विरोधाला सामोरे जाताना

पल्लवी मोहाडीकर कासंडे 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

मनतरंग

निराशा आणि त्यासंबंधित विचारांशी सामना करताना आपल्याला होणाऱ्या विरोधाचा विचार आपण कसा करायचा आणि विरोधही सकारात्मक दृष्टीने कसा स्वीकारायचा याचा विचार आपण या लेखात करूया. 

विरोध हा एकप्रकारचा आपल्याला मिळालेला नकार आहे. कितीतरी सुधारणांच्या विचारांना, कृतींना, कल्पनांना विरोध होत असतो. खास करून जेव्हा रूढार्थाने ते समाजविरोधी, परंपरांविरोधी, सर्व स्थिर असलेल्या जीवन पद्धतींविरोधी किंवा कधी मानवकल्याणाविरोधी, पर्यावरणविरोधी काही कल्पना, गोष्टी आहेत असे वाटते तेव्हा विरोध होतो. याचा अर्थ असा, की समाजाची बसलेली घडी बिघडू नये म्हणूनच विरोध केला जातो. कारण त्यामुळे अनेक बदलांना सामोरं जावं लागणार असतं. जेव्हा महात्मा फुले, महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाला सुरुवात केली तेव्हा विरोध झालाच होता आणि तो सहन करून या युगपुरुषांनी ते कार्य पुढं चालू ठेवलं होतं. हेच एक उदाहरण नाही तर अशा अनेक कथा आहेत. समाजसुधारणा ही गोष्टच विरोधाला तोंड देऊन सुरू झाली आहे असं दिसतं. 

सांगायचा मुद्दा हा, की विरोध होणारच आहे. सामाजिक, राजकीय पातळ्यांवरच नव्हे तर वैयक्तिक, व्यावसायिक, कौटुंबिक पातळीवरही विरोध होतोच. मुलांना वाटतं पालक विरोध करतात, पालकांना वाटतं की मुलं आपलं ऐकत नाहीत. स्त्रियांना वाटतं की घर तिच्या प्रगतीच्या विरोधात आहे, तर घराला वाटतं की घरातल्या बाईचा कुटुंबाच्या रीतीपरंपरांना विरोध आहे. बॉस लोकांना वाटतं की सहकारी आपल्या विरोधी आहेत, तर नोकरदारांना वाटतं की सारं व्यवस्थापनच आपल्या विरोधात आहे. सर्वांना मनातून आपल्या जगण्यात सुव्यवस्थाच स्थापित करायची आहे. परंतु, प्रत्येकाला ते साध्य करतानाचे मार्ग कदाचित नेहमी बरोबरीनं जाणारे असतील असं सांगता येत नाही. ते न जुळणारे, एकमेकांच्या विरुद्ध आहेत असं वाटतं. 

विरोध होण्याची शक्यता आहे असं मनात आपण कितीही विचार करून ठेवलं जरी असलं तरी प्रत्यक्ष विरोध झालेला सहसा कोणाला आवडत नाही. व्यावसायिक पातळीवर मुद्दाम घडवून आणलेले कल्पनाविष्काराचे (आयडिया जनरेशन) सत्र असेल तरच ते सहज मान्य होते. नाहीतर विरोध सहन करणं हे कोणतंही दुःख सहन करून ते स्वीकारण्याइतकंच आव्हानात्मक ठरतं असं सामान्यपणे दिसतं. अनेकवेळा तर आपलं म्हणणं कोणी ऐकून घेईल का, ते मान्य होईल का याची खात्री नसते म्हणून मग कित्येक लोक काही मांडायचं टाळतात. बोलतच नाहीत. जिथं ऐकून घेतलं जाईल अशाच ठिकाणी बोलतात. उगाच कशाला विरोध, मग आपली भांडणं होतील, कोणी नाराज होईल किंवा आपल्याला सहन होईल की नाही.. असं वाटतं. 

परंतु आत्तापर्यंत अनेक विरोधी विचार जगात निर्माण झाले म्हणून तर बहुआयामी समाज आणि प्रगती आपण अनुभवली आहे. विचार, निसर्ग, पर्यावरण यांना पूरक तसेच सजीव सृष्टीला अनुसरून समजा नसेल तर त्याच्या विरोधाचा विचार करणं आवश्यक राहील. नाहीतर विरोधी विचार आणि संकल्पना यामुळं कोणतंही काम हे बहुमितीय होतं यात शंकाच नाही. ज्याची संकल्पना ही त्यातल्यात्यात अधिक निकष गाठणारी असते ती मान्य होणार. त्यावेळी इतरांच्या कल्पना कदाचित मागं पडतील. पण त्यावेळी त्या ही कल्पनांवर अधिक विचार आणि काम केलं तर त्याही कधी ना कधी स्वीकारल्या जातील! म्हणूनच विरोध आणि त्याशी निगडित विचार व कृतींना टाळण्यापेक्षा आपल्याच प्रगतीचा तो आवश्यक टप्पा आहे असं मानलं तर? 

विरोध या संकल्पनेला स्थानिक ते जागतिक अशी मोठी स्केल आहे खरी, तरी आत्ता या लेखापुरता विचार एवढाच करूया की ‘वैयक्तिक, व्यावसायिक पातळीवर विरोध, त्याचा विचार कसा करायचा आणि नाराज किंवा निराश न होता संवाद कसा साधायचा.’ तसंही सामाजिक पातळीवर कार्य करायचं असलं तरी वैयक्तिक जीवनापासूनच सुधारणेची सुरुवात करायला हवी. मोकळेपणानं आपले विचार मांडता यावे, तिथं जरी मतभेद झाले तरी सकारात्मक राहून पुढं जाता यायला हवं. कोणी आपलं ऐकून घेणार नाही असं भय ही मनात नसावं. मग काहीवेळा विचार, कल्पना मनातल्या मनात राहून जातात. अनेक दिवस घुसमट सहन करून, साठत साठत कधीतरी भसकन काही विचित्र बोललं जातं, त्यातून ताण वाढतात, यामुळं नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता वाढते. तसंच आपण खरंच योग्य विचार करत आहोत की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. 

सर्वप्रथम विरोध हा विचारांना असतो हे समजून घेऊ. एखादा विचार न आवडणं, कल्पना न आवडणं म्हणजे ती व्यक्तीच आवडत नाही असं होत नाही. पण कदाचित वादविवाद जेव्हा होतात तेव्हा प्रथमदर्शनी तसं वाटून जातं. आपले विचार, आपल्या संकल्पना ही जणू ‘अध्ययन आणि अनुभव यातून आपण मिळवलेली आपली संपत्ती असते.’ जेव्हा ते कोणी अमान्य करतो तेव्हा आत्तापर्यंत आपण जगलेल्या सगळ्याच गोष्टींना नाकारलं जात आहे की काय असं वाटायला लागतं.. कोणालाही...! 

अशावेळी मग, इतकं विचा पूर्वक, सर्वांच्या भल्याचं मी मांडतो आहे, त्यातून चांगलंच होणार आहे तर ते ऐकायचं सोडून काही भलतेच विचार बाकीचे करत आहेत असे भावनात्मक विचार मनात निर्माण होताना दिसतात. इथं जे चांगलं होईल असं वाटत असतं  
ते ‘पुढं घडणाऱ्या शक्यतांच्या पातळीवर असतं.’ ‘आपण भूतकाळाचा तटस्थपणे विचार करू शकलो आहोत, त्यामुळं भविष्याचा अंदाज आला आहे, आपलं निरीक्षण चांगलं असल्यानं जगात काय घडतं आहे हे आपल्याला समजतं आहे म्हणून आपलं ऐकावं..’ असा आपला युक्तिवाद असतो. हे अगदी स्वाभाविक आहे. तसंच कदाचित जे विचार मांडले गेले आहेत त्याप्रमाणं पुढं घडण्याचीही शक्यता आहे. पण म्हणून त्याला मिळते जुळते नसणारे कोणी काही मांडूच नये ही अपेक्षा बरोबर आहे का? त्यातून जेव्हा नियोजनाचा विषय असतो तेव्हा? कशाला वेळ घालवायचा नसत्या गोष्टीत? यातून काही निघणार नाही, उगाच चर्चा, निर्णय लवकर घेऊन टाकायला हवा.. असं ऐकतो आपण बरेच वेळा. 

नियोजन हेच मुळात अनेक गृहितकांवर अवलंबून असतं. तरी आज आपण त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे. व्यावसायिक पातळीवरही व्यवस्थापनाचा तो पहिला खांब आहे. म्हणजे नियोजन, विचारपूर्वक गोष्टी आखाव्या हे मान्य आहे. मग ते करताना जर कोणी अगदी वेगळे विचार मांडले तर ते आपल्या मांडणीशी न जुळणारेच असतील हा समज का करून घ्यायचा? ते कदाचित प्रथमदर्शनी तसं वाटेल; परंतु, जर ध्येय.. ‘प्रगती, विकास’ हेच असेल तर साध्य जुळतं आहे परंतु त्यापर्यंत पोचण्याचे मार्ग मात्र वेगळे आहेत असा अर्थ घेतला तर? जर त्यातल्या त्यात उत्तम मार्ग निवडायचा असेल तर चर्चा होईल, वाद होतील आणि सुवर्णमध्य निघेल अथवा काही एक मान्य करावं लागेल. पण जर आपलं अमान्य झालं तर तो लगेच आपला पराभव आहे असा विचार करणं जरुरीचं आहे का? त्यापेक्षा आपण पुन्हा अभ्यास करून, आपला मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो हा विचार सृजनशीलता वाढवणारा आहे, असं नाही का? 

इथं कशाला विरोध झाला याचबरोबर कोण विरोध करतो आहे यालाही तितकंच महत्त्व प्राप्त होताना दिसतं. आपण नाराज होतो ते बहुतेक वेळा ‘कोणी विरोध केला’ हा विचार करून. माझं कुटुंब माझ्याबरोबर नाही, माझी मित्रमंडळी माझ्याबरोबर नाहीत, असं दुःख निर्माण होतं. त्यातही आपल्यापेक्षा वयानं, मानानं मोठ्या वरिष्ठ व्यक्तींच्या विरोधाला आपण त्यातल्या त्यात आव्हान म्हणून पाहिल्यामुळं तयारी करून सामोरे जातो, परंतु आपली मुलं, धाकटी भावंडं, कमी अनुभव असलेले, नवे, तरुण सहकारी यांना आपले काही पटले नाही तर प्रथम राग येतो. माझं समजलंच नाही आणि समोरचे समजून घेऊ शकत नाहीत याच काही मुद्द्यांवर आपण अडकतो आणि त्यातच कित्येक काळ वादविवाद होत राहतात. पण आपणही एकदा पुनर्विचार करायला हवा असा पटकन विचार होत नाही. 

हे असे वाद, वैचारिक मतभेद मानसिकदृष्ट्या ताण निर्माण करणारे असतात हे खरे; परंतु ताण निर्माण होतात कारण आपण ते भावात्मक पातळीवर घेतो म्हणून! आपला मुद्दा मांडल्यावर त्यावर सहमती घ्यायची आपल्याला थोडी घाई असतेच. पुन्हा विचार करायचा त्यात वेळ घालवायचा, जास्त कष्ट करायचे याचा ताण असतो खरंतर. आपले विचार अमान्य होऊच नयेत, आपला सल्ला ऐकलाच जावा ही अपेक्षा असते. याउलट आपले विचार स्वीकारले जातील किंवा नाही अशी तयारी केली तर? काही नवीन बदल करायचे आहेत तर ते मांडताना आपणहून ‘या विचारांना अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया द्या, जे पटते ते सांगा, जे पटत नाही ते ही सांगा.. म्हणजे सर्वांगाने चर्चा होऊन योग्य तो विचार पुढं येईल’ असं मांडलं तर? असेलही कोणी विरोधाला विरोध करणारा पण असे सर्वच नसतील. काही जबरदस्तीनं स्वीकारावं लागतं आहे असाही विचार कोणी करणार नाही व आपण चर्चा संवादात्मक पातळीवर आणू शकू. मुख्य म्हणजे सहमतीची अपेक्षा नसल्यानं झालाच विरोध, तर सकारात्मक दृष्टिकोनातून आपण ते ही विचार घेऊन पुढं जायला शिकू. 

याचा अर्थ असाही घेता येईल की मूळ विचारांना विरोध असेलच असं काही नाही, पण आपण ते कसं मांडतो आहोत त्यावरून ते किती प्रमाणात स्वीकारले जातील हे नक्की अवलंबून आहे. मग जर आपण सृजनशील असू तर फक्त मांडणी करण्याच्या पद्धती शिकून घेऊया. आपले विचार चांगले आणि काही निर्माण करणारे असतील तर जास्तीतजास्त लोकांपर्यंत ते पोचावेत यासाठी आपणच प्रयत्न करूया..!

संबंधित बातम्या