वियोगाच्या दुःखातून सावरताना

पल्लवी मोहाडीकर कासंडे
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.
डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 

हा विषय फक्त समुपदेशनाचा नाही, तर जगण्याचे तत्वज्ञान समजून घेण्याचा आहे. माझे अनुभव, मला आलेल्या प्रचिती आणि माझा अभ्यास यावर आधारित मांडायचा हा प्रयत्न. वियोग म्हणजे आपल्या माणसाच्या मृत्यूमुळे झालेला विरह. त्या माणसाची आपल्या रोजच्या जगण्यातली रिकामी झालेली जागा. या दुःखातून सावरणे असे नुसते म्हटलं तरी मनाला वेदना होतात. का नाही तो माणूस आपल्यात आता.. काय सावरायचं यातून.. काय करायचं पुढे असे प्रश्न क्षणार्धात आपल्यासमोर उभे राहतात. जरी आपण सावरलो असलो तरी काही क्षण त्या जुन्या आठवणीत जातो आणि ‘जरा हललो आतून’ असं जे म्हणतात तसं काही होतं. 

मृत्यूबद्दल बोलणेही फारसे होत नाही. ते नकारात्मक मानले जाते. कशाला ते विषय.. ‘आहे ते उत्तम जगा’ वगैरे म्हटले जाते. पण प्रत्येकाच्या मनात मृत्यूबद्दलचा विचार येऊन गेलेला असतो. पृथ्वीवरचे आपण सारे जीव हे जीवन मृत्यू याच चक्रातूनच जातो. कोणीच अमरत्वाचे वरदान घेऊन येत नाही. बरं शास्त्रीय दृष्ट्या ज्याला सुरुवात आहे त्याला शेवटही असणार त्यामुळे मृत्यू येणार नाही असा विचारही वास्तववादी नाही. त्यामुळे प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जायचेच आहे. मग जगण्याची ती एक अवस्था म्हणून का पाहू नये? कारण याने ताकद मिळते आपले आप्त, मित्रजन, जिवलग यांच्या मृत्यूनंतर वास्तव स्वीकारण्याची. निराशा, एकटेपण सहन करायची.

कोरोनाच्या संकटाने अनेक कुटुंबाना अचानकपणे आप्त, जिवलग यांच्या मृत्यूला कमी काळात मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले आहे. एरवीही निसर्ग नियमाप्रमाणे म्हातारपणी येणारा मृत्यू, म्हणजे साधारण ८०-८५ वयानंतर, या खेरीज अनेक कारणाने होणारे लहान वयातील मृत्यू यामुळेही आपल्याला या प्रसंगांना सामोरे जावे लागते. मृत्यू अचानक येवो किंवा आजाराने, ‘आता मनाची तयारी करा’ असे डॉक्टरांनी सांगितल्यावर सुद्धा.. तो माणूस आता आपल्या आसपास नाही, त्याला पाहता येणार नाही, त्याच्याशी बोलता येणार नाही, त्याला स्पर्श करता येणार नाही, त्याची जागा कायम रिकामीच राहणार... हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि मनाची तयारी करायची आहे ती या सत्याला सामोरं जायची. 

सामोरं जायचं म्हणजे दुःख होणार नाही, हताश वाटणार नाही, हातापायातली ताकद गेली असं वाटणार नाही असे अजिबात नाही. सुरुवातीला आणि नंतर कित्येक काळ तसे वाटणार. त्या माणसाचा सहवास आणि त्या आठवणी यानेच तर आपले जगणे आनंददायी केलेले असते. आपल्या रोजच्या विचारात, छोट्या छोट्या हिशेबात आपली माणसं असतात. त्यांना आपण गृहीत धरलेलं असतं. आपल्या  

कित्येक मानसिक, वैचारिक गरजा, इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कळत नकळत ते हवे असतात. अनेकदा प्रत्यक्ष गरजा काही उरत नाहीत पण आपल्या सुखदुःखाचे साथीदार, स्नेही, सहकारी, अशा भूमिकेत ते आपल्याला हवे असतात. रोजची सवय होऊन जाते ती. त्यात आनंद असतो, समाधान असतं. घराचं, कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं स्थैर्य त्यामध्ये असतं. त्यामुळे मनाची तयारी कशी व्हावी. कोणी आपल्यातून जावं हे कसं मनात यावं. 

सारे काही उपभोगून वयाच्या ८०-९० वर्षानंतर कोणी गेले तर खूप विचार मनात येत नाहीत. सारे काही पहिले त्यांनी, असे वाटते. पण अकाली होणारा मृत्यू हा जाणाऱ्या माणसावर काळाने केलेला अन्याय आहे असे वाटते. ‘जो गेला त्या माणसाच्या बाबतीत हे का घडावे? त्याच्या इच्छा शिल्लक होत्या, खूप हुशार होता, खूप काही केले असते, खूप काही उपभोगण्याचे राहून गेले...’ असे आपले दुःख असते. सैनिक, तसेच काही धाडसी, साहसी कामात असणाऱ्या व्यक्तींच्या अकाली मृत्यू बाबत हळहळ वाटली तरी त्याकडे अभिमानाने पाहिले जाते. पण अपघात, आजार असेल तर मात्र इतक्या लहान वयात का? हा प्रश्न आपण जाईपर्यंत आपल्याला सतावत राहण्याची शक्यता असते. इथे सावरावे लागते. त्याच्या जाण्याचे कारण समजले नाही म्हणजे ते कारण नसते असा त्याचा अर्थ नाही. सत्य हे की शरीर एका मशिनप्रमाणे आहे त्याचे कार्य संपले की सारे संपते. ते का संपावे? हे ठरवणे आपल्या हाती नाही. इथे कमालीची असहायता अनुभवतो आपण.. कळते आहे पण वळत नाही ही अवस्था असते.

पण सावरताही येते. पुन्हा उभे राहता येते. आहे ती वेदना, दुःख आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात अलगदपणे सांभाळून सुरुवातीला.. आणि मग नंतर त्याकडे साक्षी भावाने जगण्याचे एक सत्य म्हणून पाहता येते. जसे वियोगाच्या दुःखामुळे कोलमडून गेलेले, किंवा दुःखी, व्याकूळ भाव घेऊन नाइलाज म्हणून जगताना अनेकांना आपण पाहतो ….तसेच सावरलेले आणि उलट त्याच माणसाच्या आठवणीत काही जबरदस्त काम उभे केलेले ही पाहतो. काय विचार असेल या पाठीमागे?

सावरताना कोणी जावं, कोणी नसावं असा विचार खूप आधीपासून करायची गरज नाही. आपल्या सर्वच दर्शनांमध्ये या गोष्टीचा विविध वैचारिक पातळ्यांवर बोधपर ऊहापोह आहे. जो फक्त ‘मनाची समजूत घालणे’ असा नाही. तर तो ‘जगण्याचे सत्य समजणे’ या पातळीवरील आहे की प्रत्येकाचा एक प्रवास आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत. मृत्यू कोणाच्याच हातात नाही. या जीवसृष्टीतील सर्वात उत्क्रांत असा जीव म्हणजे आपण माणसे. आपल्याकडे मेंदू, मन आणि त्याही पलीकडच्या जाणिवांबरोबर प्रवास करणारा साक्षीरूपाने आपल्यात असणारा ‘मी’ म्हणजेच तत्त्वज्ञानातील निर्गुण निराकार परंतु या जिवाची शक्ती, प्राण असलेला आत्मा .. असे सर्व काही आहे. जगताना आपले जन्मदाते, नातेवाईक, मग जोडीदार आणि त्यानंतर आपली पुढची पिढी या सर्वांबरोबरच आपल्याला हा प्रवास करायचा आहे. हे सर्व खरेच आहे.

पण सर्वांबरोबर असला तरी हा प्रवास प्रत्येकाचा एकट्याचाही आहे. आपल्या अभिक्षमता, कौशल्य यांचा जास्तीतजास्त वापर करून आपल्या कडून काही साध्य व्हावे, घडावे, निर्मिती व्हावी यासाठी हा प्रवास आहे. जे काही आपण करणार आहोत ते आपले कुटुंब, स्नेही, समाज, देश यासाठी करणार आहोत. पण त्याचबरोबर वर म्हटल्याप्रमाणे जो केवळ आपण माणसांना प्राप्त झाला आहे तो निर्गुण निराकार, साक्षीरूप मी याच्या शोधासाठीही जगायचे आहे. कारण हाच मी आपल्याकडून सर्जनशील कार्य घडवून आणणार आहे.  

जसे मातृऋण, पितृऋण, समाजऋण आहे तसेच हे ‘मी’चे आत्मऋणही आहे. यामध्ये आपल्या शरीरमनाच्या साहाय्याने आपण ज्ञानाला प्राप्त व्हावे जेणेकरून आपल्यातील गुणांचा अधिकाधिक विकास, आणि त्यातून प्रचिती येऊन मग सर्व मोह, लोभ, अहंकार गळून पडून एका चिरंतन अशा समाधानाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती स्वतःला करून देणे हे सारे येते असे आपले तत्वज्ञान सांगते. म्हणून माणसाच्या म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हातून काही चांगले घडावे, आपला या जगाला उपयोग व्हावा, आपण आपल्या विचार, बुद्धी, मन या सगळ्यांसकट चांगल्या आचार विचार, आणि अनुषंगाने एका चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी जी पर्यावरण पूरक आणि या सृष्टीसाठी पोषक असेल.. या साठी हा मानवी जीवनाचा प्रवास असावा, उत्क्रांती च्या मागील हेच प्रयोजन असावे. जेव्हा कोणाच्या वियोगात आपण कोलमडून पडतो तेव्हा हे प्रयोजन, हा विचार नाहीसा होतो. ज्याच्या वियोगाचे दुःख आपण सहन करत असतो त्याच्या जाण्याने आपल्या जगण्याचा अर्थ ही निघून गेलेला असतो... म्हणून गरज असते हा अर्थ पुन्हा प्रस्थापित करण्याची. 

एक अजून महत्त्वाचा विचार- किड्या मुंग्यांपासून सर्वांनीच व्यवस्थित जगावे, जेवढे आयुष्यमान आहे तेवढे मिळावे हे वाटणे अगदीच योग्य आहे. परंतु ते आयुष्यमान ज्याला त्याला तसे मिळणे न मिळणे हे कोणाच्या हातात नाही. परंतु लौकिक अर्थाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपणच कोणी ना कोणी त्याला नैमित्तिक दृष्ट्या जबाबदार असतो. अनेकदा हे नैमित्तिक असणं आपल्या लक्षात येत नाही, कारण आपली तितकी साधना नसते, तितका विचार आपला झालेला नसतो. त्यामुळे अपराधीपण मनात येते, की कळत नकळत मी जबाबदार आहे याच्या मृत्यूला, आपण त्या माणसासाठी काही करू शकलो नाही. किंवा जर तर च्या शक्यतांनी मन नेहमीच उद्विग्न असते. त्यावेळी मी असे केले असते तर हे झालेच नसते, मला का सुचले नाही या प्रश्नांनी अनेक जण आपण स्वतःला भंडावून सोडतो. पण या जर तर च्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो आणि उत्तरे ही नसतात. पण अनेकदा सुरुवातीला या प्रश्नांनी आपण घेरून जातो आणि त्यातून निराशा येण्याची शक्यता असते. जर अन्याय झाला असेल तर आपण शक्य असेल आणि साथ असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवायला हवा. 

हा त्या माणसाचा प्रवास तसा होता या पलीकडे असे का घडले या प्रश्नाला दुसरे उत्तर आपल्याला देता येत नाही… म्हणूनच सतत हेच प्रश्न मनात घेऊन नकळत आपल्या जगण्याचे हे आधार तर बनत नाहीत ना हे पाहणेही आवश्यक आहे. ज्याला काहीही उत्तर नाही त्यामागे धावण्यापेक्षा जे आपण शिल्लक आहोत त्यांनी कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी करणे हे वास्तववादी आहे. आपल्या मनातल्या सुख, आनंदाच्या कल्पनांशी हे मिळते जुळते नसले तरी आपल्यातला मी जो सर्वसाक्षी आहे त्याच्या शोधात आपला प्रवास असायला हवा हा विचार या आनंदाच्या पलीकडचा आहे हे निश्चित. हे सत्य वेदनादायी असले तरी तेच मनाला उभारी देणारे आहे .. वियोगाच्या दुःखाला प्रेरणा बनवून काही सावरलेल्या हातांनी केलेल्या कित्येक समाजपयोगी निर्मिती त्याची साक्ष आहेत.... चला त्यात धीराने सामील होऊ.

संबंधित बातम्या