‘ग्लोबल व्हिलेज’चं महत्त्व 

संजय दाबके
सोमवार, 9 मार्च 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. पर्यटन स्थळं, थीम पार्क्स निर्माण करणाऱ्या जगभरातल्या कंपन्यांचं संयोजन करणारी एक जागतिक केंद्रीय संस्था आहे IAAPA नावाची. थीम पार्क्सबद्दल त्यांनी दुबईत एक मोठी कॉन्फरन्स आयोजित केली होती. कारण तसंच होतं. दुबईत त्यावेळी एकाच वेळेला IMG वर्ल्ड, बॉलिवूड पार्क, लेगोलँड, मार्व्हल या जागतिक कंपन्यांची अवाढव्य थीम पार्क्स निर्माण होत होती. ती निर्माण होताना बघणं हा एक अनुभव होता. जगभरातून साधारण १०० तज्ज्ञ या कॉन्फरन्ससाठी बोलावले होते. मी त्यात सहभागी झालो होतो. आम्ही सगळेच ही अवाढव्य निर्मिती बघून स्तिमित होत होतो. आमच्या ग्रुपमध्ये दुबईच्याच ‘ग्लोबल व्हिलेज’चे काही प्रतिनिधी सहभागी होते. त्यांच्याकडं फारसं कोणाचं लक्ष नव्हतं.. कारण जी चूक दुबईला जाणारे सगळे पर्यटक करतात तीच आम्हीही करत होतो.. कसलं ‘ग्लोबल व्हिलेज’? असेल काही तरी ठीकठाक.. अशीच माझी तरी समजूत होती. 

शेवटच्या दिवशी आमची शेवटची भेट ‘ग्लोबल व्हिलेज’ला होती. आम्ही आत शिरलो आणि आतली गर्दी बघून सगळेच चमकलो! पन्नास हजार पर्यटक? ‘डिस्नेलँड’मध्येसुद्धा एवढी गर्दी नसते. पारंपरिक वेष घातलेल्या सेवकानं खजुराचा आंबटगोड पारंपरिकच चहा देऊन आमचं स्वागत केलं आणि ‘ग्लोबल व्हिलेज’चे कार्यकारी अधिकारी, बदर अन्वाही आमच्यासमोर आले. त्यांनी ‘ग्लोबल व्हिलेज’बद्दल जी माहिती दिली तिनं सगळेजण चक्रावून गेलो. त्या संध्याकाळी अगदी सर्वसामान्य माणसांसाठी असलेल्या एका विलक्षण पर्यटन केंद्राचं दर्शन झालं. आज इतक्या वर्षांनीही माझं ‘ग्लोबल व्हिलेज’बद्दलचं कुतूहल कायम आहे. दरवर्षी एकदा तरी मी शांतपणे निरीक्षणासाठी, अभ्यासासाठी तिथं जाऊन हिंडतो.. प्रत्येक वेळी या पर्यटन क्षेत्रातल्या चमत्काराविषयी मनात आश्चर्य वागवत परत येतो. 

आहे तरी काय ‘ग्लोबल व्हिलेज’? 
दुबईतला उन्हाळा अतिशय कडक असतो, पण साधारण नोव्हेंबर ते मे हा काळ बऱ्यापैकी आनंददायक असतो. बहुसंख्य पर्यटक बहुधा याच काळात दुबईला जातात. जाणाऱ्यांच्या यादीत ‘बुर्ज खलिफा’सारखी नेहमीची ॲट्रॅक्शन्स, काही थीमपार्क्स आणि शॉपिंग हेच प्रामुख्यानं असतं. या सगळ्या मोठ्या थीम पार्क्सची तिकिटं साधारण ५०० ते ७०० दिरहॅम्स किंवा १५० ते २०० डॉलर्सच्या आसपास आहेत. एखादवेळी जाणारा पर्यटक कदाचित एवढा खर्च करतो. पण सर्वसामान्य माणसाला, एवढा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या पर्यटकाला हा आनंद कसा मिळेल? दुबईत जे स्थानिक लोक आहेत ते बहुधा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, फिलिपाइन्स या देशांमधून स्थलांतर केलेले; पण बहुसंख्येनं सामान्य कॅटॅगरीतील आहेत. त्यांच्यासाठी एखादी, बेताचं तिकीट असलेली जागा का नको? या विचारातून २७ वर्षांपूर्वी ‘ग्लोबल व्हिलेज’ साकारण्याची कल्पना पुढं आली. 

अगदी सामान्य माणसाला जगभर पर्यटन केल्याचा आनंद मिळावा म्हणून निरनिराळ्या देशांची पॅव्हेलियन्स किंवा दालनं तिथंच का असू नयेत? यातून मग जगभरातल्या देशांना आमंत्रण धाडण्यात आलं. सुरुवातीला फारसं कोणी आलं नाही. पण ‘ग्लोबल व्हिलेज’नं जी खरी झेप घेतली, ती गेल्या ९ वर्षांमध्ये. आजचे तिथले आकडे पाहिले, तर अचंबित करणारे आहेत. 

आता दरवर्षी साधारण ८० देशांची दालनं या १२० एकरांच्या परिसरात ५ महिन्यांसाठी खुली होतात. या दालनांमधून त्या त्या देशांच्या खाद्यपदार्थांपासून ते हस्तकलेपर्यंत सगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्या त्या देशांचे खाद्यपदार्थ देणारी सुंदर सजवलेली रेस्टॉरंट्स असतात. लहान मुलांसाठी खेळ असतात. कारंजी, हिरवळ आणि गर्दीनं फुललेला परिसर असं मस्त वातावरण तुम्हाला ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये नेहमीच बघायला मिळतं. 

दर वर्षी या पाच महिन्यांच्या ‘इव्हेंट’चं अतिशय काटेकोर नियोजन केलं जातं. 

शंभराहून अधिक देशांतून जवळ जवळ ६००० विक्रेते, कलाकार आणि इतर तांत्रिक मंडळी यासाठी येणार असतात. त्यांच्यासाठी व्हिसा देणं, हेच किती कठीण काम! पण सरकार त्यात मदत करतं. ‘ग्लोबल व्हिलेज’ची जागा दुबईपासून ४० किलोमीटरवर आहे. पण दुबईच्या प्रत्येक कोपऱ्यातून दर १५ मिनिटांनी फक्त १० दिरहॅम तिकिटात तिथपर्यंत सहज पोचता येत. ‘ग्लोबल व्हिलेज’ची वेळ संध्याकाळी ४ ते रात्री १२ अशी आहे. उन्हाचा लोकांना त्रास नको म्हणून ही संध्याकाळची वेळ मुद्दाम ठेवलेली आहे. प्रत्येक देशाला दर वर्षी आपल्या दालनाची नवी सजावट करावी लागते, त्यामुळं ‘ग्लोबल व्हिलेज’ दर वर्षी कात टाकतं आणि नवीन भासतं. 

इथलं तिकीट फक्त १५ दिरहॅम आहे. त्यामुळं इथं पर्यटक पुन्हा पुन्हा येऊ शकतात आणि येतातही. सहभागी होणाऱ्या देशांवर आणखी एक बंधन आहे. प्रत्येक देशानं एक तरी सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याबरोबर आणलाच पाहिजे! त्यामुळं होतं काय, की तब्बल ८० नाच, गाणी, नकला, नाट्य यांचे जगभरचे कार्यक्रम इथं सतत सुरू असतात! हे सगळं त्या १५ दिरहॅमच्या तिकिटातच! त्याचबरोबर दर शुक्रवारी रात्री भारत, पाकिस्तानमधल्या मोठ्या कलाकारांचा भव्य कार्यक्रम असतो. त्यादिवशी इथं लाख - दीड लाख पर्यटक सहज जमतात. 

गेल्या वर्षी साधारण ७० लाख लोकांनी ‘ग्लोबल व्हिलेज’ला भेट दिली, म्हणजे फक्त तिकिटातूनच २१० कोटी रुपये जमा झाले. शिवाय इथं विकल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूवर २ टक्के, आयोजन करणाऱ्या संस्थेला मिळतात. गेल्या वर्षी इथे ६००० कोटी रुपयांची विक्री झाली, त्यातून १२० कोटी रुपये त्यांना मिळाले. शिवाय यातून हजारो लोकांना काम मिळतं, दुबई सरकारला उत्पन्न मिळतं ते वेगळंच! 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सामान्य माणसाला इथं तेच समाधान मिळतं, जे श्रीमंतांना ‘डिस्नेलँड’मध्ये जाऊन मिळतं! 

कल्पना करा.. लेबानन, सीरिया, इराक, जॉर्डन, पॅलेस्टाईन यांसारख्या धोकादायक देशात आपण कधी जाऊ का? पण या देशांचे अधिकृत प्रतिनिधी इथं त्यांच्या प्रॉडक्ट्ससह आपल्याला सहज भेटतात. या सगळ्या मध्यपूर्व भागात अनंत प्रकारचे मध मिळतात. त्याचे देखणे काचेचे रांजण इथं ओळीनं लावून ठेवलेले असतात. पाकिस्तान या आपल्या शेजारी, पण शत्रू राष्ट्राबद्दल आपल्यापैकी अनेकांना कुतूहल असतं, पण आपण तिथं जायचा विचार करू शकतो का? शक्य नाही.. पण इथं पाकिस्तानच्या दालनात गेलं, की पेशावरपासून कराचीपर्यंतची सगळी संस्कृती समोर उभी राहते. आपल्यासारखंच तिथंही प्रत्येक प्रांताचं वैशिष्ट्य आहे. गालिच्यांपासून ते कुल्फीपर्यंतच्या अनेकविध वस्तूंच्या रूपात ते आपल्याला भेटतं. उझबेकिस्तान, रुमानिया, बल्गेरिया या सारख्या छोटेखानी देशांच्या दालनात त्यांच्या नाच, गाण्यांचे कार्यक्रम सतत सुरू असतात. अक्षरशः किती बघू आणि किती नको असं होऊन जातं तिथं गेल्यावर! तडाखेबंद विक्री सुरू असते, कारण किमती सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या असतात. 

आफ्रिकेचा विभाग तर अत्यंत रंगीबेरंगी असतो. इथल्या लोकांची मुळातच निसर्गाशी जवळीक असते, त्याचं प्रतिबिंब त्यांच्या अत्यंत रंगतदार वस्तूंमध्ये प्रतीत होतं. गंमत म्हणजे सगळ्यात जास्त होम मेड साबणांचे आणि सौंदर्य प्रसाधनांचे प्रकार इथं बघायला मिळतात. सुदानच्या एका कंपनीचा चहा अप्रतिम आहे. तुम्हाला त्याची चव घेता येते आणि आवडला तर विकतही घेता येतो. हे सूत्र सगळीकडं आहे. प्रत्येक गोष्ट मग ती मध असो, की मिठाई, पहिल्यांदा नमुना समोर येतो. तो घेतल्यानंतर बरेचसे ग्राहक रिकाम्या हातानं पुढं जाऊच शकत नाहीत.. तीच गोष्ट इजिप्तसारख्या देशाच्या दालनाची. इथं फारोहा आणि नेफरटीटीच्या पुतळ्यांबरोबरच मिळणारी गूळ, शेंगदाणे यांची अगदी वेगळ्याप्रकारची चिक्की अप्रतिम असते. टर्कीच्या दालनात सुंदर सजावटीचे असंख्य दिवे असतात. 

या प्रचंड परिसरात फिरत फिरत संध्याकाळ होते. दमलो तर ठिकठिकाणी फक्त २ दिरहॅममध्ये सामोसा आणि अगदी आपल्यासारखा ‘कडक’ चहा मिळण्याची व्यवस्था आहे. दररोज ५०,००० लोकांची गर्दी इथं जमते. खाते, पिते, खरेदी करते; पण कुठंही गोंधळ नाही, गडबड नाही. लहान मुलांना कोणी लॉनवर लोळलं, फुलं तोडली म्हणून ओरडत नाही. सुरक्षा रक्षक फारसे कुठं दिसत नाहीत पण त्यांची संपूर्ण पार्कवर सूक्ष्म नजर असतेच असते. 

आपल्या भारताचं दालन सगळ्यात मोठं असतं, त्याच कारण साहजिक आहे. येणाऱ्यांच्यात भारतीयांची संख्या सगळ्यात जास्त असते. 

दुसऱ्या दिवशी स्वतः बदर अन्वाही आम्हाला भेटले. त्यांनी जे सांगितलं त्याच्यातली Efficiency ऐकल्यावर प्रचंड धक्के बसले. एवढा मोठा लांबलचक चालणारा, गर्दीनं ओसंडून वाहणारा इव्हेंट करण्यासाठी त्यांचा जो कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग आहे तो फक्त २० जणांचा आहे! बाकीचे सगळे म्हणजे सुमारे ८००० कर्मचारी फक्त सहा महिन्यांसाठी घेतले जातात. या सगळ्यात सरकारची प्रचंड मदत आणि सहकार्य आहे. 

हे सगळं सांगायचं कारण, कोकणात किंवा गोव्यात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी असा ‘ग्लोबल व्हिलेज’चा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? आपल्याला तर बाहेरच्या देशांचीसुद्धा फार गरज नाही. आपली भारतीय राज्ये जरी सामील झाली तरी केवढी विविधता तिथं निर्माण होईल! 

थोडक्यात काय, तर पर्यटनाचं महत्त्व ज्या देशाला समजलं त्याच्यासाठी ते सोन्याची खाण ठरलेलं आहे. एकीकडं रोजगार पुरवणारा कुठलाही उद्योग आपल्याबरोबर प्रदूषण, निसर्गाचा ऱ्हास या सगळ्या गोष्टी घेऊन येतो. पर्यटन हा असा एकमेव उद्योग आहे जो करणारा आणि त्याचा आनंद घेणारा या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि हसू ठेवून जातो. अगदी वैयक्तिक ते सरकारी या सगळ्या पातळ्यांवर याचा विचार व्हायला पाहिजे.

संबंधित बातम्या