‘मी’च्या संरक्षण यंत्रणा

पल्लवी मोहाडीकर कासंडे 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

मनतरंग ः

निराशावादी विचारांचा सामना करताना आवश्यक ती वैचारिक बैठक आणि काही प्रत्यक्ष उपाय याची आपण गेल्या काही लेखांमध्ये चर्चा केली आहे. निराशा म्हणजे फक्त दिङ्‍मूढ होऊन बसणं नाही तर काहीवेळा हिंसक प्रतिक्रिया आणि साध्या साध्या प्रसंगांना दिल्या जाणाऱ्या कडवट प्रतिक्रिया हेसुद्धा निराशेचं एक रूप आहे असंही आपण पहिले. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर मनन करू या. निराशेशीच जोडलेला हा विषय आहे; परंतु सहसा विचार न केला जाणारा आहे. 

अपयशातून येणारी निराशा किंवा तसे विचार याला सामोरं जाताना आपलं काय कमी पडतं आहे, चुकतं आहे हे समजून घेऊन ते सुधारत पुढं जाणं, स्वतःमध्ये बदल करत राहणं हा योग्य मार्ग आहे. सुरुवातीला बसणारे धक्के, वाटणारी खंत, खेद, दुःख यातून बाहेर पडून पुन्हा स्वतःच्या प्रगतीच्या दिशेनं जाणं हीच आशावादी विचारांची खरी पेरणी आहे. त्यासाठी आपल्या चुका स्वीकारणं आवश्यक असतं. स्वीकारणं याचा अर्थ त्यावर उपाययोजना करायला सज्ज होणं. वागण्यात सुधारणा करणं! नाहीतर आपले सर्व प्रयत्न थकले, हे जग असंच आपल्या हातून हिरावून नेणारं आहे असं वाटून वैफल्याच्या खाईत स्वतःला लोटणं हे तरी होतं, किंवा मग आपल्या अपयशावर काहीतरी समर्थनं शोधून मनात त्याची वेगळी मालिकाच तयार होते. याला मानसशास्त्राच्या भाषेत ‘मी’च्या संरक्षण यंत्रणा’ म्हणतात. कशाच्या संरक्षणार्थ असतात या..? तर स्वतःचे अहंकार, स्वप्रतिमा याच्या! 

प्रत्येकाची स्वतःबद्दल म्हणजे ‘मी असा/अशी का आहे’ याबद्दल, मनात एक प्रतिमा असते. ती तशी का असते त्यालाही मनात भरपूर मोठी पार्श्वभूमी असते. प्रत्येकाला ही प्रतिमा खूप महत्त्वाची असते. जसं मुलाला ‘मी’, ‘मला हे हवं’, ‘हे माझं’ असं समजायला लागतं तेव्हापासूनच या ‘स्व’चा आणि त्याच्या रूपाचा विकास मनात होत असतो. आपण कसे आहोत, आपल्याला काय वाटतं, आपलं स्वतःच्या शरीराबद्दलचं भान, आपल्या भावभावनांबद्दलचं भान, आपले विचार, संकल्पना यांचं आपलं स्वतःचं भान म्हणजे हा ‘मी अथवा स्व.’ स्वओळख ही संकल्पना हे सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक असं स्वतःबद्दलचं भान आणि ज्ञान असण्याबद्दलची आहे. तसंच यातून निर्माण होणारे विश्वास, तत्त्व, मान्यता, मूल्य या बद्दलचीही. यावर आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, परिस्थितीचा होणारा परिणाम आणि असणारा प्रभाव हे आहेच. जरी रोज थोडा थोडा आपल्यात बदल होत असतो तरी हे ‘मी’चं रूप आपल्या मनात आपल्याला हवं तसं आपण करून घेत असतो. त्या रुपाला, प्रतिमेला धक्का लागला तर अस्वस्थता निर्माण होते. 

आपण सर्वांना फसवू शकतो, पण स्वतःला फसवू शकत नाही.. स्वतःपासून दूर पळू शकत नाही. असं जे काय म्हणतो, त्याचा अर्थ असा की.. आपण कसे वागतो आहोत हे आपल्याला पक्कं माहीत आहे, एरवी आपण काय आहोत याचा टेंभा मिरवला आहे, पण जसं बोललं जातं तसं वागता येतंय का.. असेल तर ठीक, नाहीतर मग या आपल्या ‘मी’च्या मनातल्या प्रतिमेला डाग लागण्याचा संभव असतो. रोजचं नीट जगणं हे या स्व/मी च्या मनातील रूपाच्या सातत्यावर अवलंबून असतं. जर तीच प्रतिमा मनातून कोसळली, तर मात्र कोणी आपल्याला काही म्हणो, ना म्हणो, आपली स्वतःसाठीची प्रतिक्रिया बदलते. स्व अभिमान ते स्व दूषण असं काहीही होऊ शकतं. दूषण द्यायला लागलो की मग जसे वागत आहोत तसे वागता येत नाही. 

हे दूषण देणं, आपणच आपली मानहानी करणं, आपण जगायला योग्य नाही असं वाटणं ही निराशेची अवस्था. असं का होतंय आपल्या हातून, का जमत नाहीये, कुठं कमी पडतोय, का कायम असेच अपयशी राहणार?... या प्रश्नांची मालिका मनात सुरू झाली की त्या निराशावादाकडं आपण वळतो आहोत असा अर्थ होतो. परंतु नेहमीच आपण निराशावादाकडं वळू असं काही नाही आणि नेहमीच सकारात्मक राहून जिद्दीनं स्वतःमध्ये बदल घडवत राहू असंही काही नाही. दिसताना दिसतं, की नकारात्मक आपण नक्कीच नाही; पण तरी निग्रहानं प्रगतिपथावरही नाही.. मग कुठं असतो आपण? कोणत्या मनोभूमिकेत? तर तेव्हा आपण आपल्या मनातल्या ‘मी’च्या प्रतिमेला जपण्याच्या भूमिकेत असतो. या भूमिका म्हणजेच ‘मी’च्या संरक्षण यंत्रणा. 

म्हणजे ‘समजा कोणावर कामाच्या ठिकाणी काही गफलती करण्याचे आरोप आहेत, त्याची चौकशी चालू आहे. त्यावेळी त्याचं मन स्वतःला आणि इतरांना काय सांगत असावं? .. ‘मी हे असं का केलं कारण आजच्या जगात असंच वागायला हवं, सर्वच खरं खरं वागायचं नसतंच, थोड्या थापा मारणं हे योग्य असतं. सध्या सरळ माणसाला यश मिळतं का कधी? बलवान माणसं सगळं हडप करतात. थोडं फार इकडं तिकडं चालतं. अहो समुद्रातून एक लोटा पाणी घेतलं मी फक्त, काय फरक पडणार आहे? .. अर्थात कोर्टाला अशी कारणं चालत नाहीत, मग काही कुरापती काढून पुरावे निर्माण केले जातात. 

हे दिसताना जरी सामाजिक किंवा राजकीय वाटलं तरी ते मानवी मनाशीच निगडित आहे. ज्या माणसाचा प्रामाणिक आणि सत्य वागण्यावर विश्वास आहे, तो कितीही संकटं आली तरी त्याच्या निष्ठेवर ठाम राहतो. त्यामुळं सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी शेवटी प्रत्येकाला निर्णय आपल्याच या ‘मी’च्या साक्षीनं घ्यायचा असतो. आपण दुष्ट आहोत असं मानणं हे सहसा शक्य होणारं नाही म्हणून मग अशा वैचारिक समर्थनाचा फायदा घेतला जातो. 
 

यामध्ये समजा या समर्थनांनी आजूबाजूचं पटलं, तर आपल्यावर सारखे दोषारोप करणारे कमी होतात. मग थोडं बरं वाटतं. स्वतःलाही इथं खरं आपण फसवतोच. मनानं दुःख करत बसायचं नाही हे जरी खरं असलं तरी दुःख वाटू नये म्हणून आपल्याच मनातल्या या छोट्या छोट्या ‘मी’पणाला कुरवाळत बसायचं आणि त्यातून वाममार्गाला लागायचं हे कितपत योग्य आहे? 

ही अशी समर्थनं आपल्याला दैनंदिन जगण्यातही दिसतात. घर आणि काम यात समतोल साधताना किंवा एकुणातच आर्थिक अडचणींतून मार्ग काढताना, ‘आत्ता सध्या माझ्या आयुष्यात जो गोंधळ चालू आहे त्यात जे काही घडतं आहे त्याचं नीट व्यवस्थापन मला जमत नाहीये. कशाला जास्त महत्त्व द्यायला हवं हे मला नीट समजत नाहीये. आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्या गोष्टींकडं मी दुर्लक्ष करून पुढं जायला हवं. त्यात माझी कौशल्यं कमी पडत असतील, मी जास्तच भावनात्मक पातळीवर विचार करत असेन तर यावर मी विचार करायला हवा’.. हा विचार करण्याऐवजी आपण पटकन काय विचार करतो?... ‘माझ्या बाबतीत असं कधी सरळ काम होतच नाही, कितीही करा - घोळ होतोच. माणसं कुठं धड वागतात? किंवा फार पूर्वीपासून काहीतरी घडत आल्याचं आठवतं’ आणि हे अपयश आणि त्या घटनेचा काही संबंध असला पाहिजे असं वाटून मग किती काळ आपण काही सहन करतोय अशी समजूत मनाची होते. मग व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करायचं राहून जातं. 

काही लोक आपण पाहतो, की आपल्या हाताखालच्या लोकांची चूक असं सांगून स्वतःची जबाबदारी ढकलून देतात. काय करणार असे सहकारी मिळाले तर, असे उलट प्रश्न ते उपस्थित करतात. अनेकवेळा इतरांशी बोलून त्यांना काय अनुभव येतात हे विचारलं जातं. आपल्यासारखे अनुभव येणारे बरेच असतात. ‘हो हो रे माझ्याही बाबतीत असं होतं की, खरं आहे तुझं, कोणाला पटणार नाही पण असंच होतं रे’.. असं म्हणून आपल्याला सांत्वना देणारेही असतात. मग मनातील ही वैचारिक समर्थनं अधिक पक्की होत जातात. हळू हळू त्याचे विश्वास बनत जातात. 

याचाच परिणाम असा होत जातो, की मग काही वेळा झालेली चूक स्वतःच्या मनातच साफ नाकारली जाते. हे एरवी मुद्दामहून खोटं बोलणं यापेक्षा हे वेगळं आहे. खोटं बोलताना माणसाला स्वतःला माहीत असतं, की आपण थाप मारतोय, पण जेव्हा चूक नाकारण्याच्या मनोभूमिकेत आपण जातो तेव्हा खरंच मनात अशी स्वतःची धारणा आपण करून दिलेली असते की आपली चूकच नाही. माझं बरोबर आहे असंही नाही, पण चूक नक्कीच नाही. मग त्या चुकीची कारणं भरपूर असतील. ज्यानं मला असं वागायला भाग पाडलं असेल.. इथं अमुक तमुक माझ्यावरचा अन्याय आहे, माझं वागणे हा त्याला माझा प्रतिकार होता असं मनात असतं. त्यामुळं सरळ सरळ प्रयत्न करून काही होणार नाही तर काही वेगळे मार्ग अवलंबायला हवेत असा विचार सुरू होतो. सूडबुद्धीतून होणाऱ्या अनेक गुन्ह्यांत अशी समर्थनांची शस्त्रं पाहायला मिळतात. करत असतो आपण लबाडी, पण ती त्यावेळी जणू हक्कानं करायला मिळते आहे असा विचारांचा थाट असतो. 

कित्येक वेळा आपली जोडीदाराची निवड चुकली, आपण गाफील राहिलो ही चूक मान्य होत नाही. माझ्या चांगुलपणाला फसवलं गेलं, माझ्या भावनांचा विचार झाला नाही, मी चांगलीच होते, समोरचा वाईट होता, आईवडिलांच्या दबावाखाली येऊन मी हे केलं.. बरं प्रत्यक्षात तसं झाले असलं तरी आपण घाबरलो, आईवडिलांना प्रतिकार करू शकलो नाही, माणसं ओळखता आली नाहीत, मूर्खपणा केला.. आता सावध राहायला हवं हे मान्य होत नाही, असे विचार होत नाहीत. मी चूक नाही असं मनात पक्कं असतं; मग त्यावर समर्थन येत राहतं. 

या समर्थनाबरोबरच आपल्या मी च्या संरक्षणार्थ अशी बरीच वैचारिक शस्त्र आहेत. ज्याचा वापर प्रामुख्याने होताना दिसतो. त्यांचा विचार आणि यातून बाहेर कसे पडायचे हे पुढील काही लेखात पाहूया.

संबंधित बातम्या