‘घुबडांच्या संवर्धनाची गरज’

इरावती बारसोडे
सोमवार, 3 मे 2021

मुलाखत

पुण्यातले डॉ. सतीश पांडे हे खरंतर व्यवसायानं रेडिओलॉजिस्ट, पण ते पक्ष्यांमध्ये-वन्यजिवांमध्ये अधिक रमतात. अंधश्रद्धेपायी नाहक बदनाम झालेल्या घुबडांच्या संवर्धनाचा वसा त्यांनी घेतला आहे. आत्तापर्यंत २५०हून अधिक घुबडांना बरं करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडलं आहे. संवर्धनासाठी घुबडांवर संशोधन करणं आणि मुख्य म्हणजे लोकांना याबाबत जागरूक करण्याचं काम ते गेली २५ वर्षं करत आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना ‘वर्ल्ड आऊल हॉल ऑफ फेम’मध्ये ‘स्पेशल अचिव्हमेंट ॲवॉर्ड’ देण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातले आहात. मग पक्षी/प्राणी निरीक्षण-संवर्धन याकडे कसे वळलात?
डॉ. सतीश पांडे ः मी सातारा सैनिक शाळेचा विद्यार्थी आहे. शाळेत असताना आई-वडील मला पक्षी बघायला प्रोत्साहन द्यायचे, पुस्तकं द्यायचे. घराच्या आसपास शेती-झाडं, डोंगर असा निसर्गरम्य परिसर होता. पक्षी दिसायचे, कोल्हे दिसायचे. ओढ्यांमध्ये आम्ही मासे पकडायला जायचो. टेकड्यांवर फिरायचो. त्यामुळे लहानपणापासूनच निसर्गाशी सान्निध्य होतं. शाळेत बायोलॉजीच्या देवदासन सरांनी १९६९-७०च्या दरम्यान टॅक्सीडर्मी, म्हणजेच मेलेल्या प्राणी-पक्ष्यांमध्ये भुसा भरून ठेवणे, हा विषय शिकवला. तेव्हा खूप जवळून बघितलं. त्यामुळे पक्ष्यांविषयी प्रेम वाटायचं. प्राणी-पक्षी मरतात त्यामुळं टॅक्सीडर्मी नंतर बंद झाली. पण सर म्हणायचे, आपण फक्त निरीक्षण करू. मासे पकडून आणले तर त्यांना आधी जगवायचं आणि थोड्या दिवसांनी पाण्यात सोडून द्यायचं, असं सुरू झालं. आमच्या शाळेचं ग्रंथालय खूप छान होतं. सातवी-आठवीत असताना डॉ. सालीम अली आणि इतर परदेशी पक्षितज्ज्ञांची पुस्तकं शाळेच्या ग्रंथालयातून वाचली.  
सैनिक शाळेत झाडं होती. स्पॉटेड आऊलसारख्या घुबडांची घरटी होती. या घुबडांचं मोठं आकर्षण वाटायचं, कारण ती आपल्याकडं बघत बसतात. आम्ही टॉर्च मारून घुबडं बघायचो, मजा यायची. तेव्हा कळालं या पक्ष्यांना भूत वगैरे का म्हणत असतील, कारण एकतर ती रात्री दिसतात आणि घुबडं उडतात तेव्हा त्यांचा आवाज येत नाही. सायन्स कॉलेजमध्ये गेल्यानंतर कदमसरांनीही प्रोत्साहन दिलं. आई-वडील, शिक्षक असं सगळ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळं लहानपणापासून निसर्गाशी जोडला गेलो. 

निरीक्षणातून संवर्धन कसं सुरू झालं?
डॉ. सतीश पांडे ः गावी एक पिंपळाचं झाडं होतं. उन्हाळ्यात पानगळ व्हायची. त्याला भरपूर ढोल्या होत्या. साधारण दोनशे पोपट त्या झाडावर यायचे. एक दिवस ते झाड अचानक तोडून टाकलेलं पाहायला मिळालं. विकास होत गेला आणि शेतं, झाडं गेली... आणि हे सगळं डोळ्यासमोर घडलं. असे धक्के एकामागोमाग एक बसत गेले. लोकांशी बोललं पाहिजे हे कळलं. लोकांना माहितीच नसते, त्यामुळं लोक गृहीत धरतात. पन्हाळ्याजवळ पावनगडावर बोनेलीज इगलचं घरटं होतं. घरट्यातून दोन आठवड्याची पिल्लं गायब व्हायची. इतक्या लहान पिल्लांना उडता तर येत नाही. एक दिवस माझा मित्र बंडा पेडणेकरचा फोन आला, ‘काल पिल्लं होती, आज नाहीत.’ मी लगेचच तिकडे गेलो. पहाटेच आम्ही तिथं पोचलो. शाळेतली दोन मुलं वरनं चालत आली, त्यांच्या हातात मोठी पिशवी होती आणि त्या पिशवीत पिल्लं. त्यांना विचारलं कशासाठी घेऊन जाताय, तर त्यातला एक म्हणाला, ‘मित्र म्हणाला मला पाळायला पिल्लं दे. मी तुला एअर गन देतो.’ मी त्याला समजावून सांगितलं, की हा गरुड आहे. त्याची संख्या कमी होतेय. हा तुझ्या अंगणातला आहे, तूच काळजी घ्यायला हवी. त्याला ते पटलं. मी त्याला पुस्तकं दिली आणि पिल्लं पुन्हा घरट्यात ठेवायला सांगितली. तू ही पिल्लं का काढलीस असं विचारल्यावर म्हणाला, ‘मला कुणी यांचं महत्त्व सांगितलंच नाही, मला माहितीच नव्हतं.’ हे ऐकून मला धक्का बसला. शिक्षण किती गरजेचं आहे हे लक्षात आलं. शहरात भाषणबाजी करून फारसा उपयोग नाही़; शहरातही जागरूकता निर्माण करायला हवी, पण जिथून समस्या सुरू होते, तिथं जायला पाहिजे. म्हणून फिल्डवर्क गरजेचं आहे.

यातूनच इला फाउंडेशनची स्थापना झाली का? फाउंडेशनअंतर्गत कोणते उपक्रम राबवले जातात?
डॉ. सतीश पांडे ः पं. भीमसेन जोशी माझे काका. ते, मी, डॉ. सुरुची पांडे आणि आणखी एक-दोन असे मिळून आम्ही ‘इला फाउंडेशन’ स्थापन केली, आज त्याला २५ वर्षं झाली. फाउंडेशनचं फिल्ड स्टेशन ग्रामीण भागात असावं म्हणून जेजुरीच्या पलीकडे डोंगरात असलेल्या पिंगोरी गावात फिल्ड स्टेशन उभं केलं. शिक्षणातून निसर्ग संवर्धन हा इला फाउंडेशनचा मूळ उद्देश आहे. त्यानंतर संशोधन, प्रकाशन, लोकांना सहभागी करून घेणं हेसुद्धा उद्देश आहेतच. आत्तापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ९० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत, ४५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या घडीला आम्ही महाराष्ट्र वनविभाग, भारतीय प्राणी सर्वेक्षण, कोस्ट गार्ड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा अनेक संस्थांबरोबर संवर्धन-संशोधनाचं काम करत आहोत. छोट्या छोट्या फिल्म्स तयार करत आहोत. 

महाराष्ट्र वनविभागाबरोबर ‘वनदूत’ हा उपक्रम राबवत आहोत, ज्यामध्ये स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन वनविभागाशी जोडून देण्याचं काम करतो. आम्ही त्यांना एक गोष्ट नेहमी सांगतो, सरकारबरोबर काम करा आणि शोध लागलेल्या, सापडलेल्या गोष्टी पत्रकारांबरोबर शेअर करा. या उपक्रमाचं खूप स्वागत झालं. त्यासाठी ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’तर्फे पुरस्कारही मिळाला. 

वनविभागाच्या सहकार्यानं वन्यजीवांसाठी ‘इला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ हे रुग्णालयही सुरू केलं आहे. तिथं आता घुबडांबरोबरच इतर पक्षी, प्राण्यांवरही उपचार होतात. तिथं प्राण्यांचे डॉक्टरही येतात. वन्यजिवांमध्ये काम करणारे डॉक्टर अलीकडे दिसू लागले आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. डॉक्युमेंटेशन करतो. सात वर्षांपूर्वी तिथं रोटरी क्लबच्या मदतीनं रुग्णालय उभारलं आहे. रुग्ण म्हणून येणारे लोक फाउंडेशनबरोबर जोडले जातात. त्यांची संवर्धन कार्यात मदत होते. पक्षी, प्राण्यांबरोबर, वनस्पती, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, अधिवासाचे संवर्धन यावरही काम सुरू आहे. 

घुबडांशी नातं कसं काय जुळलं?
डॉ. सतीश पांडे ः भारतामध्ये घुबडांच्या ४२ प्रजाती आहेत. त्यातील बहुतांश निवासी आहेत. काही प्रदेशनिष्ठ (Endemic), काही स्थलांतरित आहेत. घुबडं निशाचर असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणं अवघड जातं. त्यांच्याविषयी कमी माहिती उपलब्ध असते. त्यात ती रात्री दिसतात, त्यामुळे उगाचच त्यांचा संबंध अंधश्रद्धा, काळ्या जादूशी जोडला जातो आणि त्यांचा बळी दिला जातो. म्हणूनच मी हे आव्हान स्वीकारलं.  पिंगळा, शिंगळा, पट्टेरी वनघुबड, गव्हाणी घुबड, रक्तलोचन, श्रुंगी घुबड यांसह अन्य काही प्रजातींवर संशोधन केलं आहे. अंदमान-निकोबारमधीलही काही घुबडांवर संशोधन केलं आहे. अधिवासाचा नाश त्यांच्या संख्येवर परिणाम करतो आहे. घुबडं मनुष्यवस्तीजवळ राहतात, उंदीर खातात. उंदरांना मारण्यासाठी त्यांना विषारी औषध खायला घालतात आणि हे उंदीर घुबडं खातात त्यामुळे त्यांनाही विषबाधा होते. गेल्या दीड वर्षांत अशा प्रकारे विषबाधा झालेले अनेक पक्षी पाहिले आहेत. कमी विषबाधा झाली असेल तर पक्षी बरेही होतात. म्हणूनच घुबडांच्या संवर्धनाची गरज आहे. कारण एखादी प्रजाती नाहिशी झाली, तर कळणारही नाही. घुबडांवर आधारित एकमेव कॉमिक आम्ही काढलं. ते खूप लोकप्रिय झालं. वनविभागाने आम्हाला ते मराठीमध्येही काढायला लावलं. भारतातील घुबडांची माहिती देणारं एक ब्रोशरही काढलं आहे. फाउंडेशनतर्फे ऑर्निथॉलॉजीचे कोर्सेस आम्ही घेतो. हा कोर्स केलेल्या एका मुलीने स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला घुबडांवर माझं भाषण ठेवलं होत. ते ऐकून नंतर त्या मुलीची आजी मला म्हणाली होती, ‘मी मरायच्या आधी तुम्ही माझे डोळे उघडलेत आणि मनातली अंधश्रद्धा दूर केली.’ फिल्डमध्ये जाऊन काम केल्याचा परिणाम होतो. शेतकरी कुठे घुबड सापडलं तर त्याला न मारता आमच्याकडे घेऊन येतात. स्थानिक युवक शाळांमध्ये जाऊन शिकवतात. सहावी ‘वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स’ घेतली होती. ही परिषद आशियामधली पहिलीच परिषद होती. २०१८ आणि २०१९ अशी सलग दोन वर्षं भारतातील पहिलं ‘आऊल फेस्टिव्हल’ आयोजित केलं होतं. त्याला बारा ते पंधरा हजार लोक-विद्यार्थी उपस्थित होते. 

ग्लोबल आऊल प्रोजेक्टतर्फे ‘वर्ल्ड आऊल हॉल ऑफ फेम’मध्ये तुम्हाला ‘स्पेशल अचिव्हमेंट ॲवॉर्ड’ मिळाला आहे. त्याबद्दल काय सांगाल? 
डॉ. सतीश पांडे ः आय फील व्हेरी व्हेरी हम्बल. याआधी महाराष्ट्र शासनाचा जैवविविधता पुरस्कार आणि इतर काही पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्कारांमुळे फाउंडेशनबरोबर काम करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळतं. मी रेडिओलॉजिस्ट आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ऑर्निथॉलॉजीचा पीएचडी गाइड पण आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या रोज अठरा-अठरा तास काम करतोय. कधीतरी ब्रेकडाऊन होईल असं वाटत. पण मग मी फिल्ड स्टेशनला गेलो, तिथं डोंगरावर फिरून आलो की माझा थकवा पळून जातो. हीच निसर्गाची ताकद आहे.

पर्यावरण, वन्यजीव संशोधन-संवर्धन हे क्षेत्र करिअरचा मार्ग होऊ शकेल का?
डॉ. सतीश पांडे ः करिअरचा मार्ग होऊ शकेल, पण त्यासाठी वरचढ व्हावं लागेल. उच्च शिक्षण घेऊन काम करत राहावं लागेल, वेळ लागेल पण फोकस हलता कामा नये. शिक्षण, संशोधन इथं तर करिअर करता येईल, पण त्याशिवाय वनविभागामध्येही संधी आहे. काही इतर संस्थांमध्येही काम करता येईल. ताकद असेल आणि सचोटीनं काम केलं तर तुम्ही जग बदलू शकता. कमिटमेंट देण्याची तयारी असलेल्यांसाठी खूप संधी आहेत. 

हवामान बदल, अधिवासाचा नाश यांसारख्या घटकांना पक्ष्यांवर परिणाम होतोय? पक्ष्यांची सद्यःस्थिती काय आहे?
डॉ. सतीश पांडे ः या घटकांना पक्ष्यांवर जोरदार परिणाम होतो आहे. पक्षी बायोइंडिकेटर्स असतात. बदलांना पक्षी सर्वात पहिल्यांदा प्रतिसाद देतात. पाणपक्षी कमी झाले आहेत. ऋतूबदलांमुळे त्यांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होतो आहे. स्थला़ंतरित पक्षीही कमी झाले आहेत. शिकारी पक्ष्यांची संख्या कमी झाली 
आहे, ते पक्षी हल्ली दिसतच नाहीत. अनेक पक्षी मेलेले सापडतात. अधिवासाचा नाश, विषबाधा, इलेक्ट्रोक्युशन अशा अनेक बाबींचा त्यांच्या संख्येवर परिणाम होतो आहे. यावर संवेदनशीलपणे आणि प्रामाणिकपणे उपाय करायला हवेत. सरकारबरोबर काम करायला शिकलं पाहिजे.

संबंधित बातम्या