लाकसा करी आणि अर्ल ग्रे चहा

संजय दाबके
सोमवार, 7 डिसेंबर 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...
संजय दाबके

सूव्हीनूर इटिंग -६

‘सूव्हीनूर इटिंग’ म्हणजे ‘जाऊ तिथे तिथलं स्पेशल खाऊच’च्या या भागात मी आपल्या जवळच्याच दोन देशांमध्ये भ्रमंती करताना तिथल्या खाद्य संस्कृतीमधलं जेजे मला आवडलं त्याबद्दल सांगणार आहे. त्यातला पहिला देश आहे मलेशिया. अर्थातच बहुतेक वेळा क्वालालंपूरमध्ये काम असल्याने तिथेच जास्त राहणं झालं आहे; पण काही वेळा चित्रीकरणाच्या निमित्ताने दक्षिणेला मलाक्का ते उत्तरेला पिनांग आणि अगदी थायलंडच्या सीमेला लागून असणाऱ्या लांकावी बेटांपर्यंत सगळीकडे प्रवास झाला आहे. मलेशियामध्ये खाण्यापिण्यावर मुख्य प्रभाव चिनी असला तरी आजूबाजूच्या थायलंड, कंबोडिया, म्यानमार, भारत या सगळ्याच देशांच्या पाककृतींची सरमिसळ इथे बघायला मिळते. क्वालालंपूरमध्ये तुम्ही गेलात तर संध्याकाळी ‘राजा चुलान’ आणि ‘इंबी’ या दोन मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या ‘बुकीत बिनटांग’ या मुख्य हमरस्त्यावर तुम्ही जायलाच पाहिजे. बुकीत म्हणजे ‘रस्ता’. याच मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एक ‘बुकीत अलोर’ म्हणून गल्ली साधारण अर्ध्या किलोमीटर लांबीची  गल्ली आहे. खवय्यांसाठी हा स्वर्ग आहे म्हटलं तर खोटं ठरणार नाही!  संध्याकाळ झाली की इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी टपऱ्यावजा रेस्टॉरंट्स आहेत, त्यांच्या बाहेर प्लॅस्टिकची टेबलं आणि खुर्च्या टाकल्या जातात. यात निम्मा रस्ता अडतो पण याला बहुधा सरकारची परवानगी असावी! टेबलांवर मेणकापडाचे टेबल क्लॉथ, त्यांचेही रंग भडक पिवळे किंवा लाल असतात, अंथरले जातात. प्रत्येक टपरीच्या बाहेर भगभगीत लाईट्स आणि लाडीगोडीने गिऱ्हाईकांना हातातील मेनूकार्डस् दाखवत आत बोलावणारी पोरं आणि पोरी! रात्री आठच्या नंतर जर तुम्ही या गल्लीत गेलात तर पाऊल ठेवायला जागा नसते. प्रत्येक दुकानाच्या बाहेर कोळश्याच्या शेगड्या पेटलेल्या असतात. त्यात इथले कबाब म्हणजे ‘साते’ भाजले जात असतात. हे ‘साते’ चिकन, मटण, पोर्क मागाल त्याचे मिळतात. या शेगड्यांतून येणारा धूर आणि गोडसर वास यांनी सगळा रस्ता भरून गेलेला असतो. ‘साते’ ही मलेशियन उत्पत्ती! लाकडाच्या काडीवर पाहिजे त्या मांसाचे तुकडे लावून ते कोळश्याच्या शेगडीवर खरपूस भाजायचे आणि जोडीला शेंगदाणे आणि चिंच-गुळा सारखा काहीतरी सॉस एकत्र केलेल्या चटणी बरोबर खायचे. तुम्ही टेबलवर जाऊन बसलात की काही न मागतही एखाद्या बशीत हे ‘साते’ समोर येतात! मलेशिया हा समुद्राने वेढलेला देश. त्यातून क्वालालंपूर ही राजधानीच समुद्र काठी त्यामुळे माशांचे असंख्य प्रकार इथे भाजून, तळून, बश्या भरभरून प्रवाशांच्या पोटात गुप्त होत असतात. 

अशा ओपन एअर टपऱ्यांचे मर्म म्हणजे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नाकाला आणि डोळ्यांना पहिल्यांदा आकर्षित करायचे! मग आपोआप पाय तिथे खेचले जातात. प्रत्येक टपरी आपल्याला खुणावतच असते.. मी नेहमी पहिल्यांदा गल्लीच्या शेवट पर्यंत चक्कर मारून येतो. एखादे ठिकाण निश्चित करतो आणि मग तिथे घुसतो. इथे प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये वेग हा परवलीचा शब्द असतो. गर्दी खूप असते, त्यामुळे पहिला ग्रुप उठला की झपाट्याने टेबलावरचं मेणकापड साफ होतं, तुमची ऑर्डर घेतली जाते आणि पाच मिनिटांच्या आत अतिशय आकर्षकपणे तुम्ही मागवलेला पदार्थ तुमच्या समोर आलेला असतो. इथे काम करणाऱ्या बऱ्याचशा चिनी मुली असतात. गच्च भरलेले ट्रे त्या सहजतेने दोन्ही हातात घेऊन टेबलांच्या अरुंद रांगांमधून एखाद्या नर्तकी सारख्या झपाट्याने पावले टाकत, कोणालाही धक्का न लावता सहजपणे तुमच्या समोर आणून ठेवतात. आणि हे सगळं अत्यंत हसत मुखाने! बिअरच्या बाटल्या फोडल्या जात असतात आणि जगभरचे प्रवासी पहिल्यांदा दर्शनाने, मग वासाने आणि शेवटी चवीने तृप्त होत असतात. सोशल मीडियावर आपापल्या आवडीच्या जागांचा आणि खाद्य पदार्थांच्या फोटोंचा ढिगारा पोस्ट होत असतो! 

मलेशियामध्ये ‘फूड कोर्ट’ची संस्कृती खूप पूर्वी पासून आहे. मध्यभागी कॉमन बसायची व्यवस्था आणि बाजूनी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स! इथे मला आवडणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे ‘लाकसा करी’!  या करीवर थोडे दक्षिण भारतीय संस्कार आहेत. नारळाच्या रसात बनवल्या जाणाऱ्या या करीत प्रॉन्स मुख्य; पण त्याच बरोबर भाज्या, अंडी, चिकन आणि आणखीन काहीही घालून हे मिश्रण इतकं सुंदर जमवून आणतात की याच्या बरोबर काहीही न घेता लाकसा करी संपवता येते. 

‘शेंडॉल’ शिवाय मलेशियन भोजन निदान माझ्यासाठी तरी पूर्ण होऊच शकत नाही. पामच्या म्हणजे माडाच्या झाडाचे दूध आणि माडापासूनच केलेली साखर यांनी हा गोड पदार्थ तयार होतो. आपल्याकडे बर्फाचे गोळे मिळतात तसे हे माडाच्या दूध आणि साखरेचे बर्फाचे गोळे. माफक गोड चवीच्या ह्या डेझर्टमुळे सुंदर जेवणाची मैफील सुफळ संपूर्ण होते! 

माझा अतिशय आवडीचा, भारताचा अगदी सख्खा शेजारी देश म्हणजे आपल्या दक्षिणेचा श्रीलंका! श्रीलंकेला जाणं अगदीच सोपं आहे. हिरव्यागार पाचू सारखा, वनश्रीने व्यापलेला हा देश अत्यंत सुंदर आहेच पण अगदी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला सहज परवडणारा आहे. त्यातून इथल्या जनतेला पर्यटनाचे महत्त्व समजलेले आहे आणि त्यामुळे परदेशी किंवा कोणाशीही इथली सगळीच माणसं अत्यंत ऋजुतेनी वागताना दिसतात. भांडण करणारा लंकन माणूस सहसा बघायला मिळत नाही. येणारे बहुतेक पर्यटक कोलंबोला येतात. तिथून जवळच पिनावेला आणि कँडीला भेट देतातच देतात. दक्षिण भारत, त्यातूनही केरळ आणि बऱ्याच प्रमाणात तमीळ प्रभाव इथल्या सगळ्याच संस्कृतीवर आहे. पण त्यातूनही लंका आपली स्वतःची खासियत सगळ्याच बाबतीत जपून आहे. 

लंकेला आलं की माझा पहिला अजेंडा असतो तो म्हणजे जमेल तितका चहा इथे प्यायचा. जगामध्ये लंकेसारखा चहा मिळणार नाही. एकतर चहाचे अनंत मळे इथल्या पर्वत रांगांमध्ये ब्रिटिशांच्या काळापासून आहेत. उत्तम वातावरणामुळे या चहाची चव अतिशय मृदू असते. आपल्याकडे आपण चहा अतिप्रमाणात उकळून आणि त्यात साखर, दूध घालून आपण चहाची जी मूळ चव आहे ती पूर्णपणे मारून टाकतो! लंकेत चहाचा पहिला घोट घेतला की तो आपलं नाक आणि जीभ यांना जे एक अप्रतिम हळुवार सुख देऊन जातो ते अवर्णनीय आहे. लंकेत तुम्ही कुठल्याही हमरस्त्यावर, कुठेही अगदी छोट्याशा टपरीसमोर थांबा; मोठे, स्वच्छ पांढरे शुभ्र कप आणि बशी, त्यावर त्या टपरीचं नाव कोरलेलं आणि बहुतेक ठिकाणी, अगदी लहानातल्या लहान ठिकाणी सुद्धा, सुंदर ट्रे मधून किटलीतून चहा समोर येतो. चहाचे किती प्रकार! त्यातूनही माझे आवडते म्हणजे ‘इंग्लिश ब्रेकफास्ट’ आणि जिभेला किंचित सुखकर झटका देणाऱ्या चवीचा ‘अर्ल ग्रे’! 

कोलंबोपासून न्युआरा एलीयाच्या रस्त्यावरच्या पर्वत रांगांमधल्या हिरव्यागार कोपऱ्यात एखाद्या चहाच्या लहानशाच टपरी समोर गाडी थांबवावी. हवेत चांगला गारवा असावा (तसा तो ह्या भागात बाराही महिने असतोच!). बाहेरच निसर्गाच्या वेढ्यात, टेबलावर बसावे आणि समोर किटलीच्या सरंजामासकट सुंदर चहा यावा. कोणाला वाटलं तर किंचित साखर चालेल पण दुधाची गरजच नाही! असा तो चहा मनापासून प्राशन करावा आणि पुढच्या मार्गाला लागावे. हा आनंद मी अनेक वेळा घेतला आहे! श्रीलंकेच्या क्रिकेट टीमला वर्षानुवर्षे स्पॉन्सर करणारी ‘दिलमाह’ किंवा ‘मॅकवूड’ सारख्या चहाचे मळे असणाऱ्या संस्था आज जगात त्यांच्या चहाच्या दर्जासाठी प्रसिद्ध आहेत! 

इतर खाण्यापिण्याच्या बाबतीत श्रीलंकेत दक्षिण भारताशी खूपच साम्य सापडतं. समुद्राशी जोडलेल्या कुठल्याही भूमीवर नारळाशिवाय काहीही होऊ शकत नाही. हा नियम श्रीलंकेत तर फारच कडक आहे. इथल्या प्रत्येक पदार्थात नारळ पाहिजेच! अगदी कोलंबोच्या समुद्र किनाऱ्यावर गेलं तर आपल्याकडे जशी भेळ विकतात तसं गाड्या गाड्यांवरून इथे केळीच्या किंवा तत्सम पानांवरुन किसलेल्या ताज्या नारळाचे गोड खोबरे विकायला ठेवलेले असते. नुसते हे खोबरे खात हिंडायचे! कोलंबो पासून ते कँडी पर्यंत अगदी कुठेही गेलात तरी सकाळी न्याहारीला ‘स्प्रिंग हॉपर्स’ असणार! आपल्या इडली ऐवजी ह्या तांदुळाच्या शेवया गोल आकारात समोर येतात. त्यांच्या बरोबर लाल मिरची, ओले खोबरे, मीठ आणि जिरं एव्हढेच घातलेली चटणी असते. कुठेही न मिळणारा हा अजोड प्रकार आहे. बाकी भोजनात मग वडे, डोसे हे आपल्या अगदीच अतिपरिचयाचे प्रकार.

काही वर्षांपूर्वी कोलंबोहुन मी न्यूआरा एलीया या पर्वतस्थानावर गेलो होतो. तिथून परतताना गेलेल्याच रस्त्याने न येता मी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या गॅले, बेंथोटा, हंबनथोटा ह्या अगदी समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्याने परत आलो. ह्याच भागाला २००४ साली त्सुनामीने जबरदस्त तडाखा दिला होता. न्यूआरा एलियाच्या पर्वतराईतून खाली उतरून मार्गाला लागलो आणि काही अंतरावर रस्त्याच्या कडेने कुडाच्या झोपड्यांसारखे स्टॉल्स दिसायला लागले. प्रत्येकाच्या बाहेर मातीच्या हंड्यांमधून दही विकायला ठेवलेले! गाडी थांबवली. चौकशी केली तर हे अगदी छोटसं ‘तिस्सा महारामा’ नावाचं खेडं होतं. या खेड्यात सगळ्या घरांमधून दही लावतात आणि ते हमरस्त्यावरच्या पर्यटकांना विकतात. हाच त्यांचा व्यवसाय. इथलं दही खरोखरच प्रसिद्ध आहे! मातीच्या भांड्यांमधून ते मिळतं. बसून ते पामच्याच मधासारख्या लागणाऱ्या सिरप बरोबर लागेल तितके खावं! या छोट्याश्या गावाने हा दही बनवण्याच्या धंद्याला उत्तम व्यावसायिक रूप दिलं आहे, हे सोशल मीडियावर बघितलं तर सहज लक्षात येत! प्रचंड प्रमाणात इथे दह्याची विक्री होते. 

मलेशिया आणि श्रीलंका हे दोन्ही देश भारताच्या जवळ आहेत. सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक गणितात बसणारे आहेत. पाश्चिमात्य देशात गेल्यावर बऱ्याच लोकांच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी ज्या जमत नाहीत, ते होण्याचा प्रकार या दोन्ही देशात संभवत नाही कारण बऱ्यापैकी आपल्याशी मिळत्या जुळत्या चवी आणि पदार्थ! 

सूव्हीनूर इटिंगच्या ह्या सहा भागांमध्ये मला ह्या देशांमध्ये जेजे आवडलं ते सांगायचा मी प्रयत्न केला. कुणीही तिथे पर्यटक म्हणून गेलात तर या स्थानिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा जरूर प्रयत्न करा. त्याशिवाय कुठलंही पर्यटन अपूर्णच राहील

संबंधित बातम्या