हक्क, नकार आणि निराशा 

डॉ. पल्लवी मोहाडीकर कासंडे 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

मनतरंग

मनतरंग ःमागच्या लेखात आपण ‘च’ चे आग्रह आपल्याला नाराजी आणि दुःख याकडे कसे घेऊन जातात हे पहिले. हे नकार पचवायचे यासाठी जी विचारांची बैठक तयार व्हायला हवी त्याचे मनन आज करूया. ही वैचारिक बैठक प्रतिबंधात्मक आणि प्रतिसादात्मक अशा दोन्ही बाजूंनी आपल्याला मदत करते. ती ताकद आहे प्रत्येक माणसाची. जी सकारात्मक जगण्याचा भाव राखायला मदत करते. 

प्रथम नकार या शब्दावर थोडे बोलू. नकार म्हणजे आपल्याला काही हवे असताना कोणी न देणे, ते न मिळणे, खूप कष्ट करून साध्यापर्यंत न पोचता येणे, इथपासून ते कोणी आपल्याला त्यांच्या आयुष्यातून दूर करणे, नातेसंबंधातील नकार, प्रेमातील नकार इथपर्यंत सर्व. हे नकार विविध प्रतिक्रिया आणि वर्तणूक प्रकार यामध्ये परिवर्तित होण्याची शक्यता असते. काही वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून मुलींच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याचे प्रकारही घडले आहेत. आजही काही मिळाले नाही म्हणून रागारागात कोणाची हत्या ते आत्महत्या करण्याच्या बातम्या आपण ऐकतो. घातकी कृत्य करण्यापर्यंत जेव्हा कोणाची मजल जाते तेव्हा ती मनाची निराश अवस्थाच असते. नैराश्य हिंसेकडे घेऊन जाणारे असू शकते (फ्रस्ट्रेशन लीड्स टू अग्रेशन) असे मानसशास्त्रही सांगते. नकार सहन न झाल्याने निराशेच्या अशा कितीतरी विविध अवस्था दिसू शकतात. फक्त दिङ्‍मूढ होऊन बसणे, अपराधी वाटणे म्हणजे निराशा असे नव्हे, तर कित्येक वेळा द्वेष, मत्सर, सूड भावना हेही निराश मनोवृत्तीचेच प्रकार आहेत. 

नकार आणि त्यातून होणारी चिडचिड, नाराजी हे कशाचे प्रतिबिंब आहे? तर एखाद्या इच्छेमध्ये असलेली खूप गुंतवणूक, मग आपणच त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी त्या एका पातळीवर स्वतःची केलेली अडवणूक. मिळत कसे नाही तेच बघतो असा तो भाव. हे माझेच आहे, माझ्या हक्काचे आहे असा आग्रह. याचा अर्थ काही मिळवण्यासाठी एरवी करावी लागणारी धडपड, जिद्द, चिकाटी तसेच आपल्या मनात अनेकांबद्दल दाटून येणारे प्रेम, माया.. व्यर्थ नाही. त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही हे अजिबात स्वीकारता न येणे हे समाजविघातक आणि आत्मविघातक अशा कृती/भावना निर्मितीकडे जाण्याची शक्यता असते ते काळजीचे आहे. 

या विचाराची पाळेमुळे शोधूया. कारण प्रश्न असा पडतो, की अश्मयुगापासून आजपर्यंत माणसाने जी प्रगती केली आहे त्या पार्श्वभूमीवर आज ही निराशा आणि त्यावरच्या कृती या प्रगतीचे चिन्ह आहेत का? माणूस सांस्कृतिक म्हणजे सिव्हिलाइज्ड केव्हा झाला? विचार करा! असे म्हणतात, की जेव्हा शिकार करताना किंवा आलेल्या संकटाचा सामना करताना कधीतरी एका माणसाचे कमरेचे हाड मोडले.. ते जेव्हा भरून आले आणि तो पूर्ववत आपल्या कामाला लागला तेव्हा ती सांस्कृतिक जीवनाची सुरुवात होती. कारण कमरेचे हाड मोडले तेव्हा त्याच्या बरोबरीच्या माणसांनी त्याची काळजी घेतली. त्याला बरे होण्यासाठी मदत केली. ही घटना एरवी ‘पशु’ या अवस्थेतून माणसाला पुढच्या अवस्थेत नेणारी ठरली. कारण प्राणी मग ते कोणीही असो, आपल्या गटातल्या जखमी भिडूला मागे ठेवून पुढे जातात. कोणी त्याच्यासाठी फार थांबत नाही. तसेच जो सक्षम तो जगेल, बळी तो कान पिळी हेही निसर्गाचे नियम. परंतु इथे त्यावेळी जो सक्षम होता तो काळजी घेणारा ठरला. विविध समाज आणि संस्कृती अशाच उदयाला आल्या. त्यात आपापल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येकाला जगात यावे म्हणून रीती परंपरा आल्या. ठराविक भूमिका आल्या. जबाबदाऱ्या आल्या, कर्तव्य आली तसे हक्क, अधिकारही आले. 

म्हणजे, आपल्याबरोबर इतरांचाही विचार झाला पाहिजे हा विचार उत्क्रांतीच्या प्रक्रियेचाच एक भाग होता. पण समाजजीवन प्रस्थापित झाल्यावर जसजसा भौतिक विकासाचा आलेख वाढत गेला, तसा माणसाच्या इच्छांचाही वाढला. मग भौतिक सुखसोयी, त्यांची लोकसंख्येच्या अनुषंगाने निर्मिती, त्या पुरेशा असणे - नसणे यातून मग इच्छा, गरजा आणि त्यांची पूर्तता यांची गुंतागुंत वाढत गेली असणार. मग त्या कोणाच्या पूर्ण व्हाव्यात, कोणाच्या नको यामध्ये स्पर्धा, चढाओढ आली. तिथेच इच्छा आणि हक्क या मध्ये गडबड व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर इच्छांच्या घोळातून ‘मालकी हक्क’ही निर्माण झाला. फक्त जमिनीवरचा हक्क नव्हे, तर माझ्या कर्माच्या फळावरचाही हक्क! मी राबलो, मी केले तर त्याचा फायदा मला मिळायला हवा.. मी प्रेम केले, मी सेवा केली, मी मदतीला धावून गेलो तर त्याचा काहीतरी मोबदला मला हवा किंवा जे माझे आहे, संपत्ती, घर, गाडी वगैरे, माझ्या प्रेमाच्या माणसांना जरूर देईन आणि मलाही माझे वडिलोपार्जित मिळावे पण मग इतरांना ते का मिळावे? जसे आईवडिलांच्या कमाईवर मुलांचा, वारसदार यांचा हक्क आहे, पण म्हणून समाजातल्या कोणाचाही हक्क नाही. मग झगडा सुरू झाला तो कोणाला काय मिळाले, कसे मिळाले, त्याला मिळाले तर मला का नाही? तसेच त्यातून कोणाला न्याय मिळाला तर कोणावर अन्याय झाला याचा! 

यावर उपाय म्हणून माणसाने विचार केलाच की! अनेक तत्त्ववेत्ते आणि विचारवंत यामुळे जगण्याची उच्च मूल्येही प्रस्थापित झाली; ज्यामध्ये ‘सर्वेपि सुखिनः संतू सर्वे संतू निरामया’ किंवा ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ हाच भाव होता - आहे.. पण तंत्रज्ञानात प्रगती झाली, तशी माणसाच्या मेंदूमध्ये, मनामध्ये झाली का? का आजही आपण या इच्छा आणि हक्क याच घोळात आहोत? 

काही आजच्या काळातली स्वगते विचारात घेऊ.. ‘हे माझे कष्टाचे आहे, माझ्याकडून ते हिरावून नेलेय’, ‘माझा हक्क होता यावर, पण अमुक तमुक दुसऱ्याला मिळालेय’, ‘माझ्या हुशारी बुद्धीला साजेसे अजून मला मिळालेच नाही’, ‘खूप मोठे काम उभे राहावे  
म्हणून चालली आहे धडपड, पण कोणी साथ देत नाही’, ‘सर्व जाऊ दे, समजून घे रे मला तू फक्त, दुसरे काही नको’, ‘कॉमन सेन्स इज सो अनकॉमन’, ‘आपली गरज संपली की लोक निघून जातात रे, कोणी उरत नाही’.. आणि अशी बरीच लिहिता येतील. 

वर नमूद केलेल्या सांस्कृतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरवरील स्वगते ही अगदी स्वाभाविक आहेत. परंतु ही सर्व स्वगते आपला आपल्याशी संघर्ष वाढवणारी आहेत. या अगदी नकळत अशा अपेक्षा आहेत ज्यासाठी मग प्रत्येकाला शांत, समजूतदार, दिलदार, त्यागी मनाचीच माणसे नातेवाईक म्हणून, सहकारी म्हणून मिळणे, त्यांनी चांगलेच वागायला हवे असे नाही का होत?.. यामुळे मग या इच्छा जगण्याचे वास्तव नाही, तर गृहितके बनतात; नकळत प्रत्येक मनात. 

एकमेकांच्या मानसिक, भावनिक गरजांची पूर्तता करणे कुटुंब म्हणून, सहकारी म्हणून, मित्र म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे अगदी खरे आहे. परंतु त्याप्रमाणे सर्वांना वागता येणे शक्य असेल किंवा नसेल. कोणी धीट असेल, कोणी पळपुटा असेल, कोणी जिद्दी असेल, कोणी रडका असेल, कोणी कामसू असेल, कोणी कामचुकार असेल, कोणी शांत तर कोणी भांडकुदळ असेल.. आपल्या आईवडील, भावंडांपासून ते सहकाऱ्यांपर्यंत कोणीही कसाही असू शकतो. पण मनातून कोणाला असे कोणीही चालतील? शिवाय साधारणपणे जो तो आपापल्या नजरेतून परफेक्ट असणार! 

याचा अर्थ असा, की स्पर्धा इच्छांची आहे तशी ती गृहितकांचीपण आहे. आपली गृहितके बदलायला हवी आहेत. ‘इच्छापूर्ती गृहीत धरणे’ हेच एक धाडस आहे. गीतेमधील कर्मयोग हेच सांगतो. कर्म आणि कृती कोणालाच सुटल्या नाहीत. त्या सर्वांनीच करायच्या आहेत. परंतु, आपल्या इच्छेप्रमाणे घडेल हा मोह मात्र सोडून द्यायला हवा. तिथे जीव अडकला की हेतू, मार्ग, साधननिर्मिती सर्वच त्या मोहाच्या अमलाखाली जातात. संकल्प असावेत. लघुकालीन, दीर्घकालीन उद्दिष्ट असायला हवीत. त्यानेच जगण्याला, कार्याला, कोणत्याही नात्यालासुद्धा दिशा मिळेल. पण म्हणून नकारात्मक भावना निर्माण होईपर्यंत त्या इच्छांमध्ये, संकल्पांमध्ये गुंतवणूक करायची का? ही निवड नक्कीच आपल्या हातात आहे. 

यातून बोध घ्यायचा तो असा की नकार हा कोणत्या एका वस्तूला, माणसाला किंवा इच्छेला मिळणारा नाही; तर तो आपल्याच मनात निर्माण झालेल्या मालकी हक्कांच्या विचाराला आहे. मग कोणी मला, माझ्या प्रेमाला नकार देत असेल, माझ्या काळजीला योग्य प्रतिसाद देत नसेल तर त्यात त्या समोरच्या माणसाचीपण एक बाजू आहे. जे मला आवडेल ते मला मिळावे हे ठीक; पण जर मिळाले नाही तर तो कोणाचा दोष नाही. इतके मोठे जग, किती सारे मार्ग, किती नवनवीन साध्य याची मुबलक उपलब्धी असताना कुठल्या एका मोहात स्वतःची अडवणूक करायची का असा विचार करून पाहूया! 

तरीसुद्धा समाजाने मान्य केलेले अधिकार, हक्क आपल्याला मिळाले नाहीत तर आपण लढू शकतो, त्याविषयी आवाज उठवू शकतो, आपली गळचेपी करणाऱ्याला आपल्या जबाबदारीवर काहीही उत्तर देऊ शकतो. पण दुःखी, कष्टी, हिंसक, निराश व्हायला हवे असा नियम नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या संवेदन आणि क्षमतेप्रमाणे असण्याचे ते स्वातंत्र्य आहे, जे आपल्यालाही आहे. शिवाय सतत मला हवे, मला मिळावे अशी आपली घेणाऱ्याची भूमिका देणाऱ्याच्या भूमिकेतही परिवर्तित व्हायला हवी. ही वैचारिक बैठक झाली. ही वैचारिकता आपल्यात कशी रुजेल याचा प्रयत्न करूया. 

तरी हे सर्व ठीक हो, पण आत्ता संकट आहे असे वाटते आहे, आत्ता नुकसान झालेय, अपयश येतेय, खूप काळ वाट पाहावी लागतीये त्याचे काय करायचे हा प्रश्न उरतोच.. यावर चर्चा करूया पुढील काही लेखांत!

संबंधित बातम्या