कट्टा

कलंदर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  

चाहते की भक्त?
अभिनेत्री दीपिका पदुकोनने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाऊन तेथील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या निर्घृण हल्ल्याच्या विरोधातील धरणे-निदर्शनात हजेरी लावली. त्यांनी तेथे केवळ पंधरा मिनिटे हजेरी लावली. भाषण केले नाही व मीडियाशीही त्या बोलल्या नाहीत. 
पण त्यांच्या या एका मूक-कृतीने त्यांच्या चाहत्यांच्या-फॅन्सच्या - संख्येत मात्र अतोनात वाढ झाल्याचे आढळून येते. त्यांनी मूक-हजेरी लावून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असा त्याचा अर्थ लावण्यात आला. त्यांच्या या कृतीवर उलटसुलट मते व्यक्त झाली. 
भाजपच्या प्रचारकांनी त्यांची ही कृती म्हणजे ‘प्रसिद्धीचा स्टंट’ होता अशी टीका केली. तर विद्यार्थ्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी त्यांच्या या कृतीचे स्वागत केले. खुद्द पदुकोन यांच्या व्यावसायिक सहकाऱ्यांनी म्हणजेच काही अभिनेत्रींनीदेखील त्यांच्यावर टीका केली. 
काही असो, दीपिका पदुकोन या चर्चेच्या व प्रसिद्धीच्या झोतात आल्या. याचवेळी त्यांचा ॲसिड हल्ला पीडित महिलांच्या समस्येवर आधारित चित्रपट ‘छपाक’ प्रदर्शित होत होता. या चित्रपटाचा विषय ज्वलंत असल्याने तोही चर्चेत होताच व त्यात पदुकोन यांच्या या कृतीने त्यात आणखी भरच पडली. अनेक संस्थांनी त्यांच्या चित्रपटाची घाऊक तिकिटे काढून तो पाहण्याचे उपक्रम सुरू केले. राष्ट्रीय लोकदलाचे तरुण नेते आणि चौधरी चरणसिंग यांचे नातू व अजितसिंग यांचे पुत्र जयंत चौधरी यांनी तर सर्वांवरच वरताण केली. त्यांनी एक सिनेमा हॉलच एका खेळासाठी भाड्याने घेतला व त्या खेळाची सर्व तिकिटे खरेदी केली. 
त्यांनी त्यांचे कुटुंबीय व इष्टमित्रांसह तो सिनेमा पाहिला. 
दीपिका पदुकोन यांच्या त्या पंधरा मिनिटांच्या मूक हजेरीचा हा जादूई परिणाम! जय हो! 


सीएए आणि वाचाळ दिंड्या 
‘सीएए’ ऊर्फ ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ वाजतगाजत लागू केला खरा, पण त्याला झालेला विरोध बहुधा सत्तापक्षाला अनपेक्षित असावा. 
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे होणारा विरोध काही किरकोळ अपवाद वगळता अत्यंत शिस्तबद्ध, अहिंसक आणि कायदेशीर आहे. यामुळे भक्तमंडळी विलक्षण पेचातही आहेत आणि भडकलेलीपण आहेत. 
या ‘सीएए’विरोधी आंदोलनाला आता बदनाम करण्याचा खुनशी डाव आता भक्तमंडळींनी सुरू केला आहे. हे आंदोलन देशविरोधी आहे, या आंदोलनाला पाकिस्तानची मदत आहे, पाकिस्तानधार्जिणे आंदोलन आहे येथपासून आंदोलनकारी देशद्रोही आहेत, गद्दार आहेत येथपर्यंत भक्तमंडळींनी त्यांची नेहमीसारखी घाणेरडी व गलिच्छ पातळी गाठली आहे. आंदोलनकारी मंडळींशी संवाद साधण्याऐवजी सत्ताधारी त्यांना दूषणे देणारी भाषणे करीत फिरत आहेत. दिल्लीची विधानसभा निवडणूक आता होत असल्याने त्यांच्या भाषणांमध्ये केवळ कडवेपणाच नव्हे तर विखारही प्रकट होत आहे. आंदोलनकारी लोकांना चिथावणी देण्याचे सर्व प्रयत्न वाया जात असल्याने आणि ते आपला शांतिपूर्ण सत्याग्रहाचा मार्ग सोडत नसल्याने भक्तमंडळी अक्षरशः पिसाळली आहेत. 
अर्थखात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत प्रचार करताना या आंदोलनकारी लोकांकडे निर्देश करताना घोषणा दिली, ‘देश के गद्दारों को’ आणि तत्काळ उपस्थित भक्तजमावाने, ‘गोली मारों सालों को’ म्हणून त्यांना प्रतिसाद दिला. केंद्रीय मंत्र्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण ते तर फारच लहान पडले! साक्षात गृहमंत्रीच या आंदोलनकारी मंडळींना पाकिस्तानी एजंट म्हणत असतील, तर अनुराग ठाकूर यांच्यासारखा कनिष्ठ मंत्री असलीच भाषा बोलणार! 
अनुराग ठाकूर हे वादग्रस्तपणा करण्यात सराईत आहेत. त्यांनी प्रादेशिक सेनेत प्रवेश केला होता. एक दिवशी हे महाशय चक्क सेनेच्या गणवेषात लोकसभेत हजर झाले. संसदीय नियमानुसार कुणाही संसदसदस्याला गणवेषात संसदगृहाच्या आतमध्ये प्रवेश नसतो. त्यांना गणवेषात पाहिल्यानंतर एकच गोंधळ झाला व लोकसभा अध्यक्षांनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचा आदेश दिला.  
काहीच न घडल्याच्या आविर्भावात ते बाहेर गेले. संसदीय सभ्यता, शिष्टाचारही न पाळणारा हा माणूस असल्याने त्यांच्या भाषेबद्दल काय बोलावे? दिल्लीचे आणखी एक खासदार प्रवेशसिंग वर्मा! हे महाशय दिल्लीचे माजी दिवंगत मुख्यमंत्री साहेबसिंग वर्मा यांचे चिरंजीव व सध्या ते लोकसभेत आहेत. त्यांनी या आंदोलनकारी लोकांबद्दल आणखी खालची पातळी गाठली. ते म्हणाले, ‘हे लोक उद्या तुमच्या घरात घुसतील आणि तुमच्या आयाबहिणींवर बलात्कारही करतील!’ 
ही सर्व भाषणे चित्रित आहेत व त्याचे पुरावेपण आहेत. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्या चित्रफितीपण मागवल्या आहेत. 
पण........! हा ‘पण’ महत्त्वाचा आहे कारण निवडणूक अधिकारी या सत्तापक्षाच्या नेत्यांवर कारवाई करू शकणार आहेत काय? 
पक्षपाती यंत्रणांची अशी निःपक्ष कारवाई करण्याची क्षमता राहिली आहे काय असा प्रश्‍न आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांना बेदम बदडणाऱ्या गुंडांच्या चित्रफिती दिल्ली पोलिसांकडून गायब केल्या जात असतील आणि त्याबाबत हात वर केले जात असतील, तर या दोन नेत्यांच्या विरोधात कारवाईची अपेक्षा हा वेडगळपणा आहे. वरपासून खालपर्यंत सर्व यंत्रणा पक्षपाती व भेदभाव करणाऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळेच आता न्याय मिळणेही दुरापास्त झाले आहे. 
जेव्हा न्याय दुर्मीळ होतो, ती हुकूमशाहीची सुरुवात असते! 


प्रचाराचे ‘तारे’ अद्याप ढगातच?
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे अद्याप म्हणावे तसे वातावरण आढळून येत नाही. या निवडणुकीवर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अशी काही छाया पडलेली आहे, की प्रचाराला म्हणावा तसा जोरच येताना दिसत नाही. 
‘आम आदमी पार्टी’ ऊर्फ ‘आप’चा जोर त्यांनी केलेली गेल्या पाच वर्षातील कामगिरी, विकास व प्रगतीवर आहे. 
भाजपने नागरिकत्व दुरुस्ती कायदा, भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान हे नेहमीचे धार्मिक ध्रुवीकरणाचे व भावना भडकाविणारे मुद्दे घेतले आहेत. काँग्रेस पक्ष असून नसल्यासारखा आहे. 
पण प्रचारासाठी आप आणि भाजपने जी ‘स्टार-प्रचारकां’ची यादी जाहीर केली होती, त्यातील प्रमुख ‘स्टार’ अद्याप बाहेर येऊन तळपताना दिसत नाहीत आणि बहुधा ते ढगात झाकोळलेले असावेत. 
भाजपतर्फे सध्या एकच तारा चमकतोय व तो म्हणजे सर्वशक्तिमान अमितभाई शहा, म्हणजेच आधुनिक पोलादी पुरुष व गृहमंत्री! 
खरे तर भाजपने करण्यात आलेल्या घोषणेनुसार सर्वशक्तिमान शहा यांच्याबरोबरीने ब्रह्मांडनायक ऊर्फ देशाचे पंतप्रधान हे दोघेच स्टार प्रचारक असतील असे म्हटलेले होते. सध्या सर्वशक्तिमान शहाच प्रचार करताना दिसत आहेत. 
शहा यांनी २० जानेवारीला पक्षाचे अध्यक्षपद अधिकृतपणे सोडले. पण त्यांची जागा घेणाऱ्या जगतप्रकाश नड्डा यांना दिल्लीच्या प्रचारात फारच थोडा वाव ठेवण्यात आल्याचे दिसते. सगळीकडे सर्वशक्तिमान शहाच दिसत आहेत. ते सर्वशक्तिमान असल्याने साहजिकच त्यांना त्यानुसारच जोरदार प्रसिद्धी मिळत आहे, तसेच प्रसिद्धीसाठी प्रक्षोभक विधाने करण्याचे ‘कौशल्य’ही त्यांनी आत्मसात केले आहे. 
ब्रह्मांडनायक बहुधा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर झाल्यानंतर प्रचाराच्या रणधुमाळीत उतरतील! 
थोडक्‍यात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातील लोकांना खुलवणाऱ्या तरतुदींच्या आधारे जनतेला आणखी भ्रमित करण्याची त्यांची योजना राहील. 
पण बिच्चारे नड्डाजी! त्यांना या दोन ताऱ्यांमधून कोणतीच संधी मिळताना दिसत नाही! ते या दोन ताऱ्यांमुळे निष्प्रभ व झाकोळलेलेच राहण्याची चिन्हे आहेत! 


अर्ध्या रात्रीसुद्धा मदतीला तत्पर
काही नेते किंवा मंत्री साधे असतात आणि फारसा बडेजाव न करताही आपापली कामे इमानेइतबारे करीत असतात. 
असाच काहीसा प्रकार नुकताच घडला. 
केंद्रीय शिक्षण मंत्रालय किंवा नव्या भाषेत मनुष्यबळविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय शालेय बॅंड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातील सुमारे १६ शाळांनी त्यात भाग घेतला होता. सुमारे चारशे विद्यार्थी व विद्यार्थिनींचा त्यात समावेश होता. एवढ्या मुलामुलींच्या निवासाची सोय करणे हे एकप्रकारे अवघडच असते, परंतु ठिकठिकाणी या मुलांची सोय करण्यात आली होती. केरळमधील कन्नूर येथील एका शाळेच्या मुलींची व्यवस्था राष्ट्रीय बाल भवन येथे करण्यात आली होती. 
परंतु हिवाळ्यात दिल्लीत परिसंवाद, परिषदा यांची प्रचंड गर्दी असल्याने निवास व्यवस्थेवर मोठा ताण असतो. स्पर्धा संपल्यानंतर कन्नूरच्या शाळेतील या २६ मुली व त्यांचे शिक्षक एक दिवस आणखी राहून परतणार होते. 
पण आदल्या रात्रीच त्यांना जागा सोडण्यास सांगण्यात आले. 
दिल्लीच्या कडाक्‍याच्या थंडीत या शाळकरी मुलींना कुठे घेऊन जाणार या विवंचनेत शिक्षकमंडळी होती. मग शिक्षकांनी कन्नूरचे खासदार के. सुधाकरन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना अडचण सांगितली. हे सर्व होईपर्यंत मध्यरात्र झाली होती. 
सुधाकरन यांनी मनुष्यबळविकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांना मध्यरात्री फोन केला आणि अवेळी फोन करीत असल्याबद्दल प्रथम माफी मागितली, पण अडचण गंभीर असल्याने फोन केल्याचे सांगितले व या मुलींना बाल भवन येथेच राहू द्यावे अशी विनंती केली. धोत्रे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्या मुलींच्या निवासाची सोय तेथेच करण्याचा आदेश दिला. 
यामुळे त्या मुलींना ऐन थंडीत व मध्यरात्री दिल्लीसारख्या ठिकाणी कुठेतरी निवास शोधत बसण्याचा अनास्था प्रसंग टळला. सगळ्यांनी धोत्रे यांना धन्यवाद दिले. 
धोत्रे हे अतिशय साधेपणाने राहणारे आणि कोणताही बडेजाव न करणारे मंत्री आहेत. भाजपमधील जमिनीवर पाय असलेल्या मोजक्‍या मंत्र्यांपैकी ते एक आहेत. बहुधा त्यामुळेच त्यांनी त्या लहान मुलींची अडचण तत्काळ दूर केली! 
जय हो!    

संबंधित बातम्या