देशोदेशीच्या राजधान्या...

सुलक्षणा महाजन
सोमवार, 17 जानेवारी 2022

जनराजधानी

लोकशाही व्यवस्थेला आणि व्यवहारांना अनुसरून अनेक देशांनी जी राजधान्यांची संकुले आणि शहरे वसवली आहेत त्यांच्या कथा या सदरातून मी मांडणार आहे. राजधानी म्हणजे प्रत्येक देशाचे मुख्य शहर. सर्वोच्च राजकीय सत्ता स्थान. देशाच्या संस्कृतीचे प्रतीक. म्हणूनच राजधान्यांची निर्मिती करण्यात राज्यकर्ते विशेष लक्ष देतात. राजधान्यांच्या नियोजन प्रक्रियेत, दृष्टिकोनात आणि आविष्कारात किती विविधता आहे याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे. 

राजधानी म्हणजे प्रत्येक देशाचे मुख्य शहर. सर्वोच्च राजकीय सत्ता स्थान. देशाच्या संस्कृतीचे प्रतीक. प्रत्येक देशाची ध्येयधोरणे राजधानीच्या शहरांमध्ये ठरतात. आधुनिक जगातील आंतरराष्ट्रीय खलबते येथूनच होतात. हे पूर्वापार चालत आले आहे. म्हणूनच राजधान्यांची निर्मिती करण्यात राज्यकर्ते विशेष लक्ष देतात. राजेशाही संपल्यावर किंवा केवळ शोभेपुरती राजेशाही असलेल्या देशांमध्ये लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आल्या. ह्या काळात काही राजधान्या नव्या व्यवस्थेमध्येही सामावून गेल्या. तर हुकूमशाही सत्ता असलेल्या रशियात मॉस्को आणि चीनमध्ये बीजिंग ह्या भव्य राजधान्या नव्या साम्यवादी व्यवस्थेमध्ये वापरात आणून त्यांचे पारंपरिक महत्त्व सांभाळण्याचे धोरण अवलंबिले. 

पारंपरिक राजधान्यांचे लोकशाहीकरण 
युरोपमधील किंवा आशिया खंडातील बहुतेक सर्व देशांच्या राजधान्या लोकशाही पूर्व काळातील आहेत. ब्रिटनमधील लंडन, फ्रान्समधील पॅरिस, जर्मनीमधील बर्लिन किंवा स्पेनमधील माद्रिद ह्या अनेक शतकांची परंपरा असलेल्या राजधान्या आहेत. जपानमधील टोकियो, इराणमधील तेहरान अशा राजधान्याही मॉस्को, बीजिंगप्रमाणे राजेशाहीच्या काळात बांधल्या गेल्या आहेत. ह्या देशांनी लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये थोडेफार बदल करून त्याचे महत्त्व राखले आहे. ह्या सर्व राजधान्यांना राजेशाही थाटाची झूल आहे. भव्यता, सौंदर्य, कलाकुसर आणि दीर्घकाळ टिकणारी मजबूत दगडी बांधकामे ही त्यांची वास्तुवैशिष्ट्ये आहेत. त्यांचे ऐतिहासिक वास्तू वैभव, त्यांचा रोमांचक इतिहास जतन करीत असतानाच सामान्य नागरिकांना, जगभरातील पर्यटकांनाही त्यात अनेक प्रकारे सामील करून घेतले जात आहे. आलिशान राजवाड्यांमधील वैभवाचे, उपभोगाचे आणि थाटामाटाने सजवलेल्या प्रासादांचे दर्शन आता जगातील सामान्य लोकांनाही घेता येते. फ्रान्सच्या राजाचा व्हर्साय येथील राजमहाल बघायला रोज हजारो लोक तिष्ठत असतात. पॅरिसमधील लूव्हर ह्या महालाच्या वास्तूचे आता भव्य कलादालनात रूपांतर झाले आहे. माद्रिदमधील तसेच व्हिएन्नामधील राजमहाल आता सामान्य लोकांना हिंडून बघता येतो, तेथील भव्य बागेमध्ये हिंडता येते. लंडनमधील जुन्या किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक इमारतींमध्ये वस्तू संग्रहालये, कला दालने आहेत. बीजिंगमधील भव्य आणि अनेक चौक असलेला प्रशस्त राजवाडा ‘फॉरबिडन सिटी’ म्हणून ओळखला जात असे. आता तेथे रोज हजारो पर्यटकांची वर्दळ असते. या शिवाय राजेशाही काळात बांधलेल्या लंडन आणि पॅरिसमधील जुन्या राजेशाही काळातील वास्तूंचे रूपांतर लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाच्या संस्थेसाठी, पार्लमेंटसाठी केले गेले आहे. 

राजेशाही व्यवस्था काही हजार वर्षांपासून विकसित झालेल्या होत्या. प्रत्येक लहान मोठे राजे त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार, गरजेनुसार, काळ आणि प्रादेशिक शैलीनुसार राजधानीची शहरे उभारत. मात्र तेव्हा राज्ये आणि राजधान्या आजच्यासारख्या आकाराने किंवा लोकसंख्येने मोठ्या नसत. रोम शहराची लोकसंख्या वैभवाच्या शिखरावर असताना तेथील लोकसंख्या पाच लाख होती. त्यानंतर लंडनची लोकसंख्या पाच लाख झाली ती एकोणिसाव्या शतकात. प्रशासनाच्या जबाबदाऱ्या आणि गरजाही आजच्या तुलनेत मर्यादित असत. सुरक्षित आणि मोक्याचे भौगोलिक स्थान, भक्कम तटबंदी, खंदक यांच्या आतमध्ये शहर वसविले जात असे. त्यामध्ये दरबारी, कारभारी कामाच्या जागा, खलबतखाने, खजिना, धान्याची-सामानाची कोठीघरे, शस्त्रागारे, तोफखाने, हत्ती, घोडे, उंट अशा उपयुक्त प्राण्यांसाठी विशेष इमारती असत. तेव्हाच्या काळी राज्य कारभाराइतकेच महत्त्व धर्माला असल्याने त्यांची वेगळी व्यवस्था आणि संकुले असत. राजमहाल, राणीमहाल भव्य आणि आकर्षक असत. प्रधान, सरदार, कारभारी, धर्मगुरू यांची निवासस्थाने असत. सुरक्षेसाठी सैनिक तैनात असत. त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था असे. त्याच प्रमाणे बाजार, दुकाने आणि व्यापारी लोकांची वस्ती तटबंदीच्या आत असे. पाण्याचे तलाव, विहिरी यांची व्यवस्था असे. प्रशासकीय आणि धार्मिक केंद्र असलेली अशी राजधानीची शहरे सोडली तर बाकी सर्व प्रजा ग्रामीण वस्त्या आणि शेतीक्षेत्रात पसरलेली असे. प्रजेचा राजधानीशी सहसा संबंधही नसे. जवळच्या-दूरच्या राज्यातील दूत वा राजे आणि त्यांचा लवाजमा, कलाकार आणि व्यापारी हेच तेव्हाचे प्रवासी असत. 

मात्र अशा राजधान्यांना अमरत्वाचे आकर्षण असे. राज्यकर्ते अजरामर व्हावेत अशीही सत्ताधीशांची अपेक्षा असे. राजधान्या म्हणजे राजे-महाराजांची कीर्ती दूरवर पसरविण्याचे महत्त्वाचे साधन होते. अशा ऐतिहासिक राजधान्या आज जिवंत वा मृत स्वरूपात जगाच्या कानाकोपऱ्यात बघायला मिळतात. राजे-महाराजे आणि त्यांच्या जीवनशैलीची कल्पना आणि अनुभव आता सार्वजनिक स्मृतीचा भाग आहेत. त्यांना जागतिक वैभव मानले जाते. त्या अभ्यासकांचे, संशोधकांचे साधन झाल्या आहेत. पर्यटकांचे आकर्षण झाल्यामुळे  पारंपरिक राजधान्यांचे आता लोकशाहीकरण झाले आहे. 

अनेक शतकांपासून घडविलेल्या ६५० लहानमोठ्या राजधान्या आणि त्यांची शहरे भारतात आहेत. प्रत्येकाची शान, शैली, काळ, संस्कृती वेगळी आहे. आज त्या भारतीय संघराज्यात सामावून गेल्या आहेत. त्यांचे  कारभार नगरपालिका-महापालिकांकडे आणि लोकप्रतिनिधींकडे आले आहेत. त्यांच्या अर्थव्यवस्था, समाजरचना, आकार बदलले आहे. म्हैसूर, बडोदा, ग्वाल्हेर अशा राजधान्या आता जिल्ह्यांची ठिकाणे आहेत. चंदिगढ, भुवनेश्वर, गांधीनगर अशी प्रादेशिक राजधानीची शहरे नव्याने घडली आहेत. 

भारताची राजधानी दिल्ली 
दिल्लीचा इतिहास म्हणजे शेकडो वर्षांच्या भरभराटीच्या आणि ऱ्हासाच्या आवर्तनांची दीर्घकथा आहे. सतराव्या शतकापासून भारतातील  एक एक राज्य खालसा करून किंवा महाराजांना अंकित करून, भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपले हात पाय पसरले होते. १८५७मध्ये दिल्लीचा बादशहा, बहादूर शाह जफरच्या नेतृत्वाखाली भारतामधील अनेक राजे सामील झाले होते परंतु भारतामधील इतर अनेक राजांची त्यांना साथ मिळाली नाही. पुढे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ताही संपली आणि ब्रिटनची महाराणी भारताची  महाराणी बनली. काही दशके व्यापारासाठी वसविलेले कलकत्ता (आता कोलकता) ब्रिटिश सत्तेची राजधानी होती, परंतु सत्ता स्थिरावल्यावर दिल्लीमध्ये नवीन राजधानी संकुल बांधण्यासाठी नियोजन सुरू केले.

इंग्लंडहून ल्युटीन ह्या वास्तुतज्ज्ञाला वसाहतीच्या साम्राज्याची राजधानी घडविण्यासाठी पाचारण करण्यात आले. भव्य राजमार्ग आणि इमारती असलेली नवी दिल्ली त्याने जुन्या दिल्लीच्या सीमेवर निर्माण केली. नवी दिल्ली हे १९२२मध्ये ब्रिटिश सत्तेचे केंद्र झाले. मात्र केवळ पंचवीस वर्षांनी, १९४७ साली ती स्वतंत्र, प्रजासत्ताक भारताची राजधानी झाली. व्हॉइसरॉयच्या निवासासाठी बांधलेली वास्तू राष्ट्रपती भवन झाले. तेथील संसद भवनाच्या इमारतीवर नवीन मजला चढवला गेला. लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज तेथून सुरू झाले. सैनिकांचे स्मारक असलेले इंडिया गेट हे लोकशाही व्यवस्थेत सामान्य लोकांना एकत्र येण्याचे प्रसिद्ध सार्वजनिक ठिकाण झाले. राजपथाच्या दुतर्फा नवीन प्रशासकीय इमारती बांधल्या. भारताच्या  विविध भागातील ऐतिहासिक वास्तूशैली असलेल्या ह्या इमारती भारतीय संघराज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणून निर्माण करण्यात आल्या. ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीला नागरिकांनी आपलेसे केले. राजमार्ग हा जनमार्ग झाला. संसद भवनाची गोलाकार वास्तू शांतताप्रिय भारतीय लोकशाहीचे प्रतीक बनले. 

ह्या पार्श्वभूमीवर लोकशाही व्यवस्थेला आणि व्यवहारांना अनुसरून अनेक देशांनी जी राजधान्यांची संकुले आणि शहरे वसवली आहेत त्यांच्या कथा या सदरातून मी मांडणार आहे. पाकिस्तानने इस्लामाबाद हे नवीन राजधानीचे शहर उभे केले. तुर्कस्थानाची राजधानी इस्तंबूलहून अंकारा येथे नेली, तर श्रीलंकेने अनुराधापुर येथे संसद भवन आणि राजधानी संकुल बांधले. बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर ढाका येथे नवीन राजधानी संकुल तयार झाले. ब्राझीलने ब्राझिलिया तर ऑस्ट्रेलियाने कॅनबेरा येथे नवीन राजधानी वसवली. त्यांच्या नियोजन प्रक्रियेत, दृष्टिकोनात आणि आविष्कारात किती विविधता आहे याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या