प्रवास २०२०

संजय दाबके
सोमवार, 11 जानेवारी 2021

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...
संजय दाबके

प्रवास हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पण लॉकडाउनमध्ये लोकांना घरातच कोंडून राहावं लागलं आणि त्यामुळे जगभरातला प्रवास जवळ जवळ थांबलाच! बस थांबल्या. रेल्वे बंद झाल्या. विमाने होती तिथेच पार्क झाली. फक्त आणि फक्त जीवनावश्यक वाहतुकीलाच परवानगी असल्याने तेवढीच तुरळक वाहतूक दिसत होती. प्रवासाचं २४ तास आणि ३६५ दिवस सतत धडधडणारं जगड्व्याळ यंत्र कधी नव्हे ते पूर्ण बंद पडलं. या क्षेत्रातल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा बिनपगारी सुरू राहिल्या. इतक्या प्रचंड आकाराची व्यवस्था जेव्हा अशी अचानक बंद पडते, तेव्हा ती पुन्हा सुरू होतानाही एका रात्रीत सुरू होऊ शकत नाही.

जून २०२०पासून कोरोनाची लागण थोडीफार कमी जास्त व्हायला लागल्यावर प्रवासाच्या राज्यातही थोडी थोडी धुगधुगी यायला लागली. रस्त्यावर तुरळक बस दिसायला लागल्या. पोलिस पास घेऊन का होईना, पण राज्यातल्या राज्यात प्रवास करता येऊ लागला. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणं अजूनही अवघड होतं. त्याचा सर्वात जास्त परिणाम कोणावर झाला असेल तर तो रेल्वेवर. सुरुवातीला गावी परतणाऱ्या श्रमिकांपुरत्या श्रमिक एक्स्प्रेस सोडल्या गेल्या. पण ऑगस्ट संपेपर्यंत रेल्वे वाहतूक अजिबातच सुरू होऊ शकली नाही. याच काळात सरकारने काही ठराविक मार्गांवर विमान प्रवास सुरू केला आणि अनेक निर्बंधांसह जनतेचा प्रवास साधारण सप्टेंबर महिन्याच्या अखेर पासून सुरू झाला.

अगदी जूनपासून कामानिमित्त मला राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी कोरोनाचा धोका पत्करून प्रवास करणं भाग होतं, त्यामुळे ह्या सगळ्या प्रचंड प्रवास यंत्रणा सहा-सात महिन्यांनंतर हळू हळू जाग्या होतानाचा अनुभव मला प्रत्यक्ष घेता आला.

या सगळ्यात सर्वात जास्त कौतुक करावं लागेल ते विमान व्यवसायाचं किंवा एव्हिएशन क्षेत्राचं. हा व्यवसाय प्रचंड गुंतागुंतीचा आहे. ‘भरली बस आणि निघाले’, असं विमानांच्या बाबतीत होऊ शकत नाही. विमानं आणि विमानतळांचे कायदे सगळ्या जगात सारखेच असतात. तिकिटे, बॅगेज, विमानतळांवरची सगळी व्यवस्था, एअर ट्रॅफिक कंट्रोल या सगळ्याची अत्यंत सुरळीत घडी बसत नाही तोपर्यंत विमान प्रवास सुरू होऊच शकत नाही. ‘वंदे भारत’ योजनेअंतर्गत होणारी काही मोजकी उड्डाणे सोडली तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक अजूनही बंदच आहे. भारत सरकारने काही राष्ट्रांबरोबर ‘एअर बबल्स्’ तयार केले म्हणजे आपल्या आणि त्या त्या राष्ट्रांमध्ये एकमेकांच्या विमान कंपन्यांना वाहतूक करायची परवानगी मिळाली. पण यातही प्रवाशांवर खूप निर्बंध होतेच. अजूनही आहेत. जूनपासून आपल्याकडे २५ टक्के देशांतर्गत विमान वाहतूक सुरू झाली. प्रमुख विमान कंपन्यांना वाहतुकीची परवानगी मिळाली. सुरुवातीला सरकारनं निम्मेच प्रवासी घेऊन विमानसेवा सुरू करण्याची सूचना केली, पण सगळ्याच विमान कंपन्यांनी ती हाणून पाडली कारण त्यात व्यवसाय करणं शक्यच नव्हतं. मात्र प्रत्येक प्रवाशाने फेस शील्ड वापरावी आणि दोन प्रवाशांच्या मध्ये बसणाऱ्याने एकदा घातल्यावर फेकून देता येईल असा कोट वापरला पाहिजे, हे सरकारचं म्हणणं त्यांनी मान्य केलं. विमान तळावर प्रवेश करताना ‘आरोग्यसेतू’ ॲप वापरणं आणि त्यात ‘तुम्ही सुरक्षित आहात’, हे प्रवेशद्वाराजवळ दाखवणं सक्तीचं झालं. सिक्युरिटीमध्ये सामानाची आणि माणसांची तपासणी होते, तिथं तर या रोगाचा धोका सर्वात जास्त! त्यामुळे तिथलीही व्यवस्था बऱ्यापैकी बदलली. सुरुवातीच्या काळात विमानात विकले जाणारे अन्न पदार्थ बंद झाले. अशी अनेक बंधने! पण सगळ्याच विमान कंपन्या यासाठी सज्ज झाल्या. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी असतात. सगळ्यांना या नवीन ‘प्रोसिजर’चे प्रशिक्षण देणे भाग होते. माझ्या मते यात बाजी मारली ती ‘इंडिगो’ने! इतक्या कठीण परिस्थितीत व्यवसाय सुरू करतानासुद्धा अगदी पहिल्याप्रमाणे वक्तशीरपणा, ग्राहकांना भावणाऱ्या नवनवीन कल्पना आणि या नव्या परिस्थितीला सामोरं जाताना त्यांनी घेतलेला अतिशय व्यावसायिक दृष्टिकोन खरोखर कौतुकास्पद आहे. यात भर होती विमानतळांवरच्या नियमांची! या काळात मी भारतात चंडीगड, दिल्ली, अहमदाबाद, राजकोट, जामनगर, रांची, मुंबई, पुणे, नागपूर, बंगलोर, हैदराबाद, कोचीन या विमानतळांवरून अनेक वेळा प्रवास केला. प्रत्येक विमानतळावर नियम वेगळे! सगळे विमानतळ सरकारच्या ताब्यात. त्यामुळे प्रशिक्षणात प्रत्येक ठिकाणी फरक. पुण्यात सुरुवातीला ‘आरोग्यसेतू’ तपासले जायचे. आता कोणीही बघत नाही. चंडीगडला विमानतळावर उतरलं की फॉर्म भरून द्यावा लागतो. त्याचं पुढं काय होतं कोण जाणे! परत पंजाब सरकारचं आणखीन एक ‘कोव्हा’ नावाचं ॲप तुमच्या फोनवर असायला लागतं. मुंबईला त्यामानाने फारशा तपासण्या नाहीत. कोचिनला प्रवास करायच्या आधीच केरळ सरकारची ‘जाग्रथा’ नावाची वेबसाइट आहे. तिथून ‘इ सर्टिफिकेट’ घ्यावं लागत! प्रत्येक ठिकाणच्या सुरक्षा तपासणीत फरक! कोणी आपला फोटो घेतात तर कोणी बोर्डिंग पास स्कॅन करून घेतात. काही ठिकाणी बॅगेजवर कसले तरी फवारे मारतात तर काही ठिकाणी ते मशिन मधून काढावं लागतं! या सगळ्या त्रांगड्यांमधून आपलं सामान घेऊन एकदा आत जाऊन पोचलो की हुश्श म्हणायचं. 

‘इंडिगो’नं काही फार छान उपक्रम सुरू केले आहेत. गेटपाशी बसलेल्यांमध्ये जर कोणी ‘कोविड वॉरिअर्स’ असतील तर ‘इंडिगो’चे कर्मचारी लाऊड स्पीकरवरून त्यांची मुद्दाम सर्वांना ओळख करून देतात आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातं. अशा छोट्या गोष्टींमधून त्या कंपनीच्या प्रशासनाची जबाबदारी आणि प्रशिक्षण यांची जाणीव होऊन जाते. या सगळ्यात आपली भारतीय प्रवृत्ती उठून दिसते ती विमानातून उतरताना! ‘सगळ्यांनी कृपा करून उठू नका, गर्दी करू नका. आपल्या समोरचा प्रवासी जायला लागला की मगच उठून आपले सामान घ्या,’ अशा सूचना देऊनही एखादा हिरा उठून आपली बॅग काढायला बघतो आणि त्याचेच अनुकरण करत इतरही प्रवासी आपापल्या जागेवरून उठतात. कर्मचारी असहाय्य्यपणे बघत राहतात. एखाद दुसऱ्या वेळेसच सर्व प्रवासी नियमांचे पालन करताना मी बघितलं.. यात सुधारणा होणं अवघड आहे.

एकंदरीत प्रवासाचे वेगळेच पैलू या सगळ्या कालखंडात बघायला मिळाले. दिवाळीच्या गर्दीनंतर पुन्हा एखादी लाट येईल की काय? अशी भीती वाटत होती, तशी अजून तरी आलेली नाही. रुग्णांची संख्या कमी होत आहे. उद्योग धंदे पुन्हा जोमाने सुरू होत आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांपेक्षा आपल्याकडची परिस्थिती बरीच बरी आहे. लवकरच विमानप्रवासानं जग पुन्हा जोडलं जाईल... पण, २०२०चे असे निरनिराळे पैलू नोंदवून ठेवले पाहिजेत... शंभर वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या प्लेगच्या आठवणी अजून सांगितल्या जातात. हे तसंच किंवा संपूर्ण जगाला वेठीला धरणारं त्याहूनही भयंकर संकट होतं आणि माणूस त्यातून कसा तरला याच्या कथा असतील.

संबंधित बातम्या