प्रेमाच्या भाषेचे डिकोडिंग

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.
डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 

असफल प्रेमाच्या वेदना ज्यांना हाताळता येत नाहीत त्यांच्या मनात हे दुःख कित्येक काळ साठून असते, असे आपण प्रेमभावनेचे व्यवस्थापन या मालिकेतील पहिल्या लेखात म्हटले होते. नंतर कितीही वेगळे प्रश्न आले तरी आपल्या सगळ्या दुःखाचे मूळ हे आपले ‘असफल प्रेमच’ असेही वाटते. यामुळे मग एखाद्याबदल कायमच मनात राग, चिडचिड उत्पन्न होत राहते. सुरुवातीलाच या भावना व्यक्त झाल्या नाहीत आणि त्यांचा निचरा झाला नाही तर त्या मग छळत राहतात. कोणी कितीही समजावून सांगितले तरी ते पटत नाही. आपले प्रेम असफल का झाले? याचे सयुक्तिक कारण मिळालेले नसते. घरातून विरोध झालेला असो किंवा त्यावेळी आपले पटू शकत नाही म्हणून ते नाते विवाहबंधनापर्यंत न्यायचे नाही असे ठरले असो.. पण कोणाला न कोणाला वाटत राहतेच की माझ्या बाजूने काही ठीक घडले नाही. माझी बाजू समोरच्याला समजू शकली नाही. इथे मग आपण नेहमीच खूप जेन्युईन आणि दुसरी व्यक्ती फसवी, चंचल, कठोर हृदयी.. असे काही वाटू शकते.  

प्रेम आणि आकर्षण या भावनांच्या उद्दीपनासाठी हार्मोन्स कारणीभूत असले तरी त्यातून निर्माण होणारे नाते जर यशस्वी होऊ द्यायचे असेल तर मात्र विचारपूर्वक, जबाबदारीपूर्वकच निर्णय घेणे आवश्यक असते. वैवाहिक जोडीदार, मित्र मैत्रिणी, प्रियकर प्रेयसी, विवाहोत्तर आकर्षणं आणि नाती या सर्व प्रकारात हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. मुळात ‘आपले जुळते आहे का नाही’ हे अगदी मोकळेपणाने समजून घेऊन, चर्चा करून जो काही निष्कर्ष येईल तो पचवावा लागतो. कारण ही मानसिक गुंतवणूक कोणाची कोणत्या पातळीवरची असेल हे सांगता येत नाही. प्रेमाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रेमाबरोबर काळजी, समर्पण याही भावना निर्माण झालेल्या असतात आणि त्याला तसाच प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा असते. परंतु आपल्यासारखे दुसरे असणे आणि नेमके तेच आपल्याला भेटणे हा दुर्मीळ योगायोग असावा. अनेक वैवाहिक जोडप्यांमध्ये सारखेपणा न दिसता परस्पर पूरकता दिसते. तरच वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरचे हे वैवाहिक नाते टिकते. असा नियम नाही पण अनुभव नक्कीच आहे. ही परस्पर पूरकता म्हणजेच एकमेकांच्या विभिन्न स्वभावाशी समायोजन. समायोजन म्हणजे तडजोड नाही. जे काय आहे ते स्वीकारणे व ते आपण स्वीकारले आहे याचे वाईट न वाटणे म्हणजे समायोजन, जुळवून घेणे. 

जिथे असफल प्रेम, किंवा नात्यामध्ये ताण आहे तिथे असे दिसते की समायोजन दोन्ही बाजूला समान होत नाही. एकाच माणसाने कायम जुळवून घ्यावे असे समीकरण दिसते, किमान तसे बोलले तरी जाते. सुरुवातीला सारे गोडीगुलाबीने मग सर्व तिखट आंबट .. असे आपणही अनुभवले आहे आणि पाहिलेदेखील आहे. ‘संसार टिकवणे महत्त्वाचे हा संस्कार असल्याने, काही झाले तरी कुटुंबासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी टिकून राहायचे असे अनेक लोक करतात. अर्थात काहीच चांगले नसते असेही नाही. पण भावनांचा पगडा हा असतो. 

ही अशी नाती काय आणि आपले पटत नाही म्हणून प्रेम वाटूनही नात्यात पुढे न जाण्याचे ठरवणे काय किंवा कोण्या एकाने समायोजन करायला नकार दिला तर ते नाते तिथेच तुटणे काय.. सर्वत्र एक गोष्ट समान आहे ती म्हणजे एकमेकांच्या प्रेमाच्या भाषेचे डिकोडिंग नीट जमले नाही.

म्हणून मग एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप होत राहतात. ‘जुळले नाही’ याला दोघेही तितकेच जबाबदार आहेत हे मानलेच जात नाही. एक जण खूप समजूतदार, सहन करणारा तर दुसरा त्रास देणारा असे चित्र नेहमी उभे असते. अनेक सिनेमा आणि नाटकांमधून हा विषय कितीतरी वेळा मांडला गेला आहे. कथेचा शेवट काहीतरी चांगला, गोड करायचा असतो म्हणून मग नकारात्मक छटा एखाद्या व्यक्तिरेखेत ठासून भरल्या जातात. त्यामुळे मग दुसरी व्यक्ती निर्णय काय घेते, कसा बदलते, हे तार्किक दृष्ट्या मांडता येते. नकळत हेच आपल्या मनात राहते. पण असे नसते. प्रत्येक माणसात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही छटा असू शकतात. इतकेच नव्हे, प्रेमात असफल व्यक्ती इतर आयुष्यात असफल असतेच असे काही नाही. जोडीदाराशी, प्रियकर/प्रेयसीशी प्रेमाचे नाते निभावण्यात ती असमर्थ ठरू शकते परंतु म्हणजे प्रत्येक बाबतीत ती व्यक्ती दुष्टच असेल असे नाही.

खरंतर माणसाचे आयुष्य नावीन्यपूर्ण आहे. इतक्या भूमिका माणसाला कराव्या लागतात, वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रेम आणि आकर्षण या भावना कोणाच्या आयुष्यात का आणि कशा महत्त्वाच्या आहेत ते समजून घेणे महत्त्वाचे असते. एक उदाहरण घेऊ. लहानपणापासून घरात वातावरण कसे आहे? घरातून प्रेम मिळाले आहे का नाही? मनमोकळेपणाने बोलायला कोणी आहे का नाही? कौतुकाचे शब्द, प्रेरणादायी शब्द आप्तेष्टांकडून ऐकायला मिळतात का नाही? यावर खूप काही अवलंबून असते. कोणी कोणाशी अदबीने, आपुलकीने बोलले तर त्याचा प्रत्येकाच्या मनावर वेगळा परिणाम होतो. हालअपेष्टा सहन करूनही ज्याची स्वओळख दांडगी आहे आणि ज्याच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे त्याच्या मनावर या कौतुकाचा आणि गोड शब्दांचा खूप परिणाम होत नाही. पण घरातून अवहेलना अनुभवावी लागली आहे आणि मनातून मात्र आपल्याशी कोणी तरी छान बोलावे असे ज्यांना वाटते, ते सहजपणे कोणी बोललेल्या गोड शब्दांनी भारावून जातात. हे मोठेपणीही घडू शकते. खास करून घरातून कौतुक नाही पण कामाच्या ठिकाणी जेव्हा आदर मिळतो, कौतुक होते, तेव्हा त्याचे विशेष वाटतेच. 

म्हणजे समोरचा कसा वागणार आहे हे समजण्याआधी, ‘आपल्याला.. कोणी विचारपूस करावी, आपली काळजी करावी.. याची गरज आहे’ हे समजणे इथे महत्त्वाचे आहे. अनेकवेळा सुरुवातीला आपली काळजी घेतली गेली, आपल्याबद्दल आपुलकी वाटली, असे वाटून आपल्या मनात जिव्हाळा प्रेम उत्पन्न होते. मानसिक गुंतवणुकीला ‘आपल्यापासून सुरुवात होते’ हे कुठेतरी विसरले जाते. जर ते नाते पुढे टिकले नाही तर समोरच्या माणसाचा दोष असे वाटू लागते. आपली कदर नाही, किंमत नाही ही भावना तीव्र असते. आपल्याला प्रेमाची किती गरज आहे पण कोणीच ती समजून घेऊ शकत नाही असे वाटते. पण आपल्या भावनांना आपण जबाबदार हे मान्यच होत नाही. 

हे फक्त याच उदाहरणात नाही तर एरवीही दिसते. प्रेमात, नात्यात खटके उडण्याची कारणे हीच असतात. एखाद्याच्या भावना खूप उचंबळून येत असतात. दुसऱ्याला प्रेम, जिव्हाळा नसतो असे नाही, पण तितके भावनिक होता येत नाही. व्यक्त करण्यात भिन्नता असते. मग कोणाला काय वाटते, आणि कोण काय व्यक्त करते, याचे जोरदार हिशोब होतात आणि त्या हिशोबाचा अर्थ मात्र लागत नाही, सर्व गुंता झाला आहे असे लक्षात येते. प्रेम ही जर भाषा आहे तर प्रत्येक माणसागणिक त्याचे कोड्स वेगळेवेगळे असणार. ते डिकोड करण्यासाठी दोघांमध्ये काहीतरी निकष हे समान असायला हवेत.

जर प्रेमाची अभिव्यक्ती हा मुद्दा इथे लक्षात घेतला तर कोणतेही प्रेमाचे नाते तीन-चार प्रकारे व्यक्त होताना दिसते असे अनुभवास येते. एक म्हणजे शब्दातून. जे काय मनात आहे ते ते नीट शब्दातून मांडता येणे. मग ते साधे बोलणे असेल, कथा कविता असतील, प्रेमाचे निरोप असतील किंवा संवाद असतील. दुसरा प्रकार म्हणजे कृती. शब्दातून नाही व्यक्त होता येत. पण कृती मात्र दिसते. म्हणजे नीट बोलता येत नसले तरी विचारपूस होते, भेटींचे देणे घेणे, त्या माणसाला जे आवडते असे करणे, त्याची बाजू घेऊन लढणे, मदत करणे, ट्रिपला घेऊन जाणे, मजा करणे वगैरे. तिसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष त्या माणसासाठी कृती न करता त्या माणसाच्या ज्या श्रद्धा आहेत, आवडी आहेत, ध्येय आहेत, संकल्प आहेत, त्यांना साथ देणे. ही एकप्रकारची कृतीच आहे. पण अप्रत्यक्ष कृती. आणि चौथा प्रकार म्हणजे अबोल प्रेम. म्हणजे भेट होईल किंवा नाही, बोलणे होईल किंवा नाही, पण मनातून प्रेम वाटत राहणे. जमेल तेव्हा मदत करणे. 

हे समजून घ्यायला भारी वाटले तरी खरी गंमत अशी की जे दोघे आहेत त्यांच्या व्यक्त होण्याचा प्रकार जुळायला हवा. बिनसते ते तिथे. एक अबोल आणि दुसरा पराकोटीचा शाब्दिक.. तर कसे जमणार? दोघांचाही हिरमोड होणार. एकाला बोलायला जमणार नाही आणि दुसरा बोलत राहणार. एकाला भेटी देणे घेणे फार आवडते, मजा करायला आवडते पण दुसऱ्याला नाही, मग? ‘इथे कोणीच चूक नाही, पण चुकते मात्र दोघांच्याही आयुष्यात’ असे काहीसे होते. म्हणून प्रेमाचे कोडिंग आणि डिकोडिंग करणे फार महत्त्वाचे. 

प्रथम असे ठरवूया की नाते दोघांनाही खरेच हवे आहे का नाही. जे एकाला हवे असेल आणि दुसऱ्याला गरज नसेल तर ज्याला गरज वाटते आहे त्याची निराशा स्वाभाविकच आहे. पण जबरदस्तीने प्रेम मिळवता येत नाही. स्वतःच्या मनाला इथे समजवावे लागते. जसा आपला स्वभाव आहे तसा समोरच्याचा आहे. जसे आपण बदलू शकलो नाही, तसे तो/ती बदलू शकलेली नाही. इथे ‘जुळत नाही’ हे आधी मान्य व्हायला हवे. परंतु तरी मनातून प्रेम आहे आणि पुढे जायचे आहे, तर मात्र थोडे दुसऱ्यासाठी बदलायची तयारी हवी. 

यशस्वी होताना माझे ध्येय माझे संकल्प महत्त्वाचे पण प्रेमात मात्र हा ‘मी’ मात्र गळून जायला हवा. असे म्हणतात यशाची पायरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच गाठता येते पण प्रेमाची पायरी मात्र इगो डिझॉल्व्ह झाल्याशिवाय चढता येत नाही. याबद्दल पुढच्या लेखात विचार करू.   

संबंधित बातम्या