विनम्रता 

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 13 जुलै 2020

मनतरंग

विनम्रता हे आपल्या मधुर वाणीचे एक प्रगत रूप आहे, ती एक सकारात्मक भाषा आणि मनोभूमिका आहे असे मागच्या लेखात आपण म्हटले. विनम्रता ही स्वतंत्र अशी मनोभूमिका नाही. ती मनुष्य स्वभावातील अनेक चांगल्या समजल्या जाणाऱ्या भूमिका आणि भावनांचे एक संयुग आहे. त्यामुळे ती जगण्याचा दृष्टिकोन तयार करणारी एक मनोभूमिका आहे. यात कृतज्ञता आहे, आदर आहे, समोरचा कसा का असेना त्याच्या मूलभूत हक्कांचा आणि अधिकारांचा स्वीकार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मनोभूमिका तयार होण्यात मीपण, अहंभाव सहजपणे गळून जाण्याची प्रक्रिया आहे. एक संस्कृत श्‍लोक इथे आठवतो -

विद्यां ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम् ।
पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मं ततः सुखम् ॥

अर्थात - विद्या विनम्रता देते, विनम्रतेमुळे आपली पात्रता वाढते, पात्रतेमुळे धन मिळवता येते, अशा मिळवलेल्या धनामुळे स्वधर्माचे पालन करता येते आणि या सगळ्यामुळे सुख प्राप्त होते.

इथे धन म्हणजे फक्त पैसे असा अर्थ नाही, तर जगण्यासाठी आवश्यक सर्व साधनसंपत्ती असा अर्थ घेऊया. म्हणजेच जे शिक्षण आपण घेतले आहे त्यामुळे आपली गुणवत्ता वाढणार आहे की नाही, आपण जगण्यास पात्र आहोत की नाही हे या विनम्र भूमिकेमुळे ठरते.  

काही रोजच्या व्यवहारातील उदाहरणे पाहू. ‘इतका शिकलास पण कसे बोलायचे हे अजून समजत नाही,’ हे वाक्य आपण अनेक वेळा विविध संदर्भाने ऐकतो. खास करून एरवी चांगले मार्क मिळवणारा किंवा शिक्षण आणि नोकरी याबाबतीत शिखरावर असलेला जेव्हा अपमानकारक, उर्मटपणे बोलत असेल तर हे हमखास बोलले जाते. संचालक, व्यवस्थापक या पदावरची माणसे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांशी कशी वागतात हे ही नेहमी पहिले जाते. तसेच आपल्यापेक्षा वयाने, मानाने मोठ्या लोकांशी आपण कसे बोलतो, जिथे वाद आहेत, मतमतांतरे आहेत तिथे कसे बोलले जाते, तिथेही या मनोभूमिकेची परीक्षा होते. तर कित्येक वेळा अमुक अमुक सगळे करतो, हुशार आहे पण बोलण्याने सगळे घालवतो, असेही म्हणतो आपण.

खरे तर नम्र कोणीही असावे, चांगले कोणीही बोलावे. तरी शिक्षणाचा या ‘नम्र भाव’ किंवा या मनोभूमिकेशी अधिक संबंध जोडला जातो. असे का असेल यावर थोडे मनन करूया. शिक्षण घेणे म्हणजे फक्त पदवी घेणे असे इथे अध्याहृत नाही. शिक्षण म्हणजे खरे शिक्षण, स्वतःमधील वाढ, विकास, ज्ञान, आजूबाजूच्या परिस्थितीचे भान, आपल्या भोवतालच्या समाजाचे भान या अर्थाने बघूया. जेव्हा काही शिकता शिकता आपल्यालाही असे वाटते, की या अध्ययनातून नवी दृष्टी मिळाली, एक भान आले, तेव्हा काय बदल होतो आपल्यात असा कधी विचार करून पाहा. तेव्हा लक्षात येईल की एरवी आपल्याला जे प्रश्न पडतात, की हे जग असे का आहे, लोक असे का वागतात, सामाजिक मानसिकता कशी बदलते आहे आणि यात आपण कसे वागावे, याची सर्व उत्तरे नाही मिळाली तरी याबद्दलची स्पष्टता आपल्या मनात येऊ लागते. 

एक उदाहरण घेऊ, आत्ताच्या या कोरोना व्हायरस आक्रमणात पूर्ण समाजाची मानसिकता बदलून गेली आहे. अशावेळी एरवी अनेकांच्या वागण्याने नाराज होणारे आपण नकळत एकमेकांना सहकार्य करायला लागलो आहोत. स्वार्थासाठी का होईना पण काही त्याग करायला तयार झाले आहोत. कारण याविषयी जागतिक स्तरावर होणारे भयंकर परिणाम प्रत्यक्ष डोळ्याला दिसत आहेत. आज प्रसार माध्यमांमुळे या संकटाची कल्पना प्रत्येकाला आली आहे, संकटाला तोंड कसे द्यायचे हे शिकवले जात आहे म्हणून हे सहकार्य दिसते आहे. म्हणजे पाहा, या शिक्षणामुळेच एका प्रकारे ही सहकार्याची भावना निर्माण झाली आहे. जे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. जे काम करायला नाही म्हणत आहेत, त्यांची भीती समजून घेतली जात आहे. नकळत एक गाढ समजूत काहींच्या मनात तयार होते आहे. सगळेच एकमेकांशी जरा बरे वागू लागले आहेत. 

हीच भूमिका मनाने घेतलेल्या विनम्रतेमध्ये आहे. पण महत्त्वाचा फरक संकट आल्यानंतर झालेल्या या बदलात आणि विनम्रतेमध्ये असा, की हा विनम्र भाव कोणत्याही अशा भयानक संकटाची वाट पाहत नाही. ती मनोभूमिका कशाला तरी प्रतिक्रिया नसते. तर ती एकुणातच जगण्याच्या अभ्यासातून येणारी गाढ समजूत असते. कोणी कसाही वागो पण विनम्र माणूस हा संयत आणि समतोल राखूनच बोलताना किंवा वागताना आपल्याला दिसतो. याचे कारण, या अशा विनम्र वागण्यामुळे किती काही चांगले घडू शकेल आणि बहुतेक लोकांनी जर नम्रता सोडून वागायचे ठरवले तर काय अनर्थ होतील याचा पुरेपूर अंदाज त्याला आलेला असतो. 

विनम्रता वागण्यातून, बोलण्यातून, खास करून संवाद, संभाषण आणि देहबोली यावरून आपल्याला ओळखू येते. अनेक वेळा स्त्री दाक्षिण्य म्हणून काहीजण कारचे दार उघडून देणे किंवा दार उघडून ‘आपण आधी पुढे जावे,’ असे सूचक वागणे.. असे करताना आपण पाहतो. कोणी मोठ्या पदावरची व्यक्ती आली तर आपण उठून उभे राहतो, किंचित मान वाकवून शुभेच्छा देतो. याला शिष्टाचार पाळणे असेही आपण म्हणतो. माणूस बोलतो कसा यावरूनच नाही, तर तो कोणासमोर उभा कसा राहतो, सर्वांमध्ये बसतो कसा यावरूनही त्या माणसाचे मन आपण पारखत असतो. कॉर्पोरेटमध्ये काम करताना फक्त आपल्या देशाचे नव्हे, तर ज्या परदेशी कंपनीचे काम आपण करत आहोत तिथलेही शिष्टाचार आपण पाळतो किंवा पाळावे लागतात. विनम्रता ही या शिष्टाचाराचे शुद्ध स्वरूप आहे, कारण फक्त माणसेच नाही, तर सर्व जीवसृष्टीबद्दल मनात असलेला आदर आणि आपलेपणाही यामध्ये समाविष्ट आहे. 

म्हणूनच करावे लागते म्हणून आपण किती करतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून ते किती वेळा घडते, यावरून आपण विनम्र या मनोभूमिकेत आहोत की नाही ते समजते. जर त्या मनाच्या भूमिकेत आपण नसू, तर हे शिष्टाचार केवळ कामाचा भाग म्हणून पाळले जाणारे. मग एरवी तसेच दिसत नाहीत. समोर असताना नीट बोलणे मग माघारी टिंगल, टवाळी, मस्ती असेही प्रकार दिसतात. समोरासमोर उर्मट आणि उद्दामपणे वागणे बोलणे जितके योग्य नाही तितकेच माघारी वाईट बोलणे आणि अपमानकारक बोलणे हे योग्य नाही. कारण ही ‘माणूस म्हणून’ कोणाविषयी असणारी समजूत नाहीये. 

साधारण विविध वयाची माणसे, विविध टप्प्यावर कशी वागतात, साधारण समस्या काय असतात, कोणत्या प्रसंगी काय निर्णय घेतात याची जर आपल्याला समजूत आलेली असेल, तर समजा कधी समोरचा उघड उघड आपला अपमान करत असला, तरी केवळ त्याच्या ‘शब्दांकडे’ लक्ष न जाता ‘असे का होत असावे’, ‘इतका राग का याच्या मनात असेल’ असा विचार पटकन केला जातो आणि त्या रागावर पटकन प्रतिक्रिया देण्यापेक्षा... ‘तुम्ही शांत व्हा, आपण यावर बोलूया, मी नक्कीच तुमचे ऐकून घेईन, माझीही बाजू आपण ऐकावी,’ असे काही उत्तरादाखल बोलले जाते. 

विनम्रता म्हणजे काहीही ऐकून घेणे आणि कोणालाही आपल्याशी कसेही बोलू, वागू देणे हे मुळीच नाही. उलट काय नेमके उत्तर द्यावे की समोरचा शांत होईल, नीट चर्चा होईल, भावनिक संवाद न होता बौद्धिक चर्चा होईल, खरे प्रश्न काय आहेत ते मांडले जातील, जर गैरसमज असतील तर तेही समोर येतील.. हे समजणे, आपल्या बोलण्यात मार्दव येऊन केवळ आपल्या शब्दांच्या जोरावर संवादातला समतोल राखायला जमणे आणि हे सारे वेळेवर सुचत जाणे, त्यातून आपल्या मनालाही क्लेश न होता आंतरिक समाधान मिळणे म्हणजे विनम्रता! 

आपल्या वागण्या-बोलण्यात विनम्रता येण्यामागे अजून एका महत्त्वाच्या विचाराचा किंवा मूल्याचा हातभार आहे. ते मूल्य म्हणजे नतमस्तक होण्याचे. म्हणजे काय, तर मीच एक शिकलेला नाही, मलाच एकट्याला सर्व समजत नाही, माझ्यापेक्षा वयाने, मानाने, शिक्षणाने, कार्याने मोठे बरेच आहेत. शिवाय माझ्या ताब्यात नसणाऱ्या तसेच माझ्या समजुतीच्या पलीकडच्या अनेक गोष्टी आहेत. तर त्यासमोर मी नतमस्तक झाले पाहिजे. जसे एखादे लव्हाळे. नाजूक पण कणखर. वादळ आले की भुईसपाट झाल्याप्रमाणे दिसते, पण पाणी ओसरून गेले की पुन्हा उभे राहते. मोडेन पण वाकणार नाही या भूमिकेत जरी आपण आपला स्व-आदर सांभाळत असलो, तरी कधी तो स्व-आदर दाखवायचा आणि कधी सपशेल माघार घ्यायची, की ज्यामुळे माझेच नाही तर अनेकांचे नुकसान टळेल ही भूमिका ही तितकीच महत्त्वाची.. तीच नम्रतेची भूमिका. 

असाही विचार करूया, की आपल्या या मर्यादित क्षमतांमुळे आपल्याला जेवढे समजत असेल त्यापेक्षा कितीतरी माझ्या बुद्धी आणि तर्काच्या पलीकडे आहे. या विचाराचा स्वीकार केला, की पाहा आपला आवेशच बदलतो. बोलण्यात स्पष्टता येते पण उर्मटपणा किंवा उद्दामपणा येत नाही. 

वरील चिंतनाचा अर्थ असा घ्यायला हरकत नाही, की माझ्या समोर जे जे चालले आहे त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची, माझ्याशी कोणीही काही बोलले, वागले तरी त्याला उत्तर कसे द्यायचे हे ठरवू शकण्याची क्षमता... विनम्रता. जी केवळ बोलायचे कसे, वागायचे कसे याची दिशा देते, एवढेच नाही तर आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी गोळा केलेल्या माहितीवर आधारित निर्णय घेणाऱ्या मनाचे लगाम आपल्या हातात ठेवायला मदत करते. म्हणजेच घडलेल्या गोष्टींबद्दल मनात भाव निर्मिती होण्यापासून ते व्यक्त करण्याचे विविध अंदाज या सगळ्याची सूत्र आपल्या हातात येतात. ही एक सुंदरशी भेटच नाही का, स्वतःची स्वतःला!

संबंधित बातम्या