कट्टा

कलंदर
शुक्रवार, 29 मे 2020

कट्टा
राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  

अनुराग की अनुवाद?
गेल्या आठवड्यात बुधवार ते रविवार असे पाच दिवस भारतीय अर्थव्यवस्थेला जे उत्तेजक इंजेक्‍शनचे डोस देण्यात आले ते सर्वांनी टीव्हीच्या पडद्यावर पाहिले असेलच. टीव्हीवर दिसण्याच्या रोगाने राजकारणी नेहमीच ग्रस्त असतात. स्वप्रसिद्धीच्या रोगाला हिंदीत ‘छपास रोग’ म्हणतात. म्हणजे स्वतःच्या बातम्या छापून येण्याच्या लालसेचा रोग! आता वृत्तपत्रांबरोबर वृत्तवाहिन्याही सुरू झाल्याने या स्वप्रसिद्धी रोगाच्या तीव्रतेत आणखी वाढ झाली आहे. तर अर्थमंत्री आणि त्यांचे साहाय्यक म्हणजे अर्थ राज्यमंत्री हे दोघेही या पत्रकार परिषदा संबोधीत करीत असत. सव्वा ते दीड तास त्या चालत असत. ते सर्व पत्रकारांना सहन करण्याखेरीज इलाज नव्हता. छळ हा होता की अर्थमंत्री या इंग्रजीतून बोलत आणि लगेचच त्यांचे राज्यमंत्री त्याचा हिंदी अनुवाद करीत असत. यापूर्वी असले पोरकट प्रकार कुणाही मंत्र्याने किंवा कोणत्याही सरकारमध्ये झाले नव्हते. परंतु प्रसिद्धीचा हव्यास असा प्रखर असतो आणि त्याची तीव्रता अशी असते की बस्स!
गाण्याच्या क्षेत्रात सिंग बंधू. राजन-साजन मिश्रा, डागर बंधू किंवा सलामत अली खान-नजाकत अली खान यांच्या जोड्या जशा प्रसिद्ध होत्या तसाच हा काहीसा प्रकार मानावा लागेल. मुख्य गायकाने गायल्यावर दुसऱ्याने त्याची री ओढायची!
पण बाप रे! एक चूक झाली! डागर बंधू व सलामत अली व नजाकत अली हे मुस्लिम होते, त्यामुळे त्यांची उपमा सध्याच्या राज्यकर्त्यांना देणे हे पापच की हो! तर तेवढी चूक दुरुस्त करून टाका! तर ही जी काही जुगलबंदी आणि सवंगपणा पाच दिवस चालला त्यावर टीकाटिप्पण्या होणे अटळच होते. अर्थ राज्यमंत्र्यांचे नाव अनुराग ठाकूर आहे. सर्वांनी त्यांचे नाव ‘अनुराग’ नसून ‘अनुवाद’ ठाकूर असल्याचा विनोद करण्यास सुरुवात केली. आता हा विनोद आहे बरे का! नाही तर लगेच गुन्हा दाखल व्हायचा!
या पत्रकार परिषदांमध्ये अर्थमंत्र्यांना या सर्व योजनांना पैसा कोठून आणणार अशी सातत्याने विचारणा केली गेली असता त्यांनी त्यांच्या ‘सर्व जग तुच्छ’ भावनेने सतत ओथंबलेल्या चेहऱ्याने पत्रकारांना सांगितले, की शेवटच्या दिवशी त्या खुलासा करतील. परंतु मॅडम अर्थमंत्र्यांनी तो काही केला नाही. 
तोपर्यंत माध्यमांनी हे पॅकेज वगैरे नसून निव्वळ स्टंट आणि आहे त्याच योजनांची गोळाबेरीज असल्याची टीका सुरू केली होती. सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याच्या कलेत पारंगत व निष्णात असल्याचा दावा कधीतरी निष्फळ होतो.
आता ती वेळ आली आहे!

जित्याची खोड...!
दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा प्रवेश वर्मा हे नाव खूप चर्चेत... प्रकाशझोतात आले होते. हे महाशय दिल्लीतले सातपैकी एक खासदार आहेत. दिल्लीचे माजी व दिवंगत मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे ते पुत्र आहेत. साहिबसिंग वर्मा हे फारच लोकप्रिय नेते होते आणि भाजप व कट्टर रा. स्व. संघाचे प्रचारक असूनही त्यांनी कधी वादग्रस्त विधाने किंवा मुस्लिमांबद्दल कधीही प्रक्षोभक विधाने केली नव्हती. पण त्यांना प्रवेश वर्मा हे पुत्ररत्न प्राप्त व्हावे हे त्यांचे दुर्दैव म्हणायचे की काय हे कळत नाही.
तर, त्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी अशी काही वादग्रस्त व अतिशय विषारी अशी सांप्रदायिक विधाने केली होती. अखेर सरकारच्या ताटाखालचे मांजर झालेल्या निवडणूक आयोगालादेखील लाजेकाजेस्तोवर त्यांच्या या जहरी विधानांची दखल घ्यावी लागून त्यांना प्रचाराला मनाई करावी लागली होती. मुस्लिम द्वेष त्यांच्यात ठासून भरलेला आहे.
तर अशा या सांप्रदायिकता व मुस्लिमद्वेषाने ओतप्रोत प्रवेश वर्मा यांनी अलीकडेच एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये शुक्रवारच्या नमाजचा फोटो होता आणि त्याखाली त्यांनी लिहिले होते, की पहा, लॉकडाउनचे सर्रास उल्लंघन करून नमाज पढले जात आहे. दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारचा मुस्लिम अनुनय! त्यांच्या या ट्विटने काही काळ वादळ निर्माण केले. परंतु, जेव्हा पोलिसांनीही त्याची शहनिशा केली असता त्यांनी एक जुना नमाजचा फोटो टाकून हे ट्विट केल्याचे निष्पन्न झाले. नव्या कायद्यानुसार खोटी व बनावट माहिती प्रसारित करणे किंवा ट्विटरवरून सांप्रदायिक तेढ व वैमनस्य निर्माण करणे हे गंभीर गुन्हे मानण्यात आले असून त्यामध्ये तत्काळ अटकेची तरतूदही आहे. प्रवेश वर्मा यांचे ट्विट हे खोटे व बनावट माहिती पसरविणारे असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्यांना ते मागे घेण्यास सांगितले. त्यांनी ते डिलिट केले. पण त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. का? ते भाजपचे दिल्लीचे खासदार आहेत म्हणून? की खासदारांना चुकीची माहिती पसरविण्याची मुभा आहे? या देशात आता कायदे आणि न्यायसंस्थादेखील सत्तापक्षाला अनुकूल पद्धतीने वागायला लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. भेदभाव हा या प्रस्थापित राजसत्तेचा स्थायीभाव झालेला दिसतो. आता हेच उदाहरण पहा ना. प्रवेश वर्मा यांना अगदी गोडीगुलाबीने कारवाई न करता सोडण्यात आले. पण दिल्ली अल्पसंख्यक आयोगाचे प्रमुख झफरुल इस्लाम यांनी असेच एक ट्विट केले असता, ७२ वर्षांच्या या वृद्धाविरुद्ध देशद्रोह काय आणि आणखी भयंकर अशा अपराधाची कलमे लावून त्यांना सरळसरळ तुरुंगात डांबण्यात आले. दिल्ली पोलिसांचा म्हणजेच केंद्रीय गृह मंत्रालयाचा मुस्लिम विद्वेष व भेदभाव आणि दुटप्पीपणा किती पराकोटीचा आहे याचा हा पुरावा आहे, अशा आशयाचे ट्विट आम आदमी पार्टीचे नेते व केजरीवाल यांचे माजी मीडिया सल्लागार नागेंद्र शर्मा यांनी केले आहे. झफरुल इस्लाम यांनी ट्विट करून असे म्हटले होते, की मुस्लिम जगताकडे तक्रार करण्याइतके भारतीय मुस्लिमांना दाबू नका! एकदा का याची मर्यादा संपली तर भारतातल्या कट्टरपंथीयांना प्रपाताला (ॲव्हलान्श) म्हणजेच मुस्लिम जगताच्या महारोषाला तोंड द्यावे लागेल. या ट्विटबरोबर त्यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याबद्दलचा अपराध नोंदवून त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली. असा भेदभाव सध्या यथेच्छपणे आढळून येत आहे!
याच्या कर्त्याकरवित्यांबद्दल काय बोलावे?

आत्मनिर्भर ते गोबर...!
कोरोना विषाणूशी मुकाबला करता करता आपल्या सर्वांना आता ‘आत्मनिर्भर व्हा’ असा संदेश मिळाला आहे. याचा अर्थ आपण स्वदेशीला आणि स्वावलंबनाला महत्त्व द्यायचे असा होतो. या नव्या घोषणेचा गिरिराज सिंग या मंत्रिमहोदयांना फार आनंद झाला आहे. गिरिराजसिंग हे दुग्ध उत्पादने, पशुधन विभागाचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा पशुधनाशी संबंध असणे स्वाभाविक आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी विविध विधाने केलेली आहेत. एक तर कोरोनाशी लढण्याची क्षमता गो-गोबर, गोमूत्र यात आहे. याच संदर्भात त्यांनी संशोधक व शास्त्रज्ञांना याबाबत सखोल संशोधनाचा सल्लाही दिला आहे. याच मालिकेत त्यांनी गाईच्या शेणापासून म्हणजेच गोबरपासून साबण तयार करण्याची कल्पना मांडली आहे. हा साबण निर्जंतुकीकरणासाठी अत्यंत उपयोगी असेल असा त्यांचा दावा आहे.
तसेच गायीचे शेण पन्नास रुपये किलो दराने विकण्यात येईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असा आर्थिक सिद्धांतही त्यांनी मांडला आहे. पण गिरिराज सिंगच नव्हे तर आसाममधील एक भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनीदेखील गोबर आणि गोमूत्र यांचा कोरोना प्रतिबंधक म्हणून उपयोग करणे शक्‍य आहे व या द्रव्यांमुळे कॅन्सरवरही उपचार केले गेले आहेत असा दावा केलेला आहे. गिरिराज सिंग हेही प्रवेश वर्मा यांच्यासारखेच मुस्लिमविरोधी आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, भारतीय मुस्लिमांनादेखील पाकिस्तानात परत पाठवावे अशी ‘सोज्वळ’ विधाने केली होती. निवडणुकीनंतर काँग्रेसनेते तारिक अन्वर (गिरिराज व तारिक दोघेही बिहारचे आहेत) यांनी गिरिराज सिंग यांना मजेने विचारले, गिरिराजजी अब आप की सरकार आयी है अब हम को पाकिस्तान कब भेज रहे है? त्यावर गिरिराज काहीसे खजील झाले, पण तेवढाच विनोदीपणाचा आव आणून त्यांनी ‘सांगतो सांगतो’ म्हणून काढता पाय घेतला. तर मंडळी ‘आत्मनिर्भर’ आणि ‘गोबर’ याचा जवळचा संबंध आहे आणि आता गायीच्या शेणाच्या साबणाने आंघोळीची तयारी करा!

काही अपवादात्मक सुखद अनुभवही!
कोरोनामुळे सगळीकडे उदासीनता भरून राहिली आहे. लोकांना पद्धतशीरपणे घाबरवण्यात आले आहे. त्यामुळे बातम्याही सगळ्या मन खिन्न व उदास करणाऱ्याच येत आहेत. परंतु काळ्या रंगातच एखादा पांढरा ठिपका उठून दिसतो तसेच काहीसे हे चित्र! 
कोरोनामुळे असंघटित व स्थलांतरित कष्टकऱ्यांचे आतोनात हाल झाले. अगदी त्यांची अन्नान्न दशा झाली. त्यांना अन्न पुरविण्याची जबाबदारी अनेक स्वयंसेवी संघटनांनी घेतलीच. परंतु, युवक काँग्रेसने यात जी जोरदार कामगिरी केली तिची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. 
दिल्लीत संसदगृहाजवळच युवक काँग्रेसचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी गरीब व गरजूंना तीन पोळ्या, भाजी व पाण्याचा एक ग्लास अशी पाकिटे पुरविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी यामध्ये तंत्रज्ञानाचादेखील कल्पक उपयोग करून घेतला आहे. त्यांनी पोळ्या तयार करण्याचे यंत्रच युवक काँग्रेस कार्यालयात बसविले आहे. त्यामुळे वेळ व श्रमाची मोठी बचत होत आहे. अन्न पुरविण्याचे काम अखंड म्हणजे न थांबता सुरू आहे. त्यांना विचारले असता दररोज किमान दोन हजार लोकांना अन्न पुरविले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. सुरुवातीला पोलिसांनी अन्न वाटपासाठी होणाऱ्या गर्दीला हरकत घेतली होती. परंतु, आता मात्र पोलिसांनी आपला दृष्टिकोन बदलला आहे आणि लोकांची व्यवस्थित लाइन लावण्यास आणि क्रमाने तसेच गर्दी न होता सर्वांना अन्नाची पाकिटे मिळतील यासाठी ते सहकार्य करू लागले आहेत. आजही युवक काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर गरिबांची मोठी लाइन लागलेली दिसते.

जावे त्यांच्या वंशा...!
कोरोना विषाणूच्या साथीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर लाखो कष्टकरी पायीपायीच हजारो मैलांची पायपीट कशासाठी करत आहेत असा प्रश्‍न अनेकांना पडत असेल. दिल्लीच्या रस्त्यांवर असे अनेक स्थलांतरित मजुरांचे तांडे आजही दिसतात. पार पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि अगदी पश्‍चिम बंगालपर्यंत पायीपायी निघालेले हे कष्टकरी मजूर आहेत.
विश्‍वगुरू, ब्रह्मांडनायक पंतप्रधानसाहेब नवनवे कडक इस्त्रीचे पोशाख करून टीव्हीवर अवतीर्ण होतात आणि अमुक ॲप डाऊनलोड करा, तमुक गोष्टी डिजिटल पद्धतीने होणार आहे वगैरे वगैरे गोष्टी सांगत असतात. पत्रकारांनी या तांड्यांमधल्या लोकांना त्यांना या ‘ॲप’ची काही माहिती आहे काय विचारले, तेव्हा त्यांच्या माना ‘नाही’ म्हणून हलल्या. बहुतेकांकडे जुने किबोर्ड असलेले साधे मोबाईल फोन होते. एक किंवा दोघांकडेच स्मार्टफोन आढळले. एकाने अनुभव सांगितला. त्याला बिहारला जायचे होते. दरभंगा येथे. पोलिसांशी संपर्क साधल्यावर त्याला उत्तर मिळाले, की प्रथम दरभंग्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पूर्ण माहिती द्या. ते तुमच्या पत्त्याची चौकशी करतील आणि त्यांनी ‘ओके’ केल्यावर आम्ही तुम्हाला जाण्याची परवानगी देऊ. त्यात दोन-तीन दिवस गेले. मग रेल्वेसाठी नंबर लावण्याचा प्रकार. त्यात दलालांची फसवाफसवी. या सर्व प्रकारात पैशापरी पैसा जातो आणि खाण्यापिण्याचे व बरोबरच्या लहान मुले व कुटुंबीयांचे हाल होतात. अखेर सर्वात उत्तम उपाय म्हणजे पायीपायी मजल दरमजल करीत जाणे. मिळेल तेथे खाणे! या गडबडीतच एखादा ट्रकवाला, बसवाला भेटला किंवा पोलिसांनी अडवून एखाद्या ट्रक किंवा बसमध्ये बसविण्याची व्यवस्था केली तर ते जास्त चांगले. स्पेशल रेल्वे गाड्या सोडल्याची भरपूर जाहिरात करण्यात आली, पण त्या गाड्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी या कष्टकऱ्यांना काय यातना सहन कराव्या लागल्या हे तेच जाणोत. पण त्यातही रेल्वे तिकिट दलालांनी त्यांची लुबाडणूक केलीच. एकेका जागेसाठी एक हजार रुपये त्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. वर पोलिसांची दंडुकेशाही होतीच. उपाशी तापाशी अशा या लोकांचा जीव तहानेने व्याकूळ झाल्यावर त्यांना पुरेसे पाणीदेखील मिळत नव्हते. नवी दिल्ली स्टेशनवर चिडलेल्या लोकांनी चक्क पाणी व शीतपेयाच्या स्टॉलवर हल्ले केले व तहान भागवली. ही बातमी फारशी प्रसिद्ध न करण्याचे आदेश तत्काळ जारी करण्यात आले. एका माणसाच्या लहरीपायी लॉकडाउन.
लॉकडाउनमुळे उपासमार टाळण्यासाठी गावाकडे निघालेल्या स्थलांतरित मजुरांचेही असेच प्राण गेले. त्यांची संख्याही आता दीडशेपर्यंत गेली आहे. त्यांचा अपराध एकच... गरिबी व दैन्य! त्यांनी चूक केली की ते गावाकडे निघाले! त्यांनी उपाशी राहात शहरातच थांबायला हवे होते? भारत महान! 
 

संबंधित बातम्या