अपयशाला सामोरे जाताना

पल्लवी मोहाडीकर कासंडे 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

निराशा आणि निराशावादी विचार यांच्याशी लढा देणारी वैचारिक बैठक मागच्या काही लेखात आपण पाहिली. ती बैठक आपल्याला निराशेत जाण्यापासून वाचवते. मनाला सृजनशील आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लागली असते. तरी अपयशाला समोर जावं लागतंच, संकटं येतात, नुकसान होतं, एखाद्या वेळेला होत्याचं नव्हतं होतं, किंवा तशी चिंता, भीती सतत वाटत राहते. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रात हे ‘होत्याचं नव्हतं’ अनुभवलं आहे अनेकांनी. भावनिकपेक्षा तांत्रिक अडचणी अधिक आहेत. अशा वेळी काय करायचं याचा विचार आज करूया. 

हे अपयश, शून्य अनुभवणं व त्यातून पुन्हा नव्यानं उभं राहणं हे सहज सोपं वाटत नसलं, तरी कोणत्यातरी पातळीवर नक्कीच शक्य असतं. बहुतेक वेळा अशा घटना अचानक, अनपेक्षित असतात. म्हणून मग मनाला एक धक्का असतो तो. पत्त्यांचा बंगला कोसळावा तसे त्या घटनेने मनातले भविष्यातले मनोरे कोसळलेले असतात. पुन्हा आपण शून्यावर आलो असं वाटतं, खूप मागं गेलो असं वाटतं. वीजपुरवठा खंडित होऊन एकदम मिट्ट काळोख दाटावा डोळ्यासमोर असं काहीसं किंवा मोठ्या प्रयत्नांनी नावेचा दोर खेचून किनाऱ्यावर तिला आणावं आणि दोरंच सुटावा... असं वाटून जातं. म्हणजे प्रत्यक्ष घटना काही घडो मनात त्याचे भाव असे काही उमटतात, की प्रत्यक्ष घटनेबरोबरच या भावनांना ही प्रतिक्रिया दिली जाते. 

अनेकवेळा बरेच काही करून जरा निवांतपणा हवा असतो, शारीरिक, मानसिक, भावनिक दमणूक झालेली असते म्हणून थोडी विश्रांती हवी असते. खूप खर्च झालेली ऊर्जा पुन्हा भरून घ्यायची असते.. पण याच क्षणी बसलेले धक्के मन.. पटकन सावरता येणं अवघड वाटतं. तर काही लोकांना किती ही प्रश्नांची मालिका, एकामागोमाग चालूच आहे, संपत नाहीये, समजतंय की बाहेर पडणार आहोत पण ताकद संपल्यासारखी वाटते आहे... असं जाणवतं. स्वप्रतिमा, समाजप्रतिमा यालाही धक्का पोचतो. आपल्याकडं लोक काय नजरेनं बघतील याची कल्पना करून स्वतःची दया येते. हे सारं, त्यामुळं, आर्थिक पोकळी निर्माण होताना मानसिक आणि भावनिक पोकळी निर्माण करणारंही ठरतं. 

ही पोकळी असली आणि त्यातून प्रत्यक्ष कृती घडेल का नाही असं जरी वाटत असलं तरी यातून विचारनिर्मिती आणि भावनिर्मिती होतच असते. जरी असं वाटलं, की ‘ब्लँक झालोय’, ‘नवं काही दिसत नाहीये’ तरी निराशाजनक विचारांची निर्मिती चालूच राहते. ते वर लिहिलेत त्याप्रमाणं नको इतके तयार होत राहतात. म्हणजेच याचा अर्थ असा, की निर्मिती होते हे नक्की. ती सकारात्मक विचारांची आणि सृजनशील कृतींची व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एका जागी खिळणं, पाय फसणं, त्यातून बाहेर पडता न येणं असं वाटतं म्हणून पुढं पाऊल टाकायची भीती वाटते. घडलेल्या घटनेचा धसका बसतो. 

हे सर्व सांगण्याचा उद्देश हा, की संकट आलं तरी मेंदू साफ होत नाही, आपल्या क्षमता कमी होत नाहीत. केलेल्या कृतींची फळं अपेक्षेप्रमाणं मिळत नाहीत. त्यामुळं मनाचे उद्योग चालू राहतात. ‘विचारांचा रतीब चालू राहातो.’ जसं घातकी कृत्य करतानाही विचार आणि कौशल्यं लागतातच की. मेंदूला गंभीर इजा झालेला माणूस काहीच करू शकणार नाही. याचा अर्थ असा, की अपयशानंतर कौशल्यात भर पडायला हवी आणि मनाच्या उद्योगांना योग्य दिशा मिळायला हवी. तसंही परिस्थितीशी दोन हात करण्याची थोडी फार ताकद असतेच प्रत्येकात. जे कमी पडतंय असं जे वाटतं तिथं काम करायला हवं आहे. 

म्हणूनच अपयशाला कसं सामोरं जायचं हे समजणं हेच महत्त्वाचं. सामोरं जायचे सरळ सरळ दोन मार्ग. पुन्हा तीच गोष्ट नव्यानं करायची असेल तर थोडं मागं जाऊन उसळी मारून वर यायचं (बाऊंस बॅक), किंवा काही गोष्टींतून माघार घ्यायची आणि दिशा बदलायची. आपल्याला कोणता जमणार आहे त्याचा विचार मात्र ज्यानं त्यानं करायला हवा. खरंतर हे दोन्ही मार्ग एकमेकांशी जोडलेले आहेत. अपयशाचा भावनिक हिशोब न करता जर नेमकं कुठं चुकलं इतकाच विचार केला आणि स्वतःला दूषणं दिली नाहीत तर मग पुढचे मार्ग आखणं शक्य होत जातं. 

मागं जाऊन उसळी मारताना काय करायला हवं याची एक चतुःसूत्री आहे. कथक नृत्याच्या तत्कारांप्रमाणं हे चार तत्कार आहेत. १. तरी बरं.. २. त्यातल्या त्यात चांगलं काय? ३. तोपर्यंत काय? ४...तर पुढं काय? यातूनच दिशा बदलायची का तीच ठेवायची हा ही निर्णय घेता येणार आहे. 

पहिलं सूत्र - तरी बरं! याचा अर्थ असा, की काहीही घडलं की असं म्हणायचं की तरी बरं .. इतकंच झालं .. नाहीतर खूप काही होऊ शकलं असतं. तरी बरं मी वाचलो, तरी बरं सर्वच नाही गेलं, तरी बरं दुसरी संधी आहे ना, तरी बरं माझं कुटुंब सुरक्षित. खरंतर असा विचार केलेला असतो आपण. काय ‘राहिले’ हातात यावर अधिक लक्ष केंद्रित केलं तर आपली ‘नजर थोडी सुधारते’ आणि बरेच वेळा असं काही उरलेलं असतं आपल्या हातात. म्हणून आपली नजर स्थिरावायची आपल्या स्वतःवर, आपल्या क्षमतांवर! ‘सर सलामत तो पगडी पचास’.. म्हणजे आपण तर आहोत. विचार तर करू शकू, आज न उद्या काही नक्की सुचेल.. असा धीर नक्की स्वतःला द्यायचा. घटनेआधीचं नियोजन इथं कधीच निकष म्हणून पाहायचं नाही. जे काही घडलं त्याचा थोडाफार परिणाम होणारच आहे हे मान्य करायचं. सर्वच मार्ग कधी बंद होत नसतात. आर्थिकच नुकसान झालं, ते भरून येईल. नोकरीच गेली ना.. शोधावी लागेल पण मिळेल दुसरी. म्हणूनच एवढंच म्हणायला शिकायचं.. ‘तरी बरं मी आहे अजून कणखर!!’ 

दुसरं सूत्र - त्यात चांगलं काय? - याचा अर्थ असा, की चांगलं वाईट या कोणत्याही घटनेच्या दोन बाजू असतात. एका बाजूनं काही नुकसान होतं पण दुसऱ्या बाजूनं त्यातून काही नवं, चांगलंही निघू शकतं. एक मार्ग बंद झाला की दुसरा उघडतो किंवा एक मार्ग सोडावा लागतो तो दुसरा मार्ग घेण्यासाठी. अशावेळी जे सुटलं त्याचं दुःख नाही करत बसायचं. त्यातून पुढं जायचं. आत्ताच्या कोरोना परिस्थितीमध्ये अनेकांनी आपले मार्ग तात्पुरते बदलून नवीन निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेतलेला दिसतो. खुद्द सरकारनं प्रवासी विमान वाहतूक सेवा मालवाहतुकीसाठी वापरली, अनेक रेल्वेचे डबे वैद्यकीय मदत केंद्रे बनली. कित्येकांनी जीवनावश्यक वस्तूंची विक्री केल्याचंही दिसतं. याही पुढं तंत्रज्ञानाचा वापर अधिक होऊन अशीच अनेक औद्योगिक क्षेत्रात नवनवीन कामं उपलब्ध होणार आहेत. बंद पडलेले उद्योग नवीन रूपात सुरू होणार आहेत. प्रत्येक काळ्या मेघाला एक रुपेरी किनार असते, असं आपण अनेक कथांमधून वाचतो म्हणजेच कितीही संकट मोठं असलं तरी त्यातून नवीन चांगलं निघण्याची शक्यता असतेच. म्हणून मग तिसरी सूत्री जास्त महत्त्वाची. 

तिसरे सूत्र - तोपर्यंत काय? - मागं जाऊन उसळी मारताना थोडा वेळ जातोच. नवीन काही करायचं म्हटल्यावर तयारी लागतेच. नवीन शिकावं लागतं. त्यासाठी जो रिकामा वेळ आहे हातातला तो नवीन शिकून सार्थकी लावायचा. ज्या मार्गानं गेलो आणि यशस्वी होता आलं नाही, म्हणजेच थोड्या अधिक कौशल्याची जरुरत आहे. सुधारणेला नेहमीच वाव असतो असे म्हटलं जातं. मी शंभर टक्के प्रयत्न केले होते, पण परिस्थिती वाईट होती असं एकदा मानलं, की मग स्वतःकडं नीट पहिलं जात नाही. कोणीच सर्वगुणसंपन्न नसतो. पण जर वेळ मिळाला आहे तर त्यात नवीन शिकून घेण्यानं नवे संपर्क होतात, कार्याची नवी वर्तुळं दिसतात. ज्याचा कधी विचार केला नसतो असेही पर्याय समोर येतात. निर्माण झालेल्या शून्यात एक एक भर टाकण्याचीही छान संधी असते. व्यवसायातील अपयशाचा विचार करता तांत्रिक कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य यात काही कमी-जास्त झालं असण्याची शक्यता असतेच. म्हणून जर अपयशाचा हिशोब कागदावर सर्व बारीक सारीक तपशील मांडून केला तर नेमकं काय सुधारायचं ते लक्षात येतं. यातूनच चौथी सूत्री आत्मसात करण्याकडं आपण वळतो. 

चौथी सूत्री - तर पुढं काय? याचा अर्थ असा की आले अडथळे.. तर पुढं काय? प्रवासात सरळमार्ग नेहमी मिळतात असं नाही. काही नागमोडी असतात, कधी थोडा लांबचा वळसा घ्यावा लागतो. काही वेळा बदलावाही लागतो. पण नजर जिथं जायचं तिथंच असते. तसंच, समजा कलेच्या क्षेत्रात काही करायचं आहे किंवा व्यवसाय करायचा आहे, नाही जमलं सुरुवातीला, किंवा थोडं जमलं पण नुकसान झालं, तर काय? वर म्हणले तसं थोडा मार्ग बदलू, आणखी काही शिकू, नव्या ओळखी करू, नवे छंद जोपासून पाहू, नवे मार्ग आखून पाहू .. पुन्हा या मार्गाला येऊ. आहे ते स्वीकारून, काही काळ आर्थिक बाजू सांभाळून, घरची कर्तव्यं पार पाडून पुन्हा आपल्या व्यासंगाकडं नक्कीच वळता येईल. त्यात समजा दुसरा मार्ग छान वाटू लागला तरी ठीकच की! समाधान आहे कामाचं, आपल्या क्षमतांचा कस लागतोय, प्रगती होते आहे. हे छान नाही का? शेवटी कामातून आनंद मिळणं हेच खरं यश नाही का? 

ही सर्व सूत्री अमलात आणताना मन काही वेगळेच मार्ग अवलंबण्याचीही शक्यता असते. ज्याला ‘मीच्या संरक्षण यंत्रणा’ असं म्हणतात. त्या काहीवेळा पळवाटा असतात तर काहीवेळा नाराजीची समर्थनं, जी आपल्याला मागं ओढतात. अपयशाला सामोरं जाताना ती ओळखून त्यावरही मात कशी करायची त्याविषयी पुढील लेखात.

संबंधित बातम्या