थीम पार्कचे जग

संजय दाबके
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...
संजय दाबके

मनोरंजनाच्या दुसऱ्या व्यवसायाशी, सिनेमा व्यवसायाशी थीम पार्क इंडस्ट्रीची तुलना करायची झाली, तर दोन्ही इंडस्ट्री दर वर्षी साधारण तीन लाख पन्नास हजार कोटी इतका गल्ला जमवतात. लाखो नोकऱ्या या दोन्ही उद्योगांवर जगभर अवलंबून आहेत. पर्यटनाशी जोडलेल्या ‘थीम पार्क’ या अत्यंत महत्त्वाच्या इंडस्ट्रीची आज जगभर नेमकी काय अवस्था आहे?

सगळीकडे आनंदी आणि उत्साही वातावरण आहे. लहान मुले दंगा करत इकडे तिकडे पळत आहेत. पाण्याची कारंजी उडत आहेत. अतिशय आकर्षक रंगात रंगवलेले चित्रविचित्र पाळणे, त्यांच्यावरचे विजेचे रंगीबेरंगी दिवे, त्याच्यात बसलेले लहान थोर, मधूनच आपल्या डोक्यावरून वेगात जाणाऱ्या रोलर कोस्टरमध्ये बसलेल्या मुलांच्या आणि तरुणांच्या किंकाळ्या, हास्य आणि चित्कार कानावरून जातात. तरतऱ्हेचे मुखवटे विकले जात आहेत. जागोजागी खाद्यपदार्थांच्या गाड्या, रेस्टॉरंट्स.. त्यांच्या भवती तुफान गर्दी.. विकणारे आणि विकत घेणारे, खाणारे सगळेच खूष आहेत! कुणी पलीकडच्या वॉटर पार्कमध्ये भिजून चिंब झाले आहेत. वेव्ह पूलमध्ये एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायचे उद्योग सुरू आहेत.. कुठल्याही थीम पार्क मध्ये दिसणारे हे कॉमन दृश्य आहे!

माणसाला आपले वय विसरायला लावणारी जागा म्हणजे थीम पार्क. पर्यटनाच्या व्यवसायाचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग म्हणजे थीम पार्क. एकाच वेळी हजारो पर्यटकांना मनमुराद आनंद देणारी आणि त्याचे पुरेपूर पैसे वसूल करणारी जागा म्हणजे थीम पार्क!  

डिस्नेलँड, युनिव्हर्सल स्टुडिओज, सिक्स फ्लॅग्स, ओशन पार्क, लेगोलँड ही या क्षेत्रातली काही नामवंत थीम पार्क. बऱ्याच देशात ही थीम पार्क चालतात. पण त्याच बरोबर चीन, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, दुबई यांसारख्या पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या देशांमध्ये असलेली चिमलॉंग, गेंटिंग हायलँड्स, सेंटोसा, मार्व्हल किंवा बॉलिवूड पार्क यांसारखी तुलनेने छोटी पार्कसुद्धा दर वर्षी लक्षावधी पर्यटकांचे स्वागत करत असतात.

भारतात मात्र थीम पार्क हा शब्द अजूनही फारसा ओळखीचा नाही. सुट्टी घालवण्यासाठी थीम पार्कमध्ये जाणे देखील अजूनही खूप मर्यादित राहिले आहे. रामोजी फिल्म सिटी, एस्सेल वर्ल्ड किंवा इमॅजिकासारख्या पार्कमध्ये भारतीय पर्यटक मुद्दामहून जातात पण इतर देशांच्या मानाने ही संख्या फारच कमी आहे. थीम पार्क इंडस्ट्री आपल्या देशात जरा संथ गतीनेच प्रगती करत आहे. त्यातही १९९९ साली सुरू झालेल्या रामोजी फिल्म सिटीचा वाटा प्रमुख आहे. इथे दर वर्षी सुमारे २० लाख म्हणजे बरेच पर्यटक भेट देतात हे खरे, पण चीनच्या चिमलॉंग पार्कमध्ये हीच संख्या साडे तीन कोटी आहे; हे बघितल्यावर आपल्याकडे हा व्यवसाय अजून किती बाल्यावस्थेत आहे हे समजते.  

मनोरंजनाच्या दुसऱ्या व्यवसायाशी, सिनेमा व्यवसायाशी थीम पार्क इंडस्ट्रीची तुलना करायची झाली, तर दोन्ही इंडस्ट्री दर वर्षी साधारण तीन लाख पन्नास हजार कोटी इतका गल्ला जमवतात. लाखो नोकऱ्या या दोन्ही उद्योगांवर जगभर अवलंबून आहेत. दोन्ही उद्योग माणसाला घरातून बाहेर पडायला भाग पाडतात.. आणि म्हणूनच गेल्या वर्षीच्या भयानक संकटात पर्यटनाचे सगळेच उद्योग जसे भरडले गेले त्यात हेही दोन्ही उद्योग प्रचंड प्रमाणात भरडले गेले आहेत. पर्यटनाशी जोडलेल्या ‘थीम पार्क’ या अत्यंत महत्त्वाच्या इंडस्ट्रीची आज जगभर नेमकी काय अवस्था आहे?

थीम पार्कचा धंदाच मुळी गर्दी जमवायचा. जगाची सगळी चाके २०१९ च्या मार्चमध्ये थांबली आणि प्रवास हा पूर्णपणे बंद झाला. तेव्हापासून आत्तापर्यंत गेले वर्षभर बहुतेक थीम पार्क केविलवाणेपणे पुन्हा केव्हा दरवाजे उघडता येतील याची वाट पाहत आहेत. या व्यवसायात एक तर भांडवली गुंतवणूक मोठी असते. थीम पार्क चालवायचा खर्चही अवाढव्य असतो. सौंदर्य, सुरक्षा, स्वच्छता आणि मनोरंजन या चार महत्त्वाच्या खांबांवर थीम पार्कचा व्यवसाय उभा असतो. येणाऱ्या पर्यटकाला जर ह्या गोष्टी मनासारख्या मिळाल्या तर तो आपल्या कुटुंबीयांच्या आनंदासाठी खुशीने भरपूर खर्च करायला तयार असतो. परदेशांमध्ये तर वर्षातून एकदा दोनदा कुठल्या ना कुठल्यातरी थीम पार्कला भेट हा प्रत्येक कुटुंबाचा कार्यक्रम असतो. आपणही भारतातून जेव्हा या देशात जातो तेव्हा आपल्या प्रवासाच्या यादीत डिस्नेलँड, युनिव्हर्सल स्टुडिओ आणि इतर अशी ठिकाणे आधीच ठरलेली असतात. लॉसएंजेलिस आणि ओरलँडो या शहरांच्या उलाढालीत सिंहाचा वाटा या थीम पार्कचा असतो.. कित्येक रिसॉर्ट, रेस्टॉरंट, शॉपिंग एरिया ... पर्यटकांच्या खिशातून पैसे कसे काढायचे याचे जणू शास्त्रच या थीम पार्कनी निर्माण केले आहे. डिस्नेची जगभरात सहा थीम पार्क आहेत आणि रोज या सगळ्या ठिकाणी मिळून सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. मार्च पासून हे सगळे थांबले. एकट्या डिस्नेनी फक्त अमेरिकेत २३ हजार कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ दिला. 

पर्यटक पाहिजे असतील तर सतत काही तरी नवीन सादर करणे आवश्यक असते. ही नवनिर्मितीची बजेट कोट्यवधी डॉलर्सची असतात. हे सगळे थांबले! युनिव्हर्सल तर पूर्ण नवीन थीम पार्क निर्माण करणार होते. ते त्यांनी आता अनिश्चित काळापर्यंत स्थगित केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनमध्ये याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. साधारण जून-जुलैमध्ये तिथली कोरोनाची लाट ओसरू लागली. सार्वजनिक ठिकाणे उघडायची सरकारने परवानगी दिली आणि चीनची जनता जणू आयुष्यभर तुरुंगात कोंडलेला माणूस बाहेर पडल्यावर जसा वागेल तशी जमेल तिथे प्रवासाला घराबाहेर पडली. तिथली शांघायचे डिस्ने लँड, चिमलॉन्ग आणि इतरही अनेक थीम पार्क पर्यटकांनी अक्षरशः हाऊसफुल्ल झाली. याची कारण दोन आहेत. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सधन मध्यम वर्ग आहे, गेल्या काही दशकात जगभर हिंडणाऱ्या आणि मनसोक्त पैसे खर्च करणाऱ्या पर्यटकांमध्ये चिनी पर्यटकांचा पहिला नंबर लागतो. हा सगळा पैसेवाला वर्ग जगाचा प्रवास अजूनही सुरू होत नसल्यामुळे चीनमध्येच अडकून पडला आहे. त्यामुळे प्रवासाची आपली हौस भागवायला त्यांनी देशांतर्गत प्रवास मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. याच पैसेवाल्या वर्गामध्ये थीम पार्क अतिशय लोकप्रिय असल्याने तिथली सगळी पार्क गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत आहेत.  

फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड या पूर्वेकडच्या आणि दुबई, अबुधाबी, सौदी या पश्चिमेकडच्या पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणांचीही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आहे. पण या सगळ्या ठिकाणी इतर देशांमधून आलेल्या पर्यटकांवर व्यवसाय अवलंबून असल्याने जोपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत परिस्थिती अगदी पूर्ववत होणार नाही. दुबईमध्ये दर वर्षी ‘ग्लोबल व्हिलेज’ला साधारण सहा कोटी पर्यटक भेट देतात, ते या वर्षी रद्द झाले आहे. त्याच प्रमाणे सहा महिने चालणारे अतिशय महत्त्वाकांक्षी असे ‘दुबई २०२०’ हे गेल्या वर्षी होणारे प्रदर्शन रद्द करण्यात आले होते, ते आता या वर्षी होईल. तोपर्यंत जगात सगळीकडे परिस्थिती थोडीफार तरी पूर्वपदावर येईल अशी सगळ्यांना आशा आहे.

भारतात तर या व्यवसायाची नुकतीच कुठे सुरुवात झालेली होती. रामोजी फिल्म सिटी, एस्सेल वर्ल्ड, इमॅजिका, वेट अँड जॉय, निकोपार्क आणि २०१८ ला सुरू झालेले ‘साई तीर्थ’ सारखे ‘भक्ती'' या विषयाला वाहिलेले भारतातील पहिले पार्क, ही भारतातील काही प्रमुख थीम पार्क. 

सिनेमाच्या आकर्षणामुळे भारतभरातून सगळ्यात जास्त पर्यटक रामोजी सिटीला भेट देतात. हैदराबादला जायचे असेल तर लोक रामोजीला भेट देण्यासाठी एक दिवस ठेवतातच, अशी ख्याती या पार्कने मिळवलेली आहे. गेल्या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने थीम पार्क उघडायला परवानगी दिली आहे तरी अजूनही अनेक थीम पार्क उघडलेली नाहीयेत. याच कारण असे की पार्क व्यवस्थित ठेवण्याचा खर्चच एव्हडा असतो की सध्याच्या काळात जेव्हा रोज फक्त दोन-तीनशे लोक भेट देत असण्याच्या काळात पार्क चालू ठेवलं तर खड्डा आणखीन खोल जाणार आहे. अगदी ‘रामोजी’सुद्धा याच कारणासाठी अजूनही बंद आहे. 

आता लोक घराबाहेर जरी पडायला लागले असले तरी अजून अशा पार्कना भेटी द्यायची मानसिकता यायला बराच काळ जाणार आहे. जगाच्या मानाने भारतात या क्षेत्रात होणारी उलाढाल अगदीच नगण्य जरी असली तरीही ती दोन हजार कोटी रुपयांची आहे. आणि हजारो नोकऱ्या या व्यवसायावर अवलंबून आहेत. सध्यातरी या सगळ्यावर टांगती तलवार आहे. पार्क सुरू झाल्यानंतरसुद्धा लोकांना पुन्हा या जागांची आठवण करून द्यायला कमीत कमी एक वर्षाचा वेळ लागणार आहे. भारत सध्या सुमारे १४० थीम पार्क आहेत, यातली किती इतका वेळ तग धरू शकतील हा अवघड प्रश्न आहे. याच वेळी अनेक नवीन उद्योजक या व्यवसायात यायचा विचार करत आहेत. त्यामुळे या इंडस्ट्रीसाठी काहीशी ‘पुनःश्च हरिओम’ अशी स्थिती असेल.

सळसळत्या उत्साहाने भरभरून वाहणारी, माणसाला वय विसरायला लावणारी, अनेक चिंतांनी घेरलेल्या आयुष्याला निखळ आनंदाचे क्षण देणारी अशी ही ‘संकल्पना उद्याने’ - थीम पार्क पुन्हा एकदा गर्दीने भरून वाहू देत अशी प्रार्थना करूयात.

संबंधित बातम्या