इथून पुढचा प्रवास कसा असेल?

संजय दाबके
सोमवार, 25 जानेवारी 2021

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...
संजय दाबके

गेल्या आठवड्यात गुजरातला जामनगरला गेलो होतो. मुंबईहून सकाळी एकच विमान. ते पकडून पोचलो. महाराष्ट्र सरकारने गेल्या एक महिन्यापासून दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड निगेटिव्ह टेस्ट सक्तीची केली आहे. गुजरात सरकारनेही लगेच तोच नियम महाराष्ट्रातल्या प्रवाशांना लावला आहे. विमानतळावर पोचल्यापोचल्या टेस्ट करावी लागते. फक्त फरक एवढाच आहे की गुजरातमध्ये ही टेस्ट मोफत आहे आणि महाराष्ट्रात तिचे ८५० रुपये लावतात! विमानतळावर किती वेळ लागतोय याची धास्ती होती पण अतिशय सुंदर आणि तत्पर व्यवस्था होती. दोन जणांनी लाईन लावली. दोन जणांनी नावे आणि फोन नंबर घेतले. लगेच आणखीन दोन जण स्वॅब टेस्ट घेत होते. मो जून पाचव्या मिनिटाला विमानतळाच्या बाहेर पडलो. इतर राज्यांमधून प्रवास करताना असे वेगवेगळे अनुभव येत आहेत. प्रत्येक राज्याचे नियम निराळे!

अशा ह्या गोंधळाच्या दिवसांमध्ये, थोडं जपून का होईना पण आपण समाधान व्यक्त करायला हरकत नाही. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर अजूनतरी ह्या साथीची तीव्रता आपल्या देशात सातत्याने कमी होताना दिसत आहे. जून/ जुलै मध्ये अतिशय भीतीदायक वाटणारा ह्या साथीचा प्रसार आपल्याकडे सप्टेंबरच्या शेवटापासून आटोक्यात यायला लागला. तो अजूनही प्रत्येक दिवशी कमीच होताना दिसत आहे. गणपती, दिवाळी आणि ख्रिसमस सारख्या सणांच्या निमित्ताने लोक प्रचंड गर्दी करतील आणि कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येईल, अशी भीती जनतेला आणि प्रशासनाला वाटत होती. लोकांनी या सगळ्या सणांना प्रचंड गर्दी केलीच, कोरोना संबंधाने घ्यायच्या काळज्यांकडेही बरंचसं दुर्लक्ष केलं, आणि तरीही कदाचित भारतीयांची प्रतिकार शक्ती चांगली असल्याने याचा फार गंभीर फटका अजूनतरी आपल्याला बसलेला नाहीये. हळूहळू जनजीवन पूर्ववत होत आहे. देशांतर्गत प्रवास बऱ्यापैकी सुरळीतपणे सुरू झालेला आहे. बस, रेल्वे आणि विमाने साधारण ६० ते ६५ टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करत आहेत. थोड्याच दिवसात यात वाढ होऊन सुमारे ८० टक्के वाहतूक सुरळीत होईल अशी आशा आहे. मुंबईची लाइफ लाईन लोकल सुद्धा सुरू व्हायची चिन्हे दिसत आहेत.  

परदेश प्रवास मात्र इतक्या सोप्या पद्धतीने सुरु होईल असे वाटत नाही. पूर्वेकडच्या देशांमध्ये भारताप्रमाणेच परिस्थिती सुधारत आहे, त्यामुळे चीन, थायलंड, सिंगापूर, मलेशिया या देशांबरोबर प्रवासाची प्रक्रिया लवकर सुरू होईल, पण पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र या रोगाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत आहे. ज्यांना इंग्लंड, युरोप किंवा अमेरिकचा प्रवास करायचा आहे त्यांच्या साठी परिस्थिती अवघड आहे.

वास्तविक ऑक्टोबरपासूनच सगळीकडे कोरोनाचा वेग मंदावत असल्याची लक्षणे होती. त्यामुळे एअर बबल रचनेनुसार अनेक देशात करार होऊन विमान सेवा सुरू झाली होती. याचा फायदा घेणारे पहिले म्हणजे आपले सिनेमा नट! जशी परिस्थिती सुधारली तशी बहुतेकांनी दुबई, लंडन, न्यूयॉर्कची वाट धरली. यांना घरी जराही चैन पडत नसावे!  या सगळ्या देशांमध्ये जायचे असेल तर प्रवासाच्या ९६ तास आधी पर्यंत सरकारमान्य लॅब मधून निगेटिव्ह सर्टिफिकेट घ्यावे लागत होते. हे सगळं सोसून ही मंडळी परदेशात पळत होती. इथे परत आल्यानंतर मात्र इथल्या एअरपोर्ट्सवर तपासणी केल्याशिवाय कोणालाच घरी सोडत नव्हते. प्रवासी तासनतास एअरपोर्टवरच्या झुंबडीत घुसाघुसी करत होते! जुही चावला अशाच दुबईला गेल्या होत्या. परत आल्यावर मुंबईच्या विमानतळावरच्या गर्दीत अडकल्या आणि अतिशय संतापाने आपल्या देशातल्या व्यवस्थेवर ट्विट कर्त्या झाल्या! त्यामुळे ‘‘जायचे असेल तर जा, पण या सगळ्या मानसिक त्रासाला समोर जायची तयारी ठेवून जा’’, अशी परिस्थिती होती. डिसेंबर पर्यंत अगदी लंडनला सुद्धा दर आठवड्याला सतरा फ्लाईट्स होत्या!  याचा अर्थ इतक्या त्रासातून सुद्धा बरेच प्रवासी जा/ ये करत होते!

डिसेंबर उजाडला, युरोप आणि अमेरिकेत थंडी सुरू झाली आणि प्रवासाचे चित्रच बदलले! कोरोनाबाधितांचे आकडे वाढायला लागले. ख्रिसमस जवळ येत होता. लंडनच्या रिजंट स्ट्रीटसारख्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या रस्त्यांवर गर्दीचा सागर उसळला होता. यातले बहुसंख्य, मास्क वापरात नव्हते. पिकॅडिलीसारख्या प्रशस्त चौकात अक्षरशः पाऊल ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती होती. या सगळ्याचा परिणाम झालाच. इंग्लंडसारख्या लहानशा देशात एकेका दिवशी ५० हजार रुग्ण सापडायला लागले. हजारात मृत्यू होऊ लागले. परिणाम समोर आहे. बहुतेक सगळ्या देशांनी आपापल्या सीमा इंग्लंड साठी बंद केल्या. सर्व विमाने रद्द केली गेली. अमेरिका आणि इंग्लंड मधले प्रवासी डॉलर्स आणि पौंड खर्च करतात म्हणून त्यांना जगभर मान असतो. आज मात्र जगातील फक्त सहा देशांमध्ये अमेरिकेच्या प्रवाशांना विनानिर्बंध प्रवास करता येतोय. बाकी ठिकाणी त्यांचा प्रवास अवघड आहे. इंग्लंडमध्ये तर तिसरा लॉकडाउन जाहीर झालेला आहे. अतिशय कडक अशा ह्या लॉकडाउनमध्ये आपल्याकडे जे निर्बंध एप्रिल/ मे मध्ये होते तेच आता तिथे लागू आहेत.

इथून पुढे काय होईल याचा थोडासा अंदाज करता येईल. जगभर अनेक देशात व्हॅक्सिन उपलब्ध झाले आहे. फायझर, ॲस्ट्राझेंका, मॉडर्ना या कंपन्यांनी निरनिराळ्या देशांमध्ये विक्री सुरू केली आहे. पण व्हॅक्सिनेशनचा वेग अतिशय मंद आहे. जो पर्यंत हा डोस मिळत नाही तोपर्यंत पाश्चात्त्य देशातले नागरिक प्रवास करतील असे वाटत नाही. याचा अर्थ निम्मे जग विलग होईल, आणि यामुळे आंतररराष्ट्रीय पर्यटनाची गती अत्यंत संथ असेल. दुसऱ्या देशातून पुन्हा आपल्याकडे हा विषाणू येऊ नये याच बरोबर आपल्या देशांमधल्या बाधितांमुळे इतर ठिकाणी हा रोग फैलावू नये या साठी आता सगळ्याच देशांची सरकारे सतर्क आणि सावध असतील. 

प्रवास करताना आपल्या नेहमीच्या पासपोर्ट बरोबरच एक कोविड पासपोर्टही आपल्याला कदाचित बरोबर ठेवावा लागेल असं दर्शवणाऱ्या काही घडामोडी घडत आहेत. यात तुम्ही व्हॅक्सिन घेतल्याचे प्रमाण असेल. ते जर नियमांप्रमाणे असेल तर इतर देशांमध्ये तुम्हाला प्रवेश मिळायला अडचण पडणार नाही. पण पुन्हा असे प्रमाणपत्र देणाऱ्या लॅब्स जगात सगळीकडे मान्य व्हायला हव्यात. दिलेली लस मान्यताप्राप्त होती की बनावट हा प्रश्नही किचकट आहे. त्यामुळे कोविड पासपोर्टची कल्पना जरी चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी खूप अवघड असणार आहे. जगातल्या ७० टक्के लोकांना जो पर्यंत ''हर्ड इम्युनिटी'' येत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास हा असा असेल. व्यावसायिक प्रवास किंवा कामासाठी प्रवास हा एकंदरीतच जागतिक प्रवासाचा फार मोठा हिस्सा ठरतो. गेल्या वर्षभरात बहुतेक सर्व व्यावसायिकांना घरून काम करायची सवय लागली आहे. त्यामुळे याचाही परिणाम एकंदर प्रवासावर भविष्यात किती होईल, हे बघणे हा एक अभ्यासाचा विषय होईल.  

आता प्रश्न उरला भारतीयांचा. खरंतर आजची आपली स्थिती ही जगात उत्तम म्हणता येईल अशी आहे. इथे लोकसंख्येच्या मानानी रुग्णसंख्या खूप कमी आहे. त्यामुळे इतर देशांनी खरंतर आपल्या प्रवाशांना तिथे सोप्या पद्धतीने प्रवेश द्यायला हरकत नाही. पण आपल्या देशातील एकंदरच स्वच्छतेविषयी आधीपासूनच इतरांचे फारसे बरे मत नसल्याने आपल्या जनतेला परदेशी प्रवास करायला अजून बराच काळ अनंत अडचणी पार कराव्या लागतील. भारताच्या प्रवाशांना नेहेमीच शेवटी एंट्री मिळेल, असे आत्ता तरी वाटते.

इथून पुढे जरी या रोगाचा प्रसार संपूर्ण जगात कमी होत गेला तरी परिस्थिती अगदी पूर्ववत व्हायला सुमारे तीन वर्षे लागतील असा अंदाज टुरिझम इंडस्ट्रीचे अभ्यासक हतबल होऊन मान्य करत आहेत. विमान कंपन्या गाळातून वर यायचा प्रयत्न करत आहेत. एअरबस, बोइंग सारख्या दिग्गज कंपन्या सावध पवित्र घेऊन संकटाचा सामना करत आहेत. फक्त विमान वाहतुकीच्या व्यवसायामध्ये जगभर सुमारे पाच कोटी कर्मचारी काम करतात, तेही या सगळ्या परिस्थितीकडे डोळे लावून बसले आहेत.  

पण त्याचवेळी पर्यटनासाठी प्रचंड लोकप्रिय असलेली शहरे, समुद्र किनारे, पर्वत, जंगले, हॉटेलं, नौकानयन हे सगळं शांत शांत आहे. आणि येणार बराच काळ जगात ते तसेच राहील असे चित्र दुर्दैवाने दिसते आहे.

संबंधित बातम्या