कट्टा

अनंत बागायतकार
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

कट्टा

मंदिर रामाचे पण नाथ कुठे?

सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराच्यावेळी थोडा वाद झालेलाच होता. सरकार किंवा राजसत्तेचा कोणताही विशिष्ट धर्म नसतो. त्यामुळे बहुसंख्याक समाजाचे मंदिर असले तरी व त्याचा जिर्णोद्धार करायचा असला तरी राजसत्तेने त्यात सहभागी होणे उचित नाही, असे राज्यघटनेचे अनुसरण करणाऱ्यांचे मत होते. परंतु, आक्रमकांचे आघात सहन करून टिकाव धरलेले सोमनाथ मंदिर व त्याची पार्श्‍वभूमी वेगळी असल्याने त्याबाबत वेगळा विचार झाला पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे होते. सर्व इतिहास उगाळणे शक्‍य नाही. परंतु, त्या जिर्णोद्धार समारंभाला तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हजर राहिले होते.

पाच ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला प्रधानसेवकांसह अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

केवळ वेचक-निवडक अशा दोनशे अतिविशिष्ट व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. परंतु, सोमनाथ मंदिराच्या भूमिपूजनाच्यावेळी तत्कालीन राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आलेले होते. यावेळी राममंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण देशाच्या राष्ट्रपतींना देण्यात आल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

वर्तमान राष्ट्रपतींच्या नावातच राम आहे आणि ते ‘रामनाथ’ आहेत. परंतु राजेंद्र प्रसाद यांच्याइतके भाग्यवान ते नाहीत. त्यांना आमंत्रण का देण्यात आले नाही याबाबत विविध तर्क आणि हो... कुतर्कही सुरू आहेत.

हळूहळू त्याच्याही कहाण्या बाहेर येऊ लागतीलच!

--------------------------------------------------------------------------------------------------------

शेरास सव्वाशेर?

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन होत आहे. त्यानिमित्तची ही आठवण आहे. राम मंदिर उभारणीबाबत चर्चा सुरू असतानाच अचानक अयोध्येत प्रभू रामचंद्रांचा अतिभव्य पुतळा उभारण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.

त्यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार आझमखान चांगलेच सक्रिय होते. त्यांना वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्याबद्दल प्रतिक्रिया विचारली.

वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी आझमखान यांच्या बुद्धिमत्तेला बहुधा कमी लेखले असावे. त्यांना वाटले आझमखान काहीतरी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करतील आणि त्यांना धार्मिक ध्रुवीकरणासाठी काहीतरी खमंग खाद्य मिळेल.

पण त्यांचा अंदाज साफ चुकला. आझमखान भलतेच बेरकी निघाले.

त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या भव्य पुतळ्याचे जोरदार स्वागत केले. हा पुतळा अयोध्येत उभारला गेलाच पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले. पण....!

पण?

आपल्या खास शैलीत आझमखान यांनी शेवटी बाँब टाकला...! ‘प्रभु रामचंद्रांच्या पुतळ्याची उंची सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यापेक्षा एक फुटाने जास्त हवी!’

आता अवाक्‌ होण्याची पाळी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची होती, पण आझमखान यांना प्रतिक्रिया विचारून चूक तर करून बसले होते.

त्यांनी बातमी दिली आणि मग काय? प्रभू रामचंद्रांच्या त्या भव्य पुतळ्याबद्दलची चर्चाच बंद की हो! सगळे गपचूप!

सहज जाताजाताची आठवण पण मजेशीर!

 

--------------------------------------------------------------------------------------------------------

पायलट गटातली वाढती अस्वस्थता!

राजस्थानातील सत्ता पेचप्रसंग रोज नवीनवी वळणे घेत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ते राजकारणातले मुरब्बी आहेत हे दाखवून दिले आहे. त्यांचे सरकार दोलायमान झालेले असले तरी अद्याप पडलेले नाही.

कमलनाथ यांचे सरकार एका झटक्‍यात पडले. अर्थात काठावरच्या बहुमतामुळे ते स्थिर होऊच शकले नाही आणि भाजपच्या बुलडोझरपुढे त्याचा टिकाव लागला नाही.

राजस्थानात मात्र गेहलोत यांनी अद्याप मैदान पकडून ठेवलेले आहे. त्यांना आव्हान देणारे तरुण उपमुख्यमंत्री सचिन पायलट मात्र गेहलोत यांच्यापुढे फारसे प्रभावी ठरू शकलेले नाहीत. उलट आता त्यांची अवस्था ‘ना घरचे ना दारचे’ अशी झाली आहे. 

पायलट हे पुरेसे आमदार गोळा करू शकले नाहीत ही त्यांची पहिली चूक. बंड केल्यानंतर त्यांनी ते भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट जाहीर करून टाकले ही दुसरी चूक. विरोध फक्त गेहलोत यांना आहे, काँग्रेसच्या विरोधात नाही हे जाहीर करणे ही तिसरी चूक.

एकामागून एक पायलट हे अपरिपक्वता दाखवत चुका करीत राहिले. या त्यांच्या चुकांमुळे आता त्यांच्या समर्थक आमदारांतही चुळबूळ वाढू लागली आहे. तसेच त्यांच्या समर्थकांमध्येही काहीजण भाजपमध्ये जाण्याच्या पूर्ण विरोधात आहेत.

अशा या द्विधा मनःस्थितीत आता त्यांच्या समर्थकांनी त्यांना अशा अधांतरी-अनिर्णित अवस्थेत राहण्याऐवजी चक्क नवीन पक्ष काढा, मग पुढचे पुढे बघू असा सल्ला देण्यास सुरुवात केल्याचे समजते. याचे कारण आता भाजपलाही पायलट यांच्यात फारसे स्वारस्य राहिले आहे असे दिसत नाही. त्यात खुद्द भाजपमध्येदेखील ‘आयात’ नेत्यांना वाढता विरोध होऊ लागला आहे.

आता अशा परिस्थितीत पायलट यांच्यासमोरचे पर्याय कमी कमी होत चालले आहेत व कोंडी वाढत चालली आहे. एकतर त्यांना नवा पक्ष काढावा लागेल किंवा पुन्हा काँग्रेसमध्ये येऊन शरणागती पत्करावी लागेल.

अन्यथा त्यांच्या राजकीय भवितव्यावर फुली मारावी लागण्याची चिन्ह आहेत!

--------------------------------------------------------------------------------------------------------

 

संघाची सावधगिरी

भोपाळमध्ये संघाच्या उच्चपदस्थांची तीन दिवसांची बैठक झाली. अलीकडेच ही बैठक झाली. विशेष म्हणजे संघाने त्यांच्या अन्य दोन-तीन बैठका (रांची वगैरे ठिकाणी होणाऱ्या) कोरोनामुळे रद्द केल्या होत्या. परंतु भोपाळची बैठक मात्र झाली. सरसंघचालकांसह प्रमुख मंडळी उपस्थित होती. जो खल त्यांना करायचा होता तो केला.

मध्य प्रदेश हा तसा संघाला प्रिय प्रदेश आहे. एकतर नागपूर त्याच्या समीप आहे आणि त्यातल्या त्यात भोपाळ, इंदोर, जबलपूर, विलासपूर, खांडवा, उज्जैन ही ठिकाणेही त्यांना खूपच प्रिय आहेत.

तर भोपाळमध्ये बैठक झाल्यावर मुक्कामी राहिलेल्या सरसंघचलक आणि अन्य वरिष्ठ संघनेत्यांना भेटण्यासाठी कर्मठ कार्यकर्ते आणि भाजपचे असंख्य बड्या नेत्यांनी रांग लावणे अपेक्षितच होते.

त्यात अलीकडेच मध्य प्रदेशात सत्ताबदल होऊन परिवाराचे सरकार सत्तेत आलेले असताना तर संघनेत्यांना अगदी घरच्यासारखे वाटणे स्वाभाविकच होते.

साहजिकच परिवारातली ज्येष्ठ-वरिष्ठ मंडळी आल्याने... हो, संघ ही भाजपची जन्मदात्री संस्था आहे ना! तर, या वरिष्ठांना भेटण्यासाठी जोरदार गर्दी झाली.

स्वाभाविकपणे या वरिष्ठांकडे तक्रारीही झाल्याच! सर्व तक्रारींची मध्यवर्ती कल्पना एकच होती व ती म्हणजे भाजपमधली वाढती ‘आयात’!

आयात?

हो, आता नाही का ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची भाजपमध्ये आयात झाली? विसरलात काय?

तर या आयात मालास प्राधान्य देऊन मूळच्या म्हणजे ओरिजिनल मालास मात्र दुर्लक्षिण्यात येत असल्याची सार्वत्रिक तक्रार संघ-वरिष्ठांकडे करण्यात आली.

बाहेरून आलेल्या मंडळींना पक्षात तत्काळ ‘ॲडजस्ट’ करून विविध पदे व मुख्यतः आमदारकी, खासदारकी दिली जाते. पण वर्षानुवर्षे पक्षासाठी, संघटनेसाठी खपणाऱ्यांना मात्र न्याय मिळत नाही अशी या मंडळींची तक्रार होती.

आता संघ-वरिष्ठ याबाबत काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष ठेवावे लागेल. विशेष म्हणजे या संघ-वरिष्ठांनी केवळ मूळच्या भाजपच्या असलेल्या नेत्यांनाच भेटीसाठी वेळ दिला होता. असे समजते की या लोकांनी संघ-वरिष्ठांना नव्याने व बाहेरून आलेल्यांना न भेटण्याचा सल्ला दिला आणि संघ-वरिष्ठांनीही संवेदनशीलता ओळखून ‘आयात माला’स भेटण्याचे टाळले!

--------------------------------------------------------------------------------------------------------

अरुण जेटलींची मरणोत्तर समाजसेवा

अरुण जेटली यांचा अकाली मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला. 

जेटली हे निवडक आणि वेचक लोकांमध्येच खुलत असत आणि त्याच लोकांशी ते बोलणे पसंत करीत असत. यामध्ये ते इतरांकडे सरळ दुर्लक्ष करीत आणि यामुळेच त्यांच्या या अशा वागण्याबद्दल नाराजी व गैरसमजही होते.

जेटली पत्रकारांमध्ये चांगले रमत असत. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील पत्रकारांबरोबरच्या त्यांच्या गप्पांच्या मैफलींची आजही आठवण काढली जाते. या एका गप्पांच्या मैफलीतच जेटली यांनी एक गोष्ट सांगितली होती.

जेटली हे नामांकित वकील होते आणि त्यांची कायदेशीर सल्ला देणारी संस्थाही होती आणि त्याचा पसारा बऱ्यापैकी मोठा होता. कर्मचारीवर्गाची संख्याही मोठी होती. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे घरकाम, वाहन चालविणारे आणि त्यांच्या कार्यालयातील साहाय्यक पदांवर काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी काही गोष्टी केल्या. ते त्यांच्या लाभातील विशिष्ट रक्कम या कर्मचाऱ्यांच्या नावे जमा करीत असत आणि त्यातून त्या कर्मचाऱ्यांना स्वतःची घरे खरेदी करण्यासाठी ते मदत करीत असत. या पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या साहाय्यक कर्मचाऱ्यांना स्वतःची घरे, त्यांच्या मुलांना चांगल्या संस्थात शिक्षण, त्यांचे आरोग्यविमे वगैरे सुविधा दिल्या होत्या. यामुळे कर्मचारीदेखील समाधानी होते.

त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नींनाही निवृत्तीवेतन मिळते. परंतु, त्यांच्या पत्नी संगीता यांनी ती रक्कम कमश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वापरावी अशी विनंती राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना केली. नायडू यांना ही कल्पना पसंत पडल्याने त्यांनी आता या कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र कल्याण योजनाच आखून त्यास अरुण जेटली यांचे नाव दिले.

अरुण जेटली यांच्या निधनाला या महिन्यात (२४ ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या मागेही समाजातल्या वंचित वर्गासाठी काही करण्याची इच्छा असणारे राजकीय नेते विरळेच असतात. जेटली त्यापैकी एक!
--------------------------------------------------------------------------------------------------------

संबंधित बातम्या