‘पर्यटन क्षेत्र वृद्धिंगत होतंय’ 

उत्कर्षा पाटील
सोमवार, 27 जानेवारी 2020

मुलाखत
भारतातील पर्यटन क्षेत्र जोमाने वाढत आहे. म्हणूनच यातील बदलते ट्रेंड्स, या क्षेत्राचे भविष्य, आगामी काळातील आव्हाने याविषयी केसरी टूर्सच्या संचालिका झेलम पाटील-चौबळ यांच्याशी केलेली बातचीत...

भारतात येत्या काळात पर्यटन क्षेत्राचे भविष्य कसे असेल? 
झेलम पाटील-चौबळ : पर्यटन हा लोकांच्या जगण्यातील एक भाग होत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय वाढत आहे. पूर्वी वर्षातून एकदा पर्यटनाला लोक जायचे. काश्मीर, सिमला, कुलू-मनाली येथे लोक फिरू लागले. नंतर सिंगापूर, मलेशिया, थायलंड फिरण्याचा ट्रेंड आला. सिंगापूर, मलेशिया सहलीला जाऊन येणे एक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. त्यानंतर लोक जग एक्सप्लोअर करू लागले. आज घरात नवरा-बायको नोकरी करत असतात. त्यांना कामाच्या व्यापातून दोन क्षण शांततेचे मिळावेत, म्हणून ते पर्यटनाला प्राधान्य देतात. ज्याप्रमाणे भारतात तरुणांची संख्या जास्त आहे, त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्याही जास्त आहे. त्यांना आता जग बघायचे आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात पर्यटन क्षेत्र अधिक वृद्धिंगत होत जाईल. 

विशीतील पिढीचा पर्यटनाबाबत दृष्टिकोन काय आहे? 
झेलम पाटील-चौबळ : विशीतील पिढी जग फिरू पाहते. ही पिढी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा फिरायला जास्त महत्त्व देईल. त्यांच्या दृष्टीने जग छोटे झाले असून त्यांच्या फिंगर टीपवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे ते जग एक्सप्लोअर करायला बाहेर पडतील. त्यामुळे भविष्यातील पर्यटन वाढीबाबत मी खूप आश्वासक आहे. 

परदेशी पर्यटक भारताकडे कसे आकर्षित होतात? 
झेलम पाटील-चौबळ : परदेशी पर्यटकांनासुद्धा भारतीय संस्कृतीबाबत ओढ निर्माण झाली आहे. भारतीय संस्कृती, योगा, आयुर्वेद यांचा अनुभव घेण्यासाठी परदेशी पर्यटक भारतात येत आहे. हिमालय, केरळ, राजस्थान ही परदेशी पर्यटकांची सर्वांत लोकप्रिय ठिकाणे आहेत. यांना भारतीय लोकांचे आदरातिथ्य प्रचंड भावते. हे आपल्या भारतीय लोकांचे वैशिष्ट्य आहे. भारतातील आदरातिथ्य आणि वैविध्य पाहण्यासाठी लोक येथे येणारच.

उन्हाळ्यातील सुटीत पर्यटनासाठी कुठे जावे? 
झेलम पाटील-चौबळ : उन्हाळ्याच्या सुटीसाठी सिमला, कुलू-मनाली, आसाम, दार्जिलिंग, मेघालय, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, काश्मीर, नैनिताल ही पर्यटकांची सर्वांत लोकप्रिय ठिकाणे आहेत. तर परदेशात युरोपला प्राधान्य दिले जाते. बजेट आणि सर्वांना बरोबर घेऊन परवडणारी टूर म्हणून लोक आग्नेय आशियाला जातात. परंतु, आज लोकांमध्ये ‘एक्सपिरेशनल हॉलिडे’ हा ट्रेंड रुजतोय. म्हणजेच लोक तिथे काय अनुभवता येईल याचा विचार करून डेस्टिनेशन निवडतात. उदाहरणार्थ, दक्षिण अमेरिका सहलीवर गेल्यास अॅमेझॉन जंगल आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले माचू पिचू पाहायला मिळेल, असा लोक विचार करतात. हा बदल विशीतील आणि २१ ते २९ वयोगटातील पर्यटकांमध्ये दिसत आहे. आता केवळ युरोप नाही, तर त्यातील केवळ न्यूझीलंड, पॅरिस, लंडन, क्रोएशिया, बाल्टिक युरोप असा एक प्रांत लोकांना एक्सप्लोअर करायचा आहे. 

पर्यटनाच्या बदललेल्या ट्रेंडबद्दल सांगा. 
झेलम पाटील-चौबळ : आत्ताचा पर्यटनातील बदललेला ट्रेंड म्हणजे नवीन पर्यटनस्थळे एक्सप्लोअर करणे. ताश्‍कंद, बाकू, जॉर्जिया, आइसलॅंड अशा नवीन ठिकाणी फिरण्यावर पर्यटकांचा भर आहे. ही शहरे पूर्वी फिरण्यासाठी उपलब्ध नव्हती. ती आता पर्यटनासाठी विकसित होऊन खुली झाली. आज लोक शॉर्ट युरोप टूर्स करण्याला प्राधान्य देतात. हा खूप मोठा बदल गेल्या तीन-चार वर्षांत झाला आहे. 

भविष्यात केसरीची वाटचाल कशी असेल? 
झेलम पाटील-चौबळ : आज आम्ही भारतीयांना जगभरात फिरवत आहोत. तसेच जगभरातील भारतीयांना भारत आणि अन्य देशांचे पर्यटन घडवायचे अशा संकल्पनेवर आमचे काम सुरू आहे. भविष्यात याच दिशेने आम्ही वाटचाल करणार आहोत. आज जेवढे भारतीय परदेशातात जातात, तेवढ्या प्रमाणात परदेशी पर्यटक भारतात येत नाहीत. ते प्रमाण सुधारायचे आहे. जगभरातील लोकांनी भारतात आले पाहिजे. त्या दृष्टीने काम करत दक्षिण अमेरिका, युरोप, न्यूझीलंडमधील लोकांना भारत दाखवतो आहे. ते प्रमाण अजून वाढले पाहिजे. 

पर्यटनवाढीसाठी काय सुधारणा होणे अपेक्षित आहे? 
झेलम पाटील-चौबळ : परदेशी पर्यटक भारतात येण्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने भारतातील पायाभूत सुविधांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. आज आपल्याकडील काहीच ठिकाणी वर्ल्ड क्लास सोयीसुविधा मिळतात. आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांनाही सगळीकडे अशा सोयीसुविधा दिल्या, तर आपल्याकडे पर्यटकांची संख्या आणखी वाढेल.    

संबंधित बातम्या