स्मरणरंजन की हरवलेपण

पल्लवी मोहाडीकर-कासंडे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

मनतरंग

काही मानसिकता सर्व काही ठीक, छान असून आपल्याला समाधानाचा भास निर्माण करून देतात. त्याबद्दल आपण मागच्या लेखापासून मनन करत आहोत. या लेखात विचार केला आहे ‘काहीतरी हरवलंय’ या मानसिकतेचा. याचे जोडलेपण आपल्या भूतकाळाशी आहे, भूतकाळ आठवण्याशी आहे. 

भूतकाळ आठवणे हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आठवणी या असणारच. मुद्दाम काही आठवायचं नाही असं ठरवलं तरी एखादं गाणं, एखादी वस्तू, जुना कपडा, जुने फोटो आपल्याला क्षणार्धात आपल्या भूतकाळात घेऊन जातात. तो भूतकाळ सुखद असो किंवा दुःखद पण काही काळ आपण त्यात नक्कीच रमतो. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ हे तर प्रत्येक जण मान्य करेल. बालपणाबरोबरच तरुणपणीचा काळ म्हणजे महाविद्यालयीन दिवस  हे देखील तितकेच अविस्मरणीय. त्यामुळे ते बालपण, तरुणपण आठवणे म्हणजेच ‘स्मरणरंजन’ करण्यासारखे आहे. हे स्मरणरंजन आपण आपल्याला निर्मळ आनंद देण्याचाच एक प्रकार आहे. 

मला आठवतंय माझी एक आजी त्यांच्या लहानपणीच्या कथा अगदी रंगवून रंगवून सांगायची. तिची बोलण्याची पद्धतच अभिनयपूर्ण होती. त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वी घडलेलं अगदी काल परवा घडलं आहे अशा थाटात तीही सांगायची आणि आम्ही नातवंडेही मोठ्या उत्साहाने ऐकायचो. काहीवेळा आम्हीच आठवण करून द्यायचो की आजी, ती तुमची ही मजा सांग ना, ती गोष्ट सांग ना. एक दोन तास अशा गप्पात सहज निघून जायचे. एरवी ती आजी स्वभावानं एकदम कडक आणि शिस्तशीर होती. पण तिच्या आठवणीत रमली की आम्हाला अधिक आवडायची. 

अगदी हे लिहिताना सुद्धा मी काही क्षण त्या माझ्या लहानपणात शिरले होते. यालाच स्मरणरंजन म्हणतात. याच संदर्भात नुकताच नॉस्टॅल्जिया (स्मरणरंजन) याच विषयाचा डॉ. बाळ फोंडके सरांचा लेख वाचण्यात आला. असे आठवणींमध्ये रमताना मेंदूमध्ये काय प्रक्रिया होतात असा ज्या ज्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, मेंदू मापनाचे प्रयोग केले त्याचा त्यांनी या लेखात अगदी अभ्यासपूर्ण आणि नेमका आढावा घेतला आहे. ते म्हणतात त्या प्रमाणे बहुतेक वेळा स्मरणरंजन हा मनाचा एक खेळच. बहुतेक वेळा तो सुखावणाराच असतो. क्वचित त्याला विषादाची झालर येते जर आठवण दुःखद असेल तर. त्या स्मृतींची जणू काही काळ धुंदी असते आणि ती धुंदी उतरल्यावर नकळत आपण सुस्कारा टाकतो. पण तरी कोणत्याही क्षणी माणूस त्या क्षणांच्या नगरीत सफर करायला तयारच असतो. हातातली सर्व कामे बाजूला पडतात आणि अचानक थोडा काळ का होईना माणूस गत आठवणीत रमतो. त्यातून ऊर्जा घेतो. 

जेव्हा जेव्हा आपण रम्य अशा आठवणीत असतो तेव्हा तेव्हा आनंदनिर्मिती करणाऱ्या डोपामाईनचा स्त्राव मेंदूत सुरू झाल्याचं अनेक प्रयोगांत दिसून आलं आहे. किंवा आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सेंटर उद्दीपित झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अनेकदा हे स्मरणरंजन ताण कमी करण्याची एक युक्ती बनून जातं. जरी भूतकाळात मार बसला असेल, किंवा शिक्षा झाली असेल तरी आठवण म्हणून सांगताना आपण हसतो. म्हणजेच आठवणीतील त्रासदायक भाग कालांतराने आपोआप काढून टाकला जातो आणि त्यावर विचारांचे संस्कार करून त्याची बोच न उरता, त्यातून मजा कशी येईल अशी व्यवस्था आपला मेंदूच लावतो. त्यामुळे मग ... शी ! खूप वेदना झाल्या होत्या रे ... असं लक्षात न राहता .. आईशप्पथ कसला मार बसला होता! असा थोडा विनोदी ढंगातील उद्‍गार मग जुन्या आठवणी सांगताना उरतो. 

अनेक स्नेहमेळावे, रियूनिअन यांचा उद्देश तोच असतो. मित्रमंडळीत आपण आपल्या जुन्या थोड्या बेफिकीर अशा मनोवृत्तीत काही काळ रमून जाऊ शकतो. याने आपण एकटे नाही, आहेत आपल्याबरोबर सगळे पूर्वीसारखे अशी भावना दृढ होते. प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी मग त्या आठवणींमुळे सुद्धा तो विश्वास आपल्याला मिळायला मदत होते. या बक्षीस, बोनस अशा रूपातल्या स्मरणरंजनाबरोबर ‘लहानपणीचा हा रम्य भूतकाळ कुठेतरी हरवलाय’ असा विचार हल्ली अनेक प्रकाराने व्यक्त होतो. जगजीत सिंह यांची गझल, ‘वो कागज की कश्ती बारिश का पानी...’ या मध्ये जो भाव आहे किंवा ‘पुरानी जीन्स और गिटार..’ या गाण्यातला हळवेपणा आहे, तो अत्यंत सुंदर आहे. ‘गेले ते दिन गेले...’ हे गीत दुःखद भावाचे असले तरी ते जाणिवांना पोषक असे गीत आहे. 

पण याची एक दुसरी बाजूही आहे. जी नकळत आपल्याला बक्षीस म्हणून आलेल्या जाणिवेपेक्षा ‘अरेच्या! हरवलंच जास्त आहे’, अशा जणू शिक्षा मिळाल्याच्या जाणिवेकडे घेऊन जाते. तिथे आपण सर्वांनी सावध राहून हे हरवले असे फिलिंग येऊ न देणं फार महत्त्वाचं असतं. सोशल मीडियावर या अशा अर्थाच्या असंख्य कविता, कोट्स हल्ली खूप आढळतात आणि त्यातून दर वेळी सकारात्मकता दिसते असे नाही. ते जुने दिवसच कसे चांगले होते आणि आता कसे आपले जगणे गढूळ झाले आहे अशा अर्थाचे उद्‍गार येतात आणि कसेही करून ते पूर्वीचे मजेचे, थोडे बेफिकिरीने उनाड जगण्याचे क्षण आत्ता पुन्हा यावे म्हणून थोडी धडपड सुरू होते. मग एकदा रियूनिअन करून पुरत नाही. पुन्हा पुन्हा तसे भेटायला हवे, मजा करायला हवी असे वाटत राहते. ज्यांना जमत नाही त्यांच्या मनात मग काहीतरी पूर्वीचं छान हरवलं आहे अशी भावना मनात राहते. मग ते काहीही हरवलेलं असतं. घरातलं जुनं कपाट, शाळेचे बाक, पूर्वीच्या आपल्या गल्ल्या, कुठलीतरी चहाची टपरी, पूर्वीचे रस्ते, ते अंगण, ते झाड, तो पार .. ज्या ज्या या सगळ्या गोष्टींशी आपल्या आठवणी जोडलेल्या आहेत... जे आत्ता २५-३० वर्षांनी तसं नसतं .. ते सारं आठवणीत ताजं असून हरवलेलं असतं. अर्थात हे अगदी स्वाभाविक आहे. पण मग अनेकवेळा रोजच्या जगण्याच्या जबाबदाऱ्या, कष्ट, समस्या यांच्याबद्दल मनात उगाच नाराजी उत्पन्न होते. हे योग्य आहे का हा प्रश्न फक्त प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. 

कोणाचेच आयुष्य साधे सरळ नसते. शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची, व्यवसाय करायचा आणि मग संसारात पडायचे याला काहीच पर्याय नाही. पैसे कमावणे, चरितार्थ चालवणे हे तर आवश्यक आहे... प्रत्येकाला..  ‘ते कोणाला चुकले?’ ... असा भाव निर्माण झाला की मग ‘ती पूर्वीची मजा आता नाही’ असे वाटायला लगेच सुरुवात होतेच. 

आठवणींमध्ये रमताना आपली अजून एक गडबड होते म्हणजे त्या आठवणी, तो भूतकाळ व त्यातून मिळणारा आनंद आणि ते बालपण, तरुणपण हे आपण एकच समजायला लागतो. बालपण म्हणजेच आनंद असे समीकरण होते. नकळत मग लहान वयातील मोकळीक, जबाबदारी नसणे,  पैसे, नोकरी नाही, चिंता नाही हे सुख... हेच चांगले असे आत मनात घर करून राहते. जगण्याचे विविध टप्पे असणार आहेत, हे सत्य जणू मनातून आपण नाकारतो. वर म्हटल्याप्रमाणे बालपणीचा काळ सुखाचा असला, तरुणपणी खरी मजा असली तरी आपण वयाने मोठे होणार याला काहीच दुसरा पर्याय नाही. 

त्यामुळे पूर्वीचे ते दिवस हरवलेत असे कशाला समजायचे? त्याकाळी ते पूर्णपणे जगलो, मनमुराद हुंदडलो तेव्हा, म्हणून तर मग त्या क्षणात अडकलो नाही, नंतर जेव्हा जबाबदारीने काही करण्याची वेळ आली तेव्हाही ते ते सर्व तन मन धन अर्पून केलं आहे, असे भाव हे अधिक सकारात्मक नाहीत का?  

सोशल मीडिया वरचा असाच एक व्हिडिओ पाहण्यात आला. त्यात जुना दूरदर्शन संच, जुना फोन, जुन्या जाहिराती वगैरे एकत्र केलेले होते. बघताना छानच वाटले. मन काही क्षण भूतकाळात नक्की रमले. पण आज जे मी जगत आहे आणि ज्या जगात आहे त्यापेक्षा आधीचे जगच फक्त सुंदर होते, असे मात्र नाही वाटले. एक तर स्मार्ट फोन आले, आणि अनेक नवनवीन कॉम्पुटर व मोबाईल ॲप्लिकेशन्स आल्यामुळे तर हे असले व्हिडिओ आपण बनवू शकत आहोत. जुने जुने शोधून ते स्कॅन करून त्याचे कोलाज करणे हे नवीन तंत्रज्ञानामुळे तर शक्य झाले आहे. अनेकदा पूर्वीचे कट्ट्यावर गप्पा मारणे कसे चांगले होते हे आपण वाचतो आजच्या सोशल मीडियावरच! सोशल मीडिया कसा वाईट आहे हे सांगतो आपण सोशल मीडियावरच! हा विचारांमधील मोठा विरोधाभास नाही का? 

‘लिव्ह इन द मोमन्ट’ असे नेहमी सांगितले जाते. आत्ताच्या या क्षणात जागा. पूर्वीचे क्षण निश्चितच छान होते. ते तसे होते म्हणून आजचा आज आपण पाहू शकत आहोत. आज कष्ट करून सुस्थितीत आहोत म्हणूनच पूर्वीच्या आठवणी या सुखद आठवणी होऊन आज आपल्याकडे जणू खजिना म्हणून उरल्या आहेत. त्या आठवणी मनाचे रंजन करणाऱ्या आहेत. त्या तशाच राहिल्या तर कठीण प्रसंगी आपल्याला ऊर्जा मिळणार आहे. आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळणार आहे. 

परंतु जर ‘आठवणींचा खजिना’ असे मनात न राहता ‘काहीतरी हरवले’ अशी भावना बहुतेक वेळा मनात राहिली तर मात्र आपण स्मरणरंजन करून स्वतःला कोणत्याही क्षणी प्रेरित करण्याच्या आपल्याच शक्तीला विसरून आपले आजच्या क्षणाचे मिळणारे समाधान घालवून बसणार आहोत. आपल्या बालपणीच्या आणि तरुणपणीच्या आठवणीत आपली निरागसता आहे, आपल्या निर्लेप मनाची ओळख आहे, धडपड करून काही मिळवण्याची ऊर्मी त्याच काळातून आपल्याला मिळालेली आहे त्याची आठवण ही आपले या जगण्याचे संचित आहे. ते हरवले असे कसे म्हणता येईल उलट आठवणीतून ते सतत आपल्या जवळ आहे असे म्हणायला सुरुवात केली तर अधिक आनंददायी होईल नाही का?

संबंधित बातम्या