मनःस्वास्थ्याच्या वाटेवर ... 

पल्लवी कासंडे
सोमवार, 28 डिसेंबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.
डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 

‘मनतरंग’ या मालिकेतील हा समारोपाचा लेख. रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या वैचारिक आणि मानसिक बाबींवर आपण मनन करत आलो आहोत. सुरुवात आपण एका काल्पनिक चष्म्यापासून केली होती. जगण्याच्या विविध टप्प्यांवर आपल्यासमोरचं सत्य आणि भास समजून घेण्यासाठी आपल्या संवेदनांचा चष्मा हवा आणि तो नवीन माहिती, नवीन जाणिवा यांनी सतत बदलत राहायला हवा असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे मनातल्या आठवणी, साठवणी, ते अंतर्दृष्टी, निराशा, प्रेमभावना अशा संकल्पनांच्या चिंतनाद्वारे आपण नवजाणिवांना आपल्यात सामावत गेलो. स्वीकारायचा कसं, नाही कसं म्हणायचं, उगाच मनात धरून ठेवलेलं सोडून कसं द्यायचं, समस्यांना सामोरं जाताना विनोदाचा पदर कसा पकडायचा आणि व्यासंगातून आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या समजुतीचा परीघ कसा वाढवायचा... हे सगळं स्वतःला सांगताना एक गोष्ट मात्र मनात मान्य केली, ती म्हणजे आपणच जबाबदार असतो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या या छोट्या आणि दैनंदिन मानसिक व भावनिक वादळांना. म्हणून आपणच प्रयत्न करायचे आहेत स्व-उद्धाराचे. ‘मनतरंग’ हा एक संवादात्मक प्रवास होता. लेखिका आणि वाचक दोघांचाही. ज्यात हात एकमेकांचा घट्ट पकडून होतो आपण. म्हणूनच आज सगळे मनःस्वास्थ्याच्या वाटेवरही एकत्र आहोत. 

काय आहे ही वाट? ही वाट साधी सरळ आहे. या वाटेवर चालायला क्षमता आणि कौशल्यांपेक्षा इच्छाशक्ती आणि संवेदना यांची गरज अधिक आहे. आपल्याशी आपलीच मैत्री व्हावी अशी ही वाट आहे. अवघड, नाजूक, कावरेबावरे करणारे, तर कधी आनंद आणि समाधानाने भरून असणारे .. असे विविध क्षण आजही असणार आहेत आपल्या रोजच्या जगण्यात. या स्वस्थतेच्या वाटेवर नेमकं समजणार आहे की कोणते क्षण कसे जगायचे. कोणते समोर असतानाही लांबून असे जाऊ द्यायचे, कोणते चक्क सोडून द्यायचे! परिस्थिती किंवा आपल्या आजूबाजूचे लोक यांच्यावर ताबा नाही मिळवता येणार. पण असा काही विचार नक्कीच करता येईल की जेणेकरून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेवर थोडा ताबा येईल. एखाद्या क्षणी उसळेलही कधी भावनांचा डोंब. पण त्याला आपल्याच मनातल्या विभक्तपणाचा कोपऱ्यात सारून साक्षीभावाने तो कसा रोखता येईल.

स्वास्थ्य किंवा स्वस्थ या शब्दाचा विचार करू. दोन मिनिटे डोळे मिटून मनातल्या मनात म्हणून पहा. स्वस्थ! काय लहरी आणि स्पंदनं गोळा होतात पहा. काही करायचं नाही, एका जागी स्थिर राहायचं असं एक क्षण वाटेल आणि मग हीच जाणीव ऊर्जा म्हणून आपल्यात खेळू लागेल. त्यामुळे मी स्वस्थ आहे म्हणताना.. स्थिरतेपेक्षा काही ‘फारसा बिघाड नाही. मशिन उत्तम आहे, उत्तम  

चालू शकते, नवनवीन निर्मिती होऊ शकते'' या विचारांकडे आपण अधिक झुकतो आपण. 

एका जागी स्थिर राहणे वास्तवात तर शक्य नाही. अगदी भौतिक सुखात लोळत असू तरी किमान रोजची आन्हिके आणि कर्म तर करावीच लागतील. त्यासाठी एका जागेवर खिळून राहता येणार नाही. शिवाय सुखं पायावर लोळण घेत असली तरी तसे इतरांना वाटेल, आपल्याला वाटेल याची खात्री नाही. म्हणून काही कार्यासाठी मन जेव्हा गती पकडेल तेव्हा त्यात एक लय असेल. मनात एक ताल असेल. चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब नाहीसा होऊन .. जगताना हो दोन्ही असणार या सत्याचा परिचय होऊन त्याची बोच कमी उरेल. काट्यांबरोबर फुलेही दिसतील आणि जगण्याच्या चढ उतारांबरोबर मनाने स्वीकारलेले सरळ रस्तेही दिसतील. 

स्वास्थ्याची वाट अशीच असणार आहे. खाच खळगे दिसले तरी आपण पाय नेमका कुठे ठेवायचा आणि आपला तोल कसा सावरायचा हे नेमके कळणार आहे. इथे महात्मा गांधींची गोष्ट आठवते. त्यांना एकदा एका माणसाने शिवीगाळ केलेले पत्र लिहिले होते. त्यांनी ते पत्र शांतपणे वाचून फाडून टाकले. बस, त्या पत्राला खोचलेली टाचणी जपून ठेवली, जिचा परत उपयोग करता येण्यासारखा आहे. मनःस्वास्थ्याचे हे उत्तम उदाहरण आहे. चित्त विचलित होऊन काही निर्णय घेण्यापेक्षा काय जरुरीचे आहे आणि काय जरुरीचे नाही हे समजणे हेच मनःस्वास्थ्य.  

अजून एक कथा आठवते. परिकथेतीलच आहे. एका राजाला दोन मुली असतात. एक लाडकी असते, एक नावडती असते. जी लाडकी असते ती सुंदर असते, जी नावडती असते ती जरा ओबडधोबड असते. पण मनाने चांगली असते नावडती, ओबडधोबड. आणि कुरकूर करणारी असते आवडती, सुंदर. पण दोघींचे एकमेकींवर प्रेम असते. एकदा दोघी फिरायला जातात आणि रस्ता चुकतात. तेवढ्यात त्यांना एक गुहा दिसते. काही मदत मिळते का पाहायला त्या गुहेत शिरतात. तिथे बारा चेटकिणी बसलेल्या असतात. या दोघी त्यांच्या जणू तावडीतच सापडतात. पण दोघीही गयावया करतात. आम्हाला सोडून द्या अशी विनंती करतात. मग त्यातली एक चेटकीण म्हणते. ठीक आहे. तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी .. अशा प्रत्येक महिन्यांबद्दल काय वाटते ते सांगा. जो कोणी आम्हाला समाधानकारक उत्तर देईल, त्याला आम्ही सोडून देऊ. प्रथम आवडती बोलायला सुरुवात करते. ती प्रत्येक महिन्याचं जणू गाऱ्हाणं मांडते त्यांच्या समोर. की.. छे.. जानेवारी, फेब्रुवारी मध्ये फार थंडी असते. माझी त्वचा खराब होते. मार्च, एप्रिल, मे, जून फार उकाडा असतो. नको नको होतो जीव. जुलै ते ऑक्टोबर तर पाऊसच असतो. काही नीट करता येत नाही. पुन्हा नोव्हेंबरमध्ये हिवाळा सुरु होतो. छे.. ! एक ही महिना बरा नाही. हे ऐकून साऱ्या चेटकिणी नाराज होतात आणि आणखी भेसूर दिसायला लागतात. 

तर नावडती म्हणते की जानेवारीतली धुक्याची दुलई मला फार आवडते. फेब्रुवारी मार्च मध्ये तर झाडांना जुनी पाने जाऊन नवी पालवी फुटते, हिवाळ्यात शुष्क झालेला निसर्ग पुन्हा हिरवा होतो. उन्हाळ्यात असेल उकाडा, पण पाण्यात खेळता येतं ..  आंबे, द्राक्ष, जांभळे भरपूर खाता येतात.. पावसाळ्याची वाट पाहता पाहता जून जुलै येतोच. सर्व निसर्ग हिरवागार होतो. उन्हाळ्याची लाही कमी करतो. कितीतरी सण असतात या काळात. मग मज्जा येते. ऑक्टोबर पासून होतो सुरू हिवाळा ..पण हवा आल्हाददायक असते... खूप खेळता येतं, फिरायला जात येतं. नावडती जसे जसे वर्णन करत पुढे जाते तसे तसे त्या चेटकिणीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जातात. त्यांचा रंग उजळायला लागतो. नावडती डिसेंबरचे वर्णन करे पर्यंत सर्व चेटकिणींचे रूपांतर सुंदर पऱ्यांमध्ये होतं. त्या चेटकिणी या पूर्वीच्या पऱ्याच असतात. पण सतत कुरकूर केल्याने त्यांना शाप मिळालेला असतो. जेव्हा कोणी असे तुम्हाला भेटेल की जे त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी आनंदी असेल तेव्हाच तुम्हाला पूर्वरूपात येत येईल असे त्यांना सांगितलेले असते. अर्थातच मग त्या आवडतीला शिक्षा करायची बुद्धी पण त्यांना उरत नाही, पण नावडतीला मात्र तिच्या ओबडधोबड रूपाऐवजी सौंदर्य प्राप्त होते. आवडतीलाही तिची चूक समजून येते आणि तीही चांगला विचार करण्याचा निर्धार करते...  

ही कथा..’चांगला विचार करावा लहान मुलांनी’ म्हणून लिहिली गेली असावी. पण आज ही मला पटते आणि आवडते. कारण ती मला स्वास्थ्याच्या दिशेने नेते. स्वास्थ्य हे फक्त ‘बिघाड आहे किंवा नाही’ याच्याशी संबंधित नाही. तर मनातले आनंदाचे बीज किंवा झाड हेच या स्वस्थतेकडे घेऊन जाणारे आहे, हे ही कथा सांगते. यातला परीकथा हा भाग सोडला तर प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव आपल्याला चांगलेच काही देऊन जातो, आपल्या प्रगती आणि विकासाचे सांगत असतो.. असा निष्कर्ष यातून सहज काढता येईल. हे लहान मुलांना सांगायचे झाले असा विचार वाचक करत असतील तर या गोष्टीवर थोडा विचार करूया. 

जेव्हा आवडती कुरकूर करते तेव्हा त्या चेटकिणी भेसूर होत जातात. आणि जेव्हा नावडती कौतुक करते तेव्हा त्याच पऱ्या होतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे ही असेच नाही का... आपण जितके वाईट वाटून घेऊ तितके ते अधिक बोचत राहणार आणि आपले मन अधिकच नाराज होत राहणार. तर आपण तटस्थ राहून विचार केला, होते असे जगात सर्वत्र, आपण एकटेच नाही.. तर त्या वाईटाची तीव्रताही कमी होते आणि आपले मन पूर्वपदावर यायलाही मदत होते. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारूया; की दिवसभरात किती गोष्टींमुळे आपण अस्वस्थ होतो, रागावतो, चिडतो .. आणि अशा गोष्टींमुळे की ज्या तात्पुरत्या असतात, अगदी क्षुल्लक असतात. जर आयुष्य एक कॅनव्हास असा विचार केला तर त्या कुठेतरी छोटे ठिपके एवढीच जागा व्यापतात पण आपले मन मात्र उगाच भरून टाकतात.

स्वास्थ्याची वाट अशी साधी सरळ आहे. रोजच्या दिवसाचाच फक्त विचार करायचा आहे... तो ही अगदी या आत्ताच्या क्षणापासून. मनात वादळे उठण्याची जरी परिस्थिती असली तरी त्याला किनाराही आपल्या मनाचा देता येईल अशी ही वाट आहे. फक्त आपली दृष्टी बाह्य जगाकडून आतल्या जगाकडे वळवायची आहे. एखादा पाणबुड्या कसा समुद्राच्या तळाशी जाऊन ... दगड, पाषाण, तेथील वनस्पती असेच पाहतो पण तरी हे समुद्राचे वैभव म्हणतो.... तसेच आपणही करायचे आहे. त्रास देणारे आणि आनंद देणारे विचार दोन्ही मिळून रोजचा दिवस जाणार आहे. आपल्या अंतरंगात डोकावून त्याचं लेबल फक्त ‘सुख दुःखाचे धागे’ या ऐवजी ‘सुख दुःखाची संपत्ती, वैभव’ असे करायचे आहे. जे आहे ते काहीच बदलायचे नाही. बस तो चष्मा फक्त बदलायचा आहे. ज्या चष्म्यातून स्वस्थ वाटेल, त्या जाणिवांचा चष्मा रोज घालायचा आहे…. जो आपल्या विचारांचा आहे !

म्हणूनच या मनःस्वास्थ्याची वाट आपल्याच मनात आहे.. आवश्यक आहे ती फक्त इच्छा.. या वाटेच्या सर्जनाची!

(समाप्त)

संबंधित बातम्या