आग्रहातील ‘च’ आणि निराशा 

डॉ. पल्लवी मोहाडीकर कासंडे 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

मनतरंग

मागच्या लेखात पाहिले, की विज्ञानवादी आशावाद आपल्या नकारात्मक विचारांचे व्यवस्थापन करणारा आहे. त्यासाठी समजुतीचा आणि शहाणपणाचा विचार आपल्याला स्वतःमध्ये रुजवायला हवा. आपल्या नेहमीच्या मानसिकतेमध्ये थोडासा बदल करायला हवा. हा बदल म्हणजे काय याचे मनन आज आपण करूया. 

आपण सगळे अगदी लहानपणापासून परिवर्तन हा जगाचा नियम आहे असे शिकत आलो आहोत. इतकेच नव्हे तर रोज थोडे थोडे आपण बदलतही असतो.. आपल्याही नकळत, सहज! बघा कधीतरी विचार करताना असाही विचार करतो आपण, की १० वर्षांपूर्वी मी कशी होते/कसा होतो आणि आज काय आहे. सर्व परिस्थितीशी जुळवून घेताना अमिबा इतके जलद नाही, तरी स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद आपल्यात असतेच. परंतु जेव्हा आपल्या इच्छा, संकल्प आणि विचार याबद्दलचे आपले हट्ट, आग्रह आणि काही विश्वास जे आपल्याला बरे, योग्य वाटू लागेलेले, आपल्यासमोर येतात मग तेव्हा हे परिवर्तन नकोसे अथवा अवघड वाटू लागते. हे हट्ट आणि आग्रह आपल्या रोजच्या जगण्याचे नकळत आधार झालेले असतात. त्यामुळे त्यात बदल, हे न पटणारे असू शकते. 

एक उदाहरण घेऊ. उत्तम करिअर घडावे असे वाटणे हे स्वाभाविक आहे. बहुतेकांना वाटते. त्यासाठी आवश्यक असे शिक्षण आपण घेतो. विविध कौशल्ये प्राप्त करून घेतो. जगातील उपलब्ध संधीचा फायदा करून घेताना असणाऱ्या स्पर्धेशीही सामना करायची तयारी आपण करतो. हे सर्व ठीक, छान चालू असताना अपयश येऊ नये, मनाविरुद्ध घडू नये, जे करत आहोत त्याचा उपयोग व्हावा, कोणी आपल्यावर अन्याय करू नये, कोणी फसवू नये असेही वाटणे हेही अगदी स्वाभाविक आहे. पण ते ‘वाटणे’ आहे. परिस्थिती तशीच असेल किंवा तसेच घडेल याची खात्री देता येत नाही. अशावेळी अपयश येऊ‘च’ नये, मनाविरुद्ध घडू‘च’ नये हा आग्रह जरा आपल्याला नाराजीकडे घेऊन जाणारा असतो. म्हणजे आपल्या इच्छा आणि संकल्पांच्या मागे आपण ‘च’ लावला की मनातील भावनिर्मिती बदलते. ‘असे होता‘च’ कामा नये’ असे आपण म्हणत गेलो की मग स्पर्धा, आपल्यापेक्षा चतुर, धूर्त माणसे, स्वतःचे मार्केटिंग उत्तम करू शकणारी माणसे, एखाद वेळी आपल्याला त्यांच्या ताकदीच्या जोरावर दाबू पाहणारी, आपली गळचेपी करू पाहणारी माणसे, आपल्या विश्वासाला तडा जाईल असे काही वागणारी माणसे. ही आपल्यात फक्त नाराजी नाही, तर दुःख वेदना निर्माण करणारी नैमित्तिक कारणे ठरतात, जी निराशेला जन्म देणारी असतात. तरीही त्या ‘च’ चा आग्रह सोडावा असे पटकन सुचत नाही. 

मी हुशार आहे पण मी मेंटल गेम खेळू शकत नाही, असे वाटून मग अजूनच गळपटल्यासारखे होते. आपल्याला नीट लढता येत नाही आणि आपला गैरफायदा घेतला जातो आहे, अशी जाणीव मनात राग आणि तीव्र निषेध उत्पन्न करणारी असते. हे सारे स्वाभाविक आहे.. सुरुवातीला असे होणार. पण इथे आपला समजुतीचा विज्ञानवादी दृष्टिकोन मदतीला आला, तर या नकारात्मक भावनांवर मात करता येते. 

प्रत्येक घटना कशी घडावी आणि त्यात कोणाची काय भूमिका असावी याबद्दल आपल्या मनात नियमावली तयार असते. त्यानुसार आपण स्वतःकडून आणि अनेकांकडून अपेक्षा करत असतो. समोरचा शत्रू असेल तर ठीक, पण मित्राने फसवले तर मनात हाहाकार उडतो. साधारणपणे कोणी फसवू नये, विश्वासघात करू नये, राजकारण खेळू नये ही इच्छा असणे संयुक्तिक आहे. पण त्या इच्छांपुढे ‘च’ आला की मग तसे घडले नाही की दुःख वेदना निर्मितीला सुरुवात झाली म्हणून समजा. जसे मित्राने कधीही असे वागूच नये. तो विश्वासघात सर्वांत वाईट... आहे की नाही असा समज आपला? 

असे किती ‘च’ चे आग्रह किंवा हट्ट असतात आपले? अल्बर्ट एलिस म्हणतो की साधारण दहा! जे ‘काय घडावे’, ‘कसे असावे’ याबद्दल असतात. जसे मी नेहमीच गुणांनी युक्त असायला हवे (किंवा कोणीही, माझी मुले-बाळेही), चुकीला शिक्षा मिळायलाच हवी, आपल्याला प्रेम मिळायलाच हवे, कधीतरी कमी कष्टात जास्त सुख मिळायला हवे (मोफत मिळाल्यास अधिक चांगले) मग नुकसान झाले किंवा खरेदी करताना लुटले असे वाटले की अंगाची आग आग होणार. प्रेम मिळावे, मैत्री असावी, कोणाची सोबत असावी.. हे छान आहे. माणूस सामाजिक प्राणी असल्याने कोणाशी तरी जोडला जातोच; परंतु आपल्याला वाटते की अमक्याशी जोडले जावे तोच आपल्याशी जोडला जावा असा नियम आपण मनात बनवतो. तसे झाले नाही तर? 

तर मग साहजिकच दुःख आणि भावनिक आघात हे इतर लोकांमुळे, परिस्थितीमुळेच होतात, हे भीतीदायक आहे तर त्याचा विचार मी करायलाच हवा, माझ्या ताब्यात अनेक गोष्टी राहतील असे काही मी करायला हवे.. आणि तसे जर झाले नाही तर मला प्रश्नांना सामोरे जाता येणार नाही व ते खूप भयंकर काहीतरी असेल... असेही विचार, निर्माण व्हायला सुरुवात होते. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे हा निराशावादाचा एक भाग आहे. त्यामुळे असे सारे कपट, वेदना, दुःख आहेच असे मानून, मनात संकल्पपूर्तीच्या प्रक्रियेला जोडले जातात. आपण खूप सावध, खूप तर्क लावून, सतत परिस्थितीचे विश्लेषण करत राहतो, स्वतःला या निराशेच्या दिशेने नेत राहतो. अगदी सर्व निराश झाले नाहीत तरी उगाचच धास्तावलेले राहण्याची शक्यता असते. जर अशी चिंता कोणी करत नसेल तर त्या माणसाला बेजबाबदार, कोडगा ते निर्भय, बेफिकीर असे शिक्के अगदी सहज मारले जातात. म्हणजे पाहा, आपल्याला काय बदल करायचा आहे तर जे आपल्या मनात असेल, ते व्हावे अशा सदिच्छा यांना नाही तर ते व्हायला‘च’ हवे यात बदल करायचा आहे. ‘च’ वगळायचा आहे. 

कसे ते पाहू.. ‘तन, मन धन अर्पून हा मी एक प्रोजेक्ट करतो आहे. त्याला जर बाजारात रँकिंग मिळाले तर मला आणखी गुंतवणूकदार मिळतील आणि मग माझा व्यवसाय जोरदार गती पकडेल..’ हा संकल्प, इच्छा हे उत्तम. इथे रँकिंग मिळायला‘च’ हवे असे आग्रहपूर्वक मानले नाही, तरी आपण प्रयत्न तर करणार. कारण व्यवसाय उभा राहण्याची खूप मोठी शक्यता आहे. जे सकारात्मक आहे. परंतु जसे आपण आहोत तसे अनेक स्पर्धक आहेत. मी उत्तम आहे असे मला वाटत असेल तर अनेकांनाही तसेच वाटत असणार.. मी जसा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तसाच अनेक जण करत असणार.. शिवाय अशा अनेक गोष्टी, की ज्या माझ्या हातात नाहीत, ज्या मला समजल्या नसण्याची शक्यताही आहे.. म्हणून.. ‘समजा नाही मिळाले टॉप रँकिंग तर.. माझ्या हातात याच तोडीचा प्लॅन ब, क, ड... हवा. किमान कागदावर मांडलेला तरी!’ हा विचार सकारात्मक आहे की नाही? 

पाहा हं, इथे प्रयत्न कमी पडत नाहीत तर अपयशाची संभाव्यता गृहीत धरून मनाने आधीच सृजनशील राहून, आधीच बराच बाजाराचा अभ्यास करून, गुंतवणूकदार माझ्याकडे कसे आकर्षित होतील याचे बरेच प्लॅन विचारात घेतले आहेत. तरीसुद्धा त्या स्पर्धेत विजयी होता आले नाही तर काही क्षण तीव्र दुःख आणि वेदना होण्याची शक्यता आहे; पण त्याबरोबर दुसऱ्या याच तोडीच्या पर्यायांचा विचारही आहे.. मग सांगा निराशा थोडी टाळता येण्याची शक्यताही वाढली की नाही? आणि नेहमीच मनाला भरपूर नावीन्यपूर्ण विचार करायची सवय लागली तर मग एका ठिकाणाहून येणाऱ्या अपयशाचा अर्थ.. ‘माझे नशीबच फुटके’ असा न होता.. ‘मी कायम समर्थ - सर्व यश अपयश झेलायला, पचवायला’.. असा होऊ शकतो की नाही? बरे यात नियोजनासाठी मदत मिळूच शकते. आज असे लाइफ कोच आणि मेंटॉर, समुपदेशक आहेतच .. जे आपल्याला नेमके काय चुकतेय, कशाचा अंदाज नीट येत नाहीये हे सांगायला. 

ही बरीच नोकरी, करिअरविषयक उदाहरणे आहेत. असेच अनेक बाबतीत होणार नाही का? घरातल्या प्रश्नांनी बेजारही अनेक जण आपण असतो. त्यावेळी प्रश्न गळ्याशी आले, अगदी सहन होत नाही असे वाटले की कोणाशी बोलतो. काही लोक तर बोलतच नाहीत आणि एका सुंदर जगण्यात नाराज होण्याचे पत्करतात. कोण माझे प्रश्न सोडवेल असे वाटते. पण प्रश्न सोडवण्याआधी आपल्या विचारात ज्या त्रुटी असतात आणि वर जे ‘च’ चे आग्रह आपण म्हटले त्या विषयी थोडा विचार करायची आवश्यकता असते. मग आपलाच दृष्टिकोन बदलतो, मनातली भीती बदलते, वास्तवाचे भान येऊन आपणही जरा निवांत होतो. जर आपल्या प्रतिक्रिया आणि परिस्थितीला प्रतिसाद यामुळे बदलल्या तर आपल्या आजूबाजूचेही आपल्या बाबतीत त्यांची भूमिका बदलण्याच्या शक्यता वाढतात. 

प्रेमभंग, घटस्फोट आर्थिक, नैसर्गिक आपत्ती याही अत्यंत तणाव निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये जर वेळेवर किंवा जाणीव झाल्यावर जर आपण आपल्यात बदल केले, तर आहे ती परिस्थिती आपण आधीपेक्षा नक्कीच चांगल्याप्रकारे हाताळू शकतो. तसेच निराशेत जाण्यापासून आणि आयुष्य दुःखी आहे हा समज निर्माण होण्यापासूनही स्वतःला वाचवू शकतो. इथे नकळत ‘नकार पचवण्याची ताकद’ आपण स्वतःमध्ये निर्माण करत असतो. त्याचप्रमाणे कधीतरी माझ्या परिस्थितीत बदल होईल असा विचार करत अनेक  अनेक घटनांना आघात म्हणण्याच्या मानसिकतेमधून बाहेर पडून आपल्यासाठी योग्य असा निर्णय घेता येण्याची ताकदही निर्माण करत असतो. याबद्दल अधिक तपशीलवार पुढच्या लेखात.. काही अशाच आपल्या रोजच्या जगण्यात आपण अनुभवत असलेल्या घर आणि नातेसंबंधांतील उदाहरणांसह!

संबंधित बातम्या