोष्टी समजल्या. मला एक नवीन दृष्टी मिळाली.’ बोलणारा बोलून गेला, मात्र माझे मनन आणि अभ्यास सुरू झाला. दृष्टी किंवा नजर म्हणजे डोळ्याने पाहण्याची क्रिया किंवा पाहण्याची क्षमता. किती आणि कसे दिसते आहे, हे जणू मोजण्याची एक संकल्पना. इंग्रजीमध्ये ज्याला आपण व्हिजन असे म्हणतो. पण असे असले तरी पाहण्याची क्रिया हीसुद्धा फक्त शारीरिक नाही. डोळ्याने होणारे वेदन आणि सर्व जाणिवा एकवटून, घडलेल्या घटनांचे होणारे संवेदन हे दोन्ही वेगळे आहे. डोळ्याने आजूबाजूचे दिसते आहे म्हणजे ते पाहण्याची दृष्टी आहे असे नाही. दृष्टी किंवा जग अनुभवण्यासाठी असणारी नजर मिळणे अथवा असणे ही अत्यंत विशेष अशी घटना आहे.

अनेकदा भरपूर वाचन केले, कोणाचे व्याख्यान ऐकले, संशोधन केले, मिळालेल्या माहितीचे वर्गीकरण करून ते समजून घेतले, की सुरुवातीला तो माणूस म्हणाला तसे आपल्यालाही वाटते की आपल्याला एक नवीन दृष्टी मिळाली. खरे तर फक्त अभ्यास करून असे वाटेल असेही नाही. आपण विचार करत असतोच. अनेक गोष्टींचा सहसंबंध लावत असतोच. अचानक एखाद्या संभाषणाच्या निमित्ताने किंवा एखादी घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडते म्हणून.. अशा काही क्षणीसुद्धा असे वाटून जाते, की आज अमुक अमुक गोष्टीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली.

पण म्हणजे ‘दृष्टी’ या घटनेत काय होते, तर एखाद्या गोष्टीच्या अनेक बाजू समजतात. कधी विचार केलेला नसतो, ते मुद्दे समोर येतात. तर, कधी असेही वाटून जाते की आज खरा अर्थ समजला. जणू एखादी संकल्पना किंवा गोष्ट/वस्तू ही त्रिमितीय दिसू लागली; किंबहुना आपल्याला अधिक स्पष्ट दिसू लागली. जसे आहे तसे, त्यात आपल्या मनातले काही वेगळे अर्थ त्या गोष्टीला न लावता आपण पाहू शकत आहोत. असेही जाणवेल की इतके दिवस चाचपडत होतो. भोवताली नेमके काय चालले आहे हे समजत नव्हते, पण अंधारात जशी वीज चमकावी आणि एखादे काही त्या प्रकाशात लख्ख दिसावे, तसा डोक्यात प्रकाश पडला आणि आता मला स्पष्ट दिसू लागले, संभ्रम दूर झाले, दृष्टी साफ झाली, पूर्वग्रहाचे पडदे दूर झाले!

एखादी गोष्ट, घटना पाहताना, अनुभवताना आपल्या मनातले काही वेगळे अर्थ त्याला लावणे अथवा मनात पूर्वग्रह असणे ही आपल्या जगण्यातली नित्यनियमातील बाब आहे. अथवा मनात पूर्वग्रह असणे हा साफ नजर मिळण्यातला एक अडसर, जो आपले मनच तयार करते. दृष्टी येते म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याची क्षमता वाढत नाही, तर हे मनाचे डोळेच अधिक चांगले पाहू शकतात. याला ‘ज्याचा त्याचा चष्मा’ असे म्हटले आहे. जो प्रत्येकाकडे असतो. यामुळे तर हे जग आपण पाहू शकतो. आपल्या पाहण्यात एक सातत्य आणू शकतो. आपल्यापुरते नीट कसे जगावे हे समजण्यासाठी हा चष्मा आवश्यक.

हा चष्मा म्हणजे प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्या मनात असलेले निकष (criteria ). त्यामुळे जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा चष्मा वेगळा असतो, आपल्याला बदलावा लागतो. परंतु, जेव्हा दृष्टी मिळावी असे काही आपण म्हणत आहोत, तेव्हा या चष्म्याच्या पलीकडे आपल्याला जायचे आहे. हे माध्यम बदलायचे आहे. आपल्या पाहण्याचे निकष बदलायचे आहेत किंवा असे म्हणूया, की जगण्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तरी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो तरी जे काही आजूबाजूला चालले आहे, ते वेगवेगळे असे न दिसता, सर्व निकष बाजूला पडून त्या घटनांमागचे तत्त्व समजूून त्याकडे पाहण्याची एक समता मनात निर्माण होणे आवश्यक आहे... हीच दृष्टी!

आपल्या दैनंदिनीचे उदाहरण घेऊ. आपल्या दैनंदिनीकडे आपण कसे पाहत आहोत ते आपण बारकाईने तपासू. दिवसभर आपण काय करत आहोत, ते आपल्याला अर्थपूर्ण वाटते आहे का नाही, ते आवडते आहे का नाही, त्याचा वैताग येतो आहे की ते आव्हान वाटते आहे? आपल्याला कराव्या लागणाऱ्या भूमिका, त्यातून पार पाडावी लागणारी कर्तव्ये, जबाबदाऱ्या, आपले अधिकार आणि या सगळ्यातून आपल्याला काय मिळते आहे व आपण काय गमावत आहोत, फायदा होतो आहे की नुकसान होते आहे. त्याला आपण यश म्हणत आहोत की अपयश, त्यातून आपला उत्साह वाढतो आहे की निराशा येते आहे, चूक वाटते आहे की बरोबर.. आता थोडा विचार करूया, की हे सगळे असे सगळे वाटण्याचे आपल्या मनातले निकष काय आहेत. जे वाटते आहे ते तसे का वाटते आहे.

हे असे विविध काही वाटते, कारण आजूबाजूला घडलेल्या गोष्टींबद्दल नेहमीच आपल्या मनात काही भाव उत्पन्न होत असतात. जे अगदी स्वाभाविक असते. त्याशिवाय निर्णय घेता येत नाही. आपल्याला काय करायचे आहे ते ठरवता येत नाही. परंतु, आपल्या दैनंदिनीबद्दल जेव्हा इतके विविध भाव निर्माण होतात, त्याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीकडे आपण कसे घडले, काय घडले असे न पाहता ‘माझ्यासाठी’ हे काय होते, ‘मी’ याकडे कसे पाहायचे असा विचार करत असतो. ‘मला’ दुःख झाले का आनंद, ‘मला’ काय वाटले, ‘माझा’ फायदा झाला की नुकसान, ‘मला’ मिळाले की ‘मी’ गमावले... अशा सर्व आपल्या सापेक्ष अशा मनाने दिलेल्या अर्थांची एक मालिका तयार होते, जी आपल्या मनात पूर्वग्रह निर्माण करते. मग पुन्हा तसेच काही घडल्यास हे मागचे अनुभवलेले भाव आपण एक मोजपट्टी म्हणून वापरतो आणि त्याकडे पाहतो; ही दृष्टी नव्हे. कारण आपल्याला लाभलेली दृष्टी ही तर या मोजमापाच्या पलीकडचे जाणून घेणारी आहे.

जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपले जगणे पाहता चांगले वाईट, वैताग, आनंद, यश, अपयश या सर्व भावात्मक घटना आहेत. काही ना काही घडणारच आहे. त्याला आपल्या मनातल्या प्रमाण आणि निकषानुसार आपण नावे देणार आहोत. पण हे उत्तम जमणे म्हणजे दृष्टी नव्हे. तर असे काही सतत घडणारच आहे. पण अशा वेळी आपण कसे वागतो, आपल्या भूमिकांनुसार, किंबहुना प्रत्येकाच्या भूमिकेनुसार आपले निर्णय कसे बदलत जातात, आपल्याला ज्यात रस असतो आणि ज्यात नसतो त्यानुसार आपले भाव कसे बदलतात. केव्हा आपण भली मोठी समर्थने देतो, तर केव्हा जसे आहे तसे स्वीकारण्याची आपली तयारी असते. हे सगळे समजणे आणि हळूहळू प्रत्येक घटनेनुसार आणि ती समजूत अधिकाधिकपणे आपल्या जाणिवांमध्ये रुजणे म्हणजे ‘दृष्टी’! कारण आपली कृती, आपला विचार समंजस होत जातो. 

म्हणजेच भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात तसे ‘सुख दुःखे समे कृत्वा.. लाभलभौ जयजयौ..’ अर्थात, काहीही असो, सुख असो, दुःख असो, फायदा होवो, नुकसान होवो, आपला जय होवो, पराजय होवो.. सर्वांकडे समदृष्टीने पाहायला हवे. काहीतरी रोज घडणारच आहे. मग ते आपल्याला हवे असणारे असेल किंवा हवे नसणारे असेल. जेव्हा मला ते कोणत्या एका भूमिकेतून न दिसता त्या गोष्टी घडण्यामागे नेमके काय तत्त्व आहे आणि त्यानंतर त्याचे जे परिणाम होतात त्याकडे नेहमी किंवा अपवादात्मक कसे पाहिले जाते हे समजणे म्हणजे दृष्टी.

ज्ञानेश्वर माउली म्हणतात तसे सर्वांचा आत्मा हा एकच आहे हेही जाणवले पाहिजे आणि तो आत्मा धारण केलेले शरीर मात्र प्रत्येकाचे वेगळे आहे, त्यामुळे प्रत्येक जण हा त्या अर्थाने वेगळा आहे, वेगळा वागणार आहे, निर्णयात विविधता असणार आहे, त्यामुळे एखाद्या घटनेमध्ये कोणी दुःखी असेल, तर कोणी त्याच वेळी सुखी, एकासाठी जो जय आहे, तो दुसऱ्यासाठी पराजय... हे असे सारे समजून माझ्यामध्ये आजूबाजूला पाहताना ‘एकाच वेळी समता आणि विविधता याचा संगम होणे’ म्हणजे दृष्टी. ही विविधता किंवा भेद, फरक आणि त्यामुळे आपल्या मनात निर्माण झालेले निकष, तसेच जगाकडे पाहायची प्रमाणे याबद्दल मनात असलेली स्पष्टता म्हणजे दृष्टी.

दृष्टी आणि समदृष्टी हे फारसे वेगळे नाहीत. भेदाभेद न करणे म्हणजे समदृष्टी असा याचा मर्यादित अर्थ नाही. तर मुळात आपल्या नजरेला हे भेद का जाणवतात हे समजणे म्हणजे दृष्टी किंवा समदृष्टी प्राप्त होणे हे आहे. मी कोणत्याही भूमिकेत असो जेव्हा माझ्यासकट प्रत्येक जण असा का वागतो हे जेव्हा समजत जाते, दिसत जाते, तेव्हा मनातले अर्थ मधे न येता जे ढळढळीतपणे समोर नाही, पण दडलेले आहे ते सत्य माझ्यासमोर येत जाते. मग सापेक्ष असलेले माझे संवेदन निरपेक्ष तसेच निष्पक्षपाती होत जाते.

आता प्रश्न असा की ही दृष्टी आपल्याला लाभेल का, त्यासाठी काही विशेष परिश्रम घ्यावे लागतील का?

जसजसे अनुभव येत जातील, तसतसे आपल्याला अधिकाधिक स्पष्ट दिसू लागेल. पण याचे काही नियम नाहीत. तरी आपल्या मनाला ज्याक्षणी या दृष्टीची जाणीव होईल, तेव्हा मात्र आपण प्रयत्नपूर्वक तिला आपलेसे करणार हे निश्चित. म्हणून बोध/जाणीव हीच सुरुवात. ही दृष्टी आपले श्रवणही सुधारते. जे पाहत आहोत ते नेमके काय हे लक्षात आले, की नेमके कोणाचे ऐकायचे तेही स्पष्ट होते. हे श्रवण नेमके कसे काय ते आपण पुढच्या लेखात पाहू.

संबंधित बातम्या