‘चाहते व्यक्तिरेखेच्या प्रेमात...’

पूजा सामंत 
सोमवार, 9 मे 2022

मुलाखत

‘बाहुबली’ चित्रपट येण्याआधी प्रभास हे नाव फारसे कोणाला माहिती नव्हते. ‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाला, आणि प्रभासचे नाव घराघरांत पोचले. हिंदी चित्रपटसृष्टीतही या दाक्षिणात्य हिरोचे मोठे स्वागत झाले. रातोरात त्याला मिळालेले स्टारडम, त्याला दिवसाकाठी येणारी हजारो प्रेमपत्रे... हा सगळा मामलाच थक्क करणारा होता. प्रभासचा नवा चित्रपट ‘राधेश्याम’ काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. त्या निमित्ताने त्याच्याशी झालेल्या गप्पागोष्टी...

‘राधेश्याम’ चित्रपटाचे वेगळेपण काय सांगशील? 
प्रभास ः ‘बाहुबली’ चित्रपटांनी माझी चार वर्षे घेतली. बाहुबली पहिला भाग २०१५मध्ये, तर दुसरा भाग २०१७मध्ये प्रदर्शित झाला. आता चार वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांच्या मनातून यत्किचिंतही ओसरलेली नाहीये. ह्या चित्रपटाचे दोन्ही भाग पूर्ण होऊन रिलीज होईपर्यंत मी कुठल्याही नव्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले नव्हते. काया-वाचा-मने मी ‘बाहुबली’मय झालो होतो. म्हणूनच अलीकडे माझे नवे चित्रपट रिलीज झाले नाहीत. बाहुबलीचा स्पॅन प्रचंड मोठा होता. त्यात मी इतका गुंतला होतो की काय सांगू! ‘राधेश्याम’ चित्रपटाचे दिग्दर्शक राधा कृष्णा कुमार यांनी मला कथा ऐकवली तेव्हाच मला ती आवडली होती. मी लगेच होकार दिला. एखाद्या फिल्मचा हिरो ज्योतिषी असू शकतो, इतकी वेगळी भूमिका प्रथमच मला ऑफर झाली. शिवाय ‘राधेश्याम’ तसा रोमॅंटिक जॉनरचा चित्रपट आहे. एकूणच हा चित्रपट मला युनिक वाटला.

तुझा ज्योतिषावर-भविष्यावर कितपत विश्वास आहे?
प्रभास ः माझा अजिबात विश्वास नाही. माझा हात बघा किंवा पत्रिका पाहा, असे मी आजवर कुणालाही सांगितले नाही. आणि म्हणूनच मला ‘राधेश्याम’ची कथा वेगळ्या धाटणीची वाटली.

‘बाहुबली’च्या ऐतिहासिक यशानंतर तुझ्यावर किती दडपण आहे?
प्रभास ः ‘बाहुबली’ चित्रपट स्वप्नवत प्रवास होता... ‘फिनॉमिनल सक्सेस’ काय असतो, याचा अनुभव मी ‘बाहुबली’च्या यशानंतर पुरेपूर घेतला. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या वर्षावात अखंड न्हाऊन निघालो. येस, यशाचे दडपण आहे जे मी नाकारणार नाही, पण माझा प्रत्येक चित्रपट ‘बाहुबली’ ठरू शकत नाही, हे वास्तव- हे सत्य माझ्या चाहत्यांनीही स्वीकारायला हवे. त्यांच्या अपेक्षांचा हा डोंगर मनावर बाळगत मी पुढील चित्रपट करू शकणार नाही. जसा हिंदीत ‘शोले’ चित्रपट एकदाच निर्माण झाला.. ‘शोले’च्या यशाची फुटपट्टी सगळ्याच मोठ्या चित्रपटांना वापरल्यास अयोग्य ठरेल. निर्माण होणारा प्रत्येक नवा चित्रपट आपले नशीबही सोबत घेऊन येतो. कथा, दिग्दर्शन, अभिनय, गीत, संगीत, लोकेशन, संवाद अशी सगळी भट्टी बेमालूम जमली; तरीही कधी चित्रपटाचा पुरेसा प्रचार झाला नाही म्हणून, तर कधी क्षुल्लक  मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली म्हणून, अशी किरकोळ कारणेही चित्रपटाचे भविष्य ठरवू शकतात. त्यामुळे जरी मी बाहुबली फेम 'अमरेंद्र बाहुबली' असलो, तरी जादूगार नाही; माझ्या सगळ्याच चित्रपटांना बाहुबलीचे यश मिळणे शक्य नाही. अर्थात, माझे आगामी चित्रपट व्यवस्थित करणे, जबाबदारीच्या जाणिवेतून वागणे, हे मी करणार. फक्त पैशांसाठी चित्रपट माध्यम मी जवळ करणार नाही.  

‘बाहुबली’चा तिसरा भाग कधी येणे अपेक्षित आहे?
प्रभास ः ‘बाहुबली-३’च्या चित्रीकरणाची अजून सुरुवात झालेली नाही. स्टोरी सीटिंग झाले आहे, पण अजून पुढील टप्पा गाठायचा आहे. दिग्दर्शक राजामौलीदेखील खूप व्यग्र आहेत.

‘बाहुबली’च्या यशानंतर प्रत्येक चित्रपटासाठी तुला ₹   १०० करोड मानधन मिळते, हे खरे का? 
प्रभास ः मला मिळणारे मानधन मी सांगू इच्छित नाही. पण कलावंतांना ते डिझर्व्ह करतात तितके मानधन मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणाल, भाजी बाजारात मटारचा भाव बहुतेकवेळा चढा असतो, अगदी २०० रुपये किलोपर्यंत जातो. मग भेंडी, गवार किंवा तत्सम भाज्यांचा भाव २०० रुपये किलोपर्यंत का जात नाही? रिझन इज सिम्पल! ग्रीन पीज्‌ डिझर्व्ह द रेट व्हॉट दे गेट! भाज्या आणि कलावंत ह्यांची तुलना जरी नसली तरी शेवटी हा समस्त चित्रपट इंडस्ट्रीने एकत्र येऊन घेण्याचा निर्णय आहे.
 पूर्वी कमल हसन, रजनीकांत, अरविंद स्वामी अशा लोकप्रिय अभिनेत्यांना ‘साऊथ ॲक्टर’ असे लेबल असायचे. आता बाहुबलीच्या यशानंतर सगळ्या दाक्षिणात्य कलावंतांवर ‘इंडियन ॲक्टर’ असे संबोधन लागले आहे, याचे मला समाधान आहे. ही भेदाभेद कशासाठी? साऊथ ॲक्टर, भोजपुरी ॲक्टर, मराठी ॲक्टर, गुजराती ॲक्टर अशी वर्गवारी होणे मला पटत नाही. वी ऑल आर इंडियन ॲक्टर्स! ॲण्ड प्राऊड टू बी इंडियन ॲक्टर्स! विविध राज्यांनुसार भाषा बदलतात इतकाच काय तो फरक.

‘बाहुबली’नंतर तुझे फॅन फॉलोअर वाढले, त्यात महिलांचे-तरुण मुलींचे प्रमाण जास्त आहे. एकूण याबद्दल तुझे काय मत आहे?
प्रभास ः तरुणी माझ्या चाहत्या नसून, त्या मी रंगवलेल्या ‘अमरेंद्र बाहुबली’ या व्यक्तिरेखेच्या प्रेमात आहेत, असे मला आजही वाटते. माझ्या या मोहक सुपर हिरोची आदर्श व्यक्तिरेखा निर्माण करण्याचे श्रेय दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे आहे. २०१९मध्ये ‘साहो’ रिलीज झाला होता. यात श्रद्धा कपूर माझी नायिका होती. या चित्रपटाला अपयश का आले? चाहते महिला असोत किंवा पुरुष, ते बहुतेकदा प्रतिमेच्या- स्टारच्या ऑनस्क्रीन व्यक्तिरेखांवर, स्क्रीन इमेजवर अंधपणे प्रेम करतात. खरा प्रभास कसा आहे हे त्यांना कुठे ठाऊक असते? होय, मला हजारो पत्रे येतात, वेळेअभावी ही सगळी पत्रे वाचणे शक्य होत नाही. पण मॅनेजर आणि अन्य स्टाफ ही पत्रे वाचतात आणि त्यांना माझ्यातर्फे सविनय उत्तरेही दिली जातात. मी अविवाहित आहे. महिला चाहत्यांच्या दृष्टीने मी ‘एलिजिएबल बॅचलर’ असणे हे कारणही कदाचित असू शकेल.

‘बाहुबली’मध्ये तुझी नायिका असलेल्या अनुष्का शेट्टीबरोबर असलेली तुझी मैत्री फार चर्चेत होती...
प्रभास ः बाहुबलीच्या चित्रीकरणामुळे आम्ही सतत संपर्कात होतो. नंतरही एकाच शहरात राहत असल्याने फिल्म इव्हेंटमध्ये भेटणे स्वाभाविक आहे. पण या मैत्रीला निकोप मैत्रीव्यतिरिक्त अन्य कसलेही नाव असू नये!

तुझ्या बंगल्यात एकप्रकारे छोटेखानी अभयारण्य आहे असे ऐकले आहे...
प्रभास ः माझे कुटुंब - मी, आई, वडील, भाऊ, बहीण, आम्ही सगळे हैदराबादला ज्युबिली हिल्स भागात राहतो. घर घेतानाच आम्ही मोठे घेतले होते. घराच्या मागील बाजूस खूप झाडे असल्याने अगदी हजारो स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी या वनात येतात. त्यांच्यासमवेत वेळ घालवणे हे माझे एक प्रकारे स्ट्रेस बस्टर आहे. या पक्ष्यांमध्ये काही शीळ घालणारे पक्षी आहेत, ते आमची तेलगू भाषा बोलतात.. मोठी गंमत वाटते त्यांची. पण या पक्ष्यांना मी पाळलेले नाही. हे पक्षी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे उडत येतात, इथल्या वृक्षराजींवर विसावतात आणि पुन्हा उडून 
जातात. पक्षी असोत वा प्राणी, त्यांना बंधनात ठेवणे मला पटत नाही. आपल्याला कुणी कोंडून ठेवले, बंदिस्त ठेवले तर ते आपल्याला खचितच आवडणार नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य असायलाच हवे.

संबंधित बातम्या