प्रेम .. हीच आशा एकमेव!

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.
डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 

‘प्रेम हीच अभ्युदयाची आशा एकमेव!’ कुसुमाग्रजांच्या लेखणीतून प्रकटलेले हे शब्द .. हाच भाव मनात ठेवून या प्रेम भावनेवरील लेखमालिकेला सुरुवात केली होती. प्रेमाच्या अनेक बाजूंवर आपण चर्चा केली. मुले, पालक यांचाही विचार केला. मानवी मनाच्या मर्यादाही समजून घेतल्या .. तरी ‘प्रेम हीच आशा’ हे मनात कुठेतरी खोलवर रुजले आहे. हे प्रेम.. हे निरपेक्ष प्रेम आहे.. जसे एखाद्या कठीण प्रसंगी कोणी निरपेक्ष प्रेमाने आपल्याला साधी हाक जरी मारली तरी बरं वाटतं, जगण्याचा उत्साह येतो. पण निरपेक्षता इतकी सोपी नाही.. आपल्याला आणि दुसऱ्याला .. कोणालाही.. जर हे जमले तर सुंदर फूल उमलावे तसे प्रत्येक नाते उमलत जाते. कसे बरे जमेल हे... 

‘आपण प्रेम करतो आणि आपल्याला प्रश्न पडतात’ हा खरा मुद्दा नाही, खरा मुद्दा हा आहे की ‘आपण खरे प्रेम करत नाही म्हणून प्रश्न निर्माण होतात’ असे महान तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती म्हणतात. आज फक्त नात्यांमध्ये तेढ आहे असे नाही तर समाजामध्येही विविध पातळ्यांवर तेढ आहे.. दरी आहे म्हणून माणूस माणसापासून तुटतो आहे. थोडा विचार करून पहा, जिथे प्रेम आहे तिथे द्वेष आणि मत्सर नसायला हवा. पण नेमके तेच आपण जगत असतो. प्रेम या सर्वोच्च भावनेची देणगी मिळूनही ते राग लोभच आपण जास्त प्रमाणात अनुभवतो. आपल्याला वाटतं की आपले प्रेम आहे म्हणून राग आला. पण दुसऱ्याला दुखावणारी कृती घडते, आपल्याच नकळत (आणि ज्याची आपल्याकडे अनंत समर्थने असतात ) तेव्हा आपण प्रेमापासून खरे तर दूर गेलेलो असतो. असेही अनुभवास येते की आपल्याला दुसऱ्याकडून खऱ्या प्रेमाची अपेक्षा करता येते पण म्हणून आपल्याला ते खरे प्रेम करणे जमतेच असे नाही.

आजच्या स्पर्धेच्या युगात व्यावसायिक यशासाठी मी आणि माझ्यातलं वेगळेपण अशी माझी ओळख निर्माण होणं फार आवश्यक असतं. पण प्रेमातील यशासाठी नेमके याच्या उलट घडणे आवश्यक आहे. उलट इथे ‘मी’ पण नको आहे. इथे माझ्या अशा वेगळ्या ओळखीचे महत्त्व नाही. उलट ज्याच्या बद्दल प्रेम आहे त्याची आपल्या मनात काय ओळख आहे, प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेचा पुरेसा आदर आपल्याकडून केला जातो आहे का नाही हे समजणे महत्त्वाचे आहे. इथे प्रेमाचा अर्थ केवळ हार्मोन्स मधून उद्दीपित झालेल्या भावना असा नाही. तर शब्द किंवा कृती यांमधून व्यक्त होणारा आपलेपणा, जिव्हाळा, ममत्व, आपुलकी, सहिष्णुता आणि अनेक जीवांमधील जोडलेपण तसेच विश्वास, श्रद्धा आणि भक्ती असे सर्व आहे. प्रेम हाच आपल्या कुटुंबव्यवस्था आणि अनुषंगाने समाजव्यवस्थेचा पाया आहे. या प्रेमाच्या ताकदीवर या संस्था निर्माण झाल्या परंतु भौतिक सुख, विविध कारणाने हवी  

असलेली प्रतिष्ठा, आणि मान -मरातब यांचा प्रभाव असलेल्या मानवी मनाला प्रेम करायला न जमल्यामुळे ही कुटुंब आणि समाजव्यवस्था आज मोडकळीस येताना दिसत आहे.

अनेकांच्या मनात अगदी स्वाभाविक प्रश्न येतो की मग निरपेक्ष प्रेम म्हणजे नेमके काय? याचे सर्वांसाठी कॉमन असे नियम, मार्गदर्शक तत्त्व या स्वरूपात काही मिळणार का? या प्रश्नांची उत्तरं ज्याला प्रेम करायचे आहे आणि प्रेमाबद्दल प्रेम आहे त्या प्रत्येकाने आपल्यापुरती शोधायला हवी.  वर म्हटलं त्याप्रमाणे ‘खरे प्रेम मिळावे’ असे प्रत्येकाला वाटते पण ‘खरे प्रेम करता यावे’ असे ही आपल्याला वाटायला हवे. ‘कुठे उरले शुद्ध प्रेम!’ असे उसासे आपण टाकतो पण तेच शुद्ध प्रेम आपल्या हृदयात आहे का हे आपण तपासायला हवे!  

तरीसुद्धा आपल्यापुरते आज थोडे काही समजतेय का पाहू. आपल्यापैकी प्रत्येक जण जगण्याच्या विविध टप्प्यांवर, विविध भूमिकेत आहे. तरी आपल्यापरीने काही जाणून घेऊन आपल्यात बदल करायचा प्रयत्न करू, आपल्या मनात निर्व्याज प्रेमाचा दिवा लावायचे ठरवू. आपल्याला प्रेम करता येत असेल तर ते निरपेक्ष, विनाअट करता येते का कोणावर तरी.. हे पाहूया. 

एकूणातच माणसाला प्रेम ही भावना आपल्या इच्छा, अपेक्षा, मागण्या, गरजा यापासून दूर ठेवता आलेली नाही. ‘आपल्या प्रेमाच्या माणसाकडून अपेक्षा’ हे स्वाभाविक आहे. पण होते काय की अपेक्षा निर्माण झाल्या की त्या सर्व जशाच्या तशा पूर्ण होतील असे सांगता येत नाही. मग आपली उपेक्षा होते आहे हा भाव उत्पन्न होतो. इथे बहुतेक वेळा स्पष्ट बोलणे होत नाही, न बोलता सारे समजून यावे अशाही ही काही समजुती असतात. या समजुती नात्यांमध्ये अधिकच तेढ निर्माण करतात. मग ‘न जुळण्याची’ स्थिती येते. हे ‘न जुळणे’ म्हणजेच दोन व्यक्तींमधील ‘फरक’ समजून घेणे. परंतु मी समजून घेते/घेतो; समोरचा समजून घेत नाही असे प्रत्येकालाच वाटत जाते आणि मग सर्वानी समजून घेतले पण कोणालाच काही समजले नाही अशी परिस्थिती येते!!  चला मग प्रथम आपण आणि आपले जिवलग, आपला जोडीदार, आपले आप्तस्वकीय यांना त्यांच्यातल्या आणि आपल्यातल्या फरकांसकट, किमान काही काळ समजून घेता येते का पाहूया. एकदा जमले की पुन्हा पुन्हा जमेल. आपल्याला जमले की इतरांना ही सांगता येईल. 

दुसरा विचाराचा मुद्दा असा की, निरपेक्ष प्रेम म्हणजे एकतर्फी प्रेम नव्हे. मग आपण त्या माणसासाठी खूप काही करत राहतो. आपल्या इच्छांचा त्याग करतो, कित्येक गोष्टी सहन करतो पण त्याची त्या माणसाला कदर नाही हे दुःख मनात सलते. आपल्याला वाटू लागते की जसे आपले प्रेम आहे तसे दुसऱ्या कोणाचे नाही. पण एक प्रश्न इथे स्वतःला विचारूया की त्याग, सहन करणे हे जरी प्रेमापोटी असले तरी ते किती प्रमाणात आणि किती काळ करावे, का करावे याचा अंदाज आला नाही तर आपण आपली भलावण कशी करणार आहोत? इथे कथा, कविता, कादंबऱ्या, चित्रपटांमधील याअर्थाचे मेलोड्रॅमॅटिक संवादही आपल्या मनात घर करून असतात. पण सहन करणं ही दर वेळी प्रेमाची परिभाषा होऊ शकत नाही. आपण स्वतःवर अन्याय करून घेतो एका अर्थाने आणि दुसऱ्याला करू देतो. 

काहीवेळा आपण प्रेम करतो, पण आपले आपल्या जोडीदारावरील अवलंबित्व वाढते. त्यातून असुरक्षितता निर्माण होते. आपल्यासाठी कोणी फारसे करत नाही असेही विचार मनात येऊ लागतात. पण हे परावलंबन आहे. प्रेम नाही. इथे आधी आपण मनाने कणखर होणे अधिक आवश्यक आहे. तसेच आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी काही करावे, आपल्यासाठी लढा द्यावा असेही वाटते. हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु अनेक वेळा अशी साथ आपल्याला मिळत नाही असे वाटते. याचे कारण अनेकदा संकल्पना आणि जगण्याचे दृष्टिकोन यात फरक असू शकतो. परंतु हा फरक समजला नाही तर आपली होरपळ होतेच शिवाय त्या माणसालाही आपण काहीच ठामपणे, स्पष्टपणे उत्तर न दिल्याने किंवा काही कणखर पवित्रा न घेतल्याने त्याचे ही फावते. आपल्याला यासाठी असे ठरवायला हवे की गरज, सुरक्षितता म्हणून सुरुवातीला जोडीदाराची साथ हवीशी वाटली तरी स्वातंत्र्य आणि स्वावलंबन हे एका परिपूर्ण नात्याचे आधारस्तंभ आहेत. जितके आवश्यक आहे तेवढेच कोणासाठीही करायचे आहे, त्याचवेळी आपली बाजूही नीट समजून सांगायची. जर नीट मांडता येत नसेल तर ते शिकायचे, कोणाची मदत घ्यायची. पण उगाच सहन करायचे नाही आणि आपल्या जोडीदारालाही आपला विचार करायला शिकवायचे.

तिसरा विचार प्रेमाच्या अभिव्यक्तीचा. मागच्या लेखात आपण म्हटले त्याप्रमाणे प्रेमाची अभिव्यक्ती प्रत्येकाची निराळी असणार. ती जुळेल किंवा जुळणार नाही. पण एकमेकांची अभिव्यक्ती समजून नक्की घेता येईल. त्याचा आदर करता येईल, कौतुक करता येईल. जे शक्य आहे ते मोकळेपणे एकमेकांना सांगितले आणि एकमेकांसाठी थोडे बदलण्याची तयारी केली तर कोणाचा हिरमोड होणार नाही. प्रत्येक माणूस निराळा त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत या भावनिक प्रक्रियाही  वेगळ्या असणार. भावनेच्या कोणत्या छटेचा प्रभाव कोणावर असेल हे सांगता नाही. परंतु आपल्याबाबतीत काय होते आहे हे समजून घ्यायला काहीच हरकत नाही. यातून एका चांगल्या आणि परिपूर्ण भावनिक नात्याची निर्मितीच होणार आहे.

सारांश - प्रथमदर्शनी आकर्षण आणि मग सहवासाने त्यातून निर्माण होणारे प्रेम हे स्वाभाविक आहे. परंतु खरे, निरपेक्ष प्रेम निर्माण होते ते एकमेकांचा पूर्ण परिचय होऊन जेव्हा एकमेकांचा सर्व गुण दोषांसकट स्वीकार केला जातो तेव्हाच. तिथे एकमेकांच्या मानसिक, वैचारिक वाढीला पूर्ण वाव दिला जातो. त्यासाठी थोडे जास्त समायोजन करावे लागले तरी ते केलेले असते. भावनिक अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यही दिलेले असते. पण त्याही पलीकडे जाऊन एकमेकांना कसा प्रतिसाद द्यायचा आणि त्यातून प्रेमाचे नाते कसे फुलवत न्यायचे हे समजलेले असते. हे कदाचित सहज समजेल असे नाही पण ते नात्याच्या बहारासाठी समजून घेण्याची, त्यासाठी आपल्यात थोडेफार बदल करायची, जागरूकतेने, जाणीवपूर्वक आपल्या जीवलगांसाठी काही अधिक करण्याची समजूत, क्षमता आणि इच्छा हे सर्व शिकावे लागते. तशी तयारी असावी लागते. जरी सुरुवातीला हे जाणवले नाही तरी प्रेमाचे नाते हवे आहे ना मग ते कोणत्याही टप्प्यावर शिकता येते. आपण किमान हे सारे समजून घेऊ, आपल्या घरापुरता विचार करू, आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोलू. एकमेकांना मदत करू.. प्रेमाचा बहर प्रत्येक नात्याने अनुभवावा अशी इच्छा तर व्यक्त करू… 

कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी म्हणत या लेखाची सांगता करू ..

प्रेम कुणावरही करावं .. कारण .. प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव...

संबंधित बातम्या