कट्टा

कलंदर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

कट्टा

पक्षप्रचारासाठी वेषांतर?
अलीकडेच भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी राजधानीत पार पडली.
त्यानिमित्ताने विविध राज्यातल्या प्रतिनिधींबरोबर भेटीगाठी व त्यांचे अनुभव ऐकण्यास मिळाले. पश्‍चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांनी केलेले अनुभव कथन ऐकून हसावे की काय अशी स्थिती झाली. पश्‍चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेसची व गावागावात असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची दहशत वाढत असल्याची व त्यामुळे पक्षाचा विस्तार सोडा पण साधा पक्षाचा प्रचार करायला जाणे अवघड झाल्याचे तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले.
कुणाला अतिशयोक्ती वाटेल, परंतु बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या विरोधातील उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत किंवा जे अर्ज भरू शकले ते प्रचार करू शकले नाहीत आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्यासाठी मतदान करू देण्यात आले नाही.
दहशत, जरब व प्रसंगी मारहाण असे प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले, की त्यांना उघडपणे पक्षासाठी प्रचार करायला जाता येत नाही. त्यामुळे पक्षासाठी कार्यकर्ते गोळा करणे किंवा त्यांची निवड करणे या गोष्टी तर लांबच राहिल्या !
अखेर काहीजणांनी युक्ती लढवली.
त्यांनी वेषांतर करून गावागावांमध्ये जाऊन प्रचार करण्यास सुरुवात केली. कुणी फेरीवाल्याचे सोंग घेतले, कुणी घरोघर जाऊन लहानसहान वस्तू विकतात त्या विक्रेत्यांचे रूप धारण केले; तर काहींनी पोस्टमनचा वेषही धारण केला असे सांगण्यात आले. हरून अल्‌ रशीद वेषांतर करून राज्यात हिंडत असे व त्याच्या राज्यकारभाराबाबत लोकभावना काय आहे ते समजावून घेत असे. अनेक वेळेस राजकारणी मंडळी काहीतरी नाट्यमय व सनसनाटी फैलावण्यासाठी वेषांतराचे नाटक, अचानक ठिकठिकाणी धडक-भेटी देणे असे प्रकार करीत असतात. महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनीही असे प्रकार एकेकाळी केलेले होते.
परंतु एखाद्या पक्षाच्या दहशतीचा ससेमिरा चुकविण्यासाठी वेषांतर करून पक्षाचे काम करावे लागणे हा प्रकारही अनोखाच मानावा लागेल !
पण राजकारण व वेषांतर हा प्रकार परस्परांपासून फार वेगळा मानण्याची गरज नाही. एक खासदार होते. ग्रामीण पार्श्‍वभूमी असल्याने ते त्यांच्या राज्यात व मतदारसंघात अगदी मोकळ्याढाकळ्या धोतर व सदऱ्याच्या वेशात राहायचे. पण संसदेच्या अधिवेशनाच्या वेळी मात्र ते पॅंट-शर्ट, कधी सफारी घालून येत असत. एकदा कुतूहलाने विचारल्यावर काहीसे लाजत म्हणाले, की विमानतळावरून आधी घरी जातो आणि मग पॅंट-शर्ट घालून संसदेत येतो !
एकदा तर एका काँग्रेसनेत्याने सांगितले, की हल्ली काँग्रेसमध्ये उपऱ्यांची गर्दी का होताना दिसते ? त्याने स्वतःच्याच प्रश्‍नाला उत्तर देताना म्हटले, ‘दिवसभर सफारी घालून धंदा करणारेच संध्याकाळी काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते म्हणून खादीचे कुडते पायजमे घालून मिरवायला येतात. यामुळे काँग्रेस पक्ष कसा काय वाढणार ?’ त्यामुळे वेषांतर आणि राजकारणातील मंडळी यांचे नाते तसे वेगळे नाही.


संघ शरणम्‌ गच्छामि?
भाजपची पितृसंघटना रा.स्व.संघाने विज्ञान भवनात तीन दिवसांची परिषद घेतली. ‘भविष्यातील भारत ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन’ ही परिषदेची मध्यवर्ती कल्पना व संवाद परिषद म्हणून यामध्ये सर्व विचारांच्या मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर, चित्रपटक्षेत्र, कलाक्षेत्र अशा सर्व क्षेत्रातील मंडळींना निमंत्रित करण्यात आले. 
अर्थात निमंत्रणाची अधिकृत यादी कुणालाच मिळालेली नाही. याच परिषदेला राहुल गांधी, सीताराम येचुरी, ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या.प्रत्यक्षात या तिघांनाही निमंत्रण पाठविले नसल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले. अर्थात निमंत्रण असते, तरी हे तिघेहीजण परिषदेसाठी उपलब्ध नव्हते. सीताराम येचुरी हे कॅनडा आणि अन्य देशांच्या दौऱ्यावर गेलेले होते. बॅनर्जी त्यांचा अर्धवट राहिलेला परदेश दौरा पूर्ण करण्यासाठी जर्मनी व अन्य युरोपीय देशात गेल्या होत्या. 
राहुल गांधी मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर गेलेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपबाहेरच्या राजकीय मंडळींपैकी कुणी फारसा प्रतिसाद या परिषदेला दिला नाही. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांनी जाहीरपणे ते परिषदेला जाणार नसल्याचे सांगून टाकले होते. वादग्रस्त राजकीय नेते अमरसिंग यांना निमंत्रण देण्यात आले होते आणि ते परिषदेला हजरही राहिले. 
बॉलीवूडच्या तारे व तारकांनादेखील निमंत्रित करण्यात आले होते.
सध्या प्रसिद्ध असलेल्या एका तरुण अभिनेत्याने सरकारी आदेश मिळाल्यावर या परिषदेला हजर न राहण्याची कुणाची हिंमत आहे ? असा प्रश्‍न करून त्याच्या उपस्थित राहण्यावर प्रकाश टाकला.
सर्वसाधारणपणे व मुख्यतः शासकीय कार्यक्रमांसाठी, तसेच पंतप्रधान किंवा राष्ट्रपती उपस्थित राहणार असतील अशा कार्यक्रमांसाठीच विज्ञान भवन उपलब्ध असते. परंतु प्रथमच अपवाद करून सरकारबाह्य व स्वतःला सांस्कृतिक म्हणविणाऱ्या या संघटनेसाठी विज्ञान भवनाचे दालन खुले करून देण्यात आले. असेही कानावर आले, की यासाठी काही मंत्रालयांचे या ठिकाणी होणारे कार्यक्रम इतरत्र हलविण्यात आले.
एका मंत्रालयाला अशोक हॉटेलात त्यांचा कार्यक्रम करण्यास सांगण्यात आले. थोडक्‍यात रा.स्व.संघाचा भाजप व संघबाह्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची एक भलीमोठी मोहीम होती. संघाकडे समाजातील मान्यवरांना ओढण्यासाठीचा हा प्रयोग होता. जय हो !!


का हो धरिला मजवरी राग ......
सर्वज्ञ-युगपुरुष-महानायकाच्या श्रेणीत एकच व्यक्ती भारतात आहे.
तरीदेखील कधीकधी त्यांना प्रश्‍न विचारण्याची क्षमता काही मोजक्‍या सहकाऱ्यांमध्ये असते.
त्या सहकाऱ्यांवर मग दात ठेवला जातो आणि संधी मिळताच त्या सहकाऱ्यांचे पाय ओढण्याचा कावा साधला जातो. सर्वज्ञांचे एक मंत्री सहकारी आहेत. स्पष्टवक्ते आहेत. नोटबंदीच्या निर्णयापूर्वी त्याच्या परिणामांचे आकलन केले आहे काय अशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट विचारणा करणारे हे सर्वज्ञांचे सहकारी आहेत. 
भाजपची पितृसंघटना रा.स्व.संघाचा वरदहस्त त्यांच्यावर असल्याने त्यांना सर्वज्ञ-महानायक हात लावू शकत नाहीत असे राजकीय वर्तुळात सर्वसाधारणपणे मानले जाते. मंत्रालयाच्या कामकाजात सर्वांत चांगली कामगिरी असलेले आघाडीचे मंत्री म्हणून त्यांचा लौकिक असल्यानेही युगपुरुषांना त्यांच्याविरुद्ध काही बोट ठेवायला जागा मिळेनाशी झाली आहे. ती टोचणी सतत महानायकांना असावी. कारण लहानलहान गोष्टीत मग या सहकाऱ्यांचे पाय ओढण्याचे काम चालू असते.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मूळ कार्यक्रमपत्रिकेनुसार या मंत्री महोदयांना राजकीय ठराव मांडण्याची जबाबदारी होती.
आयत्यावेळी काय चक्रे फिरली कुणास ठाऊक, या मंत्री महोदयांचे नाव अचानक गळाले आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांना राजकीय ठराव मांडण्यास सांगण्यात आले.
या मंत्री महोदयांना त्यांच्या मंत्रालयाशी निगडित कामांसाठी व परकी गुंतवणुकीच्या काही प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी परदेशात जायचे होते. दौरा ठरला होता.
पण..... ! महानायकांचा आदेश निघाला, की परदेश दौरा रद्द !
दिल्लीतच होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी तुमचे येथे
राहणे आवश्‍यक आहे, तेव्हा येथेच रहा असा फतवा जारी करण्यात आला. 
बिचारे मंत्री मुकाट्याने परदेश दौरा रद्द करून दिल्लीत राहिले.
महानायकांना परदेश दौऱ्यावर जाण्याची हौस व आवड असल्याचे गेल्या चार वर्षात देशाने अनुभवले आहेच ! परंतु मंत्र्यांनी परदेश दौऱ्यावर जायचे म्हटले, की लगेच त्यांना त्रास सुरू होतो असे म्हणतात.
त्यामुळेच परदेश दौऱ्यासाठी मंत्र्यांना महानायकांची चक्क परवानगी घ्यावी लागते. तसेच जर एखाद्या खासगी संस्थेच्या कार्यक्रमासाठी परदेशात जायचे असेल, तर त्याला चक्क बंदी करण्यात आली आहे असे कानावर आले आहे.
एकदा एका मंत्र्याच्या परदेशात शिकत असलेल्या मुलाचा पदवी समारंभ होता व त्या मंत्र्याला सपत्नीक त्यासाठी जाण्याची इच्छा 
होती. त्याने परवानगी मागितल्यावर मंत्रिपद सोडून मग जा असे सुनावण्यात आल्याचे समजते. तो मुकाट्याने गप्प बसला व भारतातच राहिला. 


अजब जवळीक?
कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते, की एकमेकाचे वैरी असलेल्यांनाही अचानक एकत्र यावे लागते !
पूर्वीच्या काळातल्या गोष्टींमध्ये नदीपलीकडे असलेल्या कोर्टात जाण्यासाठी एकमेकाविरुद्ध लढणारे वादी-प्रतिवादी, त्यांचे वकील यांना एकाच नावेतून जावे लागण्याचे आपण सर्वांनीच वाचलेले आहे.
तसाच काहीसा प्रकार सध्या घडत आहे.
भाजपमधील एक असंतुष्ट (अद्याप त्यांनी बंडाचा झेंडा उभारलेला नसल्याने बंडखोर म्हणता येणार नाही) डॉ.सुब्रह्मण्यम स्वामी यांचे एकच उद्दिष्ट आहे, की अरुण जेटली यांना अर्थमंत्रीपदावरुन हटविणे. यासाठी ते एकही संधी गमावत नाहीत. परागंदा मद्यसम्राट मल्ल्या प्रकरण सध्या गाजत आहे. मल्ल्याला भारताबाहेर सहजपणे पळून जाण्यास कुणी साह्य केले काय अशीही चर्चा चालू आहे आणि यामध्ये अरुण जेटली हे वादाच्या भोवऱ्यात आहेत.
मद्यसम्राटाने पलायनापूर्वी संसदेत जेटलींची भेट घेतली होती हा आरोप आहे. जेटलींनी त्यात दुरुस्ती करताना ‘भेटीचा प्रयत्न केला होता, पण आपण त्याला उडवून लावले होते’ असे म्हटले आहे.
स्वामींनी जून महिन्यात एक ट्‌वीट करून मद्यसम्राटाला पळून जाण्यास किंवा त्याच्या विरुद्धची सीबीआयची नोटीस सौम्य करणारा तो ‘पॉवरफुल्ल’ नेता कोण असा प्रश्‍न केला होता. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाने ते ट्‌वीट शोधून फेरप्रसारित केले आणि स्वामींची त्याबद्दल प्रशंसा केली. परंतु तोपर्यंत स्वामींनी ताजे ट्‌वीट करून जेटली व मद्यसम्राटाच्या संसदेतील भेटीचा तसेच मद्यसम्राट ३६ बॅगा बरोबर घेऊन पळाला असाही गौप्यस्फोट केला.
हे सर्व महाभारत घडूनही भाजपतर्फे कुणीही जेटलींच्या बचावासाठी अद्याप पुढे आलेले नाही हे काहीसे विस्मयकारक आहे. पण वास्तव आहे! कदाचित, जेटली हे निष्णात वकील कायदेपंडित असल्याने स्वतःचा बचाव करण्यास समर्थ आहेत अशा समजुतीने कुणीही त्यांच्या बाजूने पुढे आलेले नाही.
विशेष म्हणजे जेटली यांनी एकदा खुलासा केला, परंतु त्यानंतर पुन्हा नव्याने समोर आलेल्या या माहितीबाबत किंवा काँग्रेसने केलेल्या आरोपांबाबत (संसदेत जेटली व मल्ल्या एकमेकांशी वीस मिनिटे बोलत होते) देखील जेटली यांनी कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही.
असे सांगितले जाते, की संसदेतील कॅमेऱ्यांमध्ये असलेल्या पूर्वीच्या चित्रणांच्या फुटेजची छाननी सुरू करण्यात आली आहे आणि ते सापडले तर जेटली विरोधी पक्षांना चारीमुंड्या चीत करायला पुढे सरसावतील.
तूर्त........ मौन !!

संबंधित बातम्या