पिटलॉकरीचा प्रवास 

संजय दाबके
सोमवार, 27 जानेवारी 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...

महाराष्ट्रातल्या गेल्या ४-५ पिढ्यांमधल्या लाखो लोकांना परदेशगमनाची स्वप्ने पडायला लागली त्याला कारणीभूत होती पुलंची तीन पुस्तके! ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ आणि ‘जावे त्यांच्या देशा.’ पुल ज्या काळात परदेशी गेले होते, त्या काळात प्रवास करणाऱ्यांची संख्या फार कमी होती. दुधाची तहान ताकावर म्हणून असंख्य वाचकांनी पुलंच्या या प्रवासवर्णनांमधून अनेक देश बघितले. कॉलेज संपून नोकरीला लागेपर्यंत मी त्यातलाच एक होतो. या तीनही पुस्तकांमध्येसुद्धा पुल स्वतः ‘अपूर्वाई’मध्ये जास्त गुंतलेले दिसतात. एकतर त्यांचा हा भारताबाहेरचा पहिला प्रवास आणि पहिलेपणाची गोडी नेहमी जास्तच असते. त्यातून इंग्लंडसारखा त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला भावेल असा इतिहास, नाटक यांच्या प्रेमाने झपाटलेला सौजन्यशील देश! पुल यात लिहिताना अनेक सुंदर स्थळांचा उल्लेख आणि वर्णन करतात. त्यात लंडन तर आहेच, पण इंग्लंडमधली इतर मोठी शहरे आणि अगदी छोटी छोटी खेडीपण आहेत. शाळेच्या वयात ही सगळी नावे केव्हाच पाठ झाली होती. तिथे जायचे स्वप्न होते.. शक्यता शून्यच! 

पण नशीब कधी कुठे कुठली दारे आपल्यासाठी उघडेल याचा नेम नाही. १९९२ मध्ये इंग्लंडला शिक्षणासाठी मला शिष्यवृत्ती मिळाली. तीसुद्धा योगायोगाने थेट पुलंना जी मिळाली होती तीच BBC इथे ट्रेनिंगची! फरक एवढाच होता, की पुल TV कार्यक्रम निर्मितीच्या अभ्यासासाठी गेले होते, मी स्टुडिओ तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी तिथे पोचलो. त्यावेळी इतकी वर्षे त्यांच्या नजरेतून पाहिलेले इंग्लंड मी स्वतः अनुभवले. त्यानंतरही अनेक वेळा कामानिमित्त इंग्लंडला जात राहिलो. स्कॉटलंड, आयर्लंडपासून ते अगदी दक्षिण किनाऱ्यापर्यंत सगळे इंग्लंड पालथे घातले. पण त्या ‘अपूर्वाई’मधली एक अगदी छोटीशी जागा हुलकावण्या देत होती. स्कॉटलंडमध्ये एडिंबराच्या उत्तरेला एक अगदी पेन्सिलीच्या ठिपक्याएवढे सुंदर खेडे आहे. पुल तिथे पोचले होते, ते तिथला जगप्रसिद्ध नाट्य महोत्सव बघायला! नाटक हा माझ्या अगदी प्रेमाचा विषय नसल्याने मला तिथे जायचे होते खरे, पण कारण मिळत नव्हते. 

तीन वर्षांपूर्वी नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये मला जंगलात एक शो करायचा होता. तिथे हजारो वृक्षांमध्ये प्रकाशयोजना करून जंगलाची कथा सांगायची होती. जगात असे काम कुठे कोणी केलेय का, ते शोधत होतो. आणि आश्चर्यम! त्याच ‘पुलं’च्या पिटलॉकरीला असा एक शो दर वर्षी हिवाळ्यात करतात असे समजले. माझा शो व्हायच्या आधी तिथे जाऊ शकलो नाही, पण डायरीत आणि डोक्यात पक्की नोंद झाली होती. शेवटी गेल्या वर्षी दुसऱ्या कामाला जोडून ‘पिटलॉकरी’ झाले! 

पिटलॉकरीला दर वर्षी हिवाळ्यात फक्त चाळीस दिवस ‘एनचांटेड फॉरेस्ट - मंतरलेले अरण्य’ या नावाचा शो गेली २० वर्षे होत आहे. एकतर इंग्लंडमधली थंडी! म्हणजे तापमान आधीच शून्य किंवा उणे मधेच हेलकावत असते. त्यातून ही जागा आणखीन उत्तरेला. हा शो ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होतो आणि नोव्हेंबर मध्यावर संपतोपण! हा शो उघड्या - जवळजवळ १०० एकरांच्या जंगलात केला जातो. बरे सगळे शो प्रकाशयोजनेवर अवलंबून असल्याने फक्त रात्रीच असतात. माझी समजूत अशी, की असल्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत रात्री त्या जंगलात कोण जाईल? पण भारतातूनच जेव्हा नेटवर हॉटेल शोधायला सुरुवात केली तर सगळी फुल्ल! एक खोली मिळायची मारामार! शेवटी कशी बशी एका हॉटेलात २ रात्रींपुरती जागा मिळाली. मग स्वतःचे ज्ञान अजून वाढवले. या शोच्या फक्त चाळीस दिवसात, पिटलॉकरीसारख्या चिमुकल्या गावात जगभरातून सुमारे ५ लाख लोक, रात्रीच्या जंगलाचे अद्‍भुत सौंदर्य दाखवणारा हा खेळ पाहायला येतात. तिकीटही काही कमी नाही - २० पौंड म्हणजे सुमारे १८०० रुपये! 

गावातल्याच ज्येष्ठ लोकांची एक कमिटी आहे. तेच या खेळाचे आयोजन करतात. इंग्लंडमधून उत्तमोत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ बोलावून दर वर्षी गावाच्या सीमेवरच हे जंगल वेगवेगळ्या हरतऱ्हेच्या विद्युत रोषणाईने उजळून टाकतात. संध्याकाळी ६ वाजल्यापासून प्रेक्षकांची जी रीघ लागते, ती रात्री शेवटी १२-१ वाजता कडाक्याच्या थंडीत आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी परत जाते. 

लंडनहून माझी बाकीची कामे संपवून मी एडिंबराला रेल्वेनी जाणार होतो. तिथून पुढे पिटलॉकरीला बसने! इंग्लंडमधला रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सुखकारक आहे. एकतर गर्दी कमी असते. गाड्यांचा दर्जा आणि वेग दोन्ही आपल्यापेक्षा खूपच चांगल्या प्रतीचा. अर्थात सगळ्या युरोपमध्ये रेल्वे प्रवास हा सुंदरच आहे. ठरलेल्या वेळी किंग्स क्रॉस स्टेशनवरून गाडी निघाली. लंडन सोडून जसजसे आपण उत्तरेला जायला लागतो, तसतसा हा प्रवास आणखीनच सुंदर व्हायला लागतो. यॉर्क सोडल्यानंतर तर दोन्ही बाजूला टेकड्या आणि डोंगररांगांमधून आपण स्कॉटलंडच्या राजधानीत कधी पोचतो ते समजत नाही. साडेचार पाच तासांचा प्रवास. एडिंबराच्या वेव्हर्ले स्टेशनवर दुपारी २ वाजता पोचलो. पिटलॉकरीची बस साडेचार वाजता होती. बस स्टँडपण रेल्वे स्टेशनपासून चालत अंतरावर आहे. एडिंबराला काही वेळा येऊन गेल्यामुळे मग दोन तास वेळ समोरच्याच प्रिन्सेस स्ट्रीटवर चक्कर मारत घालवला. एडिंबरा हे ही लहान शहर आहे. ‘अजिंक्यतारा’ जसा सातारा शहराची एक बाजू व्यापून टाकतो, अगदी तसाच त्याच आकाराचा एडिंबराचा आटोपशीर किल्ला या शहरावर सावली धरून आहे. काळजीपूर्वक जपलेल्या सगळ्या जुन्या इमारती आणि दगडी स्मारके, मधूनच आकाशात उंच गेलेले टोकदार चर्चेसचे घुमट, तर दुसऱ्या बाजूला अत्याधुनिक ब्रँड्सच्या दुकानांनी सजलेला शहराचा एकमेव मध्यवर्ती रस्ता.. प्रिन्सेस स्ट्रीट. थंडी कडाक्याची होती त्यामुळे पोटपूजा करून बस स्टँडच्या उबदार वातावरणात येऊन बसलो. पिटलॉकरीची बस आली, वेळेत सुटली. थंडीच्या दिवसात इथे ४ वाजताच अंधार पडायला सुरुवात होते. साधारण साडेसातच्या सुमारास पिटलॉकरीला पोचायला पाहिजे होते. पण वाटेत पर्थ सोडले आणि बसच्या अंगात आल्यासारखे आवाज यायला लागले. गाडीचा स्पीड एकदम कमी झाला आणि रखडत रखडत आम्ही एका बँकफूट नावाच्या खेड्याच्या दहा बाय दहाच्या बस स्थानकावर कसेबसे पोचलो. इथे चालकाने जाहीर केले ‘बस या पुढे जाऊ शकत नाही. मी दुसरी बस मागवतो मग त्यात तुमची सोय होईल.’ एकतर ब्रिटिश माणूस अत्यंत सोशिक आणि कोणी मनात आणले तरी काही करता  येण्यासारखे नव्हते, त्यामुळे सगळे जण निमूटपणे उतरलो आणि समोरच्या उघड्या शेडमध्ये जाऊन उभे राहिलो. अंगातल्या सगळ्या हाडांची थंडीने लाकडे झाली होती. बर हे तसे आडवळणाचे खेडे! गाडी येईल येईल म्हणताना दीड तासाने दुसरी बस आली आणि आम्ही पिटलॉकरीच्या दिशेनी मार्गस्थ झालो. 

दोन तासांनी अंधारातच ‘पिटलॉकरी’ असे ड्रायव्हरने सांगितले आणि एक म्हातारे जोडपे आणि मी असे त्या अंधारात बसमधून खाली उतरलो. इंग्लंडमध्ये खेडेगावात आपल्याकडच्या कोकणासारखेच साडेसात आठला सामसूम झालेले असते. काय गावातला एखादा पब उघडा असेल तोच. माझे ‘वेल हाऊस’ नावाचे छोटेसे हॉटेल साधारण कुठे आहे ते मी नकाशात बघितले होते, पण त्यासाठी कुठे उतरलोय ते तर समजायला पाहिजे! बस निघून गेली होती. ते जोडपेपण एका गाडीत बसून निघून गेले. त्या थंडीच्या कडाक्याच्या अंधारात मी विचारात पडलेला, की आता हॉटेल शोधायचे कसे? गप्प बसून किंवा कोणाची वाट बघण्यात अर्थ नव्हता. रेल्वे स्टेशन सापडले पाहिजे. हाच रस्ता मुख्य रस्ता दिसत होता. दहा मिनिटे एका बाजूला चालत गेलो. त्या बाजूला काहीच नाही! पुन्हा परत येऊन विरुद्ध बाजूला चालायला सुरुवात केली आणि पाचव्या मिनिटाला अंधारात लपलेली स्टेशनच्या जुन्या इमारतीची सावली दिसली. जीव भांड्यात पडला. तिथून पुढे हॉटेल शोधणे अवघड नव्हते. बेल वाजवली. हॉटेलचा मालक बॉब वाटच बघत होता. खोलीतच चहा पिऊन आणि बिस्किटे खाऊन झोपलो. पुलंनी ओळख करून दिलेल्या पिटलॉकरीत येऊन तर पोचलो होतो. दर्शन दुसऱ्या दिवशी होणार होते...

संबंधित बातम्या