कट्टा

कलंदर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर... 

मर्कट उच्छादाचा कळस
टीव्हीवर इंग्रजी चित्रपटांच्या चॅनेल्सवर अनेकांनी ‘प्लॅनेट ऑफ एप्स’ आणि त्या मालिकेतले सिनेमे पाहिलेले असतील. यामध्ये एप्स माकडे मानवावर मात करून त्यांच्यावर कसे अधिराज्य स्थापन करतात याची कल्पना केलेली आहे. या सिनेमांची मालिकाच सादर झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीत होते काय असे वाटायला लागले आहे.
या मर्कटलीला असोत किंवा भटक्‍या कुत्रांचा उच्छाद असो काही प्राणीप्रेमी नेत्यांचा याला पाठिंबा असल्याने हा छळ वाढत चालला आहे.
गेली अनेक वर्षे राजधानीत या ‘बजरंग दला’चा धुमाकूळ आता इतका टोकाला चालला आहे, की त्याला आवर कसा घालायचा ही बाब थेट संसद व सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने माकडांच्या नसबंदीला अनुकूलता दाखवली आहे.
हे जरी खरे असले तरी ती करायची कशी हा यक्षप्रश्‍न आहे.
संसद, सर्वोच्च न्यायालय, साउथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक म्हणजेच देशाची सूत्रे ज्या ठिकाणांहून हलतात त्या परिसरावर या मर्कटांचे जणू अधिराज्य निर्माण झाले आहे. आता ही माकडे एवढी धीट झाली आहेत, की त्यांना आव्हान दिल्यास थेट हल्ले करू लागली आहेत. 
संसदेतही या माकडसेनेने आपली दहशत एवढी निर्माण केली आहे, की संसदेच्या सचिवालयाने खासदारांसाठी व कर्मचारी वर्गासाठी या माकडांच्या हाताळणीबाबत सूचनांचे परिपत्रकच जारी केले आहे.
यामध्ये संसदेच्या सज्ज्यांमध्ये म्हणजेच वऱ्हांड्यामध्ये माकडे बसली असतील, तर त्यांच्या विनाकारण वाटेला जाऊ नये किंवा त्यांना हुसकविण्याचाही प्रयत्न करू नये अशी सूचना करण्यात आली आहे. शक्‍य असेल तर मार्ग बदलून जावे असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर या माकडांच्या नजरेला नजर देण्याचे सक्तीने टाळावे अशी विशेष सूचना या परिपत्रकात करण्यात आलेली आहे. याचे कारण असे की नजरेला नजर देण्याने माकडे आणखी बिथरतात आणि त्यांच्याकडे रोखून बघण्यामुळे त्यांना ती व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करते की काय असे वाटून ते प्रतिहल्ला चढवतात. चावल्यानंतर त्याला प्रतिबंधक लस नाही. असेही सांगितले जाते, की माकडाच्या चाव्याची जखम बरी झाल्याचे आढळून आले, तरी कालांतराने तो भाग सडू लागतो.
थोडक्‍यात, माकडांच्या दहशतीची मजल आता लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरापर्यंत पोहोचली आहे.
अरे हो, विसरलोच की ! माकडांची ही दहशत मंदिरांमध्ये तर सर्वाधिक आहे. उत्तर हिंदुस्थानात तर मंदिरांवर माकडांचा कब्जाच आहे आणि तुम्ही तेथे बरोबर पिशवी किंवा खाद्यपदार्थ व एवढेच काय देवाचा प्रसाद देखील बरोबर नेऊ शकत नाही कारण माकडे चक्क हल्ले करून ते पदार्थ लंपास करतात !
तर माकडांपासून सावधान !
पण गंमत सोडा ! गंभीर बाब ही आहे, की शहरीकरणाचा अनियंत्रित व बेसुमार विस्तार आणि झाडे व जंगलतोड यामुळे या प्राण्यांच्या निवासावर गदा आलेली आहे आणि मग त्यांनी आता मानवाच्या वस्त्यांवर आक्रमण सुरू केले आहे. त्यातूनच ‘अवनी’ची कहाणी घडते !
माणूस व प्राणी यांच्यातील समतोल नाते पुन्हा कधी प्रस्थापित होईल?


थंडी अजून आलीच नाही !
नोव्हेंबर सरत आलाय, पण राजधानी दिल्लीत ती हवीहवीशी वाटणारी गच्च, गडद, थंडी काही येईना !
सकाळी आणि रात्री गारवा असतो एवढेच ! साधारणपणे १५ नोव्हेंबरपासून दिल्लीला थंडी लपेटायला लागते.
दिल्लीकर गरम कपडे बाहेर काढू लागतात. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत नेहरू जाकिटे, एखादा स्वेटर यावर थंडीचा मुकाबला केला जातो.
१५ डिसेंबर किंवा डिसेंबरच्या मध्यास एक हिवाळी पाऊस पडतो आणि मग मात्र ती प्रिय थंडी सुरू होते. कडाका वाढत जातो. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना या थंडीची सर्द शिरशिरी साथ असते.  असो, उगाच स्वप्नात कशाला रमा ?
दिल्लीत खऱ्या थंडीची अद्याप चाहूलच लागलेली नाही!
आणि याचे काही ठोस मापदंड आहेत बरं का ?
प्रमुख मापदंड म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री! तेच हो, ‘आप’ले अरविंद केजरीवाल! ते कसे काय? दिल्लीत खरी थंडी सुरू झाली की केजरीवाल त्यांच्या विशेष गणवेषात अवतीर्ण होऊ लागतात!
गणवेष? हो, तोच तो ! लांब बाह्यांचा स्वेटर, डोक्‍याला ‘आप’ची टोपी आणि संपूर्ण डोक्‍याला झाकणारा गळाबंद असा स्कार्फ म्हणजेच मफलर! मधून मधून खोक्‌ खोक्‌ असा खोकल्याचे आणि खाकरण्याचे पार्श्‍वसंगीत! अशा अवतारात ते अवतीर्ण झाले की समजावे की, होय, दिल्लीत थंडीचे आगमन झाले आहे!
अरेरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अद्याप या अवतारात आलेलेच नाहीत व त्यामुळेच दिल्लीच्या त्या प्रिय थंडीचे आगमनच झालेले नाही असे खेदाने नमूद करावे लागत आहे!
गेल्या वर्षी थंडीचे आगमन होताच केजरीवाल हे त्यांच्या विशिष्ट अवतारात अवतीर्ण झालेच, पण वर लोकांना त्यांनी थंडीचा मुकाबला कसा करायचा याचे काही सल्लेही दिले.
यावर्षी दिल्लीकर या नेत्याची आणि थंडीच्या प्रतीक्षेत आहेत!


प्रचारपद्धतीत बदल का बरं?
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची गडबड सुरू आहे. प्रचारही शिगेला चालला आहे. ब्रह्मांडनायकांच्या आणि त्यांच्या सहनायकांच्या वाणीला विलक्षण धार चढलेली आहे आणि त्या धारदार जिव्हेने ते प्रतिपक्षाच्या चिंध्या करताना दिसत आहेत! ओ हो ! पण या दोन्ही नायकांच्या प्रचारभाषणात यावेळी एक लक्षणीय बदल आढळतो. प्रथमच हे दोन्ही नेते राज्यातील नेत्यांचा म्हणजेच तेथील मुख्यमंत्र्यांचा उदो उदो करताना ऐकायला येत आहे.
यापूर्वी असे कधी झाले नव्हते. कारण साक्षात ब्रह्मांडनायकच सर्व सूत्रे स्वतःच्या हाती ठेवत असत. त्यामुळे फक्त ब्रह्मांड नायकांच्या नावाने व चेहऱ्यानेच मते मागितली जात असत. आता या तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या पोस्टर्सवर मुख्यमंत्र्यांचे चित्र मोठे व ब्रह्मांडनायक व सहनायकांचे चित्र तुलनेने लहान आकाराचे आढळून येते. हे देखील लक्षणीयच म्हटले पाहिजे हो! पण हा बदल कशासाठी? भाजपचे या राज्यातील स्थानिक नेते व कार्यकर्ते काहीसे ढेपाळलेले आहेत कारण राजस्थानात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तीव्र नाराजीची लाटच आहे. तर मध्य प्रदेश व छत्तीसगड मध्ये पंधरा पंधरा वर्षांच्या सत्तेने मतदारांना कंटाळा आलाय! तेच तेच चेहरे व पक्ष त्यांना नकोसा झालेला आढळतो. नावीन्य व परिवर्तनाची ओढ त्यांना लागल्याचे सांगण्यात येते. त्यातून कार्यकर्ते ढेपाळलेले आहेत. मध्य प्रदेशात तर अशी स्थिती सांगितली जाते, की कार्यकर्त्यांनी खुद्द राष्ट्रीय अध्यक्षांनाच मतदानापर्यंत म्हणजेच २८ नोव्हेंबरपर्यंत राज्यातच रहा असा धोशा लावलेला आहे. तुम्ही राहिलात तर कार्यकर्ते काम करतील असे ते सांगत आहेत. ब्रह्मांडनायकांनी मध्य प्रदेशात ११ जाहीर सभा घेण्याचे ठरविले आहे. परंतु कार्यकर्ते काहीसे खट्टू आहेत. गुजरात व कर्नाटकात ब्रह्मांडनायकांनी वीस-वीस, बावीस-तेवीस सभा घेतल्या पण येथे मात्र ११वर बोळवण? यामुळेही कार्यकर्ते काहीसे नाउमेद झालेले आहेत. असे सांगतात, की दोन्ही नायक स्थानिक नेतृत्वाचा उदो उदो अशासाठी करीत आहेत व स्वतःला काहीसे पिछाडीवर ठेवत आहेत कारण खरोखरच लोकांनी धोबीपछाड दिला आणि पराभव झाला तर त्याचे खापर स्थानिक नेतृत्वावर फोडणे सोपे जावे ! त्यामुळे त्याची आतापासूनच तयारी! काय तल्लख बुद्धी? जय हो!!!


यंदा दिवाळी मिलनच नाही
होली, दिवाळी, रोजा-इफ्तार या धार्मिक सण व प्रसंगांनाही राजकीय व राष्ट्रीय राजधानीत राजकारण चिकटणे अपरिहार्य आहे. आणि त्यानुसार या तिन्ही प्रसंगी राजकीय नेते ‘मिलन’ आयोजित करीत असतात. एकेकाळी लालकृष्ण अडवानी जेव्हा सत्तेच्या केंद्रस्थानी होते तेव्हा त्यांच्याकडील होली-मिलन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असे आणि त्याचे निमंत्रण मिळणे प्रतिष्ठेचे मानले जात असे.
त्यांचेच सहकारी डॉ.मुरली मनोहर जोशी हेही न चुकता होली व दिवाळीनिमित्त ‘मिलन’ आयोजित करीत असतात. एवढेच काय भाजपतर्फेदेखील गेली चार वर्षे त्यांच्या मुख्य कार्यालयात ‘दिवाळी मिलन’ आयोजित केले जात असे. त्यावेळी ब्रह्मांडनायकांची हजेरी हे मुख्य आकर्षण असे आणि फाजील उत्साही पत्रकारदेखील त्यांच्याबरोबर ‘सेल्फी’चा राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडत असत. पण यावर्षी काय झाले कुणास ठाऊक? 
बहुधा पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका व आचारसंहितेमुळे असेल, यावेळी भाजपचे दिवाळी मिलन झालेच नाही! 
डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी दिवाळी मिलन आयोजित केले होते. पण अर्थमंत्री व संरक्षणमंत्री या दोन प्रमुख मंत्र्यांनी त्याचवेळी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद ठेवून जोशींच्या मिलनाला घातपात करण्याचा प्रकार केला होता असे आता लक्षात आले आहे. जोशी यांच्या सद्यःस्थितीवरच्या मार्मिक टिप्पण्या पत्रकारांनी ऐकू नयेत यासाठी तर हा बनाव नसावा? असू शकतो ! अशा हलक्‍या गोष्टी हलकी मंडळीच करीत असतात ! 


हे मंत्री अदृश्‍य का?
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. आणखी एक केंद्रीय मंत्री-पेयजल मंत्री-उमा भारती या सध्या लोकसभेत झाशी या मध्य प्रदेशाला लागून असलेल्या, पण उत्तर प्रदेशात असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्या, तरी मूळच्या मध्य प्रदेशाच्या आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्या आहेत. या दोघीही भाजपच्या आघाडीच्या महिला नेत्या आणि विशेष म्हणजे वक्तृत्व तरबेज नेत्या मानल्या जातात. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक प्रचारात या दोघींनाही फारसे स्थान देण्यात आले नव्हते. गृहमंत्री राजनाथसिंह हे केवळ पर्यटनाप्रमाणे एक चक्कर मारून आले. नाही म्हणायला ग्रामीण विकासमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे मध्य प्रदेशात तळ देऊन असले, तरी ते केवळ आपल्याच भागापुरते मर्यादित आहेत. थोडक्‍यात प्रचाराची सारी धुरा ही ब्रह्मांड नायक, त्यांचे सहनायक आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या खांद्यावरच ठेवण्यात आलेली आहे. बाकीच्या कुणालाही फारसा वाव ठेवण्यात आलेला नाही.
त्यामुळे ब्रह्मांडनायकच सर्व जबाबदारी घेत असल्याने बाकीची मंडळी आरामात दिल्ली ‘एन्जॉय’ करीत आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली हे त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे तसेही फारसे बाहेर जात नाहीत. त्यांना दिल्लीत बसून ब्लॉग लिहून कधी राहुल गांधी, सीबीआय प्रमुख, रिझर्व बॅंक प्रमुख वगैरेंची चेष्टा, टिंगल टवाळी करण्याची जबाबदारी आहे. हे नसेल तेव्हा अर्थव्यवस्था कशी भराऱ्या घेत आहे याचे काल्पनिक चित्र रंगविण्याचेही काम आहे. इमानेइतबारे ते हे काम करीत असतात. थोडक्‍यात ब्रह्मांडनायक आणि सहनायक हे ते सोडून अन्य कुणालाही प्रकाशझोतात येऊ देण्यास तयार नाहीत! वाह क्‍या बात है? पूर्वी क्रिकेटपटू कपिलदेव पामोलिन क्रीमच्या जाहिरातीत म्हणत असे त्या चालीवर, ‘दोनो नायकों का जवाब नही !’  

संबंधित बातम्या