चूक स्वीकारायला शिकूया 

डॉ. पल्लवी मोहाडीकर कासंडे 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.
डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 

आपल्या मनाने आपल्या चुकांचे, पराभवाचे किंवा न जमलेल्या कृतींचे वृथा समर्थन, आपल्या विचित्र वागण्याचे उदात्तीकरण असे करू नये आणि मोकळेपणाने आपला कमीपणा, हार आणि चुकासुद्धा मान्य कराव्यात. त्या सुधारून पुढे जायला शिकावे यासाठी काय करता येईल याचा आज विचार करू. तसेच आपणच कसे बरोबर आहोत यासाठी वैचारिक शस्त्र तयार करण्यापेक्षा आपल्याला या चुकांमधून काय शिकता येईल असेही मनन करूया. 

‘चूक - बरोबर असे काही नसते, हे सर्व दृष्टिकोन आहेत’ हे वाक्य जरी मानवी जीवनासाठी लागू असले तरी कोणाला दुखावणे, फसवणे, आवश्यक तो मान न देता येणे, दिलेले वाचन पाळता न येणे, योजिलेले संकल्प पूर्णत्वास नेता न येणे, भावनिक होऊन अपेक्षा करणे आणि त्यातून स्वतःलाच दुःख देणे, या अशा अनेक कृती आपल्या हातून घडतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना कळत नकळत आपणच जबाबदार असतो. त्यामुळे मुद्दाम कोणाशी वाईट वागलो नाही, तरी जे चांगले फारसे घडले नाही असे वाटते त्यालाही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार असतो. म्हणजे कुठेतरी समजण्यात, बोलण्यात, काही कृती करण्यात चूक झालेली असते. 

काहीवेळा आपल्याला वाटते की आपण तर सगळे चांगलेच केले, तरी लोक आपल्याला असे का वागवतात? तेव्हाही आपला अती चांगुलपणा हाच त्याला जबाबदार असतो. म्हणजे सतत चांगले वागत राहणे आणि कोणाचा अन्याय सहन करत राहणे हेसुद्धा चूकच आहे. अशा सर्व प्रकारच्या छोट्या, मोठ्या, प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आपली चूक म्हणता येईल अशा सर्व कृती स्वीकारून स्वतःमध्ये बदल घडवणे सोपे नसते. त्यावेळी आपण इतरांवर, तर कधी परिस्थितीवर आरोप करून मोकळे होतो आणि मग ज्या आपल्या वागण्यामुळे आपल्यावर हा प्रसंग आलेला असतो त्याबद्दल विचार करणे राहून जाते. 

कामाच्या ठिकाणी आपली चूक आहे असा विचार करायलाही अनेकवेळा कमीपणा वाटतो. एकतर आपली स्वतःची प्रतिमा आपल्याच मनात डागाळली जाईल असे तरी वाटते, नाहीतर, बाप रे! असे कसे भयंकर काही घडले आपल्या हातून! असे वाटून अपराधीपण येते. या दोनही प्रतिक्रिया आपली चूक आपल्याला मोकळेपणे स्वीकारायला प्रतिबंध करतात. खरेतर आपण हे मानत आलो आहोत की जो चुकतो तो माणूस असतो किंवा जो प्रयत्न करतो तोच चुकतो. जो संवेदनशील आहे तोच जास्त विचार करणार आहे, त्यालाच उलट सुलट विचार येतील, तोच प्रयोग करून पाहील व काहीतरी गडबड होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे चूक झाली म्हणजे मोठा गुन्हा झाला असे नाही. म्हणूनच विचार करूया अशा मानसिकतेचा, ज्यामुळे जे काही बिघडले आहे तेही लक्षात येईल. आपल्याला आणखी काय प्रयत्न करावे लागणार आहेत, नवीन काही शिकावे लागणार आहे का हे ही समजेल. यामुळे अपराधीपण किंवा कोणावर आरोप हे अभ्यासपूर्ण पद्धतीने टाळता येतील. 

सर्वप्रथम हे लक्षात घेऊ की ती चूक किंवा तसे वागणे म्हणजे आपण नाही. ती एक कृती आहे. आपले कर्म आहे. ते तसे का घडले यामागे निश्चितच एक पार्श्वभूमी असणार आहे. कदाचित जे घडले त्यापेक्षा नक्कीच अधिक बरे, योग्य वागता येईल, पण त्यावेळी ते तसे घडले हे समजायला हवे. एरवी आपण म्हणतो की पहिल्यांदा चुकून होते, भावनेच्या भरात, अचानक, नकळत.. दुसऱ्यांदा तसेच घडले तर ती बदल न जमल्यामुळे घडलेली चूक असते. परंतु तिसऱ्यांदा किंवा वारंवार घडू लागले तर मात्र ती सवय आहे किंवा ते वागणे एका बाजूने योग्य वाटू लागले आहे, त्याचे फारसे वाईट वाटत नाही.. असा त्याचा अर्थ होतो. नकळत काही कृती सतत करत राहण्याचा मोह पडतो किंवा त्यांचा आधार वाटू लागतो, प्रतिक्षिप्त क्रियांप्रमाणे त्या केल्या जातात. जेव्हा हे सर्व जाणवेल, पटेल, तेव्हा नेमके काय बदल करायचे ते समजून येईल. संपूर्ण जगण्याचे तत्त्वज्ञान बदलण्याची आवश्यकता नाही. जे जगलो आहोत ते काही नावे ठेवण्यासारखे नाही, फक्त काहीच कृती मात्र पुन्हा करायच्या नाहीत हे स्वतःकडून आपल्याला करवून घ्यावे लागेल. 
आता हे कधी करायचे, त्याला काही मुहूर्त नसतो. म्हणजे आपण एखाद्याचे सर्व काही ऐकून घेतो आणि त्यामुळे आपण दबले जातो आहोत, हे जरी लक्षात आले तरी मग विरोध कधी करायचा असा विचार करत बसलो की नेमकी योग्य वेळ येत नाही. जेव्हा ज्या क्षणी जाणवते तीच योग्य वेळ असते. म्हणजे जसे अभ्यासाला सुरुवात कधी करायची? व्यायामाला सुरुवात कधी करायची? आपली रोजची कामे शिस्तबद्ध कधी करायची? याला जसे एकच उत्तर असते - आत्ता, या क्षणापासून.. दुसरा चांगला मुहूर्त नाही. तेच चूक सुधारताना म्हणता येईल. 

काही गोष्टी ठरवून करायला सुरुवात झाली की आपले विचार आणि आपली कृती हे जुळतात का, आणखी कोणत्या सवयी आपल्याला जडल्या आहेत की गोष्टी जमत नाहीत हे ही समजते. म्हणून कृती करायची वेळ लगेच येईल किंवा न येईल, किमान विचारांना सुरुवात लगेच होणे हे खूप महत्त्वाचे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच ते आपल्याला हवे आहे का, हे आपल्याला नक्की ठरवावे लागते. 

काहीवेळा मनात काही खोलवर दडलेले आहे असेही वाटत असते. ज्या गतीने विचार होतो त्या गतीने वागणे बदलता येत नाही.. अशावेळी मन मोकळे करणे आणि चर्चा करणे फायद्याचे ठरते. नेमके आपल्याला काय म्हणायचे आहे, अपराधीपण किंवा दुःख मनात आहे हे कोणाला सांगताना त्याची धार थोडी बोथट होतेच. शिवाय तो समोरचाही अनेक  
उदाहरणे देतो अशा तऱ्हेची, मग आपण एकटे नाही, होते असे अनेक वेळा, हा विचार आपण स्वतःला स्वीकारायला मदत करतो. शिवाय घडलेले सर्व चुकलेले असते असेही नाही, म्हणजे ते ‘शिकलेले’ या प्रकारातही टाकता येते.. काय शिकतो आपण तर कदाचित कसे वागू नये हे शिकतो, एखादी गोष्ट जमत नसेल तर ती कोणत्या पद्धतीने करू नये असेही आपण शिकतो. 

चूक मान्य करताना बोलावे कसे हेसुद्धा शिकावे लागते. जेव्हा ‘आपण कोणाला दुखावले आहे’ असे वाटते व ते मान्य करायची वेळ येते तेव्हा आपल्यालाही आपल्या वागण्याचे दुःख होतेच. पण तरी तिथे आपले दुःख सांगत बसण्यात काही अर्थ नाही. तर आपल्या वागण्यामुळे आपले नाते, मैत्री यावर परिणाम होतो आहे यावर लक्ष केंद्रित करून जी काही बोलणी बसतील आपल्याला ती थोडी सहन करून, थोडी योग्य कारणे देऊन आणि आपण परफेक्ट नाही, चुका होऊ शकतात पण मुद्दाम काही करण्याचा हेतू नाही हे संवाद करून सांगणे, तिथे सामोपचाराचा आग्रह धरणे योग्य ठरते.. अर्थात नुसती माफी मागून उपयोग नाही. तर खरेच आपल्या वागण्यात बदल घडवणे ही महत्त्वाचे असते. बदल घडला तर माफी मागायचीही आवश्यकता राहात नाही. 

नातेसंबंधात चूक मान्य करताना आपण आपल्या वागण्याची आणि ते बदलण्याची पूर्ण जबाबदारी घेतो आहोत हे सांगणेसुद्धा समोरच्यावर चांगला परिणाम करणारे असते. नाहीतर मी असाच आहे, हा माझा स्वभाव आहे, मी बदलू शकत नाही जे काही समजून घ्यायचे आहे ते दुसऱ्याने.. हा भाव त्या नात्याचा अनादर करणारा ठरू शकतो. पती - पत्नी संघर्षामध्ये हे अनेकवेळा दिसते. मी चुकतो आहे, हे मान्य... पण मी बदलणार नाही.. मी असाच.. असे म्हटल्यावर समोरच्या माणसाचा हिरमोड होतो. मग अशावेळी त्याचे जे होतील ते परिणाम स्वीकारावे लागतात. 

अशा चुका मान्य करणे हे व बदलाची तयारी दाखवणे हे आपल्यातल्या कमतरतेचे लक्षण नाही. उलट ती मनाची एक ताकद आहे. आपण फक्त आपला विचार करत नाही, तर ज्यांच्याशी आपण जोडलेलो आहोत त्यांचाही विचार आपण करतो हे दाखवण्याची ही संधी असते. बरे, यात आपण दुसऱ्यासाठी बदलत नसतो बरे का. अनेकांना असे वाटते. मी इतरांसाठी का बदलावे. पण नाते हे दोघांचे असते. ते एकमेकांच्या साथीने उमलणार आणि बहरणार असते. त्या नात्याच्या बहारासाठी बदलायचे असते किंवा ज्या चुका आधी झाल्या त्या सुधारायच्या असतात. 

जेव्हा उघडपणे, सभेत, सर्वांसमोर कोणी आपल्यावर टीका करतो, आपल्याहातून काही घडले आहे याची जाणीव करून देतो तेव्हा ती परिस्थिती हाताळणेही सोपे नसते. एक तर हा आपला अपमान वाटण्याची शक्यता असते. हे कोण मला बोलणार असेही वाटते. परंतु यामुळे जो विचार मांडला गेला आहे त्यावर विचार करायचा राहून जाते. टीका पटली नाही तरी एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार झाला म्हणून जर आभार मानले तर कदाचित चांगला संवाद घडण्याची शक्यता असते. 

तसेच प्रत्यक्ष आपली चूक नसताना केवळ नैतिक जबाबदारी म्हणूनही आपल्याला एखाद्या घटनेला जबाबदार धरले जाते. ती खरी परीक्षा असते. अशावेळी उत्तर द्यायला वेळ मागून घेणे योग्य ठरते. सर्व विचार करून मी नक्की यावर प्रतिक्रिया देईन आणि योग्य ती कार्यवाही किंवा कारवाई करेन हेही सांगणे योग्य ठरते. निर्णयाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे किंवा माघार घेणे हे अनेकवेळा धैर्याचे मानले जाते. अशी अनेक उदाहरणे सामाजिक आणि राजकीय पातळीवर आपण पाहतो. 

जबाबदारी स्वीकारणे ही अत्यंत सकारात्मक मनोभूमिका आहे. यामध्ये समोरच्या माणसाबद्दल आस्था, सहानुभूती आणि आपुलकी आहे. सामाजिकच नव्हे, तर वैयक्तिक नातेसंबंधात या भावना खूप महत्त्वाच्या आहेत. याच अनुषंगाने प्रेमातील अपयश आणि चुका यांच्याबद्दल पुढच्या लेखात मनन करूया.

संबंधित बातम्या