कट्टा 

कलंदर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...  

कौतुक सोहळे ! 
भाजप संसदीय पक्षाची बैठक दर मंगळवारी होत असते. 
पण गेल्या दोन बैठकांचे रूपांतर सन्मान समारोह किंवा सन्मान समारंभात करण्यात आले होते. 
पहिला प्रसंग होता तो युगपुरुषांनी अविश्‍वास ठरावावर विरोधी पक्षांना यशस्वी मात दिल्याचा ! 
या प्रसंगाची कल्पना भाजप खासदारांनाही नव्हती. संसदीय पक्षाची बैठक म्हणून जमलेल्या खासदारांना अचानक सांगण्यात आले की आज बैठकीचे रूपांतर "सन्मान समारोह' मध्ये करण्यात आले आहे. 

काय ? एक भलामोठा केसरिया हार आणला गेला आणि तो युगपुरुषांच्या भोवती घालण्यात आला. 
युगपुरुष स्तुती भाषणे झाली. अविश्‍वास ठराव जिंकल्याबद्दल कोणाचा सत्कार केला जाणे हे बहुधा संसदीय इतिहासातील दुर्मिळ उदाहरण असावे ! 

पण वर्तमान राजवट ही अपवादात्मक आहे. 
तर, प्रथमच रस्ते, परिवहन, बंदरमंत्री नितीन गडकरी यांना व्यासपीठावर येऊ देण्यात आले. त्यांनी युगपुरुषांच्या स्तुतिपर भाषण केले. नंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी प्रशंसा करताना अमेरिकेतसुद्धा भारताच्या पंतप्रधानांपासून प्रेरणा घेऊन कामे केली जात असल्याचे सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कन्या इव्हान्का यांना नुकत्याच अमेरिकेत भेटल्या तेव्हा त्यांनी सांगितले, की भारतातील मातृत्वविषयक कायद्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन काम सुरू केले आहे. हा कायदा वर्तमान राजवटीत झाला आहे. सर्वांत शेवटी युगपुरुषांचे भाषण झाले. 

अविश्‍वास ठराव जिंकल्यानंतर लगेचच ते ब्रिक्‍स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्यालाच जोडून त्यांनी आतापर्यंत भेट न दिलेल्या रवांडा आणि युगांडा या दोन आफ्रिकी राष्ट्रांनाही भेटी दिल्या. 

युगांडातील सामान्य लोकांनासुद्धा भारतीय संसद व लोकशाहीचे कसे अप्रूप वाटते याचा किस्सा त्यांनी सांगितला. युगांडाच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर एका कार्यक्रमात बोलताना आपण संसदेचा संदर्भ दिल्यावर तेथील श्रोते उठून जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. त्यामुळे काहीसे चकित होऊन आपण त्यांना विचारले की तुम्ही भारताच्या संसदेतील अविश्‍वास ठरावाची चर्चा पाहिली का ? तेव्हा त्या लोकांनी सांगितले, की त्यांनी भारतीय संसदेतील चर्चा पाहिली आणि ते फार प्रभावित झाले. ते नियमित भारतीय संसदेचे कामकाज पहात असतात असेही त्यांनी सांगितले. 

युगपुरुषांच्या या प्रसंगावर प्रचंड टाळ्याच टाळ्या पडल्या ! 
काही भानावर असलेल्या भाजप खासदारांना मात्र प्रश्‍न पडला होता, की युगांडात भारतीय संसदेचे कामकाज कधीपासून प्रसारित होऊ लागले ? पण त्याचे उत्तर त्यांना अजून मिळालेले नाही. 

लागोपाठ पुढच्या आठवड्यात आणखी एक कौतुक सोहळा झाला. 
या संसद अधिवेशनात सामाजिक न्यायविषयक बरीच विधेयके संमत करण्यात आली. 

त्यात तिहेरी तलाक कायद्यात दुरुस्ती(लोकसभेत), ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कोर्टाने सुचविलेल्या सौम्य तरतुदी नाकारणारे विधेयक संमत करण्यात आले. मग काय प्रत्येक गोष्टीचा प्रचार व गाजावाजा करण्याची सवय असलेल्या या राजवटीने 1 ते 9 ऑगस्ट हा सामाजिक न्याय सप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरवले आणि पुन्हा एकदा युगपुरुषांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक न्यायाच्या कटिबध्दतेचा गौरव करण्यात आला. 
टाळ्या टाळ्या!! टाळ्या !!!युक्तीला नसे तोड ! 
लोकसभा निवडणुकीचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. युगपुरुषांनी निवडणुकीच्या तयारी संदर्भात भाजप खासदारांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. 

या बैठकीत खासदारांच्या अडचणी ऐकून घेणे आणि त्यावर तोडगे काढण्याऐवजी त्यांनी युगपुरुषांनी सुरू केलेल्या योजनांचा प्रचार-प्रसार कसा करायचा हेच सांगितले जाते. हे फक्त "वन वे ट्रॅफिक' असते. 

एका बैठकीत युगपुरुषांनी सुरू केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेची चर्चा सुरू असताना एका खासदाराने एका प्रामाणिक अडचणीचा उल्लेख केला. त्याने सांगितले, की ही योजना गरिबांसाठी आहे. हे गरीब लोक चक्क झोपड्यांमध्ये राहतात. त्यांच्या झोपड्यांत सिलिंडर ठेवायला जागा नसते किंवा सिलिंडर ठेवला तर तो गॅस शेगडीच्या इतका जवळ ठेवावा लागतो, की त्यातून अपघाताची शक्‍यता निर्माण होते. तसेच सिलिंडरची नळी वर राहते आणि शेगडी खाली असते आणि त्यामुळेही या गरिबांना ते गैरसोयीचे होते. त्यांना गॅसची शेगडी ठेवण्यासाठी छोटे टेबल दिले तर सिलिंडर व शेगडी समान पातळीवर येऊन ते सोयीचे होईल. 

युगपुरुष काही काळ विचारात पडले. 
पण, काही क्षणच ! लगेच त्यांचा चेहरा उजळला ! त्यांना या अडचणीवर उपाय सापडला होता ! 

त्यांनी त्या खासदाराला सांगितले की सिलिंडरसाठी एक खड्डा खणायला सांगा. त्या खड्ड्यात सिलिंडर ठेवल्यानंतर त्याची नळी वर राहणार नाही व ती शेगडीच्या पातळीत म्हणजे "लायनीत' येईल ! 

किती सोप्या उपाय आहे ! 

हा विषय काढणारे खासदार चूप झाले. त्यांनी विषय वाढवला नाही ! 


कावळे आणि कोकीळ 
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांना सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी आवाहन करणारे पत्र लिहिले होते. त्या पत्राला विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी एक संयुक्त उत्तर पाठवले. 

या पत्रात त्यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात सत्तारूढ पक्ष आणि त्यांनी पुरस्कृत केलेल्या पक्षांकडून कसा पद्धतशीर गोंधळ घालण्यात आला होता याचे सोदाहरण दाखले दिले. उलट विरोधी पक्षांनी पुरस्कृत केलेला अविश्‍वास ठराव चर्चेला येऊ नये यासाठी काय काय प्रकार करण्यात आले व सरकारला कोण मदत करीत होते याकडेही अध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले. या पत्राच्या अखेरीला कावळा व कोकीळ पक्षासंबंधीच्या एका श्‍लोकाचा संदर्भ देण्यात आला होता. हा श्‍लोक महंमद सलीम (मार्क्‍सवादी कम्युनिस्ट) यांनी समाविष्ट केला होता. 

त्याच सर्वसाधारण अर्थ असा, की कावळा व कोकीळ यांच्यातील साम्यामुळे(दोघेही काळे कुळकुळीत) त्यांची ओळख पटविणे अवघड असते पण वसंत ऋतू आला की कोकीळ कुहू कुहू करू लागतात पण कावळे काव कावच करत राहतात. तद्वतच अधिवेशन सुरू झाले की कोकीळ कोण व कावळे कोण हे लक्षात येईलच. लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्षांचा रोख कळून न आला तरच नवल ? 

बहुधा त्यामुळेच पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याबरोबरच अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. 

यानंतर या अधिवेशनात लोकसभेचे कामकाज बऱ्याच अंशी सुरळीत पार पडले. 

राज्यसभेतील विनोद करण्यात हातखंडा असलेल्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार सभागृहात सध्या "उपराष्ट्रपती शासन' चालू आहे. 

त्यावेळी उपसभापतिपदाची निवडणूक झालेली नव्हती. आता उपसभापती स्थानापन्न झाले आहेत. 

राज्यसभा सभापती वेंकय्या नायडू यांचे व्यक्तिमत्त्व आग्रही आहे. त्यामुळे अनेकवेळेस ते वादग्रस्त ठरतात. नियमांचा काटेकोरपणा दाखवताना बऱ्याचदा यात सदस्यांना पुरेशी संधी न मिळण्याचाही प्रकार घडतो. लोकसभेत अध्यक्षांना जसे संयुक्त विरोधी पक्षांनी पत्र लिहिले तसेच पत्र राज्यसभेच्या सभापतींनी म्हणजे नायडू यांना लिहिण्याचे विरोधी पक्षनेत्यांनी ठरवले होते. नायडू यांनी गोंधळ खपवून घेतला जाणार नाही या तत्त्वाची अंमलबजावणी करताना एखाद्या सदस्याने जरी थोडासा गोंधळ केला तर ते सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करून टाकत असत ! यामुळे सरकारलाही एखादा अडचणीचा विषय टाळण्यासाठी ही एक युक्ती मिळाली होती. त्यामुळेच विरोधी पक्षांनी नायडू यांना पत्र लिहिण्याचे ठरवले होते. त्याचा मसुदाही तयार करण्यात आला होता. परंतु पत्रकारांना ही माहिती कळताच ही बातमी बाहेर फुटली. सगळीकडे बातम्या झळकल्या. दुसऱ्याच दिवशी रोज सकाळच्या गटनेत्यांच्या बैठकीत नायडू यांनी, "आज मी पेपरमध्ये बातमी वाचली, की मला विरोधी पक्षनेते पत्र लिहिणार आहेत. मी त्या पत्राची वाट पाहतोय !' 

आता भांडे फुटल्यानंतर सगळीच पंचाईत ! पत्र पाठवण्याची कल्पना बारगळली. 

पण, विरोधी पक्षांना जो "मेसेज' नायडू यांना द्यायचा होता ते आपोआप दिला गेला.  यानंतरच्या कामकाजात तसा फरक पत्रकारांना आढळून आला. 


जिओ मेरे लाल ! 
"जिओ' ही रिलायन्स पुरस्कृत पंचतारांकित व प्रस्तावित शिक्षणसंस्था ! 
या संस्थेला "इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स' म्हणजेच "ख्यातीप्राप्त किंवा लौकिकपात्र शिक्षणसंस्था' असा दर्जा केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आला. या संस्थेची अद्याप एक वीटदेखील लावण्यात आलेली नाही. परंतु तिची संभाव्य कामगिरी लक्षात घेऊन हा दर्जा तिला देऊ करण्यात आला आहे. सर्व काही(तूर्तास तरी) अधांतरी व कल्पनेत ! 

यावरून राजधानीच्या राजकीय वर्तुळात विनोद सुरू होणे अपेक्षितच होते. 
अशाच एका परिसंवादात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे वक्तेहोते. 

परिसवांदाच्या सूत्रसंचालकांनी येचुरी यांचा "मिस्टर येचुरी' असा उल्लेख केला. 
त्यावर येचुरी म्हणाले, की माझी ओळख चुकीची आहे. मी "मिस्टर' नाही "डॉक्‍टर' आहे. 

सूत्रसंचालक येचुरी यांना जाणणारे होते. ते काहीसे खजील झाले आणि त्यांनी म्हटले की येचुरी जेएनयू मध्ये पीएचडी करीत होते पण त्यांनी ती पूर्ण केली याची मला कल्पना नव्हती. त्यांनी ती अर्धवट सोडली अशी माझी माहिती होती. त्यावर येचुरी यांनी मामला गंभीर होत असल्याचे पाहून तत्काळ चुटकी मारली, "माझी डॉक्‍टरेट जिओ विद्यापीठाची आहे !' 
कल्पनेतील विद्यापीठ तशीच ही कल्पनेतील डॉक्‍टरेट आहे मी कधीतरी भविष्यात डॉक्‍टरेट घेईन म्हणून तुम्ही मला ती न घेताच आताही डॉक्‍टर म्हणू शकता ! 

येचुरी यांचा खुलासा ऐकताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला ! 


सबकुछ गुजरात ?? 
युगपुरुष लोकसभेत उत्तर प्रदेशातील वाराणसीचे प्रतिनिधित्व करतात ! 
वाराणसीतून 2014 मध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर "विश्‍वनाथाच्या भेटी सोमनाथ' अशी स्वनामधन्य उक्ती त्यांच्या तोंडून आली नसती तरच नवल ! 

त्यांनी वाराणसीला चकाचक करण्याचा विडा उचलला. काही भागात चकचकाट झाला देखील. परंतु अजूनही बहुतांश भाग हा जुनाटच राहिला आहे. अर्थात ठिकठिकाणी उड्डाण पूल आणि इतरही सुखसोई करण्याचे प्रकल्पही सुरू आहेत. परंतु वाराणसीत एका उड्डाण पुलाचे बांधकाम चालू असतानाच ते कोसळले आणि वीस लोकांचा मृत्यू झाला. या पुलाचे कंत्राट उत्तर प्रदेश सेतू निगम या सरकारी उद्योगाकडे होते पण प्रत्यक्षात निगमतर्फे अनेक उपकंत्राटेही देण्यात येत असतात. 

ही उपकंत्राटे आपल्या खास, मर्जीतल्या लोकांना देण्याचे प्रकार सुरू आहेत. 
पूल कोसळला तेव्हा उपकंत्राट असलेली कंपनी कोण याचा शोध सुरू झाला. तेव्हा ती कंपनी एका केंद्रीय मंत्र्याच्या निकटवर्तीयांची असल्याची माहिती सांगण्यात आली व त्यामुळे एफआयआरमध्ये त्या कंपनीचे नावच समाविष्ट करण्यात आले नाही. 

परंतु हा प्रकार एवढाच मर्यादित नाही. वाराणसीच्या सुशोभीकरण आणि शहरी सुधारणांच्या योजना, कार्यक्रम व प्रकल्प हे प्रामुख्याने बाहेरच्या आणि विशेषतः गुजरातमधील कंपन्यांना दिले जात असल्याची माहिती सांगण्यात येते आणि यामुळे वाराणसी व उत्तर प्रदेशातील स्थानिक उद्योग व्यावसायिक विलक्षण चिडलेले आहेत. त्यांनी आगामी निवडणुकीत आपले रंग दाखवू असे काही मंडळींजवळ बोलून दाखवले आहे. 

याची कुणकूण युगपुरुषांना लागली असावी. आता भाजपमध्ये अतिशय दबक्‍या आवाजात चर्चा केली जाते, की युगपुरुष पुढची निवडणूक कुठून लढवणार ? वाराणसी की अन्यत्र ? 

एका गोटातून तर असे सांगण्यात आले, की आपली चौफेर लोकप्रियता सिद्ध करण्यासाठी युगपुरुष ओडीशातील पुरी येथून निवडणूक लढवू शकतात ! अर्थात ते नेहमीच अतिशय सावध असतात त्यामुळे आपला गुजरात ते सोडणार नाहीत. गुजरातमधील गांधीनगर येथून ते यावेळी निवडणूक लढवतील असे सांगितले जाते. म्हणजेच गेल्यावेळच्या बडोद्याचा ते त्याग करतील. 

पाहू या, काय होते ते ! घोडामैदान जवळच आहे ! 

संबंधित बातम्या