प्रवास ः चीनची खाद्यसफर 

संजय दाबके 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...
संजय दाबके

सुव्हिनूर ईटींग ४ 

दहा-बारा वर्षं झाली असतील. बीजिंगमध्ये पोचून दोन दिवस झाले होते. चीनमध्ये आधी प्रवास केला होता, पण या राजधानीच्या शहरात पहिल्यांदाच आलो होतो. काम भरपूर होतं त्यामुळं पहिले २ दिवस घाईतच गेले. तिसऱ्या दिवशी मात्र वेळ ठेवला होता. बरोबर चिनी मित्र होते. सकाळीच बीजिंगपासून साधारण ५०-६० किलोमीटरवर असणाऱ्या चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीवर चाल करून आलो. पार सातव्या टप्प्यापर्यंत जाऊन पोचलो. दिवस तसा मोकळाच होता. संध्याकाळ झाली. मित्र न्यायला आले. शहराच्या उत्तरेला असणाऱ्या गुई जी म्हणजे घोस्ट स्ट्रीटच्या दिशेनं आम्ही निघालो होतो. लांबूनच सगळीकडे टांगलेले भडक लाल रंगाचे; पण मोहक आकारांचे आकाश कंदील दिसायला लागले. सोनेरी आणि लाल हे चिन्यांचे लाडके रंग! त्यांच्या देवळे (म्हणजे जी काही मोजकी बुद्धिस्ट मंदिरे आहेत ती.. चीनमध्ये देव धर्माला बंदी आहे), सण ते अगदी मिरवणुकीतला ड्रॅगन सगळं या लाल आणि सोनेरी रंगात रंगलेलं असतं. 

गुई जी रस्त्यावर प्रवेश केला, की पुण्यातल्या जुन्या शनिवार पेठेत शिरल्यासारखं वाटतं! तसेच शेकडो वर्षांचे जुने वाडे.. (फक्त ते पडून तिथे स्कीम न करता बाहेरच्या सुंदर प्रवेशद्वारांसह आहेत तसे जपून ठेवलेले आहेत). या बहुतेक प्रत्येक वाड्यात सुंदर रेस्टॉरंट! वाडे २-३ मजली. प्रत्येक मजल्यावर आणि खोल्या खोल्यांमधून टेबले थाटलेली. पण खरी मजा मधल्या चौकात! भव्य चौकात मांडलेली स्वच्छ टेबले. वर गॅलऱ्या गॅलऱ्यांमधून टांगलेल्या त्याच लाल रंगाच्या आकाश कंदिलांची उधळण. त्यामुळे सगळ्या वातावरणात पसरलेली गूढ अशी लालसर छटा. तत्परतेने आणि अत्यंत वेगाने तुमचे स्वागत करून तुम्हाला टेबलावर बसवून तुमच्या समोर झटपट मेनूकार्ड आणून ठेवणाऱ्या चिनी मुली! चिनी मुली तुम्ही कुठंही बघा.. विमानतळ असो वा हॉटेल, दुकान असो वा पोस्ट ऑफिस, विलक्षण वेगानं काम करतात. त्यांच्याइतक्या झपाट्यानं कामाचा फडशा पाडणाऱ्या मुली इतर कुठल्याही देशात मी पहिल्या नाहीत. परत हे सगळं करून अत्यंत हसतमुख! त्या मानानं पुरुष किंवा तरुण मुलं फारच ढिम्म आणि संथ!  

''गुई जी'' रस्त्यावर अशी वाड्या-वाड्यांमध्ये वसलेली शंभराच्यावर हॉटेल्स आहेत. चीनमधले सीचुआन, शॅन डाँग, गुआंगडाँग आणि हुनान हे प्रमुख प्रांत! या सगळ्याच प्रांतांची खाण्यापिण्याची वैशिष्ट्यं आहेत. आपल्याकडं जसा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमेतल्या राज्यांमध्ये खाण्यापिण्यात जमीन अस्मानाचा फरक असतो तेच इथंही. पण ''गुई जी'' रस्त्यावर हे सगळे प्रांत आपापल्या पाककृती घेऊन हजर आहेत. पण हे सगळं सोडून आज इथं मित्र ''पेकिंग डक'' खायला घालायला घेऊन आले होते. एकटं चीनमध्ये आलं आणि पारंपरिक चिनी भोजनाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर एकतर तुमचं नशीब चांगल्या जागी जायला जोरावर असायला पाहिजे किंवा बरोबर चिनी मित्र तरी पाहिजे. तिसरा पर्याय नाही! याच मुख्य कारण भाषा. अजूनही बहुतेक हॉटेल्समधून इंग्रजी ऐकलं की कोरे किंवा प्रश्नार्थक चेहरे बघायला मिळतात. आपल्याला काय पाहिजे ते त्यांना समजावून सांगेपर्यंत जीव जायची पाळी येते! चित्रांचे मेनू असतील तर त्या चित्रांकडे बघून ऑर्डर देता येते पण बरोबर जर शाकाहारी कोणी असेल तर हाल विचारू नका! किती तरी वेळा मी अशा शाकाहारी मित्रांसाठी रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात जाऊन कांदे बटाटे शोधून काढून "ह्याचं काही तरी करून द्या आता" हे खुणेच्या भाषेत समजावून सांगण्याचा खेळ केलेला आहे! अशावेळी ते मँडरिन भाषेत बोलत असले तर मी सरळ मराठीत बोलायला सुरुवात करतो कारण इंग्लिश बोलून काहीच फायदा नसतो. कमीत कमी मराठी बोलताना हातवारे तरी जोरदार करता येतात आणि त्याचा फायदाही बरेचवेळा होतो! 

आज मित्र बरोबर असल्यानं काही काळजी नव्हती! 

''गुई जी'' रस्त्यावरून चालत चालत आम्ही ''दाई तान'' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. आधी सांगितलं तशाच जुन्या वाड्यात हे प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. हे चिनी लोक प्रचंड प्रमाणात ऑर्डर करतात. इथंही तसंच झालं. थोड्याच वेळात आमचं टेबल अनेक पदार्थांनी  
भरून गेलं. अनेक पद्धतीच्या उकडलेल्या आणि परतलेल्या भाज्या, टोफू (बांबूचा गर) पोर्क, चिकन, बीफ यांच्या शिजवलेल्या, भाजलेल्या आणि अनेक प्रकारच्या सॉसेसमध्ये घोळवलेल्या पदार्थांनी समोर गर्दी केली. सोबत लहान लहान बाउल्समध्ये समोर येणार चिकट भात! चिन्यांना अजून आंबेमोहोर, बासमती वगैरे तांदुळाच्या जाती असतात याची माहिती नसावी. यच्चयावत चीनमध्ये मिळणारा हा भात असाच. आपल्याकडे असतो तशा उकड्या तांदुळाचा आणि चिकट! तो काड्यांनी खायचा. बहुतेक चिनी हे शेलाट्या अंगकाठीचे असतात. जाड चिनी माणूस क्वचित बघायला मिळेल! आता हे अगदी सडसडीत अंगकाठीचा स्त्री पुरुष ज्या वेगानं समोरचं अन्न संपवतात किंवा फस्त करतात ते बघून आपण थक्क होऊन जातो! ऑर्डर बघितल्यानंतर "हे सगळं कोण खाणार?" या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर समोर मिळून जातं! चिनी पाककृतींचा बाज आपल्याला थोडासा उग्र वाटतो. पण जर थोडी सवय झाली तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी काही काळानं आवडायला लागतात. 

मी वाट पाहत होतो ती ''पेकिंग डक''ची! ते समोर येतं तेसुद्धा डिशमध्ये वाढून नाही तर अगदी खास पद्धतीनं! पांढरा शुभ्र पोशाख घातलेला एखादा सेवक आधी येऊन आपल्या टेबलशेजारी एक स्टॅंड मांडतो. नुकतंच ओव्हनमधून काढलेलं किंवा ताजं ताजं भाजलेलं असं ते डक तो त्या स्टॅंडवर अडकवतो. खाली पांढरी शुभ्र डिश ठेवतो आणि दोन्ही हातात चमकणाऱ्या स्टीलच्या सुऱ्या घेऊन तो तुमच्या समोर ते सोलायला सुरवात करतो. अत्यंत कसबी कलाकाराप्रमाणं, बघत राहाव्यात अशा त्याच्या हालचाली असतात. म्हणता म्हणता तुमच्या समोर त्या बदकाच्या ढिगारा तयार होतो. हा सगळा प्रकार जितका रुचकर तितकाच प्रेक्षणीयही आहे. समोर निरनिराळ्या प्रकारच्या मुळ्या, सॉसच्या बशा असतातच. त्यांच्या बरोबर हे बदक स्वाहा करणं म्हणजे एक स्वर्ग सुख आहे! ४० तास अनेक पद्धतींनी मॅरिनेट केलं जाणारं हे बदक उगाच इतकं जगप्रसिद्ध झालं नाही! अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर हे तर फक्त पेकिंग डक खायला अमेरिकेतून चीनला जायचे असं म्हणतात! आता बदकासाठी बीजिंगला जायला मी काही किसिंजर नाही, पण बीजिंगला कधी गेलो तर मात्र तिथल्या एखाद्या संध्याकाळी घोस्ट स्ट्रीट वरच्या एखाद्या बदकावर माझं नाव नक्कीच लिहिलेलं असतं! 

चीनमध्ये माझा सगळ्यात जास्त प्रवास होतो तो सिचुआन या अगदी पश्चिम चीनच्या प्रांतात. आपला हिमालय ओलांडला, की लगेचच हा प्रांत सुरू होतो. तिथं जायला मात्र बँकॉक किंवा कुनमिग इथून जायला लागतं. चेंगडू हे शहर म्हणजे या सिचुआन प्रांताची राजधानी. तिथून साधारण दोन अडीच तासांच्या अंतरावर झिगॉंग नावाचं एक छोटंसं, साधारण आपल्या वाई एवढ्या आकाराचं गाव आहे. मला कामासाठी तिथं खूप वेळा जावं लागतं. छोटं असलं तरी अत्यंत रेखीव असं हे गाव आहे. प्रशस्त रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा सुंदर बागा, गावाच्या मधून वळणावळणानं वाहणारी छोटीशी वर्षभर पाण्यानं भरलेली नदी.. असं सगळं छानच आहे. पण सिचुआन प्रांत त्याच्या खाद्यसंस्कृतीसाठी सगळ्या चीनमध्ये प्रसिद्ध आहे. आपल्याकडच्या गल्लीगल्लीमधल्या चायनीज गाड्यांवरचा ''शेझवान'' हा रूढ झालेला शब्द म्हणजे ''सिचुआन'' या शब्दाचाच अपभ्रंश! झिगॉंगमध्ये बहुतेक वेळा दुपारचं जेवण, फॅक्टरीत कर्मचाऱ्यांच्या बरोबर होतं.. ते तसं साधं सोपं. पण संध्याकाळी या चिनी मित्रांचा आग्रह म्हणजे राक्षसी असतो! त्यातून ऑफिस असो किंवा हॉटेल सिचुआनच्या पाक संस्कृतीचं तिखटाबरोबर काय लग्न लागलंय ते कळत नाही! लाल तिखट, मिरी, आले, कांदे, लसूण, तिरफळे आणि मला माहीत नसलेले असंख्य तिखटाचे प्रकार इथले स्वयंपाकी मुक्त हस्ताने समोरच्या भांड्यांमध्ये उधळत असावेत! आपल्याकडं कोल्हापूर किंवा इतर कुठल्याही तिखट भागात इरेसरीनं अट्टल तिखट खाणारा इथं पहिल्याच फेरीत बाद होईल! 

इथं मित्रांची संध्याकाळ जमते ते हॉटपॉटच्या भोवती! याला काही ठिकाणी स्टीम बोट असंही म्हणतात. टेबलाच्या मध्यभागी मंद आचेवर ठेवलेला मोठ्ठा कुंडा. त्यात प्रचंड तिखट, अक्षरशः मिरच्यांचा रस्सा. बाजूला अनेक कंदमुळं, मांसाचे प्रकार, उकडलेली अंडी, भाज्या, मासे ठेवलेले. ज्याला जे पाहिजे ते त्यानं समोरच्या रश्श्यात टाकावं. थोडावेळ शिजवून काड्यांनी आपल्या ताटात वाढून घ्यावेत. गप्पा रंगत जातात. आपण आपले होरपळलेले तोंड सांभाळत जपून जपून खायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळी  समोर एखादी नाजूक दिसणारी सुंदर तरुणी बिनधास्त या रश्श्यावर ताव मारत असते. हे मधलं कुंड सारखं भरलं जात असतं.. जगात अनेक ठिकाणी हॉट पॉट निरनिराळ्या नावांनी मिळतो पण कुठंही तो एवढा तिखट नसतो. पण अस्सल सिचुआन पद्धतीत याला पर्याय नाही. एकदोन वेळा तोंड पोळून घेतल्यावर मी पराभव मान्य करून काही साधं सुधं मागवायला सुरुवात केली. 

पूर्वेकडच्या आणखी काही देशांची खाद्यसफर पुढच्या भागात!

संबंधित बातम्या