गेल्या सहा महिन्यातला प्रवास! 

संजय दाबके 
सोमवार, 21 डिसेंबर 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...
संजय दाबके

गेल्या १२ मार्चला मी वृन्दावन मध्ये होतो. तिथून दिल्लीची कामे संपवून १७ तारखेला पुण्यात परत आलो. दुसऱ्या दिवशी एका दिवसासाठी मुंबईला जाऊन आलो आणि त्याच दिवशी लॉकडाउनची घोषणा झाली. सगळं काही १५ दिवस बंद! महिन्यातून साधारण तेवीस-चोवीस दिवस कामासाठी प्रवास करणारा मी एकदम घरात जेरबंद झालो. पण त्यावेळीही ‘‘ठीक आहे.. होईल पंधरा-वीस दिवसांनी सगळं सुरळीत!’’ या पेक्षा फार त्याकडे लक्ष्य दिलं नाही. एप्रिलचा मध्य उजाडला आणि एकंदर पुढच्या काही महिन्यांचं चित्र लक्षात यायला लागलं. देशांतर्गत आणि परदेशी एअरलाईन्स बंद झाल्या. रेल्वे, बस बंद झाल्या. फार काय घरापासून दुचाकीने सुद्धा कुठे जायची सोय उरली नाही. गल्ल्या गल्ल्यांमध्ये बांबू लावून अडसर तयार झाले.  अनेक साईट्सची कामे अर्धवट, आहेत त्या स्थितीत ठेवली लागली. एका पेठेतून दुसऱ्या पेठेत जायला पोलिस पास आवश्यक झाला. गावाबाहेर पडणं तर अशक्यच होतं. मे महिना सगळ्यात भयंकर होता. एखादं संकट येऊ शकतं आणि त्याला तोंड देण्याची आपली तयारी सुद्धा असते. पण ते संकट संपणार कधी? हे जर अनिश्चित असलं तर सगळ्याच हालचाली थांबतात. भविष्याचा, अगदी उद्याचाही विचार करता येत नाही. मे महिन्यात अगदी हेच झालं. 

चंद्रपूरच्या माझ्या साइटवर बंगालचे सुमारे शंभर आर्टिस्ट्स अडकले होते. सगळ्यांनाच या संकट काळात त्यांच्या घरी जायची ओढ लागली होती, पण प्रवासाची परवानगीच नव्हती. काही दिवसांनी सरकारनी काही रेल्वे सुरू केल्या पण पश्चिम बंगालच्या सरकारने त्या रेल्वेंना आपल्या राज्यात प्रवेश नाकारला. केंद्र सरकार काही जाहीर करत होतं पण प्रत्येक राज्य आपापले स्वतःचे नियम लावून प्रचंड गोंधळ निर्माण करत होतं. जे व्यावसायिक इतर राज्यांमध्ये काम करतात त्यांचं या काळात सगळ्यात जास्त नुकसान झालं. याच कारण एकच होतं.. नेमक्या माहितीचा अभाव! पोलिस खातं या दोन महिन्यात प्रचंड ताणात होतं.. त्यामुळे प्रत्येक चेक नाक्यावर त्यांना पाहिजे ते नियम असा प्रकार सुरू होता.

जून महिना उजाडला. आपल्याकडे महाराष्ट्रात अंतर्गत प्रवासाला परवानगी मिळाली. पण त्या साठी पोलिस पास आवश्यक होता. एका गाडीत चारच माणसे. सगळ्यांची ओळखपत्रे, डॉक्टरांचे सर्टिफिकेट, स्वतःची पत्रे असं सगळं अपलोड करा आणि ‘पास’ ची वाट बघत बसा असा प्रकार सुरू झाला. एक मात्र मान्य करायला पाहिजे ही सिस्टीम बऱ्यापैकी एफिशिअंट होती. जूनमध्येच मी गाडीने चंद्रपूरला जायचं ठरवलं. आयुष्यभर प्रचंड प्रवास झालेला असूनही त्या दिवशी गाडीत बसताना ‘थ्रिलिंग’ वाटत होत! या प्रवासाचा मुख्य हेतू अर्थातच तिथल्या आमच्या कामाची  

पाहणी करून होणारं नुकसान काही कमी करता येईल का? याची चाचपणी करणं हा तर होताच, पण त्या पेक्षाही बाहेरची परिस्थिती नेमकी काय आहे? हे बघायची मला प्रचंड उत्सुकता होती. 

जूनच्या २० तारखेला चंद्रपूरच्या दिशेने निघालो. बस वाहतूक बंदच होती, त्यामुळे रस्ते पूर्ण मोकळे. रस्त्याने चंद्रपूरला जायला अठरा- एकोणीस तास लागतात. थोडेफार खाद्यपदार्थ बरोबर घेतले होती पण फार नाही. कुठे तरी काहीतरी मिळतंच हे आत्तापर्यंतच्या अनुभवातून माहीत झालं आहे. फक्त चहासाठी प्रत्येकाने स्वतःचे कप मात्र घरून आणले होते. या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट होता. पुणे नगर-आणि नंतर औरंगाबाद ह्या रस्त्यावर बऱ्यापैकी पोलिस बंदोबस्त, पासचे चेकिंग सुरु होते. सर्व व्यवहार बंद! औरंगाबाद सोडून जालन्याच्या मार्गाला लागलो आणि फरक दिसायला लागला. पहिल्यांदा म्हणजे जालन्याच्या अलीकडे एका बाजूला कोणाच्या लक्षात न येईल अश्या पद्धतीने बाहेर कापड लावून एका टपरीत चहा उकळत होता. तिथे बाजूला गाडी लावून थांबलो. एक नवरा बायको आमच्या सारख्या थोड्याफार येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा, पोहे, बिस्किटे इतपत का होईना पण देत होते. जालन्याहून पुढे निघालो. सिंदखेडराजा ते यवतमाळ ह्या रस्त्यावर मात्र बरीच वाहतूक सुरू होती. एकेक गाडीत बारा-बारा लोक भरलेले. पोलिस त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करून सोडून देत आहेत असं चित्र होतं. एकंदरीत मोठी शहरं सोडून जसं अंतर्भागात जाऊ तशी कोरोनाची कोणाला जाणीव आहे की नाही? अशी शंका यावी असं चित्र होतं! बाजार बंद होते पण लोकं कुठून तरी कुठे तरी जात होते. 

मेहेकर सोडलं आणि आतल्या लहान रस्त्याला एका बाजूला एक ढाबा सुरू असल्याचं जाणवलं. या वेळेपर्यंत मर्यादित का होईना माल वाहतुकीला परवानगी मिळाली होती. त्यामुळे कुठे चुकून माकून एखादा ट्रकवाला अशा ठिकाणी थांबत होता. तिथे थोडी पोटपूजा करून पुढे निघालो. पोलिस पास वर क्यूआर कोड होते पण कुठल्याही नाक्यांवरच्या पोलिसांकडे ते स्कॅन करून चेक करायची यंत्रणा नव्हती. हे बहुधा अनेकांच्या लक्षात येऊन फोटो शॉप केलेले अनेक पासेस निश्चितपणे वापरले जात असणार यात शंकाच नाही. आपल्याकडे नियम करणे, पण ते पाळले जातील याच्या व्यवस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष्य करून रामभरोसे व्यवस्था राबवणे याचा हा अश्या अभूतपूर्व संकट काळात सुद्धा आणखीन एक नमुना होता. 

चंद्रपूरला लॉकडाउन होता. आत येणाऱ्या प्रत्येकाची कागदपत्रे आणि पास यांची तपासणी अनिवार्य होती पण भद्रावती नंतर जिथे चंद्रपूरची हद्द लगेचच सुरु होते तिथे एक बॅरिकेडिंग होते आणि एक पोलिसांचा तंबू होता... पूर्ण निर्मनुष्य.. तपासणी साठी कोणीही नाही! जूनच्या त्या चंद्रपूरच्या प्रवासात एकंदरीतच सरकारी यंत्रणा कशी काम करते आहे याची अगदी जवळून झलक बघायला मिळाली. असाच प्रवास मग आणखीन तीन-चार वेळा झाला. या वेळेपर्यंत पहिलं थ्रिल ओसरलं होतं. प्रत्येक प्रवासात जनजीवन जास्त सुरळीत होत आहे हे दिसत होत. सरकारी नियम होतेच, पण ना जनता, ना पोलिस कोणीच ते फारसे मनावर घेताय असं वाटत नव्हतं. रस्त्यावरच्या हॉटेलांना उघडायची परवानगी मिळाली पण टेबलवर बसायची परवानगी नव्हती. तरीसुद्धा औरंगाबाद- नगर- पुणे रस्त्यावरच्या प्रत्येक हॉटेलात मागच्या बाजूला टेबले टाकून येणाऱ्या प्रवाशांची भोजनाची व्यवस्था केली जात होती. 

या काळात माणसाची जगायची धडपड बघायला मिळाली. जे जमेल ते काम करून लोक उदरनिर्वाह चालवायचा प्रयत्न करत होते. उच्च वर्गीयांना या लॉकडाउनचा विशेष फरक पडणार नव्हता. मध्यमवर्गीय माणूस सुद्धा काही काळ या परिस्थिती तग धरू शकतो, पण हातावर पोट असणाऱ्यांची काय अवस्था होती याच प्रत्यक्ष दर्शन या काळातल्या प्रवासात घडलं.

सप्टेंबर महिन्यांनंतर पोलिस पास बंद झाले. आता राज्यात कुठेही हिंडणं शक्य झालं. देशांतर्गत विमान सेवा थोड्याफार प्रमाणात तरी सुरू झाली. त्यामुळे इतर राज्यात जात आलं. विमान कंपन्यांवर निर्बंध घातले गेले आहेत. प्रत्येक प्रवाशाला चेहऱ्यावर लावण्यासाठी फेस शील्ड आणि मधल्या आसनांवरच्या प्रवाश्याला कागदी झगा घालणं आवश्यक झालं आहे. मुळात हवाई प्रवासाचा व्यवसाय हा अतिशय शिस्तबद्ध आहे, त्यामुळे अतिशय तातडीने त्यांनी हे सगळे नवे बदल योग्य पद्धतीने आत्मसात करून आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याचे योग्य प्रशिक्षण देऊन भारतभर राबवायला सुरुवात केली आहे. इथेही फक्त घोळ आहे तो सरकारी यंत्रणांमध्ये. प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक विमानतळावर नियम वेगळे! चंदीगडच्या विमानतळावर बाहेर पडताना प्रत्येक प्रवाशाकडून फॉर्म भरून घेतात तर इतर ठिकाणी नाही! नागपूरच्या विमानतळावर बाहेर पडताना अजूनही प्रत्येक प्रवाशाचे टेंपरेचर चेक करतात, इतर ठिकाणी नाही. आरोग्यसेतू ॲप वापरायची सक्ती सुरवातीच्या काळात केली होती. आता एकाही एअरपोर्टवर तुम्हाला कोणीही ह्या ॲप बद्दल विचारतही नाही. माझ्या सारख्या फक्त हॅन्डबॅग घेऊन हिंडणाऱ्या प्रवाशांसाठी विचारलं तर प्रवास थोडासा सोपेच झाला आहे. अजूनतरी विमानतळांवर फारशी गर्दी नाही. म्हणजे विमाने फूल आहेत पण उड्डाणे अजून ६० टक्केच सुरू केली आहेत. त्यामुळे! आता सरळ बोर्डिंगपास दाखवून थेट सिक्युरिटीला जात येत. त्यामुळे पूर्वी जे विमानतळावर दोन तास आधी जायला लागायचं ते आता एखादा तास आधी गेलं तरी चालतं! उड्डाणे कमी असल्याने होणारे विलंब/ विमाने रद्द होणे याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. बहुतेक विमाने वेळेत सुटतात आणि वेळेत पोचतात. प्रवाशांना फेसशील्ड आणि गाऊन घालायची सवय झाली आहे. फक्त विमान उतरलं की आपण भारतीय लोकांनी बेशिस्त काही क्षणात उफाळून येते. विमान थांबल्यानंतर, ‘उतरायची घाई करू नका. विमानाच्या त्या चिंचोळ्या जागेतून गर्दी करू नका. आपल्या पुढच्या रांगेतला प्रवासी जेव्हा उठेल तेव्हाच आपले सामान घ्यायला उठा’ असं विमानतळाचे कर्मचारी ओरडून सांगत असतात. पण बहुसंख्य प्रवासी या कडे दुर्लक्ष्य करतात आणि एकदम उठून गर्दी करतात. एक पाच मिनिटे थांबले तर यांचे काय बिघडते? किंवा एव्हढ्या तातडीने त्यांना कुठे जायचे असते? हे समजण्या पलीकडचे आहे. पुन्हा यातला बहुतेक समाज हा सुशिक्षित असतो! पण एकंदरीत या सगळ्या नवीन प्रवास व्यवस्थांची सवय माणसांना होत आहे हे नक्की!

आता लक्षणे अशी आहेत की करोना हळू हळू नियंत्रणात येतोय. ‘वंदे भारत’च्या काही फ्लाईट्स सोडल्या तर आंतरराष्ट्रीय प्रवास अजून सुरु झालेला नाहीये, पण कदाचित त्याचीही सुरुवात पुढच्या दोन-तीन महिन्यांमध्ये होईल अशी चिन्हे आहेत. आणखीन एखाद्या वर्षात पुन्हा सर्व सुरळीत होईल आणि या विचित्र वर्षाच्या फक्त आठवणी शिल्लक राहतील. प्रवासाचे वेगळेच अनुभव हे वर्ष देऊन गेलं. ते या वर्षापुरतेच मर्यादित राहोत आणि पुन्हा अशी वेळ कोणावर न येवो म्हणजे पुढच्या प्रवासाच्या बॅगा भारत येतील अशी आशा व्यक्त करूयात

संबंधित बातम्या