श्रवण

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 27 एप्रिल 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

जगतानाची विविधता पाहताना एकाच वेळी आपण सर्व माणसे म्हणून समान आहोत, तरी एकमेकांपासून विभिन्न आहोत याची जाणीव होणे म्हणजे दृष्टी, हे आपण मागच्या लेखात पाहिले. त्यात ही दृष्टी आपले श्रवणही सुधारते असे विधानही केले होते. दृष्टीने श्रवण सुधारते तसेच चांगल्या श्रवणाने दृष्टीही. त्याबद्दल मनन आज करूया. 
श्रवण म्हणजे ऐकणे. आपल्याला नीट ऐकू आले तरच स्पष्ट बोलता येते. भाषा आपण ऐकून ऐकून जास्त चांगली शिकतो. आपल्याकडे ‘श्रुती आणि स्मृती’ याचे फार महत्त्व आहे. जेव्हा छपाई कलातंत्र अवगत नव्हते, तेव्हा गुरुकुलात ऐकून, म्हणून, पाठ करून, लक्षात ठेवून, ते पुढच्या पिढीला द्यायचे अशी पद्धत होती. असे अनेक ग्रंथ, गीता, पुराणे, कथा आधी ऐकून स्मृतीमध्ये जतन केलेल्या होत्या, ज्या आज आपल्याला छापील स्वरूपात मिळतात. जसे ऐकले तसे पुढे सांगितले, हा नियम मात्र इथे पाळलेला दिसतो. कारण मुळात ते ‘नीट ऐकलेले होते.’ एकुणातच गुरुजी किंवा कोणीही ज्येष्ठ जे काही सांगतात, ते ऐकणे याचा फक्त अभ्यास नाही; तर जगतानाचा खूप मोठा संदर्भ होता. त्या स्मृती या जगण्याची दृष्टी असे काहीसे होते. 

आजकाल कोणाचे ऐकायचे नाही, किंबहुना ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या म्हणीचा विपर्यास सर्वत्र दिसतो. महाविद्यालयात विषय शिकवले जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे एखादा विषय व त्याबद्दलची माहिती याची कोणी उकल करून सांगितली, तर जी नवी दृष्टी प्राप्त होते, ती या तरुण वयात मिळणे थोडे गरजेचे असते. इंटरनेटवर सर्व माहिती उपलब्ध आहे, त्यामुळे आम्ही आमचे शिकू असे वाटत असावे. पण त्यामध्ये हे असे अर्थपूर्ण निरूपण ऐकायचे राहून जाते. प्रत्येकाला बोलायचे आहे पण ऐकायचे फार कमी लोकांना आहे. योग्य ते ऐकले गेले नाही तर काय होऊ शकते हे रामायणाची कथा आपल्याला सांगते. राजा दशरथाने तळ्याकाठी ऐकू आलेला आवाज नेमका कोणाचा हे बरोबर जाणले असते, तर कदाचित रामायणच घडले नसते. त्यामुळे मनातले अर्थ न मिळवता जसे आहे तसे ऐकायला शिकणे हे जमायला हवे. 

प्रथम, ऐकणे म्हणजे नेमके काय ते समजून घेऊ. ऐकताना आपण काय काय ऐकतो. तर बोलणाऱ्या माणसाचे सादरीकरण. प्रत्येक शब्द, त्याचा उच्चार, बोलणाऱ्याच्या आवाजाची पट्टी, रोख, कोणत्या शब्दावर भर आहे, एकुणात आवाज मोठा आहे, कोमल आहे वगैरे. त्यावरून तो माणूस काय बोलतो आहे, किती कळकळीने बोलतोय, खरेच अभ्यासपूर्ण बोलतो आहे का, समजून बोलतो आहे का, मनापासून बोलतो आहे का याचा अंदाज आपण बांधत असतो. म्हणजेच ऐकणे हे फक्त बोलणाऱ्या माणसाच्या शब्दांचे नसते. त्या माणसाला आपण पूर्ण ऐकत असतो. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधत असतो. तसेच ऐकणे फक्त कानाने नसते. तर ते सर्वांगाचे कान करून आपण ऐकत असतो. जसे, काही शब्द ऐकता ऐकता भीतीदायक वाटून आपल्या अंगावर काटा येतो. काही प्रेमाचे शब्द ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात. काही शब्द ऐकून स्फुरण चढते आणि आपण जोमाने हात पाय चालवायला लागतो. जसे हर हर महादेव या आरोळीने सगळे मराठी सैन्य उसळी मारून शत्रूवर तुटून पडायचे.. असे वाचले आहे इतिहासात. आईची हाक ऐकून मुले असतील तिथून धावत येतात असे आपण म्हणतो. तर एकदा कामात गढलो, की मला काही ऐकू येत नाही असेही कोणी सांगते.

याचाच अर्थ असा, की ऐकलेले स्वर किंवा सूर हे वेदन म्हणून कानाचे कार्य असले, तरी त्याला अर्थ देऊन नेमके ते काय आहे, त्याचे काय करायचे हे मात्र आपण स्वतःला सांगत असतो. म्हणजे आपले मन तो निर्णय घेत असते. आपले आत्तापर्यंत झालेले अध्ययन, अनुभव याच्याशी नवीन झालेले वेदन पडताळून पाहून हा अर्थ आपल्यापर्यंत आपले मन पोचवत असते. म्हणून समजून घेताना आपल्याला प्राप्तच झालेली दृष्टी आपल्याला हे असे ऐकताना मदत करते. 

कोणी माणूस बोलतो कसे यापेक्षा जो ऐकतो आहे तो ऐकतो कसे, त्याचा अर्थ मनात कसा लावून घेतो यावर बहुतांश वेळेला प्रतिक्रिया काय दिली जाईल आणि संवाद कसा घडेल हे अवलंबून असते. कोणी अपमानकारक बोलत असेल तर एखादा नीट ऐकून घेईल, पण शांतपणे उत्तर देईल; तर एखादा चिडून काही प्रतिक्रिया देईल. शब्द, बोलणाऱ्याचा रोख, आवाजाची पट्टी कदाचित दोन्ही वेळेला सारखीच ऐकली गेली असेल, पण त्यानंतर स्वतःला त्याबद्दल काय सांगायचे इथे फरक पडला असेल. कोणी कसेही बोलो मला ते कसे ऐकायचे आहे, हा निर्णय त्या माणसाने त्याच्या हातात ठेवला असेल आणि हे जमेल केव्हा, तर ‘कोण, कसे, कधी, काय बोलतो, बोलू शकतो, किंबहुना कोणी कधीही काहीही बोलू शकतो, पण आपण ते कसे ऐकायचे हे आपण ठरवायचे’ ही दृष्टी जेव्हा माणसाला येईल; काय ऐकायचे आणि काय सोडून द्यायचे जेणेकरून वादविवाद, वितंडवाद होणार नाहीत; उलट ते टाळले जाऊन सलोखा निर्माण होण्याची शक्यता वाढेल, हे जेव्हा समजेल तेव्हाच श्रवण उत्तम जमले आहे असे म्हणता येईल. इथे काय ऐकायचे आणि काय सोडून द्यायचे याचा अर्थ परिपक्व वाचक योग्य प्रकारे घेईलच. 

इथे मुद्दा असा आहे, की आपण कानाने जे ऐकतो ते आपण स्वतःला कसे ऐकवतो? कानावर काहीही पडेल. पण त्यातले नेमके काय आपल्या मनापर्यंत जाऊ द्यायचे हे समजले पाहिजे. आपल्याला भीती दाखवणारे, नकारात्मक प्रतिक्रिया देणारे अनेक जण असतात. अगदी आपले घरचेसुद्धा. काळजी व्यक्त करण्याच्या नादात आपण उगाचच नेमके काय करायचे नाही, काय धोकादायक आहे हे ऐकतो, परंतु त्यावर मात कशी करायची हे फारसे कोणी सांगतही नाही आणि त्यामुळे आपण तसे ऐकतही नाही. एक गोष्ट इथे आठवते. 

एकदा एका जंगलात बेडकांची टेकडी चढायची स्पर्धा ठरते. सर्व तरुण बेडकांना आमंत्रण दिले जाते. एवढी मोठी टेकडी आपली मुले कशी चढतील असा सर्व पालक बेडकांना प्रश्न पडतो. बहुतेक सगळे काळजीत पडतात. काही पालक, त्यांच्या मुले बेडकांना येऊच देत नाही. काही बेडूक आई पालकांचे ऐकत नाहीत आणि टेकडीच्या खाली स्पर्धेला येऊन उभे राहतात. बिगूल वाजतो आणि स्पर्धा सुरू होते. काही पालक बेडूक आरडाओरडा सुरू करतात. ‘अरे जाऊ नका रे, पडाल रे’ असे त्यांचे सुरू होते. टेकडी चढायला अवघड असतेच. आपल्या पालकांचा आरडाओरडा ऐकून काही बेडूक स्पर्धेतून माघार घेऊन खाली येऊ लागतात. असे करत करत शेवटी चार तरुण बेडूक स्पर्धेत उरतात. पण ते जोमाने टेकडी चढू लागतात. जे चार उरले असतात त्यांच्या पालकांना अधिक भीती वाटू लागते. ‘बाकीचे कसे परत आले, तुम्ही का आमचे ऐकत नाही, आम्हाला कोण तुमच्याशिवाय,’ असा पुन्हा आरडाओरडा सुरू होतो. टेकडीचा वरचा भाग थोडा गुळगुळीत आणि कठीण असतो. ते पाहून घाबरून चारपैकी तीन मागे परत फिरण्याचा निर्णय घेतात आणि मग उरतो एकटाच. तो मागे पाहत नाही, इकडे तिकडे पाहत नाही आणि जसे जमेल तसा पुढे जात राहतो. तो एकटाच वर जातो आहे हे पाहून एकदम शांतता होते. त्याचे पालक मात्र मोठ्या विश्वासाने त्याच्याकडे पाहत आहेत असे सर्वांना जाणवते. बाकी सर्व पालक बेडकांना आश्चर्य वाटते आणि काळजीही. एक दोन बेडूक त्यांच्या जवळ येऊन म्हणतात, की खूप शूर आहे तुमचा मुलगा. अजिबात घाबरला नाही. त्यावर ते पालक बेडूक म्हणतात, की अहो असे नाही. त्यालाही भीती वाटत असेल, पण तुमचा तो ‘नका जाऊ नका जाऊ’ हा आरडाओरडा त्याने ऐकला नाहीये. तो ‘बहिरा’ आहे! 

आता आपल्याला जर अवघड काम करण्याचे बळ हवे असेल किंवा आत्मविश्वास हवा असेल, तर आपण बहिरे असणे चांगले का? तर अजिबात नाही! कारण वाईट ऐकू येणार नाही, तसे चांगलेही ऐकू येणार नाही. नेहमी सकारात्मक बोलणे आपल्या हातात असते, पण नेहमी सगळे सकारात्मकच बोलतील याची खात्री कशी द्यावी, ते आपल्या हातात नाही. त्यापेक्षा आपण जे ऐकतो आहे त्यातून सकारात्मक अर्थ घेऊन स्वतःला चांगलेच सांगावे हे जमण्यासारखे आहे. असे म्हणतात की जेव्हा राजारामाचा जन्म झाला तेव्हा तो पालथा जन्माला आला. ते ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता महाराज म्हणाले, की अरे वा. छान की.. पाहा.. हा पातशाही पालथी घालेल!

स्वतःशी किंवा इतरांशी संवाद साधताना स्वतःचे ऐकणे हे यासाठी महत्त्वाचे. उत्तम वक्ता हा उत्तम श्रोते निर्माण करू शकतो, तसेच श्रोते उत्तम असतील तर वक्त्यालाही ते आव्हान असते. व्याख्यानापूर्वी तयारी करताना कोण आपले ऐकणार आहे हे प्रत्येक वक्ता जाणून घेत असतो. समोर अर्जुन होता म्हणून भगवंताला गीता सुचली, कारण ऐकणारा उत्तम होता असेही सांगितले जाते. समुपदेशनात सल्ला हा १० टक्के, तर ऐकणे हे ९० टक्के असते. समोरचा काय म्हणतो आहे ते नीट समजले, तर मार्गदर्शन चांगले करता येते. कोणाचे ऐकून घेता येणे हे कोणाशी बोलता येण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे ठरते. वाचनाने शहाणपण येते असे म्हणतात, पण ऐकण्याने शहाणपणाबरोबर माणसे आपली होतात हा स्वानुभव आहे.

संबंधित बातम्या