कट्टा

कलंदर
सोमवार, 18 मे 2020

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  

धूसरता.... अफवा!
पारदर्शक राज्यकारभारात फारशा अफवा पसरत नाहीत किंवा तसा वावही मिळत नाही कारण सर्वच खुलेपणाने होत असते. धूसर आणि बंदिस्त वातावरण अफवांना अत्यंत पोषक असते. कारण कुणाला फारसे काही माहिती नसते व अगदी मोजक्‍याच व मूठभरांच्याच हातात सूत्रे असतात, त्यामुळे बाकीच्यांना केवळ अटकळबाजीखेरीज दुसरा पर्याय रहात नाही.
ताजेच उदाहरण घ्या ना! ते उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांचे! ते गंभीर आजारी असल्यापासून त्यांचे निधन झाल्यापर्यंत अफवाच अफवा! अगदी त्यांचे संभाव्य वारसदार कोण याचीही चर्चा लोकांनी केली. अखेर किम यांनी चीनच्या अध्यक्षांशी संभाषण केले, स्वतःचे काही फोटो प्रसिद्ध केले व त्यानंतर त्यावर पडदा पडला.
भारतात कोरोनाच्या आक्रमणातच देशाचे द्वितीय पोलादी पुरुष केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या प्रकृतीबद्दल अशाच अफवा पसरल्या. त्या इतक्‍या वाढल्या, की अखेर खुद्द अमितभाई शहांनी ट्विट करून त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत असल्याचे ठणकावून सांगितल्यावर लोकांची तोंडे बंद झाली.
अफवांचे प्रकार तरी किती?
शहांना मधुमेह आहे आणि तो बळावला आहे. तर अन्य काही अफवाखोरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मानेत गाठ झाली असून ती कर्करोगाची असावी वगैरे वगैरे.
एक गोष्ट मात्र खरी आहे, की कोरोनाच्या आक्रमाणापूर्वीपासूनच अमितभाई जरा प्रकाशझोतापासून बाजूला गेल्यासारखे वाटत होते. विशेषतः महाराष्ट्रातील घडामोडी आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ते आणखी बाजूला गेले. दिल्ली दंगलींनंतर ते आणखी सूक्ष्मात गेले. यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या गावगप्पांना जोर चढला होता.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीच्यावेळीच दिल्लीत दंगली झाल्याने पंतप्रधान विलक्षण नाराज झाले. तर काहींनी ट्रम्प भेटीला गालबोट लागावे म्हणून त्या घडवून आणल्या असेही बोलले जाऊ लागले. त्यात अमितभाईंनी प्रसिद्धीपासून स्वतःला दूर केल्याने या गप्पांना आणखी जोर चढणे स्वाभाविक होते.
कोरोनाचे आक्रमण सुरू झाले. मग काय सर्व प्रकाशझोत पंतप्रधान साहेबांवरच येणे अगदी स्वाभाविक होते. पहिले काही दिवस सबकुछ पंतप्रधान साहेबच होते. त्यामुळे अमितभाईही फारसे पुढे आले नव्हते. त्यातच या अफवाही सुरू झाल्या. काही मंडळींनी तर एक पाऊल पुढे जाऊन लवकरच मंत्रिमंडळातही फेरबदल होणार आणि बहुधा अमितभाईंनाही बदलले जाईल असेही पसरविण्यास सुरुवात केली.
आपल्या या माहितीस बळकटी आणण्यासाठी या मंडळींनी असेही सांगायला सुरुवात केली, की पहा, अमुक दोन तीन मंत्री हे पार पडद्याआड होते पण आता कसे जाहीरपणे पुढे येऊन बोलायला लागले आहेत आणि त्यांना प्रसिद्धीही मिळत आहे!
हे सर्व झाल्यावरच अमितभाईंनी मग या अफवांना मूठमाती देण्यासाठी कंबर कसली. प्रथम त्यांनी त्यांचा रोजचा कार्यक्रम काय असतो याची बातमी प्रसारित केली. ते सकाळी साडेआठ वाजता ऑफिसात कसे येतात आणि रात्री उशीरापर्यंत कसे काम करतात वगैरे वगैरे. घरीसुद्धा त्यांनी एक कंट्रोलरुम स्थापन केल्याची माहितीही त्यांनी दिली. तरीही अफवा थांबेनात तेव्हा त्यांनी ट्विट केले आणि सर्व काही ‘अंडर कंट्रोल’ असल्याचे आणि ते अगदी पूर्णपणे ठणठणीत असल्याची ग्वाही दिली.
हुश्‍श! काय लोक तरी? काय अफवा पसरवतील कुणास ठाऊक?

लोकसभा अध्यक्षांचा नवा उपक्रम
लोकसभा अध्यक्ष ओम बिडला हे एक वेगळेच व्यक्तिमत्व आहेत. सतत नावीन्याच्या शोधात ते असतात. काहीतरी नवनवीन कल्पना ते राबवताना आढळतात. आता त्यांनी एक ताजी कल्पना मांडून त्यावर अंमलबजावणीही सुरू केली आहे.
लोकसभा टीव्हीवर येणारे वरिष्ठ पत्रकार तसेच संसदेचे वार्तांकन करणारे वरिष्ठ पत्रकार म्हणजे ज्यांनी किमान वीस-पंचवीस वर्षे संसदेचे वार्तांकन केले आहे असे पत्रकार, तसेच त्या पत्रकारांच्या वृत्तपत्र किंवा वाहिनीचे मुख्य संपादक आणि त्यांचे मालकही यांची माहिती त्यांनी गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
यासंदर्भात काही वरिष्ठ पत्रकारांकडे फोन तसेच निरोप आले, की आपण आपले पूर्ण नाव, हुद्दा, संस्थेचे नाव, मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि विवाहाची तारीख ही माहिती तत्काळ पाठवावी.
खरे तर ही जवळपास सर्व माहिती लोकसभा सचिवालयाकडे असतेच. त्यामुळे हा नवीन प्रकार काय आहे म्हणून काही पत्रकारांनी संबंधितांकडे विचारणा केली. काही पत्रकारांना तर या निरोपाच्या विश्‍वसनीयतेबद्दलही शंका आली. त्यामुळे खातरजमा करून घेतली असता हा निरोप अगदी खरा असल्याचे निष्पन्न झाले.
मात्र या माहितीत विवाहाच्या तारखेचे औचित्य काय अशी विचारणा पत्रकारांनी केलीच. त्यावर मिळालेली माहिती अशी, की लोकसभा अध्यक्षांनी वरिष्ठ पत्रकारांची माहिती घेतानाच अशी कल्पना अधिकाऱ्यांपुढे मांडली, की हे पत्रकार एवढे वरिष्ठ आहेत तर आपण संसदेतर्फे त्यांचा जन्मदिन तसेच विवाहतिथीनिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे? लोकसभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांना शुभेच्छा देणे हा एक चांगला उपक्रम होऊ शकतो.
उपस्थित अधिकारीगणांनी माना डोलावल्या आणि ‘व्वा फारच चांगली कल्पना आहे,’ अशी प्रशस्तीही जोडली.
मग काय लोकसभा सचिवालयातील कर्मचारीगण कामाला लागला. सर्वत्र निरोप गेले आणि माहिती गोळा करण्यास प्रारंभ झाला.
याला म्हणतात कल्पनाशक्ति आणि प्रतिभा आणि नावीन्याची हौस!
जय हो!

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची लाट?
कोरोना विषाणूमुळे अनेक नवनव्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग! देशाचे पंतप्रधानसाहेब यांनी तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्याची राष्ट्रीय मोहीमच सुरू केली आहे. जवळपास रोजच ते सतत कुणाबरोबर तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करीतच असतात. नेत्याचे अनुकरण करण्याची लागण फार पूर्वीपासूनच आपल्या देशात झालेली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत या लागणीची प्रखरता किंवा तीव्रता विलक्षण वाढलेली दिसते. नेता जसा बोलतो, वागतो, हातवारे करतो त्याचे अनुकरण करायचे! कोरोनाच्या आक्रमणानंतर देशाचे पंतप्रधानसाहेब त्यांच्या घराबाहेरही पडलेले नाहीत आणि आपल्या घरात बसूनच त्यांनी राज्यकारभाराचे सारथ्य आणि देशाचे नेतृत्व चालवले आहे. फारच जबरदस्त! पण हो, लॉकडाऊन आहे ना? पंतप्रधान बाहेर कसे पडू शकणार? तेही खरेच की! मात्र, पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल टाकून इतर मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची आयडिया हुबेहूब अमलात आणायला सुरुवात केली. कारण तेही घराबाहेर कसे पडणार?
मंत्र्यांचे सोडा, लोकसभा अध्यक्षांनीदेखील देशातील विधानसभा अध्यक्षांबरोबर, तसेच काही परदेशी पीठासीन अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून अनुभवांचे आदानप्रदान केले. या स्पर्धेत भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा मागे कसे राहतील? त्यांनीही त्यांच्या निवासस्थानातून देशभरातील भाजपचे नेते व कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून संपर्काचा सपाटा लावला. भाजपचे खासदार, मग राज्याराज्यातले आमदार, भाजपची सरकारे असलेले मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिगण, भाजपच्या प्रदेश शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी अशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची आवर्तनेच त्यांनी सुरू केली.
महाष्ट्रातदेखील भाजपचे माजी मुख्यमंत्री हे अद्याप मुख्यमंत्र्यांप्रमाणे आचरण करीत असून तेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अफाट वापर करीत असल्याचे कानावर आले. आता ही लाट आल्याने थोडीफार गडबड होणारच. प्रथम काही मंत्र्यांनी ‘झूम’ ॲपचा वापर सुरू केल्यावर गृहमंत्रालयाने ते सुरक्षित नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे संरक्षणमंत्र्यांनीच या ‘झूम’द्वारे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी संवाद साधला होता. पण तो प्रकार बंद झाला. पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, कॅबिनेट सेक्रेटरी, गृहसचिव ही सर्व मंडळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा यथेच्छ उपयोग करीत आहेत.
बहुधा हळूहळू राज्यकारभारच या पद्धतीने सुरू होणार काय अशी शंका येऊ लागली आहे!

मद्यापेक्षा खरेदीची धुंदी पडली महागात!
करायला गेलो एक आणि झाले दुसरेच! तब्बल चाळीस दिवसांच्या बंदीनंतर देशातल्या मद्य दुकानांना जाग आली. त्या दुकानांवर मद्यप्रेमी तुटून पडणार हे अपेक्षितच होते आणि मद्यप्रेमींनी अपेक्षाभंग केला नाही! चाळीस दिवसांची तहान भागवायची म्हणजे काय?
सकाळी सहा वाजल्यापासून शारीरिक दुरीकरणाचे नियम धाब्यावर बसवून आणि काही ठिकाणी तर एकमेकांच्या खांद्यावर चढून मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यासाठी त्यांनी आपली बाजी लावली. या गोंधळामुळे आणि पाहता पाहता मद्यसाठा संपल्याने अनेकांना आपली तहान न भागवताच निराशेने परतावेही लागले. पण काही नशीबवान ठरले. खरे तर त्यांना ‘मद्यवान’ म्हणायला लागेल, कारण त्यांना मद्याच्या बाटल्या खरेदी करण्यात यश मिळाले होते आणि त्या खुशीची धुंदीच त्यांना अधिक चढली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
एका ‘मद्यवान’प्रेमीने मद्यखरेदीचे बिल सोशल मीडियावर झळकविले. ते बिल होते ५२ हजार ८४१ रुपयांचे! सोशल मीडियावर त्या बिलाची बरीच रसभरित चर्चाही झाली. पण सरकारी बाबू काही नशेत नव्हते. त्यांची तीक्ष्ण नजर सर्वत्र असते. एक्‍साईज किंवा अबकारी शुल्क विभागाच्या नजरेत हे बिल आले. मग काय ते लागले कामाला! कारण नियमाप्रमाणे एका व्यक्तीला २.३ लिटर मद्य आणि १८.२ लिटर बियर एवढाच कोटा जाहीर करण्यात आला होता. म्हणजेच या मद्यवान महाशयांनी काहीतरी तिकडम केल्याचे स्पष्ट झाले होते. मग काय एक्‍साईजचे दूत तत्काळ संबंधित दुकानाकडे रवाना झाले...! आता पुढे काय झाले असेल त्याचा अंदाज प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार लावावा!

मंद मंद मंदावत जाणारी माहिती...!
कोरोना विषाणूच्या आक्रमणाच्या मुकाबल्यासाठी राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाली. पहिल्या दोन टप्प्यात सरकार विलक्षण आक्रमक होते आणि दररोज आरोग्य विभागातर्फे माध्यमांना ताजी आकडेवारी पुरवली जात असायची.
एवढ्या महत्त्वाच्या प्रसंगात खरे तर आरोग्य विभागाच्या सचिवाने येण्याची आवश्‍यकता होती, पण सहसचिवाच्या पातळीवरील अधिकाऱ्यांना पाठवून हे काम उरकण्यात येत होते. हे अधिकारी केवळ त्यांना आखून दिलेले निवेदन करण्यापलीकडे काही सांगायचे नाहीत आणि त्यांची ती कार्यकक्षाही नव्हती. त्यामुळे पत्रकारांची माहिती मिळवताना अतिशय अडचण होत असे.
आता तर तेही बंद करण्यात आले आहे. माहिती देण्याबाबत हे सरकार फारसे उत्साही नसते ही आतापर्यंत अनेक वेळा स्पष्ट झालेली गोष्ट आहे. एकेकाळी त्सुनामीच्या संकटासंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्री असलेले कपिल सिब्बल काही वेळा तर त्यांच्या अनुपस्थितीत नवीन चावला यांच्यासारखे वरिष्ठ सचिव पत्रकारांबरोबर वार्तालाप करायचे. कारगिल संघर्षाच्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आणि डीजीएमओ असे दोघेजण संयुक्तपणे पत्रकारांना माहिती देत असत. त्यामुळे पत्रकारांनादेखील सखोल माहिती या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून मिळत असे.
आता तसे काहीच राहिलेले नाही. फक्त सुमारबुद्धी आणि वाचाळ दिंड्या! गंमत म्हणजे आरोग्यमंत्र्यांना तर जवळपास पत्रकारांसमोरच येऊ दिले जात नाहीये! म्हणजे टीव्हीच्या पडद्यावर झळकण्याचा अधिकार या सरकारमध्ये फक्त एकमेवाद्वितीयांनाच आहे हे पुन्हा सिद्ध होत आहे. बिचारे हर्षवर्धन त्यांच्या खात्याची माहितीही ते पत्रकारांना देऊ शकत नाहीत असे केविलवाणे झालेत.
किती कोते आणि क्षुद्र मन?
अटलबिहारींच्या कवितेप्रमाणेच... छोटे दिलसे कोई बडा नही होता!
भारत महान!
 

संबंधित बातम्या