काहीतरी मिस होतंय...

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे
सोमवार, 7 डिसेंबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.
डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 

‘आमच्या वेळी हे नव्हते, किंवा पूर्वी हे नव्हते,’ अशी काही वाक्ये, ‘पु.लं.’ म्हणतात तसं, पूर्वी ज्याच्या त्याच्या तोंडी असायची आणि ‘बालवाडी पासून ओंकारेश्वरापर्यंत कुठेही ऐकू यायची’. सध्याच्या काळातही काही वाक्ये अशीच ज्याच्या त्याच्या तोंडी असतात. ते म्हणताना देखील लोक थोडे उसासे वगैरे सोडतात. ‘काहीतरी मिस होतंय’, ‘काहीतरी हरवलंय काळाच्या ओघात’, ‘मन लागत नाही, बोअर होतंय’.. 

हे असे आपल्याला वाटून गेले आहे का असा प्रश्न वाचकांनी स्वतःच्या मनाला विचारावा. एखाद्या वेळेस वाटत असेल तर ठीकच आहे. कधीतरी असे वाटणार. पण जर असे वाटण्याची वारंवारता अधिक असेल तर ते फक्त वाटणे नाही तर ती मानसिकता होते आहे. समजा तुम्हाला असे कधी वाटत नसेल, पण आपण आजूबाजूला ऐकत असू, आपल्या घरात कोणी म्हणत असेल...  आणि सर्व घर छान भरलं असताना उगाच जगण्याबद्दलचं असमाधान व्यक्त करत असेल.. 

म्हणूनच थोडी ही मानसिकता समजून घेऊ आणि त्यातून मार्ग कसा काढायचा तेही बघू. आज आपण विचार करूयात पहिल्या वाक्याचा.. ‘काहीतरी मिस होतंय!’ इंग्रजीमध्ये याला ‘फिलिंग ऑफ मिसिंग आउट असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात, ‘बाकी सर्व जगाने जे काही सुंदर असे आयुष्य आहे ते अनुभवले आहे, मजा केली आहे, माझी मात्र राहून जातेय / राहून गेले आहे’. म्हणजे मी संसारातच फार अडकलो, कामातच अनेक वर्ष निघून गेली, बैलाची वर्षे जगण्यातच जिंदगी बरबाद झाली, काही करता आले नाही, कधी कुठे जाणे नाही, मौज मजा नाही, छ्या ! कित्येक वेळा निराशा व्यक्त करताना ही वाक्ये बोलली जातात. मग कित्येक गोष्टी मिळूनही, हे आधी झाले असते तर बरे झाले असते... असे वाटत राहते. 

‘मग खरेच नाही का हे..’, असे काही लोक म्हणतील. ‘नाही का केले काम आम्ही आयुष्यभर, कष्ट केले पण अनेक गोष्टी सध्या सुद्धा नाही जमल्या!’ हे बरोबरच आहे. खरंच आपण काम करत असतो. खूप कष्ट करत असतो. पण आपल्यापेक्षा कदाचित आपल्या मागच्या पिढीने असे कष्टाचे दिवस जास्त पहिले आहेत. किंवा रोजंदारीवर काम करणारे, मजूर आजही असेच दिवस पाहत आहेत. आपण ऑफिसमध्ये आहोत, किंवा जरा बरे काम करत आहोत. त्या कामाच्या ठिकाणीही लोक ओळखतात आपल्याला. मग भले ‘ऑफिस ते घर’, ‘घर ते ऑफिस’ असे जरी केले असेल तरी पण सण समारंभ तर नक्कीच साजरे केले असणार. आपली मुले मोठी झाली, छान घडली, लग्न वगैरे कार्यक्रमांच्या निमित्ताने तरी नक्कीच कधी सुट्टी घेऊन कुठे जाण्याचा योग आलाच असणार. पण जेव्हा आपण कदाचित वरच्यावर ट्रीपला जाणाऱ्या, पार्ट्या करणाऱ्या, बाहेरचे खाणे, ब्रँडेड कपडे यांची चंगळ असणाऱ्या माणसांशी तुलना करतो, त्यांना पाहिले की वाटते की..  छे, आपण काहीच नाही केले. मग यातूनच काही वेळा ‘दुसरा माझ्यापेक्षा सुखी’ अशी भावना निर्माण होते आणि आपणही पैसे कमावून, घरात छान वस्तू असून, आपले स्वतःचे घर असून, थोडा फार बँक बॅलन्स असूनही ... थोडे दुःखीच राहतो. अगदी रोज नाही पण बरेच वेळा असमाधान मनात घर करून राहते. हा जागतिक फिनॉमिना आहे. याच भावनांचा फायदा घेऊन आज पर्यटन, फिल्म इंडस्ट्री, फॅशन इंडस्ट्री, आणि रोज नव्याने उदयास येणारी ‘जंक फूड’ची भरभराट होते आहे. 

जाहिरातीही अशाच असतात... की त्वरा करा.. नाहीतर ही ऑफर हातून निसटून जाईल. सर्वच ऑफर्सना आपण भुलत नाही हे जरी खरे असले तरी आपल्या मनात ज्या गोष्टी असतात त्याबद्दल जेव्हा आपण असे ऐकतो पाहतो तेव्हा एक क्षण वाटून जाते की हो काहीतरी निसटून चालले आहे. केले तर आत्ताच होईल नाहीतर नाही! 

काही न करता सुद्धा घरात बसता येते, हे कोरोना आणि त्यामुळे झालेला लॉकडाउनने खरंतर दाखवून दिले आहे. गरजा अगदी थोड्या असतात आपल्या, बाकीचा चंगळवादच आहे. पण आता जसे जसे अनलॉकच्या प्रक्रियेतून आपण ‘सर्व काही चालू झाले’ .. अशा अवस्थेत जात आहोत .. तसे हे ‘अर्रर्र खूप मिस झालं राव, ट्रीप राहून गेली, ट्रेक राहून गेला, पार्ट्या, सुट्ट्या, मजा राहून गेली’ .. असे उद्‍गार सर्वत्र ऐकायला मिळतात. आपण काळजी घेतली आणि कोरोनाच्या संकटातून वाचलो म्हणून आपण असे म्हणत आहोत हे त्यावेळी लक्षात सुद्धा येत नाही. एरवी सुद्धा... काम केले म्हणून तर थोडे पैसे जमा करू शकलो आणि आज सर्व जबाबदाऱ्या पार पाडून मौज मजेवर विचार न करता, सहज, पैसे खर्च करू शकतो आहोत... हे लक्षात येत नाही.

आजचा सोशल मीडियाचा भडिमार याला आणखी दुजोरा देतो. कारण खास करून खाणे पिणे, हॉटेलिंग आणि पर्यटन या विषयकच पोस्ट अधिक असतात. तिथे विविध स्टायली मारत फोटो काढलेले असतात, सेल्फी असतात. फोटोंचे कौतुक नसते मनात .. पण आपण जायला हवे तिथे, जी मजा यांनी केली ती करायला हवी हे मनात येते. कित्येकदा ऐतिहासिक स्थळे, त्यांच्या कथा, त्यांची निर्मिती यात अजिबातच रस नसतो. बस जाऊन मजा करणे हाच फक्त फोकस असतो. म्हणून मग नुसती मजा होते आणि आपणच आपल्याच पवित्र वास्तूंच्या जागी कचरा करून येतो.

सर्वच ‘ट्राय’ करून बघायला हवं ... ‘काही केले नाही’ असे नको व्हायला म्हणून उगाचच खर्च करतो, खात राहतो.. यातून चिरंतन असे समाधान मिळते का? हा प्रश्न कधीच स्वतःला आपण विचारत नाही. तंत्रज्ञान विकसित होत राहणार आहे. नवनवीन वस्तू बाजारात येत राहणार आहेत. मग आपण किती विकत घेणार आणि जुन्या वेस्ट म्हणून पुन्हा बाजारात जमा करत राहणार..?

मध्ये एकदा एका मित्र मैत्रिणींच्या संमेलनात कोणीतरी म्हणून गेलं .. की कितीही काम करा.. पण ताम्हिणी घाटात जाऊन तुम्ही धबधब्याखाली उभे राहिलात का.. खंडाळ्याच्या घाटात जाऊन करवंद खाल्लीत का .. सिंहगडावर जाऊन पहाटेचा वारा अंगावर घेतलात का .. (अशी अजून मोठी लिस्ट होती).. जर असे केले असेल तरच खरे आयुष्य जगलात.. ते ऐकल्यावर थोडे लोक बावरले होते. ‘छे काय आपण अडकलो रहाट गाडग्यात!’, असंच त्यांना वाटू लागले.  पण असे लगेच वाटून घ्यायचे काहीच कारण नाही. कारण हे अजूनही करता येईल.. इतके काही मोठे चुकीचे घडले नाही.. असे काहीही फार मोठे मिस केले नाही. 

माझी एक बालमैत्रीण मला नेहमी सांगते की मधल्या काळात नाही भेटू शकलो, किंवा आजही जवळ राहात असून रोज भेट होत नाही म्हणजे काय फार मोठे आपले चुकत नाही. आपण आपल्या कुटुंबासाठी आवश्यक तेवढा वेळ देत आहोत. आणि जमेल तेव्हा नक्की भेटणार आहोत. काहीही मिस करत नाही आपण.

याचा अर्थ फिरायला जायचेच नाही का, हॉटेलिंग करायचे नाही का, मित्रांची संमेलने, पार्ट्या वाईट आहेत का .. तर अजिबात नाही. ते करायचेच पण मानसिकता बदलून. ‘फिलिंग ऑफ मिसिंग आउट हा दृष्टिकोन बदलून. आपल्या मनाची प्रगती व्हावी म्हणून, वैचारिक समृद्धी व्हावी म्हणून. मग त्यासाठी कसेही करून काहीतरी करण्याचा आटापिटा नको आणि ते जमले नाही तर अपराधीपणा किंवा दुःख ही नको. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येये आणि आपले वर्तनप्रकार वेगळेच असणार. ज्यावेळी करिअर करायचे, कुटुंब सुरू करायचे, घराची जबाबदारी अंगावर घ्यायची, आपल्या पालकांच्या खांद्यावरचा भार कमी करायचा तेव्हा वाटेल तसे मनमानी करत नाहीच वागता येणार. आपल्या मनस्वीपणाची जबाबदारी आपणच घ्यायची. जी मजा करायची आहे त्यासाठी पाया आपल्यालाच पक्का करायला हवा. ते करताना जर काही सुंदर असे वाटणारे क्षण नाही जगता आले तर त्यात आपण काही मिस करत नसतो.

म्हणून अगदी या क्षणापासून इतरांच्या जगण्याशी आपली तुलना करणे बंद करूया. असे म्हणतात की लढा प्रत्येक जण देत असतो. अनेकांचा लढा आपल्या लक्षात येत नाही. त्यांनी त्यांच्या कष्टाची फळे उपभोगलेली आपण पाहतो, पण त्यांचे कष्ट आपण पाहिलेले असतातच असे नाही. तुलना करायची नसेल तर सोशल मीडियाचा वापर मर्यादित करू. जे लोक मजा करत आहेत असे वाटते त्यांचे कौतुक करू. त्यांची मजा हे आपली प्रेरणा असणे दर वेळी योग्य नाही. जर पर्यटन करायचे असेल तर ते विचारपूर्वक आणि जबाबदारीने करायला हवे. काहीवेळा विचार करमणुकीच्या पुढे जात नाही. मनोरंजन होईल.. म्हणजे आपल्या मनाचे रंजन होईल, मन ज्यात रमेल, ते करणेही आवश्यक आहे. जे आपल्याला अनेकवेळा सर्जनशीलतेचा मार्गच दाखवणार आहे. अनेक गोष्टी करण्यासाठी आपले वय, आपली क्षमता, आणि आपल्या इच्छा यांचा मेळ बसणे ही खूप महत्त्वाचे आहे. 

आपण जर आपल्या भूतकाळाशी करत तुलना  असू तरी काहीतरी हरवल्याचं फिलिंग येत राहतं .. त्याबद्दल पुढच्या लेखात..

संबंधित बातम्या