निराशावादी विचाराचे व्यवस्थापन

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

मनतरंग

माणूस इतका निराश, नकारात्मक का होतो, यामागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. लहानपणापासून माणसाची जडणघडण, भावनिर्मिती आणि विचारनिर्मितीची प्रक्रिया, त्याच्या प्रतिक्रियांची निर्मिती यावर विचार करणे आवश्यक आहे, असे आपण मागच्या लेखात म्हटले. म्हणून आज आपण मनन करणार आहोत - निराशा आणि निराशावादी विचार यातील सहसंबंध, तसेच त्या अनुषंगाने माणूस नकारात्मक कसा घडतो, त्या नकारात्मकतेशी सकारात्मक लढा देणारा विचार कसा निर्माण होऊ शकेल याचे. निराशावाद ही संकल्पना मांडण्याचे कारण असे, की ती कोणा एका माणसाची समजूत नाही, तर ती सामाजिक मानसिकता आहे. ज्याचा परिणाम प्रत्येकावर होत असतो. परंतु, त्याचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येकाला आपापला करावा लागतो. कोणत्याही विचाराचे व्यवस्थापन करायचे म्हणजे, त्या विचाराने प्रभावित न होता रोजच्या छोट्या छोट्या प्रसंगात तो विचार मर्यादित करून स्वतःची मानसिकता हाताळायला शिकायचे, जेणेकरून समायोजन क्षमता वाढेल.

प्रथम निराशावाद समजून घेऊ. ‘वाद’ म्हणजे विचारांचा समूह, जो वैयक्तिक नाही, सामूहिक असतो. म्हणजेच निराशावाद हा नकारात्मक विचारांचा समूह आहे. माणसाचा कसा परिचय होतो या विचारांशी? आपण निराश व्हायचे असते हा विचार माणूस काही जन्माला येताना आपल्याबरोबर घेऊन येत नाही. तो लहानाचा मोठा होताना, घरी, दारी, आसपास, शाळेत, समाजात जे काही घडताना पहातो, त्यावरून आपल्याला येणाऱ्या अनुभवांवर किंवा प्रसंगांवर कशी प्रतिक्रिया द्यायची हे शिकतो. अर्थात त्याच्या अंतःप्रेरणाही याला करणीभूत असतात. निराशा येते तेव्हा असे दिसते, की त्या माणसाच्या मनोभूमिका, विश्वास, मूल्ये या सर्वांना घडलेल्या घटनेमुळे छेद मिळाला आहे. जे मनात आहे त्याच्या नेमके उलटे झाले आहे, ज्याचा त्रास होतो आहे. कारण ही मूल्ये, विश्वास हे तर जगण्याचे आधार होते. हे प्रासंगिक नसते. कारण जगण्याचा आधार, मूल्यांना छेद वगैरे कल्पना या एका प्रसंगातून आलेल्या नसतात. अनेक लोकांच्या बाबतीत, युगानुयुगे त्या तशा घडत आलेल्या असतात. त्याला अनेकांनी ठराविक अर्थ, प्रतिक्रिया दिलेल्या असतात. त्यावरून मग माणसाने स्वतःचे विश्वास ठरवलेले असतात, जे वर म्हटले तसे ‘सामाजिक मानसिकता’ या स्वरूपात दिसतात. हळूहळू ते ‘वाद’ होत जातात. 

मराठी विश्वकोश असे सांगतो, की निराशावाद कोणतीही तत्त्वप्रणाली, विचारांचा समूह वगैरे नाही, ते काही जीवनाचे सुव्यवस्थित दर्शनही नाही. तर एकुणातच रोजच्या घडणाऱ्या घटनांपासून ते मानवाच्या सामाजिक आणि वैश्विक जीवनाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आहे. आपल्या आयुष्यात बहुतांश दुःख, खेद, वाईट घटना, वैफल्य असेच जास्त आहे; चांगल्या तसेच मंगलकारी गोष्टींपेक्षा असे विचार करण्याची ही वृत्ती आहे. आसपास जे काही होते आहे, त्यात वाईट गोष्टी होण्याचीच अधिक शक्यता असते किंवा जे काही झाले त्यातून अमंगल असेच अर्थ निघतात, असा या दृष्टिकोनाचा मुख्य आधार. फक्त हा दृष्टिकोन सार्वत्रिक आहे. 

ग. दि. माडगूळकरांचे यांचे गाणे ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे..’ आणि तुकोबांचे हे चार शब्द, ‘सुख जवापाडे, दुःख पर्वताएवढे..’ हे म्हणजे माणूस आपल्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक आहे, हे कसे मानतो याचे समर्पक उदाहरण आहे. याचे कारण असेही म्हणता येईल, की अगदी लहानपणापासून प्रत्येक माणूस विरोध, नकार, अपयश, वेदना, शारीरिक आजार, जिवलगांचे विरह, मृत्यू अशा अनेक दुःखदायक घटनांमधून जात असतो. छान काम करण्याची इच्छा असणाऱ्या उत्साही मनाला अनेक वेळा नाउमेद होण्याचे प्रसंग येतात. हे फक्त सर्व सामान्य माणसाला नाही तर राजे महाराजे, श्रीमंत, कलावंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, सुर्जनशील कार्यकर्ते कोणाच्याही वाट्याला हे अनुभव येतात. अनेक कविता, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटके यातून या दुःखाचे विदारक चित्रण आपल्याला वाचायला, पाहायला मिळते. 

साक्षात गौतम बुद्धांच्या चरित्रातही या दुःखाचे वर्णन आहे. राजपुत्र सिद्धार्थ लहानपणापासून सर्व प्रकारची सुखे उपभोगीत असताना, वार्धक्य, रोग आणि मृत्यू या तीन प्रखर दु:खांचे त्याला दर्शन होते, तेव्हा तोही वैराग्यप्राप्तीसाठी सर्व वैभवाचा त्याग करतो. सर्व धर्मांत आणि विविध तत्त्वज्ञानांत जे मांडले गेले आहे, ते याच दुःखांवरच्या उपायांबद्दल आहे. तपशीलवार अभ्यास केला तर या तत्त्वज्ञानाची निराशावादी भूमिकाही आहे असे दिसते. ज्याचे सार म्हणजे ‘संसार आणि लौकीक जीवन म्हणजे मोहाने भरलेले आहे आणि त्यातून बाहेर पडलो तरच आपल्या आत्म्याची मुक्ती आहे,’ असे काही म्हणणे. पण तत्त्वज्ञानाची याच्या बरोबर उलटही भूमिका आहेच, जी आशावादी आणि अत्यंत सकारात्मक आहे. ज्याचे सार म्हणजे ‘शिस्त आणि साधना यातून याच संसारात आपण मंगलमय वातावरण निर्माण करू शकतो आणि स्वतःला गाढ शांततेचा अनुभव देऊ शकतो,’ असे आहे. चाणाक्ष वाचकांच्या हे सहज लक्षात येईल, की दोन्ही भूमिकांचा रोख एक असला तरी मार्ग वेगळा आहे. एकात सोडवणूक या अर्थाने मुक्ती आहे, तर दुसऱ्यात मुक्तीच्या निर्मितीची प्रक्रिया, प्रेरणा आहे. एकात मोहापासून दूर जाणे, तर दुसऱ्यात अभ्यासपूर्ण शिस्तबद्ध उपभोग आहे, जो चिरंतन आनंदाचा स्रोत आहे.

हा आशावादी विचार, दृष्टिकोन हाच निराशेचे व्यवस्थापन करायला शिकवतो. आशावाद हा नेहमीच काहीतरी चांगलेच घडणार हे सांगत नसतो, तर जे काही घडणार आहे किंवा घडले आहे ते सर्वच वाईट नाही, चांगलेही आहे, फक्त तसे पाहण्याची दृष्टी विकसित करायला हवी, हे आशावाद सांगतो. ही खोटी समजूत किंवा स्वप्नवत अवस्था नक्कीच नाही. यामध्ये थोडे विज्ञान आणि या जीवसृष्टीचा अभ्यासही आहे. ज्यामुळे भोवतालच्या सृष्टीबद्दलचे संवेदन हे बहुआयामी होण्याची संभाव्यता अधिक आहे. 

एक विचार असा करूया, की आपण काळजी घेतली तरी सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांना छेद देणारी अस्वस्थता आपल्यापर्यंत आणि आपल्या मुलांपर्यंत पोचतेच. नैसर्गिक आपत्तीपुढे माणसाला सपशेल झुकावेच लागते. मग त्यावेळी आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःख आणि वेदनांना कोणी ना कोणी जबाबदार आहे किंवा ते आपले वाईट नशीब तरी आहे; नाहीतर आपल्यासारखा माणूस नाही, हा समज समस्त जगावर त्रासदायक, दुःखद असा आरोप करून या निराशावादाकडे घेऊन जातो. त्याउलट आशावादातील विज्ञान सांगते, की भोवतालची भौतिक आणि अभौतिक सृष्टी ही माणसाचा आनंद, सुख, शांतता, हित, प्रगती या संबंधात संपूर्ण निष्पक्ष आहे. काही गोष्टी या निसर्ग नियमाप्रमाणे होणारच आहेत, जसे जन्म आणि मृत्यू, त्यात चूक बरोबर, पाप पुण्य असे काही नाही. 

सामाजिक विज्ञान सांगते, की समाज माणसांचा आहे, तो माणसाने तयार केला आहे, त्यात सगळे सारखे नाहीत. त्यामुळे सगळ्या गोष्टी कोणा एकाच्या मनासारखे होणे शक्यच नाही. कोणाला काही न्याय वाटेल, तर कोणाला काही अन्याय. काहीही होऊ शकते. हा विचार वास्तववादी आहे आणि म्हणून नकारात्मक नाही, जे आहे ते सांगणारा आहे.

अजून एक गोष्ट इथे समजून घ्यायला हवी, की विज्ञान वर्गीकरण करते, विविध अवस्था सांगते, पातळ्याही ठरवते. पण काय योग्य अयोग्य, चांगले वाईट, सुखकारक दुःखकारक.. असे भावनिक अर्थ त्याला देत नाही. प्रसंगांना मिळणारी मानवी मनाची भावनिक प्रतिक्रिया ही त्या घटनेबद्दल भीती, काळजी, चिंता म्हणून मग नकार हे सार्वत्रिक स्तरावर निर्माण करते. आज बुद्धिमत्ता, हुशारी, यश, मिळकत, फायदा, न्याय, सुख, आनंद याला खूप महत्व का आहे, कारण त्या गोष्टींना मिळणाऱ्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत, सकारात्मक आहेत, त्या गोष्टी सर्वांनाच हव्या आहेत. त्याउलट एकुणातच दुःखाकारक गोष्टींना नकार आहे. इतकेच नव्हते तर ते होऊच नये, घडूच नये असे म्हणणे आहे. 

ज्याला विज्ञान समजले त्याला सुख दुःख याची क्षणभंगुरता समजते, मग भावनांचे व्यवस्थापनही जमते. अनुभवांचे वर्गीकरण डोक्यात पक्के असूनही जास्त शेरेबाजी, शिक्केबाजी होत नाही. ‘समता-समानता नाहीच कुठे’ हे समजल्यामुळे ‘विषमता’ समजून घेता येते. असे होणारच कधी ना कधी, कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत.. काल कोणी दुसरे, आज मी, उद्या आणखी कोणी.. कधी कोणी जात्यात, तर कधी पोत्यात.. प्रत्येकाला जायचेच अशा अनुभवातून, पण म्हणून सगळे आयुष्य आणि हे जग दुःखद नाही हा विचार मनात मुरत जातो आणि घडणाऱ्या घटनांचे धक्के कमी तीव्रतेचे असण्याची शक्यता वाढते. जसे सर्वात दुःखकारक आणि वेदना देणारा प्रिय व्यक्तीचा मृत्यू हासुद्धा ‘माझ्यापासून काळाने हिरावून नेलेली गोष्ट’ असे कायम न वाटता; सुरुवातीला होणाऱ्या दुःख वेदना यानंतर त्या ‘व्यक्तीच्या जगण्याच्या प्रवासाचा तो अंतिम टप्पा’ हे सत्य स्वीकारता येते.

हा विज्ञानवादी आशावाद आपल्याला नकारात्मक आणि निराश विचारांना जोरदार टक्कर देणारा आहे. तसेच, रोजच्या घडणाऱ्या घटनांपासून ते विनाशकारी घटनांपर्यंत जरुरीपुरते नाराज, निराश होऊन एरवी त्यातून निर्माण झालेल्या नकारात्मक विचारांचे व्यवस्थापन करणारा आहे. हा समजुतीचा आणि शहाणपणाचा विचार आपल्या जडणघडणीचा भाग असायला हवा. आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीची कारणे स्वतःला नेहमी देण्यापेक्षा अभ्यासाने आपली मानसिकता बदलण्याकडे आपण वाटचाल करायला हवी. आता जडणघडण ही फक्त लहानपणीच होऊ शकते असे एक जनमत आहे, पण ते संपूर्ण सत्य नाही. आता या वयात काय बदलणार, असे तर अजिबात नाही. ज्याक्षणी मनात ठरवले, ती सुरुवात! शिकणे हे शेवटपर्यंत सुरू राहू शकते. त्यामुळे स्वतःला घडवणे, बदलणे हाच एकमेव मार्ग आहे. घडवायचे म्हणजे नेमके काय करायचे ? कशामध्ये बदल हवा हे आपण पुढच्या लेखात पाहू.

संबंधित बातम्या