प्रवास काय शिकवतो? 

संजय दाबके
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...

परमेश्वराने जेव्हा जग निर्माण केले तेव्हा अनेक चमत्कार दाखवले. उंचच उंच पर्वत, अथांग समुद्र, विस्तीर्ण पसरलेली वाळवंटे, घनदाट जंगले... काय काय निर्माण केले! परत प्रत्येकाचे सौंदर्य वेगळे. मग अनेक देश जन्माला आले. त्या देशांमधून थोर कलाकार पुढे आले. त्यांनी आपापल्या परीने या सौंदर्यात भर घातली. कुणी मंदिरे, मशिदी बांधल्या तर कुणी राजवाडे बांधले, कुणी अद्‍भुत पिरॅमिड्स बांधले तर कुणी आयफेल, पिसासारखे अजब मनोरे बांधले. ही परंपरा अगदी आजही जगभर बुर्ज खलिफा असेल किंवा सरदारांचा पुतळा असेल.. त्यांच्या माध्यमातून पुढेच जात आहे. 

आपल्याला जे नेहमी बघायला मिळत नाही ते बघायची, अनुभवायची माणसाला नैसर्गिक ओढ असते. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या माणसाला वाळवंट बघावेसे वाटते, तर वाळवंटात राहणाऱ्या माणसाला जंगलाचा मोह पडतो. पुरातन काळापासून पर्यटन हे व्यापारानिमित्त जास्त होत असले, तरी जग बघायला म्हणून हिंडणाऱ्या हिरोडोटसपासून ह्युएन त्संगपर्यंत आणि कोलंबसापासून ॲमंडसन - स्कॉटपर्यंत केवळ जग पाहण्याच्या अनिवार आसक्तीपायी अक्षरशः प्राणावर उदार होऊन शेकडो वीरांनी जगाचे कानेकोपरे पालथे घातले, नवनवीन प्रदेश शोधून काढले. 

आज आपण जे पर्यटन करतो ते त्या मानाने खूपच सोपे आहे. सगळ्या जगात सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत. प्रवासाची मुबलक साधने आहेत. आज काही तासात जगाला फेरी मारता येते! गेल्या शतकापासून जगातल्या बहुतेक सगळ्या देशांनी आपल्या निसर्गसौंदर्यात भर घालून पर्यटकांना भुरळ पाडायला सुरुवात केली. कित्येक देशांची अर्थव्यवस्था तर आज पर्यटनावर अवलंबून आहे. बहुतेक देशांनी आपापले टुरिस्ट बोर्ड स्थापन केले आहेत आणि आज ते जगभर आपल्या देशाची व्यवस्थित जाहिरात करून जास्तीत जास्त पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. 

सिंगापूर, हॉंगकॉंगसारख्या छोट्या बेटांनीसुद्धा उत्तम रस्ते, करमणुकीचे कार्यक्रम, डिस्नेलँड-युनिव्हर्सल स्टुडिओजसारखी प्रचंड लोकप्रिय थीमपार्क्स आयात करून आपल्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर घातली. आफ्रिकेतल्या देशांनी जंगलातल्या प्राण्यांच्या सफारी सुरू केल्या, त्या लोकप्रिय झाल्या. युरोपसारख्या जागतिक इतिहास घडलेल्या भागात असंख्य संग्रहालये उभी राहिली, जुन्या खुणा जपल्या जाऊ लागल्या. सगळीकडून सगळीकडे पर्यटकांचा ओघ सुरू झाला, जास्तीतजास्त पर्यटकांना आपल्याकडे ओढायची चढाओढ सुरू झाली. 

निरनिराळ्या प्रदेशात मी जेव्हा जातो, तेव्हा लोकांनी पर्यटनाबद्दल केलेले अनेक पद्धतीचे विचार बघून थक्क होऊन जातो. आज याच अंगाने थोडेसे अगदी आपल्या जवळच्या  उदाहरणाकडे मी किंचित वेगळ्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करणार आहे. 

माझी खात्री आहे, की वाचकांपैकी कित्येक जण दुबईला नक्की जाऊन आले असतील. भारतापासून विमानाने अवघ्या दोन - अडीच तासांच्या अंतरावर असणारा हा छोटेखानी देश भारतीय पर्यटकांना सर्वांत प्रिय आहे. एकतर खर्च कमी, खाणे पिणे, भाषा आपल्या जवळची; पण इतर सुविधा मात्र आपल्यापेक्षा अतिशय चकाचक असल्याने स्वाभाविकपणे भारतीयच काय जागतिक पर्यटकांचा ओढा दुबईकडे असतो. कामानिमित्त मला दुबईला नियमित जावे लागते आणि प्रत्येकवेळी रखरखीत वाळवंटात शेख झाएद यांनी कृत्रिमपणे निर्माण केलेल्या या सुंदर नगरीचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रचंड कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. 

ऐंशीच्या दशकात जेव्हा दुबईचे टाऊनप्लॅनिंग एका अमेरिकन कंपनीकडून करायचे ठरले, तेव्हा शेखनी एक अट घातली. दुबईतल्या १२ तरुण स्थापत्य विशारदांना (आर्किटेक्ट्सना) त्या कंपनीने प्रशिक्षण द्यायचे. आजची अतिशय सुंदर प्लॅनिंग असलेली दुबई या बारा जणांनी प्रत्यक्षात आणली आहे. त्यातले एक दाऊद हे मला DSK यांच्या ड्रीमसिटी प्रोजेक्टवर भेटले होते, त्यांच्याकडून दुबईच्या त्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल खूप ऐकायला मिळाले. खाडीभोवतालच्या गरीब वाळवंटात या लोकांनी अक्षरशः एक नंदनवन उभारले आहे. भव्य विमानतळ, एमिरेटससारखी अव्वल दर्जाची विमान कंपनी, विशाल रस्ते, येणाऱ्या प्रवाशांना सगळीकडे सहजपणे पोचवणारी मेट्रो, आठवडाभरात बघून संपणार नाहीत अशी जगातली सर्वोत्कृष्ट थीमपार्क्स, सतत चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस, इथले बाजार, भरपूर साध्यापासून ते पंचतारांकितपर्यंत हॉटेले आणि इतर सुविधा... इथली प्रत्येक गोष्ट पर्यटनाशी जोडलेली आहे. 

दुबईत गेले, की बहुतेक जण, बुर्ज खलिफा, वाळवंटातली सफारी, रात्रीची बोट सफर (धो क्रुझ), सोन्याचा बाजार (गोल्ड सौक) आणि भरपूर शॉपिंग यात रंगतात आणि परत येतात. मला मात्र हे खऱ्या अर्थानी जागतिक असलेले शहर/देश चालते तरी कसे? याची उत्सुकता असते. मग मी ‘बर दुबई’ या जुन्या भागातल्या जुन्या चौकातल्या (ओल्ड सौक) मधल्या एखाद्या चहाच्या टपरीत जाऊन बसतो. समोर दुबईतले जीवन उलगडत असते. देशोदेशींचे नागरिक इथल्या लांबलचक बाजारात कपडे, दागिने, मसाले, ऊद, धूप आणि काय वाट्टेल ते खरेदी करत असतात. या चहाच्या टपरीत कामकरी वर्ग येऊन आपापल्या सुखदुःखाच्या गोष्टी करत असतो. हळूहळू संध्याकाळ होते. समोरच्या खाडीतील पाणी दोन्ही बाजूच्या इमारतींवरच्या रोषणाईच्या प्रतिबिंबांनी झगमगायला लागलेले असते. तुम्ही जर डिसेंबर ते मे या दरम्यान गेलात, तर अतिशय प्रसन्न करणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकी येत असतात. खाडीच्या दोन्ही तीरांवरून लोकांची ने-आण करणाऱ्या छोट्या छोट्या डिझेलवर चालणाऱ्या तऱ्या पाण्यावर तरंगत असतात. प्रचंड संख्येनी जगभरचे प्रवासी या सोयीचा उपयोग करतात. एके दिवशी संध्याकाळी मी गंमत म्हणून या बोटी आहेत तरी किती म्हणून मोजले तर २०० च्या आसपास भरल्या. आता व्यवसायाची गंमत बघा. भल्या सकाळी ही सेवा सुरू होते. प्रत्येक बोटीत बरोबर २० प्रवासी घेतात. कमी नाही आणि जास्त नाही. तिकीट फक्त १ दिरहम म्हणजे २० रुपये असते. खाडी ओलांडायला साधारण ५ ते ६ मिनिटे लागतात. या सर्व बोटी दिवसाचे बहुधा १६ तास फुल चालतात. हिशेब केला तर दर होडी एका तासात साधारण १० फेऱ्या करते. म्हणजे हा अगदी लो टेक व्यवसाय वर्षाला साधारण साडेसहा कोटी डॉलर्सचा व्यवसाय करतो. त्याच बरोबर एक उत्कृष्ट सेवा तयार होते आणि कित्येक लोकांची घरे चालतात, रोजगार निर्माण होतो. दुबई, सिंगापूर, हॉंगकॉंग या सारख्या छोट्या छोट्या देशांत माझ्या दृष्टीने या गोष्टी मॉलपेक्षा जास्त बघण्यासारख्या असतात. फक्त त्यासाठी वेळ पाहिजे आणि बघायची उत्सुकता पाहिजे. आपापल्या देशातले पर्यटन असे निर्माण करतात. 

तिथेच जवळ एक मध्यम आकाराचे दुबई म्युझियम वाहत्या रस्त्याच्या खाली तळघरात निर्माण केले आहे. इथेही खूप भारतीय प्रवासी जाताना दिसत नाहीत. अप्रतिम म्युझियम आहे. तिकीट फक्त ६ दिरहम. दिवसाला साधारण ४ ते ५ हजार लोक इथे भेट देतात. किती बस कंपन्या, किती हॉटेल्स, किती वस्तू विक्री केंद्रे (सोव्हेनिअर शॉप्स) अशा छोट्या छोट्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणांमुळे चालतात, किती रोजगार निर्माण होतात! दुबई अशी बघायला हवी. हे सगळे बघत असताना मनात आपल्या देशाचे विचार येत असतात. या रखरखीत वाळवंटाला देवाने जितके दिले आहे, त्यापेक्षा हजारो पटींनी त्याच देवांनी आपल्या भारताच्या पारड्यात दान टाकले आहे. पण आपण काय करतो? सांगतो... 

पूर्व जर्मनीतल्या सॅक्सनी टुरिझमचा एक मोठा अधिकारी वूल्फगँग गार्टनर हा माझा प्रवासातच झालेला चांगला मित्र आहे. एकदा भारतात आला असताना मला म्हणाला, ‘जरा मला तुमची किनारपट्टी दाखवशील? बघायची आहे.’ म्हटलं, ‘तथास्तु.. चल.’ तीन दिवसांचा प्रवास ठरवला होता. दापोलीपासून सुरुवात करून सावंतवाडीपर्यंत त्याला हिंडवून आणायचे असा विचार होता. पहिल्याच दिवशी संध्याकाळी पोचल्या पोचल्या त्याला हर्णैच्या किनाऱ्यावर घेऊन गेलो. संध्याकाळी चार वाजल्यापासून इथे जी धमाल सुरू होते तिला तोड नाही. मासेमारी करून येणारे ट्रॉलर्स हळूहळू किनाऱ्याला लागत असतात. परत जाणाऱ्या ट्रॉलर्समध्ये समुद्रात बैलगाड्या घालून डिझेल पोचवले जात असते. ताजी मासळी किनाऱ्यावर ओतली जात असते. वाटे तयार होत असतात. होलसेलचे आणि किरकोळ विक्रीचे बाजार लागतात, बोल्या ठरत असतात. सूर्य हळूहळू तांबूस सोनेरी रंग धारण करून समुद्राच्या कुशीत जायला लागलेला असतो. कोळी आणि खरेदीदार कधी खुशीत तर कधी हमरातुमरीवर येत असतात. चापूनचोपून लुगडी नेसलेल्या, अंगावरचे सोने सहजतेने वागवणाऱ्या कोळिणींचा कलकलाट चाललेला असतो. अनुभवी लोक बरोब्बर आपल्या ओळखीच्या कोळिणी हुडकून ताजे म्हावरे घेऊन आनंदात जात असतात. किनाऱ्यावरच्या त्या असंख्य जातीच्या माशांचे सोनेरी, चंदेरी रंग, आकार बघूनच पोट भरते. जगात इतकी ‘कलरफुल’ जागा आणि दृश्य क्वचित बघायला मिळतील! युरोपात मासेमारीची बंदरे आहेत, बाजार इथल्यापेक्षा अवाढव्य आहेत; पण तिथे सगळा यांत्रिक कारभार! वूल्फगँग बरोब्बर त्याच्यातच अडकला! म्हणाला, ‘संजय इथून आपण कुठेही जायचे नाही.. रोज संध्याकाळी इथेच यायचे.. हे अवर्णनीय आहे.’ म्हटले, ‘तथास्तु!’ तिन्ही दिवस संध्याकाळी तो एखादी समाधी लागल्यासारखा हर्णैच्या बंदरात अनिमिष नेत्रांनी हा बाजार बघत बसायचा. तिसऱ्या दिवशी अंधार पडला, हर्णैचा बाजार थोडा निवला आणि आम्ही परत निघालो. तो म्हणाला, ‘किती कर्मदरिद्री लोक आहात रे तुम्ही! अरे, असा बाजार आमच्या जर्मनीत असता तर काय केले असते आम्ही त्याचे! इथे जे दीपगृह आहे त्या उंचवट्यावर एक सुरेख काचेची भिंत असलेले रेस्टॉरंट उभारले, तर पश्चिमेचे लोक फक्त बिअरच्या ग्लासबरोबर हे सगळे बघायला १००-१०० डॉलर्स देतील! पण काय तुमचे इथे यायचे रस्ते! शरीरातली सगळी हाडे खिळखिळी होतील! काय सुंदर आहे हे सगळे! हे नीट करावे असे तुम्हाला वाटत नाही का रे? खरे तर किती सोपे आहे..’ काय उत्तर देणार मी त्याला? आपल्या महाराष्ट्राला ७०० किलोमीटर लांबीचा किनारा आहे, पण त्याची महती कळते ती दुबईच्या त्या छोट्याशा खाडीच्या काठावर बसून चहा पिताना! शेवटी गदिमांच्या ओळी आठवतात - 

सतत वाहते उदंड पाणी 
कुणी न अडवून नेई रानी 
आळशास ही व्हावी कैसी 
गंगा फलदायी? 

प्रवास तुम्हाला विचार करायला लावतो यापेक्षा प्रवासाचा कुठलाही मोठा फायदा मला तरी दिसत नाही. 

पुढच्या भागात दुबईतल्याच आणखी एका अफाट, पण खूप कमी अनुभवल्या जाणाऱ्या पर्यटन प्रकल्पाविषयी...

संबंधित बातम्या