कट्टा

- अनंत बागायतकर
बुधवार, 24 जून 2020

राजकारणातही गमती जमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...  
कलंदर

चिनी घुसखोरीचे रहस्य काय?
चिनी सैन्याने लडाखमध्ये तीन ठिकाणी घुसखोरी केली आहे. गालवान व्हॅली, हॉटस्प्रिंग एरिया व पॅनगाँग लेक ही तीन ठिकाणे आहेत. याखेरीज सिक्कीममध्ये नाकु ला परिसरातही त्यांनी घुसखोरी केलेली आहे. या सर्व ठिकाणची उपग्रह छायाचित्रे उपलब्ध आहेत. 

एवढे सारे होऊनही इतरवेळी राष्ट्रवाद व देशभक्तीचे नगारे क्षणोक्षणी पिटणारे राज्यकर्ते, त्यांची भक्तमंडळी हे विलक्षण चूपचाप आहेत. केवळ चिनी मालाचा बहिष्कार करा एवढ्या प्रचारापर्यंतच त्यांची हिंमत दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनमोहन सिंगांपासून ते नेहरूंपर्यंतच्या पूर्वीच्या सर्व राज्यकर्त्यांना तुच्छ लेखणारे ब्रह्मांडनायक, विश्‍वगुरू, महासाहसी, परमपराक्रमी पंतप्रधानही एकदमच गपचूप आहेत. 

चीनच्या जागी पाकिस्तान असता तर आत्तापर्यंत कसल्यातरी ‘ॲक्‍शन’ करून छाती पिटली गेली असती. पण हे काहीच होताना आढळत नाही. उलट, सर्व काही ठीक आहे, बातचीत सुरू आहे आणि चर्चेच्या मार्गानेच हा वाद सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी भूमिका घेतली जात आहे. या पार्श्‍वभूमीवरच राजनाथसिंग यांचे २५ ऑक्‍टोबर २०१३ मधले एक जाहीर सभेतले भाषण सोशल मीडियावर फिरू लागले आहे. त्यात त्यांनी मनमोहन सिंग यांना ‘तुमच्यात दम नाही आणि म्हणूनच जरा भारतीय सैनिकांना परवानगी देऊन बघा...’ (म्हणजे ते चिनी सैन्याला पळवून लावतील) असे म्हटले होते. त्यावेळीही चिनी सैन्याने घुसखोरी केलेली होती. तो पेचप्रसंग मनमोहन सिंग सरकारने विलक्षण संयमाने, कोणताही गाजावाजा न करता सोडवलेला होता. त्यावेळी सर्व मामला परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या पातळीवर सोडवण्यात आला होता आणि त्याबाबतची माहिती माध्यमांना पुरवली जात असे. लपवालपवी केली जात नसे. पण सध्या मामला लपवालपवीचाच अधिक दिसतोय. सेनाप्रमुखांनी चिनी सैन्य काहीसे माघारी गेल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्ष सीमेवरील स्थितीबाबत सर्वजण मूग गिळून गप्प आहेत. गोटातून एवढेच सांगितले जाते आहे, की लडाखमध्ये तीन ठिकाणी चीनने घुसखोरी केलेली आहे. पॅनगाँग लेक येथे तर चीनकडून नेहमीच घुसखोरी केली जात असते. पूर्वी ते थोडीफार आगळीक करून माघार घेत असत. पण यावेळी तसे घडताना आढळत नसल्याने ५६ इंची छातीत धडकी भरलेली असावी व त्यामुळेच गपचूप बसण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. 

एक मात्र खरे की चीनच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर झोपाळ्यावर झुलून, तमिळ लुंगी नेसून त्यांच्याबरोबर जणू प्रदीर्घ व निकटचा परिचय असल्याचे दाखविण्याचे जे प्रकार केले गेले ते सर्व निरर्थक व निष्फळच ठरले असे म्हणावे लागेल. एवढे सारे चमकदार ‘इव्हेंट’ करून चीन मात्र पुन्हा भारताच्या डोक्‍यावर बसायला बघत आहे. म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो! नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांना नावे ठेवणे फार सोपे असते, परंतु धीरगंभीरपणे परिस्थिती हाताळून देशाला यश मिळवून देणे यासाठी फार वेगळे गुण लागतात!  

हे कसे काय बुवा? 
कोरोना साथीच्या निमित्ताने एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, की जर तुम्ही ‘व्हीव्हीआयपी’ म्हणजेच ‘अतिविशिष्ट व्यक्ती’ असाल तर तुम्हाला तत्काळ कोरोनावरील चाचण्या व उपचार उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही पैसा सोडायला तयार असाल, तर कोणतेही खासगी रुग्णालय तुम्हाला सेवा देण्यास तत्पर असते. 

आता हेच उदाहरण पहा ना! भाजपचे ‘कर्कश-मुखी’ प्रवक्ते संबित पात्रा यांना म्हणे कोरोना झाला होता. ते स्वतः डॉक्‍टरच आहेत, पण गेली काही वर्षे ते वैद्यकीयपेक्षा राजकीय सेवा अधिक करीत आहेत. तर त्यांना कोरोना बाधा झाल्याचे कळताच ते दिल्लीतल्या पंचतारांकित मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. दोन-तीन आठवडे राहिले. उपचार करून बरे झाले आणि परतले! 

आता ते पुन्हा विरोधी पक्षांवर पूर्वीच्याच तडफेने तोंडसुख घेऊ लागले आहेत. या पंचतारांकित मेदांता हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील उपचार घेत असत बर का. परंतु, संबित पात्रा यांच्या कोरोना लागण किंवा बाधा होण्याबाबत विविध तर्क केले जात आहेत. संबित पात्रा यांनी एका चॅनेलवर बोलताना जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्याबद्दल काही अनुचित वक्तव्ये केली होती. त्यावरून काही लोकांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या. यामध्ये छत्तीसगढमधील काही तक्रारींचा समावेश होता. या कारणास्तव संबित पात्रा यांना छत्तीसगढच्या फेऱ्या कराव्या लागल्या असत्या. सध्याच्या दिवसांत प्रवास हा फारसा सुखावह राहिलेला नाही. त्यामुळे संबित पात्रा यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले असणार! आता ते छत्तीसगढच्या फेऱ्या कशा करणार वगैरे चर्चा सुरू असतानाच त्यांना अचानक कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. काय? ते तत्काळ पंचतारांकित मेदांतामध्ये दाखल झाले. कोरोनामुळे त्यांचा बाह्यजगाशी संपर्कही बंद झाला. संबंधित पोलिस तक्रारीलाही आपोआपच पायबंद झाला. पण किती काळ ते स्वतःला वाचवतील? कानून के हाथ लंबे होते है म्हणतात! 

तर आता ते परतले आहेत पण पूर्ण बरे होण्यास व पूर्ववत होण्यास आणखी काही काळ लागेल असे ते म्हणत आहेत. पण त्यांच्याविरुद्धची तक्रार व कोरोना यांच्या योगायोगाबद्दल मात्र सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे!  

वजनदार व वयोवृद्ध राज्यसभा 

कर्नाटकातून दोन वजनदार नेत्यांची राज्यसभेत ‘एंट्री’ झाली आहे. पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वोच्च नेते एच. डी. देवेगौडा आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेत दाखल झाले आहेत. 

देवेगौडा यांचे वय ८७ आहे, तर खर्गे ७८ वर्षांचे आहेत. देवेगौडा हे अजूनही तंदुरुस्त आणि ‘फिट’ असल्याचे दाखवतात. ते रोज व्यायाम करतात आणि त्याचे फोटोही ते सोशल मीडियावर टाकत असतात. खर्गे यांना मात्र असा काही शौक नाही. 

एक मात्र खरे की दोन्ही पक्षांमधील तरुण नेत्यांमध्ये मात्र यामुळे एकदम नाराजी आलेली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचा जीव अगदीच लहानसा आहे. परंतु काँग्रेसमध्ये एक सार्वत्रिक भावना आहे, की राज्यसभा ही केवळ वयोवृद्ध नेत्यांसाठीच आहे. 

खर्गे हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काँग्रेसच्या निकषानुसार लोकसभेत हरलेल्यास लगेचच राज्यसभेची उमेदवारी दिली जात नाही. परंतु, यापूर्वीही काँग्रेसने अनेक मोठ्या नेत्यांसाठी हा निकष मोडलेला आहे आणि खर्गे यांच्यासाठीही तो निकष दुर्लक्षिण्यात आला. 

खर्गे यांचे वय लक्षात घेता त्यांना कर्नाटकाच्या स्थानिक राजकारणातून बाजूला काढणे अधिक उचित असल्याने हा निकष डावलून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शिवकुमार यांनी खर्गे यांना चतुराईने राज्यसभेत पाठवून आपला मार्ग निष्कंटक करण्याचा प्रयत्न केला. 

तिकडे देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांनाही वडील हे दिल्लीत अधिक राहिलेले चांगले असे वाटू लागले आणि त्यांच्या राज्यातील हस्तक्षेप कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी वडिलांना राज्यसभेवर पाठविले. 

आता कर्नाटकात दुसऱ्या फळीचे राज्य सुरू झाले असे म्हणायला हरकत नाही! 

राज्यपालांची आक्रमकता! 
वर्तमान राजवटीत देशात ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत तेथील राज्यपालांना बहुधा त्या सरकारांना निमूटपणे कामकाज व राज्यकारभार करू न देण्याच्या सूचना असाव्यात. ज्या राज्यात विरोधी पक्षांची आणि विशेषतः केंद्राशी दोन हात करणारी सरकारे आहेत, तेथे राज्यपालांनी त्या सरकारबरोबर संघर्षाची भूमिका घेतलेली आढळते. महाराष्ट्रात गरीब दिसणाऱ्या राज्यपालांनी पाहता पाहता स्वतःला ‘वादग्रस्त’ उपाधी चिकटवून घेण्यात यश मिळवले. 

पश्‍चिम बंगालमध्ये जगदीप धनकर यांनी तर पहिल्या दिवसापासूनच आक्रमकपणा धारण केला आहे. पक्षपातीपणाचा आणि राज्य सरकारला त्रास देण्याचा कळसच त्यांनी केला आहे. 

गेल्या सत्तर वर्षांत क्वचितच असे राज्यपाल झाले असावेत! सध्या धनकर आणि तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते व खासदार यांच्यात तुंबळ वाक्‌युध्द फुटलेले आहे. तृणमूलच्या नेत्यांनी टीका केली रे केली, की धनकर हे त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून किंवा अगदी चॅनेलवर जाऊन त्यास प्रत्युत्तर देत असतात. अखेर तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांना राहवले नाही. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, की राज्यपाल सध्या दुहेरी भूमिकेत आहेत आणि त्यांना डबल शिफ्ट मध्ये काम करावे लागत आहे... एक भाजपचे प्रवक्ते म्हणून त्यांना प्रमुख भूमिका पार पाडावी लागत आहे आणि त्यासाठी त्यांना डबल काम करावे लागत आहे. केवळ ट्विटरवरच नव्हे तर टीव्हीच्या चॅनेलवर जाऊनही ते भाजपचे समर्थन करण्याचे प्रकार करीत आहेत. धन्य ते राज्यपाल आणि त्यांना नेमणारे राज्यकर्ते त्याहून महान! 

खान मार्केट अस्ताकडे? 

दिल्लीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे ‘खान मार्केट’! हे काही नुसते मार्केट म्हणजे शॉपिंग करण्याचे ठिकाण नाही. दिल्लीतल्या उच्चभ्रू, लब्धप्रतिष्ठितांचे ते आवडते ठिकाण आहे, ते तेथील काही जुनीपुराणी हॉटेले, काही इतर मालांचे दुकानदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांच्या दुकानांमुळे! काही पुस्तकांच्या दुकानात तुम्ही चहा घेत घेत तेथील पुस्तके चाळू शकता. विशेष म्हणजे पुस्तकांचे दुकानदार हे नुसते विक्रेते नाहीत, तर त्यांना येणाऱ्या गिऱ्हाइकांच्या आवडीनिवडी, त्यांचा वाचनाचा कल या सर्व गोष्टी माहिती असतात. 

येथे येणाऱ्या ग्राहकापेक्षा स्वतः पुस्तक दुकानदारच अधिक चोखंदळ आहेत आणि त्यांची नेहमीची गिऱ्हाइके येताच ते त्यांना अमुक वाचा, हा नवीन लेखक फारच चांगला आहे, अमुक पुस्तक स्फोटक आहे वाचून बघा असे सांगतात. अनेक स्पेशल ग्राहकांना तर नवीन पुस्तके आल्यानंतर फोन करून आवर्जून दुकानात या म्हणून सांगणारे दुकानदारही आहेत. उदारमतवादी व साधारणपणे डावीकडे कल असलेल्यांचा या ठिकाणी विशेष राबता असतो. त्यामुळेच एका भाषणात या देशाच्या पंतप्रधानांनी या मंडळींची संभावना ‘खान मार्केट गॅंग’ अशी केली होती. सध्या देशात पुराणमतवादी व पुनरुज्जीवनवादी शक्तींचा बोलबाला आहे. या शक्तींना प्रगतिशील विचारांचे वावडे असणे अत्यंत स्वाभाविक आहे. उदारमतवादाचा आणि त्यांचा दुरान्वयानेही संबंध नसतो. असे असले तरी डावे व उदारमतवादी यांचा जेथे वावर असतो, तेथे कुतूहलापोटी चकरा मारणारे पुराणमतवादी अनेक आहेत आणि तेही मोठा आव आणून या पुस्तक दुकानांच्या मालकांबरोबर चर्चा करताना आढळत असतात. 

परंतु, कोरोना आणि एकंदरच आर्थिक घसरणीमुळे सर्व धंद्यांवर विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे. त्यामुळेच खान मार्केटमधील काही प्रमुख हॉटेलांनी आपापली हॉटेले बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याच्या पाठोपाठच इतरही काही प्रमुख दुकानांनी काढता पाय घेतला आहे आणि हो... खान मार्केट गॅंगला अनुकूल असलेली अनेक पुस्तकांची दुकानेदेखील आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनाच्या निमित्ताने या देशावर पुराणमतवादी व पुनरुज्जीवनवादी विचारसरणी लादणे आणि उदारमतवाद खतम करण्याचे हे षड्‌यंत्र आहे काय अशी शंका यावी! 

परंतु समोर दिसणारे चित्र हे आहे!  

संबंधित बातम्या