का होत आहे ट्रॅफिक जाम?

ज्योती बागल
सोमवार, 17 जून 2019

कव्हर स्टोरी
 

निर्मल पुर्जा यांनी फेसबुकवर एक फोटो कॅप्शनसहित पोस्ट केला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, ‘एव्हरेस्टच्या डेथ झोनमध्ये जवळपास ३२० लोक रांगेत एव्हरेस्टवर चढण्या-उतरण्याची प्रतीक्षा करत आहेत.’ माउंट एव्हरेस्टच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या रस्त्याची रुंदी खूपच कमी असून त्याच रस्त्याने चढावे अथवा उतरावे लागते. या भागालाच ‘डेथ झोन’ म्हणतात. इथे पुढची व्यक्ती पुढे सरकली, तर मागची व्यक्ती पुढे सरकू शकते. अशाप्रकारे ट्रॅफिक जामची समस्या एव्हरेस्टवर ओढवली आहे. अर्थात एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही एव्हरेस्टवर अशी गर्दी पाहायला मिळाली होती. पण ही सतत होणारी गर्दी भविष्यात चिंतेचा विषय होऊ शकते. त्यामुळे या मागची कारणे शोधणे गरजेचे आहे. 

याठिकाणी गिर्यारोहक मृत्युमुखी पडण्याची मुख्य कारणे म्हणजे शिखराची असलेली अतिउंची, दुसरे म्हणजे सततचे खराब हवामान आणि तिसरे म्हणजे या खराब हवामानात अडकल्यावर ऑक्‍सिजनची कमतरता.

उपलब्ध माहितीनुसार १९९२ पासून आतापर्यंत माऊंट एव्हरेस्टवर सुमारे २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांत एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या वाढली असून यात बरेच हौशी गिर्यारोहकदेखील आहेत. जे हौशी असतात त्यांची आरोहणाची पूर्ण तयारी नसते. शारीरिकदृष्ट्या ते तेवढे सक्षम नसतात. अशावेळी ते शिखरावर कसेबसे चढतात खरे, पण उतरताना मात्र त्यांची तारांबळ उडते. कारण त्यांना चढण्याचा आणि उतरण्याचादेखील सराव नसतो. 

एव्हरेस्ट मोहिमेत बेसकॅम्प, कॅम्प-१, कॅम्प-२, कॅम्प-३, कॅम्प-४, हिलरी स्टेप आणि एव्हरेस्ट समीट असे मुख्य सात टप्पे आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच २६ मे २०१९ रोजी हिलरी स्टेप पॉइंटवर २५० ते ३०० गिर्यारोहक रांगेत वाट बघत थांबले होते. त्यामुळे पुढील चढाईसाठी साधारण दोन-तीन तास उशीर झाल्याचे बोलले जाते. यात नेपाळच्या बाजूने जाणाऱ्यांची गर्दी भरपूर असते. तर चीनच्या बाजूने जाणाऱ्यांची गर्दी तुलनेने कमी असते. 

माउंट एव्हरेस्टची उंची जास्त असल्याने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो. अशात चढाई करणे जिवावर बेतू शकते. त्यामुळे वातावरण अनुकूल होण्याची वाट बघावी लागते. जेव्हा अधिक काळ वातावरण अनुकूल असते, तेव्हा शिखरावर गर्दी होत नाही. पण काही वेळा तीन-चार दिवसच वातावरण चांगले असते आणि याचदरम्यान गिर्यारोहक शिखरावर पोचायच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे गर्दी वाढते. तसेच गिर्यारोहकांना जो ऑक्‍सिजन दिला जातो, तो एका ठराविक वेळेपुरता असतो. म्हणजे आठ-दहा तास पुरेल एवढ्याच प्रमाणात ऑक्‍सिजन दिलेला असतो. पण जेव्हा वातावरण खराब होते, तेव्हा ट्रॅफिक जाम सारखी समस्या उद्‌भवते आणि गिर्यारोहकांना जास्तवेळ रांगेत थांबावे लागते. अशावेळी ऑक्‍सिजन कमी पडतो आणि गिर्यारोहकांच्या जिवावर बेतते. कारण पुन्हा बाल्कनी पॉइंटवर जाऊन ऑक्‍सिजन सिलिंडर आणणे किंवा मागवणे शक्‍यच नसते. अशावेळी गिर्यारोहकाला त्याच परिस्थितीत तग धरून राहावे लागते. ज्या गिर्यारोहकांना ही परिस्थिती सहन होत नाही, त्यांच्यावर जीव गमावण्याचीदेखील वेळ येते. कारण, जरी गिर्यारोहकांसाठी काही अद्ययावत साधने उपलब्ध झाली असली, तरीही माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे आव्हान अजूनही तितकेसे सुलभ झालेले नाहीच. 

एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम होण्याची काही कारणे आहेत, एक - सततचे बदलणारे हवामान. दोन - एव्हरेस्ट मोहिमांचे झालेले व्यावसायिकीकरण, तीन - तीनही बाजूंनी गिर्यारोहण होत असल्याने कोणत्या बाजूने किती साहसवीर चढाई करत आहेत हे स्पष्ट नसते. त्यामुळे एव्हरेस्टच्या अंतिम टप्प्यात गर्दी होण्याच्या घटनांत वाढ. चार - पुरेशी पूर्वसिद्धता नसताना केवळ हौसेखातर गिर्यारोहण करणाऱ्यांच्या संख्येत वाढ.

नेपाळ सरकारची सहज भूमिका 
 नेपाळ पर्यटन विभागाच्या माहितीनुसार १९५३ मध्ये एडमंड हिलरी आणि शेर्पा तेंजिंग नॉर्गे या दोघांनंतर आत्तापर्यंत ४,४०० गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्टवर चढाई केली आहे. नेपाळ सरकारकडून अनेक गिर्यारोहकांना माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी सहज परवानगी दिली जात असल्याने गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे. परवानगी देताना नेपाळ सरकार गिर्यारोहकांकडून १८ ते २० लाख रुपये घेते. तसेच, सरकारी कंपन्यांबरोबरच खासगी कंपन्या गिर्यारोहकांना, कमी बजेटच्या ऑफर देत आहेत. अशाप्रकारच्या कंपन्या वाढण्याचे कारण म्हणजे नेपाळची उपजीविका पूर्णपणे यावरच अवलंबून आहे. सरकारी कंपन्यातरी गिर्यारोहकाच्या सर्व गोष्टींची तपासणी करतात, पण खासगी कंपन्या सर्वसाधारण गोष्टी तपासून परवानगी देऊन टाकतात. नेपाळ सरकारने खासगी कंपन्यांवर काही अटी व शर्ती घालणे गरजेचे आहे. 

इथे होत आहे गिर्यारोहकांची गफलत 
 नेपाळींमध्ये शेर्पा ही एकच जमात आहे, जी माऊंट एव्हरेस्टच्या उंचीवर खूप काळ तग धरू शकते. म्हणून हे शेर्पा गिर्यारोहकांना शिखरावर घेऊन जातात आणि परत खाली घेऊन येतात. शिवाय कॅम्प टू नंतर वरच्या सर्व पॉइंट्‌सवर गरजेच्या वस्तू पोचवतात. कारण ‘कॅम्प टू’च्यावर कोणतेही वाहन जात नाही. त्यामुळे सर्वप्रकारची वाहतूक हे शेर्पाच करतात. ते साधारण दहा-पंधरा रोटेशन करतात. पण हल्ली गिर्यारोहकांची संख्या वाढल्याने आणि तिन्हीही बाजूंनी गिर्यारोहकांची चढाई होत असल्याने त्यांना शिखरावर घेऊन जाण्याचे काम शेर्पा म्हणून इतर नेपाळी लोकदेखील करू लागले आहेत. खासगी कंपन्यांकडून असे बनावट शेर्पा पुरवले जातात. हा खरा शेर्पा आहे, की एक सामान्य नेपाळी व्यक्ती हे गिर्यारोहकांना ओळखता येत नाही. अशाप्रकारे  इथे गिर्यारोहकांची फसगत केली जाते.

एव्हरेस्ट मोहिमांचे व्यावसायिकीकरण झाले आहे, यात काहीही गैर नाही. कारण नेपाळची उपजीविकाच त्यावर अवलंबून आहे. एव्हरेस्टवर जाणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढत आहे. पण असे ट्रॅफिक जाम पहिल्यांदा झाले आहे असे नाही. एव्हरेस्टवर एवढी गर्दी तर प्रत्येक वर्षी असते. नेपाळमध्ये गिर्यारोहकांना परवानगी देणाऱ्या किंवा सेवा पुरवणाऱ्या फक्त सहा सरकारमान्य कंपन्या आहेत. ज्यांचे साधारण बजेट १८ ते २० लाख रुपये दरम्यान आहे. पण या कंपन्यांव्यतिरीक्त नेपाळमध्ये अनेक कमी बजेटवाल्या कंपन्या आहेत. ज्या साधारण १४ ते १५ लाखांमध्ये पॅकेज देतात. शिवाय या कंपन्या गिर्यारोहकांना परवानगी देताना त्यांनी एखादा छोटा-मोठा कोर्स आणि काही ट्रेक केले असतील, तर त्यांना परवानगी देऊन टाकतात. आपले काही पैसे वाचतात या विचाराने गिर्यारोहक बेसकॅम्पवर दिल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करतात... आणि आपल्या जिवाची हमी गमावतात. ज्या सरकारी कंपन्या असतात त्या गिर्यारोहकांच्या जिवाची हमीदेखील घेतात; शिवाय शेर्पाही अनुभवी देतात. पण या इतर कंपन्या कसलीच हमी घेत नाहीत. यात चूक म्हणावी ती या कंपन्यांनी दिलेले कमी बजेटवाले पॅकेज स्वीकारणाऱ्यांचीच असते. जर या लोकांनी अशा खासगी कंपन्यांनी देऊ केलेले कमी बजेटचे पॅकेज घेतले नाही, तर आपोआप त्या कंपन्या बंद पडतील... आणि बाकीच्या समस्याच निर्माण होणार नाहीत.
- मनीषा वाघमारे, एव्हरेस्टवीर

एका मोहिमेच्या गाइड उर्सिना झिमरमन यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, ‘अशा प्रकारचे ट्रॅफिक जाम हे योग्य तयारी नसलेल्या गिर्यारोहकांमुळे होते. कारण हे गिर्यारोहक चढाई करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसतात. यामुळे त्यांच्या स्वत:च्या जिवाला धोका असतो; शिवाय त्यांना घेऊन जाणाऱ्या शेर्पांच्याही जिवाला धोका निर्माण होतो.’

व्यावसायिकीकरणाची वाटचाल... 
 एव्हरेस्टचे आकर्षण खूप गिरिप्रेमींना आहे. सर्वांना काहीतरी हटके करायचे असते. त्यामुळे छोटे-मोठे ट्रेक करणाऱ्यांनादेखील आपण एव्हरेस्टवीर होऊ शकतो असे वाटू लागले आहे... आणि त्यांच्या या अति उत्साहाला कमी पैशांत एव्हरेस्ट सर करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या या कंपन्या खतपाणी घालतात.
व्यावसायिक मोहिमांना खरी सुरुवात १९९४-९५ दरम्यान झाली. एव्हरेस्टचे आकर्षण असणाऱ्या सर्वांना एव्हरेस्ट सर करण्याची संधी मिळावी या उद्देशाने काही अमेरिकी अनुभवी एव्हरेस्टवीर गिर्यारोहकांनी व्यावसायिक पद्धतीने एव्हरेस्ट मोहिमा आयोजित करण्यास सुरुवात केली... आणि अनुभवी गिर्यारोहकांबरोबरच हौशी गिर्यारोहकांसाठीदेखील एव्हरेस्ट चढाईची संधी उपलब्ध झाली. हा जागतिक गिर्यारोहण क्षेत्रातील एव्हरेस्ट मोहिमांबाबतचा मोठा बदल होता. व्यावसायिकरणाचा मुख्य भाग म्हणजे कंपन्या आल्या आणि ओघाने गिर्यारोहक हे त्यांचे क्‍लायंट्‌स झाले. या सोयीमुळे गिर्यारोहणाचा अनुभव नसलेल्या आणि वेगवेगळ्या कारणाने व उद्देशाने एव्हरेस्ट चढाई करण्याची इच्छा असणाऱ्या जगभरातील व्यक्तींना एव्हरेस्टवर चढाई करण्याची संधी उपलब्ध झाली. हा व्यावसायिक प्रयोग यशस्वी झाल्यामुळे एव्हरेस्टवर १९९६ मध्ये अनुभवी गिर्यारोहक व एव्हरेस्टवीर रॉब हॉल याने एक अशीच व्यावसायिक मोहीम एव्हरेस्टवर आयोजित केली होती. त्या मोहिमेची शिखर चढाई सुरू असताना हवामान बिघडले आणि रॉब हॉल आणि त्यांच्या क्‍लायंटसना खाली येणे कठीण झाले. शेवटी त्या मोहिमेत रॉब हॉलसह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. या मोहिमेतील अपघाताची जगभर चर्चा तर झालीच; शिवाय टीकाही झाली. एव्हरेस्टच्या वलयाला भुलून गिर्यारोहणासाठी तयार झालेल्या ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या आयोजकांच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. परिणामी पुढे काही वर्षे अशा मोहिमा बंद पडल्या. पण पुन्हा काही कालांतराने सुरू झाल्या व त्यांना चांगला प्रतिसादही मिळू लागला. परिणामी एव्हरेस्ट आरोहणाची गिर्यारोहणतील तत्त्वे मागे पडली आणि आर्थिक, व्यावसायिक तत्त्वे वरचढ ठरू लागले.

अशा मोहिमांत गेल्या सात-आठ वर्षांत भारतीयांची संख्यादेखील वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एव्हरेस्ट प्रसिद्धीचे वलय असून राज्यातील पहिला, विभागातील पहिला, जिल्ह्यातील पहिला अशी बिरुदावली मिळवण्याची ओढ देश-परदेशातील तरुण व मध्यमवयीन यांच्यात निर्माण झाली आहे. गिर्यारोहण हा साहसी खेळ असून त्यासाठी विशेष प्रशिक्षण, कौशल्य व अनुभव यांची आवश्‍यकता असते. प्रथम ट्रेकिंग, नंतर प्रस्तरारोहण आणि गिर्यारोहणाचे प्रशिक्षण, त्यानंतर हिमालयातील कमी उंचीच्या शिखर मोहिमा यातून पुरेसा अनुभव मिळतो. त्यानंतर तुम्ही एव्हरेस्ट व इतर आठ हजार मीटर वरील शिखरांच्या मोहिमांसाठी तयार होता. पण हल्ली ट्रेकिंग सुरू करताच तरुणांना एव्हरेस्ट चढाईची स्वप्ने पडू लागतात. अशा एव्हरेस्टवीरांचा इतिहास तपासला, तर त्यांनी एव्हरेस्ट नंतर गिर्यारोहणात विशेष काही केल्याचे दिसून येत नाही. ल्होत्से, मकालू, चोयु ही अति उंचीवरील वलयांकित शिखरे असून अशाच शिखरांवर हे गिर्यारोहक आरोहण करताना दिसतात. पण इतर कमी उंचीच्या शिखरांवर हल्लीच्या एव्हरेस्टवीरांनी मोहिमा केल्याचे ऐकिवात येत नाही. यावरूनच हल्लीच्या एव्हरेस्टवीरांच्या मानसिकतेचा अंदाज बांधता येतो. आनंदासाठी गिर्यारोहण ही गिर्यारोहणाचा मूळ संकल्पना मागे पडून विक्रमासाठी आणि प्रसिद्धीसाठी एव्हरेस्ट-आरोहण अशी घातक संकल्पना आता रुजू लागली आहे. तसेच एव्हरेस्टकडे आकर्षित होणाऱ्यांच्या संखेतील प्रचंड वाढीमुळे या मोहिमांना मागणी तसा पुरवठा हे व्यापारातील तत्त्व लागू झाले आहे. यात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल अंतर्भूत आहे. एका गिर्यारोहकाचा सर्वसाधारण खर्च २५ लाखांपर्यंत जातो. एका मोसमात नेपाळमधून १००० तर तिबेटमधून ५०० सहसवीर बेसकॅम्पला येतात. याचे गणित करायचे झाले, तर ३५० कोटींची उलाढाल फक्त एप्रिल-मे महिन्यातील मोसमात एव्हरेस्ट चढाईत होते. त्यामुळेच आताची एव्हरेस्ट चढाई ही केवळ गिर्यारोहण मोहीम राहिली नसून एव्हरेस्ट बाजारपेठेचा भाग झाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
- हृषिकेश यादव, 
पहिल्या भारतीय नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेते.

गिर्यारोहकांनी कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी? 

  • कंपनी निवडताना सरकारी कंपानीच निवडावी. कमी बजेट कंपन्यांच्या जाहिरातींना बळी पडू नये. 
  • एव्हरेस्ट सर करण्यासाठी लागणारा गिर्यारोहणाचा विशेष अनुभव आणि सराव असल्याशिवाय माऊंट एव्हरेस्ट आरोहणासाठी जाऊ नये.
  • गिर्यारोहक आणि गाइड दोघेही शारीरिकदृष्ट्या सक्षम असावेत. 
  • एव्हरेस्टच्या वलयाला भुलून न जाता डिफिक्‍ल्टी लेव्हलचा विचार करावा. 
  • चढाई होत नसल्यास वेळीच माघार घ्यावी. जेणेकरून स्वत:चा आणि गाइडच्या जिवावर बेतणार नाही.    

संबंधित बातम्या