कुमारवयातील प्रेम आणि पालक

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

मनतरंग

मागच्या लेखात म्हटले त्या प्रमाणे शाळा व महाविद्यालयांतील मुलामुलींची मैत्री आणि प्रेम प्रकरणे हा आज पालकांच्या चिंतेचा विषय आहे. सध्या सोशल नेटवर्किंग मीडिया मोबाइलवरही सहज उपलब्ध झाल्याने मग तासनतास मुले मोबाइल ग्रुप चॅटिंगमध्ये बुडालेली दिसत आहेत. अभ्यास, करिअर या गोष्टींकडे साहजिकच दुर्लक्ष होते आहे. 

अशा वेळी पालकांची भूमिका ‘माझे मूल चुकत आहे, त्याला सुधारा', ‘आमचे म्हणणे बरोबर आहे,' अशी असते किंवा ‘काय चुकले आमचे?' असा प्रश्न विचारताना ‘काही चुकले' असे वाटत नसतेच. शाळा व महाविद्यालयातील दिवस म्हणजे किशोरवय. त्यावेळी होणारे मुलांमधील शारीरिक, मानसिक तसेच भावनिक बदल आणि मुलांना त्या वयात वाटणारे आकर्षण, हे सर्व परस्परपूरक आहे. त्याचा एकत्रितपणे विचार करायला हवा. नाहीतर प्रश्न अधिक गुंतागुंतीचे बनत जातात. म्हणूनच पालकांनी आधी स्वतःचे शिक्षण करायला हवे. 

या कुमारवयात नेमके काय होते ते समजून घेऊया. जसे प्रेम भावनांच्या उद्दीपनासाठी काही हार्मोन्स जबाबदार असतात, तसेच मूल वयात येऊ लागले आणि त्यांची वाटचाल लैंगिक परिपक्वतेकडे सुरू झाली की काही हार्मोन्स आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करतात. मुलींमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे याकाळात प्रभावी असणारे हार्मोन्स आहेत. इस्ट्रोजेन आपल्या मेंदूमधील सिरोटोनिन या आनंद निर्माण करणाऱ्या ग्रंथींची पातळी वाढवणारे आणि प्रोजेस्टेरॉन हे ही पातळी नियंत्रित करणारे असते. तर टेस्टोस्टेरॉन मुलांमध्ये लैंगिक भावनांचे उद्दीपन करणारे असते. वयाच्या १३-१४व्या वर्षानंतर मुलामुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटायला सुरुवात होते, हे निसर्गसुलभ आहे. अर्थात सर्वच मुले याने वाहावत जात नाहीत. कारण मनात जरी काही वाटले तरी तसे वागण्याचे इच्छा आणि धाडस सर्वांमध्ये निर्माण होईल असे नाही. इथे पालक, घरातील संवाद हे खूप महत्त्वाचे ठरते. 

या सर्व हार्मोनल घडामोडी व त्यामध्ये होणाऱ्या चढउतारांमुळे मुले ‘भावनांमधील चढउतार’ अनुभवू लागलेली असतातच. कितीही वेगळा विचार केला तरी भावनांवर आपला काही ताबा नाही हा ही अनुभव अनेक मुलांना येतो. त्यामुळे आपल्या आवडी निवडीही बदलत आहेत हे थोडे जाणवू लागते. पण कोणी आपल्याला आवडत आहे, तर ते आपल्याला वाटणारे आकर्षण आहे का प्रेम याबद्दल ही मुले संभ्रमात असतात. पण त्याबद्दल घरी, कुटुंबातील व्यक्तींशी बोलू शकतीलच याची खात्री देता येत नाही. मग मित्रमंडळी असतातच. आपल्या वयाची सर्वच मुले अशीच वागत आहेत मग यात काही बिघडत नाही असा समज व्हायला वेळ लागत नाही. या भावनांचा जोर इतका असतो की एखाद्यावर आपले तन, मन, धन अर्पावे असेही वाटू लागते. ज्याच्याबद्दल हे काही वाटते आहे त्याच्याकडूनही तसाच प्रतिसाद आला की मग मनापासून काही वाटते आहे, दोघांनाही वाटते आहे म्हणजे हे खरेच असणार, कायमचे असणार, दीर्घकाळ टिकणारे असणार असा समज त्या छोट्या वयातही निर्माण होतो. 

हे अचानक झालेले बदल पालकांच्या लक्षात येईपर्यंत वेळ लागतो आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद होऊ लागतात, मुले आपले ऐकत नाहीत असे पालकांना वाटू लागते. परिपक्वतेकडे सुरू झालेला प्रवास मुलांना     ‘आपल्याला आता समजतेय, सांगण्याची गरज नाही', ‘सारख्या सूचना कशाला, मला ही कळते', अशा विचारांकडे सहज घेऊन जातो. म्हणून मग पालकांनी काळजीने सांगितलेले मुलांपर्यंत त्या तीव्रतेने पोचत नाही. आपल्याला सारखे रागावले जात आहे असे मुलांना वाटते. 

कुमारवयीन मुले म्हणजे पालकही चाळिशीला आलेले असतात. त्यांच्यातील धीर आणि सहनशीलता ही थोडी कमी झालेली असते. इतके दिवस अत्यंत गुणी असणारे मूल अचानक कसे असे वागू शकते या प्रश्नांनी ते ही हैराण असतात. मग मुलांना कंट्रोल करायचा प्रयत्न होतो, त्यांचे बाहेरचे उद्योग, उपक्रम यांवर थोडी गदा आणली जाते यामुळे जो संवाद घडायला हवा तो न घडता उलट पालक आणि मुलांमधील तेढ वाढत जाते. 

वयाच्या बाराव्या वर्षानंतर एकुणातच समवयस्कांचा प्रभाव असतोच मुलांच्या मनावर. त्यामुळे मग समवयस्कांचे अनुकरण करण्याकडे कल वाढतो. यातच जे ‘उपाय' त्यांच्याकडून कळतात ते ‘करून पाहू' असे म्हणून प्रत्यक्षात करून पाहिले जातात. यात मुलामुलींची मैत्री, एकमेकांना पटवणे, त्यात पैजा लागणे, या गोष्टी सर्रास दिसतात. आपले मूल कोणाच्या प्रेमात आहे आणि वेळ घालवतेय असे जाणवते, काही वेळा रंगेहाथ पकडले जाते, तेव्हा पालक आणि मुले यांच्यात हा एरवी होऊ शकणारा संवादच हरवून गेलेला असतो. काय नेमके बोलावे हे आई वडिलांना समजत नाही व जे काय समजते ते उपदेश, रागावणे, चिडणे, धमकावणे या मार्गाने सांगितले जाते. या वयातील प्रभाव आणि त्यांचा परिणाम यावर चर्चा आणि संवाद या मार्गाने बोललेच जात नाही. 

त्यामुळे मग मुलांच्या इतर उद्‌धट वागण्याचा आणि त्याचे प्रेम प्रकरण यांचा एकत्रित विचार केला जातो. मुलांनी नेमके आधी काय करावे यात पालकांचे ही संभ्रम असतात. प्रेम भावनेतून बाहेर पडून अभ्यास करावा, करिअर करावे हे खूप आदर्शवादी झाले. प्रेमातून बाहेर पडणे आणि सर्व आयुष्याचा समतोल विचार करणे हे इतके सोपे असते का? ज्या वयात नैसर्गिक भावनांचा पगडा आहे त्या वयात विचारांनी स्वतःला हाकत पुढे नेणे ही त्या वयात अचानक जमणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी मुलांशी खूप लहान वयापासून बोलणे गरजेचे असते. 

जर नसेल बोलले गेले तर त्या टप्प्यावर ‘सर्व प्रश्न एकत्रित सोडवणे' हे तरी टाळणे आवश्‍यक असते. जसे आधी मुलांना त्या भावनेत स्थिर होऊ दे. जो कोणी मुलगा/मुलगी आहे जर त्यांच्याशी पालक म्हणून आपणही संपर्क करत राहिलो, त्यांना आवश्‍यक तो आदर देऊन सल्ला मार्गदर्शन करत राहिलो, म्हणजे थोडक्‍यात जे आपल्या मुलाचे भावविश्व आहे ते आपल्या विश्वात समाविष्ट करत गेलो तर मुलांचा आपल्यावर विश्वास बसून त्यांच्यामध्ये काही बदल होणे याची शक्‍यता वाढते. 

हे केव्हा बोलावे! तर केव्हाही बोलावे. प्राथमिक किंवा पूर्वप्राथमिक शाळेत असताना मोठ्यांचे ऐकून कोणी लहान मूल त्याला आवडलेल्या मुलाला ‘आय लाईक यू', ‘आय लव्ह यू' म्हणते किंवा कोणी दुसऱ्याने बोलल्याचे ऐकते व ते आपल्याला येऊन सांगते; हीच वेळ असते मुलांशी संवाद साधण्याची. त्यावेळी त्याच्याशी असे काही बोलता येईल की - अरे वा, तुला/त्याला आवडते का ती.. का बरं आवडते..., ती खेळते का तुझ्याशी. मग तुम्ही काय काय खेळता. ‘आय लाईक यु’ असं म्हणायचे असते का, कोण बरे म्हणते असे. कोणत्या मुव्हीमध्ये पाहिलेस का .. इ. इ. मग असे विषय आपल्या आई बाबांजवळ बोललेले चालतात, ते रागवत नाहीत, आपले ऐकून घेतले जाते, घरी कोणताही विषय निषिद्ध नाही... हा विश्वास तरी मुलांमध्ये येऊ शकतो. 

घरी इतर काही का प्रश्न असेना पण आपल्या मुलांसाठी हे आपण करायलाच हवे. बरं कोणी विचारेल की आमची मुले मोठी आहेत, मग वेळ निघून गेली का, तर नाही. मुद्दाम या विषयांवर बोलता येत नसेल तर आपले चित्रपट आपल्याला अनेक विषय घरबसल्या देत असतात. त्यावरून टीका न करता, टोमणे न मारता, काय भासमय आहे, काय केवळ या तरुण अवस्थेचे वैशिष्ठ्य आहे, पण यापेक्षा वेगळा विचार महत्त्वाचा आहे अशा अर्थाचे मुलांशी बोलता येते. आपण वाटेल ते ऐकायची तयारी दाखवली तर मुले बोलतील. यामुळे या नैसर्गिक अवस्थेचा प्रभाव आपण टाळू शकू असे नाही, पण मुलांना तो नीट संयमाने हाताळायला नक्कीच मदत करू शकू. 

आपण विषय काढला की मुलांच्या या वागण्याला आणखी बढावा मिळेल ही समजूत करून घेऊ नये. कोणताही प्रश्न बोलण्यामुळे वाढत नाही. उलट त्यावर नीट ‘चर्चा झाली नाही' तर तो चिघळतो. मुलांवर लक्ष ठेवण्याची, नजर ठेवण्याची गरज नाही. उलट हे असे तुला होऊ शकते तर तू सावध राहा, माझ्याशी बोल, हे सांगणे महत्त्वाचे आहे. आजकाल इंटरनेटवरून कोणतीही माहिती मुलांना उपलब्ध होऊ शकते. ती माहिती त्यांच्या पर्यंत पोचायच्या आत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचायला हवे. जर ते त्या सर्व मोहजालामुळे प्रभावित झाले आहेत असे जाणवले तर तिथे तुमच्या प्रेमाचा प्रभाव वाढवायला हवा. त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून, उगाच कशाचा धाक दाखवून मुले आणखी दूर जातील. त्यांनी काही धाडसी निर्णय घेऊ नयेत म्हणून त्यांच्याबरोबर राहणे आवश्‍यक आहे. 

प्रेम, आकर्षण या विषयी बोलायचे म्हणजे त्यांना यातून दूर कसे काढायचे हेच फक्त नाही. या प्रेम आणि आकर्षण यातून होणारे एक जबाबदार नाते निर्माण होऊ शकते, की जिथे फक्त दोघांनी आपला आपला विचार करायचा आहे असे नाही तर आपल्या घरांचाही विचार करायचा आहे... हे सांगितले गेले तर मुलांना फक्त विरोध होतो आहे असे न जाणवता ऐकण्यासारखे आहे असेही वाटेल. जबाबदारी ही नेहमीच वैचारिक क्रांती आपल्यात घडवते. माझे प्रेम, माझे सुख, माझा आनंद असा होणारा विचार कुटुंब आणि समाज याच्या दिशेने वळू शकतो. ज्या घरात आई वडिलांचे वाद आहेत त्या घरांमध्ये मुलांशी ‘सुदृढ नाते’ संबंधांविषयी संवाद होणे थोडे अवघड असते कारण आई वडील स्वतः त्या नात्याच्या ताणातून जात असतात. पण ही पळवाट होऊ शकत नाही. अशा वेळी आणि एरवीही ज्या पालकांना वाटत आहे की आपला संवाद मुलांशी होऊ शकत नाही त्यांनी समुपदेशकाशी विश्वासाने संपर्क साधावा. आधी आपण संवाद कौशल्य शिकून घ्यावे. हेच शिक्षण सज्ञान व मध्यमवयीन व्यक्तीने स्वतःचे कसे करावे हे पुढच्या लेखात पाहू.  

संबंधित बातम्या