कट्टा

कलंदर
सोमवार, 18 मार्च 2019

कट्टा
राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...
 

श्रेयासाठी धडपड
एखाद्या गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी धडपड, घायकुतीला येणारे अनेकजण असतात. अशा लोकांबद्दल कुणाचे मत चांगले नसते. कारण कसेही करून श्रेय घेणे, ज्याला ‘श्रेय उपटणे’ म्हणतात, ती त्यांची प्रवृत्ती असते. त्यातही अर्धवट कामे करायची आणि त्यांची उद्‌घाटने करून त्याचे श्रेय घेणारी मंडळी तर धन्यच असतात. सध्या अशांची केवळ चलतीच नाही, तर हे प्रकार बिनदिक्कतपणे करणारे राष्ट्रीय नेतृत्वच अशा लोकांना लाभले आहे. तीनच उदाहरणे देण्यासारखी आहेत. 
पश्‍चिम उत्तर प्रदेशातील कैराना येथे लोकसभेची पोटनिवडणूक होती. पोटनिवडणुकीच्या प्रचाराला पंतप्रधान जात नाहीत. पण विजयाची लालसा किंवा पिपासा एवढी तीव्र होती, की कैरानाच्या शेजारून जाणारा जो दिल्ली-मेरठ एक्‍स्प्रेस हायवे होता, त्याचे केवळ साडेसात किलोमीटरचे काम पूर्ण झालेले असूनही ब्रह्मांडनायकांनी त्याच अर्धवट पूर्ण झालेल्या महामार्गाचे उद्‌घाटन करण्याचा घाट घातला. भर उन्हात लोकांना उभे करून स्वतः गाडीत उभे राहून हात हलवत त्यांनी सर्व काही पार पाडले. रस्त्याचे काम अजून सुरूच आहे.
इंडिया गेट शेजारी एक ‘वॉर मेमोरिअल’ किंवा ‘युद्धस्मारक’ बांधण्याचा घाट या सरकारने घातला होता. यांना शांतता स्मारके नको असतात. युद्धाची खुमखुमी त्यांना आहे. इंडिया गेट शेजारची मोकळी जागा त्यांना खुपली असावी, म्हणून तेथे युद्धस्मारक उभारण्याचा घाट घालण्यात आला. इंडिया गेटपाशी ‘अमर जवान ज्योती’ स्मारक असतानाही केवळ स्वतःची वेगळी टिमकी बडवण्यासाठी या युद्ध स्मारकाचा अट्टहास करण्यात आला. काम जोरात सुरू झाले आणि आता निवडणूक जवळ येऊ लागल्याचे दिसताच आणि बालाकोटची हवाई मोहिमेची पर्वणी साधून ब्रह्मांडनायकांनी युद्ध स्मारकाच्या उद्‌घाटनाचा सोहळा आयोजित केला. खरे तर राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रपती हे सेनादलांचे सर्वोच्च प्रमुख (सुप्रिम कमांडर) असतात. पण त्यांना फाट्यावर मारण्यात आले. ब्रह्मांडनायकांनी उद्‌घाटन केले, मानवंदना घेतली व जेवढा बडेजाव मिरवता येईल तेवढा मिरवला. 
पण अजूनही या स्मारकाच्या भोवतालच्या जमिनीचे सपाटीकरण सुरूच आहे. हिरवळ लावण्याचे काम सुरू आहे आणि इतरही बरीच कामे चालू आहेत. आणखी एक प्रसंग!  संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्यात आले. समारंभ झाला. तेथेही ब्रह्मांडनायक... आपण आता त्यांना विश्‍वगुरू म्हणू! तर विश्‍वगुरूंचे भाषण वगैरे झाले. दुसऱ्या दिवशी तैलचित्र गायब! 
हे कसे काय झाले म्हणून चौकशी सुरू झाली. तेव्हा कळले की तैलचित्र घाईघाईत काढण्यात आल्याने त्यात खूप त्रुटी राहिल्या होत्या आणि त्यामुळे ते पुन्हा सुधारण्यासाठी चित्रकाराकडे पाठविण्यात आले आहे. आता याला काय म्हणावे? 


सोडून चाललेली गर्दी?
एकेकाळी विष्णुअवतारी ब्रह्मांड नायकांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे. 
ते २०१४ चे दिवस होते. लोकांना सर्व काही नवीन नवीन वाटत होते. त्यामुळे ब्रह्मांडनायकांना उदंड प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे 
त्यांची मुळातलीच ५६ इंची छाती आणखी विस्तारत असे. आता मात्र गर्दी आणि बहुधा त्यामुळे त्यांची छाती आक्रसू लागल्याचे दिसू लागले आहे. 
पाटण्याला ‘एनडीए’ची म्हणून एक मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीसाठी ‘एनडीए’ ऊर्फ ‘भाजप आघाडी’तर्फे प्रचाराचा बिगूल फुंकण्यासाठी ही सभा होती. या राज्यात भाजप व नीतिशकुमारांचा संयुक्त जनता दल यांचे संयुक्त सरकार आहे. संयुक्त जनता दलाने आपली गर्दी जमवली होती. पण भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्येच इतके मतभेद होते, की गर्दी जमवायची कुणी यावरच वाद होऊन अखेरीला भाजपची गर्दी जमूच शकली नाही. हे मतभेद इतके विकोपाला गेले होते, की या सभेत भाजपच्या एका कार्यकर्त्याने, ‘गर्दी का जमवली नाही’ अशी विचारणा करणाऱ्या स्थानिक नेत्याच्या भर सभेतच श्रीमुखात भडकवली. हे नेते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. 
ही सर्व मारामारी राहू द्यात बाजूला! या सभेसाठी गर्दी न जमल्याने नेतेमंडळी विलक्षण नाराज झाली. राष्ट्रीय अध्यक्षांनी जाब विचारल्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी टाळाटाळ, एकाने दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचे प्रकार सुरू झाले. ज्या गाजावाजाने ही सभा घेण्याचा प्रयत्न झाला तो फसला. 
गर्दीअभावी अर्धवट भरलेल्या मैदानातच ब्रह्मांडनायकांना भाषणबाजी करावी लागली. 
आता पाटण्यातून दिल्लीजवळ उत्तर प्रदेशाच्या हद्दीत येणाऱ्या हिंडन येथे जाऊ. 
तेथे ब्रह्मांडनायकांची सभा झाली. दोन-तृतीयांश मैदान रिकामे होते. चाळीस-पन्नास हजारांची गर्दी आणि कहर म्हणजे ब्रह्मांडनायक बोलायला उभे राहिल्यानंतर जमलेल्या लोकांपैकी काहीजण गटागटाने सभा सोडून निघून जाऊ लागले. ब्रह्मांडनायकांना हा धक्का होता. खुद्द वाराणसीमध्येदेखील त्यांच्या सभेतून लोक निघून जायला लागल्यावर त्यांना स्वतःला लोकांना बसण्यासाठी मिनतवाऱ्या कराव्या लागल्या होत्या. 
नाटक हे नाटक असते. दीर्घकाळ ते चालू शकत नाही. बहुधा आता लोकांना हे नाटक असल्याचे कळायला लागले आहे. 


डिजिटलचे धिंडवडे?
निवडणूक आयोगाची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करणारी पत्रकार परिषद राजधानीतल्या आलिशान अशा विज्ञान भवनात पार पडली. ही पत्रकार परिषद अत्यंत ढिसाळ पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त अडखळत बोलत असल्याने त्यांचे शब्दोच्चारही पत्रकारांना स्पष्ट ऐकू येत नव्हते. त्यात मुख्य निवेदन करण्यातच त्यांनी इतका वेळ लावला, की प्रश्‍नोत्तरासाठी पत्रकारांना फारसा उत्साहच राहिला नव्हता. तरीदेखील पत्रकारांनी नेटाने प्रश्‍न विचारले. त्यामुळे पत्रकार परिषद नको तेवढी लांबली. 
एवढ्या वेळात आयोगाच्या निवेदनाच्या प्रती तयार ठेवणे शक्‍य होते. पण ते घडले नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांनी प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल आणि पत्रकारांना ‘सॉफ्ट कॉपी’ उपलब्ध होईल असे सांगितले. परंतु, जवळपास दीड तासांच्या विलंबाने पत्रकारांना निवडणुकीबाबतचे पूर्ण वेळापत्रक, तपशील व आयुक्तांचे निवेदन उपलब्ध झाले. या उशिराने वैतागलेल्या पत्रकारांनी आयोगाला असंख्य निरोप पाठवून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. 
पूर्वी संगणक किंवा डिजिटल किंवा सॉफ्ट कॉपी वगैरे गोष्टी उपलब्ध नसतानादेखील पत्रकार परिषद संपता संपता पत्रकारांना छापील स्वरूपातील प्रसिद्धिपत्रक, वेळापत्रक व आयुक्तांचे निवेदन यांच्या प्रती उपलब्ध करून दिल्या जात असत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले.
‘डिजिटल इंडिया हाच काय?’ असे असंख्य खोचक प्रश्‍नही आयोगाला विचारण्यात आले. वस्तुतः या सर्व गोष्टी आधीच तयार करून ठेवण्याची पद्धत आहे आणि आयुक्तांचे निवेदन संपताक्षणी ते वेबसाइटवर अपलोड करणे अपेक्षित असते. परंतु यावेळी पूर्ण अनागोंदी होती. 


प्रियंकांचा धसका?
प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकरणप्रवेशाचा धसका सत्ताधारी पक्षाने घेतला असावा. कानोकानी मिळालेल्या माहितीनुसार सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख प्रियंका गांधी असा न करता ‘प्रियंका वद्रा’ करावा अशी अलिखित, अनौपचारिक सूचना व आदेश जारी करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्यासंबंधीची एखादी बातमी आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून देताना त्यांचे ‘गांधी’ हे आडनाव मुद्दाम वगळण्यात येते. न जाणो, ‘गांधी’ नावामुळे त्यांची ओळख पटून त्यांचाच प्रचार व प्रसार व्हायचा. त्यापेक्षा लोकांच्या चटकन लक्षात येऊ नये यासाठी ‘प्रियंका गांधीं’ऐवजी ‘प्रियंका वद्रा’ नाव उच्चारून त्यांचा प्रभाव कमी कसा होईल हे पाहण्याची ही केविलवाणी धडपड सुरू आहे. एवढेच नव्हे, तर सत्तापक्षाची बांडगुळे असलेल्या वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे यांनाही प्रियंका यांच्या नावापुढे ‘गांधी’ न लावता मुद्दाम ‘वद्रा’ लावून त्यांची ओळख जनतेपर्यंत फार जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते. 
अरेरे! केवढी ही धास्ती! केवढा हा धसका! ताज्या माहितीनुसार, प्रियंका गांधी या दक्षिण भारताचा दौरा करणार आहेत आणि इंदिरा गांधी यांच्याशी साम्य दाखविणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे तेथील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे कळते. त्यामुळेच धास्तावलेल्या सत्तापक्षाने या अशा हलक्‍या काड्या करून कद्रूपणा करायला सुरुवात केली आहे. 


जूते और जात? 
मारामाऱ्या, दंगे, हिंसाचार यातही 
जातीचा खेळ कसा होतो याचा हा किस्सा आहे... 
उत्तर प्रदेशात भाजपच्या एका खासदाराने भाजपच्याच एका आमदाराला चपलेने बदडले आणि मग त्या आमदारानेही त्या खासदाराला दोन-तीन टोले लगावले. ही दृश्‍ये सर्वांनी टीव्हीवर पाहून त्याचा निर्मळ आनंद घेतलेलाच आहे. 
आता तो आनंद आणखी द्विगुणित करा! 
या घटनेचे वेगळे पडसाद उत्तर प्रदेशाच्या राजकारणात पडत आहेत. 
चप्पलमारू खासदारसाहेबांचे नाव होते 
शरद त्रिपाठी. ते ब्राह्मण! ज्याने मार खाल्ला ते आमदार राकेशसिंग बाघेल. ठाकूर म्हणजेच राजपूत! 
सध्या उत्तर प्रदेशात ‘ठाकूर राज’ असल्याचे बोलले जाते. म्हणजेच योगी आदित्यनाथ हे ठाकूर असल्याने त्यांच्या राज्यात ठाकुरांना भरपूर झुकते माप आहे. हे आमदार महोदयही मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असल्याचे सांगितले जाते. या ‘ठाकूर राज’मुळे उत्तर प्रदेशातला ब्राह्मण समाज प्रचंड नाराज आहे. इतका, की तो भाजपच्या विरोधात जाण्यास तयार झाला आहे. 
या पार्श्‍वभूमीवर त्रिपाठी (ब्राह्मण) महाशयांनी एका ठाकुराला बदडल्याने ब्राह्मण समाज (उत्तरेत त्यांना सरसकट पंडित म्हटले जाते) म्हणजे ‘पंडित वर्ग’ विलक्षण समाधानी आहे. 
या मारामारीचा आगामी लोकसभा निवडणुकीत काही परिणाम होईल काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. 
सध्या उत्तर प्रदेशात पंडित वर्गाला जी दुय्यम वागणूक मिळत आहे, त्याचा काही परिणाम तर मतदानावर होणार आहे, असे खात्रीशीरपणे सांगितले जाते. उत्तरेत सर्वसाधारणपणे पंडित मंडळी ही भाजपचे समर्थक मानले जातात. परंतु कारणे अशी काही घडतात आणि एखादा समाज दुरावतो तसा काहीसा हा परिणाम आहे. उत्तर प्रदेशात सामाजिक समतोल साधण्यासाठी भाजपने मुख्यमंत्रिपद ठाकूर समाजाला दिलेले असले तरी प्रदेश अध्यक्षपद ब्राह्मण समाजाला दिले आहे. परंतु, मुख्यमंत्रिपद हे मुख्यमंत्रिपद असते. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत पंडित मंडळी काय करतात याकडे भाजपचे विशेष लक्ष आहे.   
 

संबंधित बातम्या