कट्टा

कलंदर
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...
 

बिनधास्त शरद यादव!
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी २०१४ च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक लिहिले आहे. हल्ली दिल्लीत बरीच राजकारणी मंडळी व विशेषतः हरलेले आणि विरोधी पक्षात असलेले नेते पुस्तके लिहू लागले आहेत. जयराम रमेश. वीरप्पा मोईली, पी.चिदंबरम, सलमान खुर्शिद, अश्‍विनीकुमार वगैरे वगैरे. त्याच मालिकेत कपिल सिब्बल यांनीही प्रवेश केला आहे.
पूर्वी पुस्तकाचे प्रकाशन होत असे. आता पुस्तकाचे ‘लाँचिंग’ होते. म्हणजेच एखादे क्षेपणास्त्र, अग्निबाण अवकाशात प्रक्षेपित केला जातो तत्समच पुस्तकाचेही प्रकाशन नव्हे तर प्रक्षेपण होते. 
तर सिब्बल यांच्या या ‘बुक लाँच’ला अनेक विरोधी पक्षनेते उपस्थित होते. शरद यादव, सीताराम येचुरी, चिदंबरम, चंदन मित्रा इ. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हेही उपस्थित होते परंतु पुस्तक ‘लाँच’ करून व नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे भाषण देऊन ते प्रेक्षकांत पहिल्या रांगेत जाऊन बसले.
पराभवाची मीमांसा करताना शरद यादव यांनी बाँबच टाकला. ‘पराभव होणारच होता, पण इतकी वाईट अवस्था होईल असे वाटले नव्हते’ असे सांगितल्यावर एकच हास्यकल्लोळ झाला. शरद यादव हे एक बिनधास्त बोलणारे नेते आहेत आणि फर्ड्या इंग्रजीत झालेल्या या कार्यक्रमात ते हिंदीत बोलले पण सर्वाधिक टाळ्या मिळवून गेले.
यादव यांनी युपीए-२ सरकारच्या वेळी झालेले अण्णा हजारे आंदोलन व त्या आंदोलनामागे असलेल्या शक्तींचाही उल्लेख केला आणि ती परिस्थिती हाताळण्यात युपीए सरकारला अपयश आले असे सांगितले.
मात्र या आंदोलनाबाबत बोलताना पुन्हा त्यांच्या बिनाधास्तपणाचा परिचय त्यांनी दिला.
आपण त्यावेळी एनडीए म्हणजे भाजप आघाडीतच होतो. त्यामुळे या आंदोलनाला कशी योजनाबद्ध रीतीने मदत करण्यात आली होती याची पूर्ण माहिती आहे. या आंदोलनात बाबा-बुवांची फार चलती होती आणि आपल्या नावात दोनदा श्री लावणारे महाराजही यात कसे सामील होते असेही त्यांनी सांगितले.
भाजपला या निवडणुकीत अशा सर्व बाबांची मदत झाली. घंटाबाबा, बाल्टीबाबा, चिमटीबाबा अशी नावे त्यांनी घेताच पुन्हा एकदा उपस्थित मंडळी हसून आडवीतिडवी झाली. एवढे होऊनही भाजपला फक्त ३१ टक्के मतेच मिळू शकली अशी पुस्ती जोडायला ते विसरले नाहीत.
शरद यादव आता विरोधी पक्षांबरोबर आहेत आणि भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापनेच्या प्रयत्नात आघाडीवर आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांच्या व्यासपीठावर त्यांना प्रमुख स्थान दिले जाते.


राजकीय वातकुक्कुट
अन्नमंत्री रामविलास पास्वान यांच्या हालचालींवर हल्ली सगळे राजकीय पक्ष नजर ठेवून आहेत.
आता का? याचे कारण उघड आहे! 
रामविलास पास्वान यांना बदलत्या राजकीय हवेचा अचूक वास लागतो! म्हणूनच सरकार कुणाचेही असो, ते कायम मंत्री राहतातच! 
वाजपेयींच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. २००४च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांनी वाजपेयी सरकारच्या त्याग केला. त्यागासाठी कारणही त्यांनी मोठे निवडले होते.
गुजरातमधील गोध्रा प्रकरण, दंगे व हिंसा व हत्याकांड यामुळे व्यथित होऊन रामविलास पास्वान यांनी वाजपेयी सरकार, भाजपची साथ सोडून दिली होती. एवढा त्याग केल्यानंतर त्यांना त्याचे गोड गोड फळ तर मिळायलाच हवे होते. गुजरात दंग्यांमुळे त्यांनी सांप्रदायिकतेचा त्याग केला होता. आता युपीएमध्ये प्रवेश करून त्यांनी धर्मनिरपेक्षतेची कास धरली! युपीएमध्ये दहा वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर त्यांच्या त्यागाची वेळ येऊन ठेपलेली होती. आता त्यांना युपीएच्या काळातल्या भ्रष्टाचाराचा उबग आलेला होता.
काय? त्याग आणि पुन्हा त्यागाचे गोड गोड फळ तयारच होते!
गुजरात दंग्यांचा ठपका असलेल्या महानायकाशीच त्यांनी हातमिळवणी केली. विकास-प्रगती-सुशासनाबद्दल अचानक पास्वान यांना काळजी निर्माण झाली आणि त्यामुळेच महानायकांच्या बरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय केला. त्यांचे सुपुत्र, धाकटे भाऊ हेही लोकसभेला निवडून आले. पास्वान पुन्हा केंद्रीय मंत्री झाले!
आता गेल्या काही दिवसांपासून पास्वान पुन्हा सरकारविरुद्ध बोलू लागले होते. त्यामुळे राजकीय पक्षांचे कान टवकारले गेले होते.
एकतर ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा सौम्य करण्याचा निर्णय दिला होता त्यांची राष्ट्रीय हरित प्राधिकरणावर फेरनियुक्ती आणि हा निर्णय रद्द करण्यासाठी वटहुकूम किंवा कायद्यात दुरुस्ती अशा मागण्या करून त्यांनी प्रसंगी मंत्रिपद, भाजप आघाडी सोडण्याचा इशारा दिला होता. पुन्हा त्याग करण्याची वेळ आली काय असे वाटू लागले. परंतु सरकारने कायद्यात दुरुस्ती केल्याने पास्वान यांच्यावर त्यागाची पाळी आली नाही. यामुळे लालूप्रसाद यांनीच एकदा त्यांना ‘मौसम वैज्ञानिक’ म्हटले होते. राजकीय हवामानाचा अचूक अंदाज त्यांना येत असल्याने आता देखील मंडळी त्यांच्या हालचालींवर नजर राखून आहेत! याला राजकीय वातकुक्कुट असेही म्हटले जाते.
वारा येईल तसा हा इमारतींच्या वर टोकावर लावलेला कोंबडा फिरत राहतो! इंग्रजीत काहीजण अशा मंडळींना ‘मायग्रेटरी बर्ड’ म्हणजे अनुकूल हवामानाच्या दिशेने स्थलांतर करणारे पक्षी!
आता कळलं? पास्वान यांचे भारतीय राजकारणतले स्थान?


उत्साहावर पाणी !
या  देशाचे सर्वज्ञ युगपुरुष व महानायक यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न आहे.
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, व्हॉट्‌सॲप, इमेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अशा सर्व माहिती तंत्रज्ञानाच्या प्लॅटफॉर्मचा ते मनसोक्त वापर करीत असतात. राज्यातल्या नोकरशहांबरोबरदेखील ते नियमित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून त्यांच्याकडून त्या राज्याच्या प्रगतीचा आढावा घेत असतात.
हा आग्रह त्यांचा केवळ स्वतःपुरता मर्यादित नाही. त्यांनी भाजपच्या खासदारांना देखील त्याचा वापर करण्यास सांगितले आहे.
त्यासाठी प्रत्येक खासदाराचे फेसबुक अकांउंट, तो किती व्हॉट्‌सॲप ग्रुपचा सदस्य आहे वगैरे गोष्टींची माहिती पक्षाला देणे बंधनकारक आहे असे नुकतेच समजले. हल्ली तर कुणी खासदार सर्वज्ञांना भेटले, की ते या मुद्यांवरच त्यांची उलटतपासणी घेतात असे कळले. एका खासदाराला मोठ्या मिनतवारीने सर्वज्ञांची भेट मिळाली. तो आनंदाने बेहोष होण्याचेच बाकी होते. भेट खासगी किंवा वैयक्तिक असल्याने तो त्याच्या पत्नीला पण बरोबर घेऊन गेला.
सर्वज्ञांच्या भेटण्याच्या दालनात त्याने उत्साहाने पत्नीसह प्रवेश केला.
आता सर्वज्ञ स्वागत करतील, ख्यालीखुशाली विचारतील, बरोबर पत्नी आहेतर एखादा विनोद करतील असे मनातले मांडे तो खात होता.
पण झाले भलतेच !
सर्वज्ञांचा चेहरा कोरा करकरीत ! त्याने नमस्कार केला, पत्नीची ओळख करून दिली.
सर्वज्ञांकडून संभाषण सुरू होईना म्हणून यानेच काहीतरी बोलण्यास सुरुवात केली. एक वाक्‍य झाल्यावरच सर्वज्ञांनी त्यांना मतदारांशी संपर्क कसे राखता, फेसबुक अकांउंट, त्याद्वारे कितीजणांपर्यंत पोहोचता आणि तत्सम माहिती विचारण्यास सुरुवात केली. 
तो बिचारा गडबडून गेला. काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून त्याने पाच हजार, दहा हजार लोकांशी संपर्क असतो असे सांगण्याचा प्रयत्न करताच सर्वज्ञांनी त्याला चमकावले, ‘फक्त एवढेच ?’  मग त्यांनी त्यांचे उदाहरण देऊन ते दिवसात किती हजार लोकांशी संपर्क साधतात हे सांगितले.
खासदार निरुत्तर ! पत्नीसमोर कचरा होऊ लागला होता !
सर एक फोटो घेऊ ? त्याने या पेचातून मार्ग काढण्यासाठी विचारले !
सर्वज्ञांनी फक्त ‘हूं’ एवढेच म्हटले.
घेतला आणि नमस्कार होऊन काही मिनिटातच खासदार सपत्नीक बाहेर ‘निसटले’ !


भाजपमध्ये घबराट?
लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तशी भाजपमध्ये अस्वस्थता व घबराट आढळून येते. प्रत्येक खासदाराला त्याच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या आधारेच उमेदवारी देण्याचा जो इशारा पक्षाध्यक्षांनी दिला होता त्यामुळे विद्यमान खासदारांमध्ये अस्वस्थता आहे.
आपल्या भवितव्याच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या खासदारांची संख्या शंभर ते सव्वाशे असल्याचे खासगीत सांगतात. पक्षाने लोकसभेच्या सदस्यांना आपापले प्रगतिपुस्तक सादर करण्यास सांगितले आहे. परंतु खरी चिंता वेगळीच आहे. साधनसंपत्तीने ओतप्रोत असलेल्या या पक्षाने आपल्या खासदारांच्या त्यांच्या मतदारसंघातील कामगिरीच्या मूल्यमापनासाठी काही खासगी संस्थांचीही मदत घेतल्याचे सांगण्यात येते. 
याखेरीज पक्षांतर्गत निरीक्षकांची फौज, संलग्न संस्था-संघटनांकडून मिळणारी माहिती यांचे एकत्रीकरण करून पक्षाध्यक्षांकडे अहवाल जात असतात असे या खासदारांना कळले आहे. त्यामुळेच त्यांना भवितव्याची चिंता भेडसावू लागली आहे.खासदारांनी आपल्या मतदारांपर्यंत संपर्क यंत्रणा कशी प्रस्थापित केली आहे, मतदारसंघाचे दौरे, पंतप्रधानांच्या आवडत्या योजनांचा मतदारसंघात झालेला प्रसार व अंमलबजावणी याचीही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. आता हे न करणाऱ्या खासदारांचे धाबे दणाणले स्वाभाविक नाही काय ?
त्यामुळेच ज्यांना स्वतःलाच आपल्या कामगिरीची खात्री नाही त्यांनी इतर पक्षांकडे संपर्क साधायला सुरुवात केल्याचे समजते ! यामध्ये उत्तर भारतीय राज्यातील मंडळींची संख्या अधिक असल्याचे कळते !


दीदी की खारूताई?
लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तशी भाजपमध्ये अस्वस्थता व घबराट आढळून येते. प्रत्येक खासदाराला त्याच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या आधारेच उमेदवारी देण्याचा जो इशारा पक्षाध्यक्षांनी दिला होता त्यामुळे विद्यमान खासदारांमध्ये अस्वस्थता आहे.
आपल्या भवितव्याच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या खासदारांची संख्या शंभर ते सव्वाशे असल्याचे खासगीत सांगतात. पक्षाने लोकसभेच्या सदस्यांना आपापले प्रगतिपुस्तक सादर करण्यास सांगितले आहे. परंतु खरी चिंता वेगळीच आहे. साधनसंपत्तीने ओतप्रोत असलेल्या या पक्षाने आपल्या खासदारांच्या त्यांच्या मतदारसंघातील कामगिरीच्या मूल्यमापनासाठी काही खासगी संस्थांचीही मदत घेतल्याचे सांगण्यात येते. 
याखेरीज पक्षांतर्गत निरीक्षकांची फौज, संलग्न संस्था-संघटनांकडून मिळणारी माहिती यांचे एकत्रीकरण करून पक्षाध्यक्षांकडे अहवाल जात असतात असे या खासदारांना कळले आहे. त्यामुळेच त्यांना भवितव्याची चिंता भेडसावू लागली आहे.खासदारांनी आपल्या मतदारांपर्यंत संपर्क यंत्रणा कशी प्रस्थापित केली आहे, मतदारसंघाचे दौरे, पंतप्रधानांच्या आवडत्या योजनांचा मतदारसंघात झालेला प्रसार व अंमलबजावणी याचीही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. आता हे न करणाऱ्या खासदारांचे धाबे दणाणले स्वाभाविक नाही काय ?
त्यामुळेच ज्यांना स्वतःलाच आपल्या कामगिरीची खात्री नाही त्यांनी इतर पक्षांकडे संपर्क साधायला सुरुवात केल्याचे समजते ! यामध्ये उत्तर भारतीय राज्यातील मंडळींची संख्या अधिक असल्याचे कळते !  
 

संबंधित बातम्या