नरवीर अभिवादन यात्रा

डॉ. अमर अडके, दुर्ग अभ्यासक
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्ययात्रा शनिवारी, ता. १६ फेब्रुवारी २०२० रोजी सिंहगड ते उमरठ दरम्यान निघाली. विराण डोंगरउतार, त्यावर वाळलेल्या गवताची दुलई आणि मधून उतरणारी घसाऱ्याची डोंगरवाट, असा प्रवास सुरू झाला... बघता बघता सिंहगड डोंगरांच्या आड गेला आणि पालखी वाडीच्या पंढरीत पोचली...
 

महाबळेश्वरच्या खोऱ्यातल्या चंद्रगडाच्या माथ्यावर उभा होतो. चंद्रगडाच्या पायथ्याचं झाडीत दडलेलं ढवळे आणि त्याच्या पलीकडचं उमरठ अंदाजानं शोधत होतो. मनामध्ये एक विचार आकार घेत होता. तानाजी मालुसरे सिंहगडावर धारातीर्थी पडले. त्यांची समाधी प्रतापगड, महाबळेश्वर, चंद्रगड यांच्या पायथ्याच्या दरीतल्या उमरठमध्ये. सर्वदूर महाराष्ट्र पिढ्यानपिढ्या हे ऐकत आला, समजत आला. नरवीरांच्या देहावर अग्निसंस्कार केले, त्यांचा देह पंचत्वात विलीन झाला तो उमरठला. त्याचवेळी मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हा देह सिंहगडावरून कसा आणला असेल? कोणत्या मार्गानं आणला असेल?... तेव्हाच एक निश्चय पक्का झाला. ‘सिंहगड ते उमरठ’ नरवीरांच्या पुण्ययात्रेच्या पुण्यमार्गाचा भूगोल शोधण्याचा... 

सात वर्षं झाली, अखंड शोधमोहिमा सुरूच आहेत. जे हवं ते अगदी शंभर टक्के गवसलं असं नाही, पण सिंहगडापासून अंदाजानं, संदर्भानं, स्थानिकांच्या मार्गदर्शनानं, मौखिक इतिहासाच्या आधारानं पोचलोच. हे सगळं सांगावंसं वाटलं ते एवढ्यासाठीच, की यावर्षी म्हणजे इ.स. २०२० ला नरवीरांच्या धारातीर्थी पतनाला आणि पुण्ययात्रेला साडेतीनशे वर्षं होत आहेत. त्यानिमित्तानं ‘सिंहगड ते उमरठ’ अशी सह्याद्रीच्या अंतरंगातली ‘नरवीर अभिवादन यात्रा’ करायचं ठरलं. या पुण्ययात्रेच्या भूगोलाच्या मागोव्याचा प्रवासही तसा प्रदीर्घ आहे. जवळजवळ पंचवीस मोहिमा त्यासाठी आखल्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं, डोंगरभटक्यांच्या अनुभवांचा आधार घेतला, भूमिपुत्रांकडून डोंगरपोटातले राबते घाटमार्ग धुंडाळले, पूर्वसुरींच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतला. 

सिंहगडाचा डोणगिरी कडा ते कल्याण दरवाजा, दुसऱ्या कल्याण दरवाजातून बाहेर पडून अनेक डोंगररांगा चढून आणि उतरून विंझरच्या धनगरवाडीत पोचायचं. तिथून राजगड पायथा हे मोठं अंतर काटायचं. रायगड पायथ्याच्या खंडोबाच्या माळाच्या खालच्या अंगानं भुतोंडे उजव्या हाताला ठेवून पासली पार करून केळदला पोचायचं, मग मढे घाटातून उतरून रानवडी गावठाणाच्या अलीकडं बावेच्या विहिरीपर्यंत पोचायचं. मग वाकी-दहिवद-बीरवाडी असा अंदाजानं प्रवास करून बीरवाडी महाडच्या वरच्या अंगानं पोलादपूर कापडेफाटा-उमरठ असा पुण्ययात्रेच्या पुण्यप्रवासाचा आराखडा तयार झाला... आणि रोमांचकारी मोहीम आकाराला येऊ लागली. 

मोहिमेची पूर्वतयारी सुरू झाली. उमरठकर मंडळी, पंचक्रोशीतील मालुसरे मंडळी आणि मुख्य म्हणजे नरवीर तानाजी उत्सव समितीचे चंद्रकांत कळंबे आणि पोलादपूरचा आमचा सहकारी प्रकाश कदम या साऱ्यांनी या पुण्ययात्रेचं शिवधनुष्य आम्हा मैत्रेयांच्या खांद्यावर दिलं. दिवसही ठरला. १४ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री निघून भल्या पहाटे सिंहगडावर पोचायचं. तिथून पुण्ययात्रा सुरू करायची. लांब अंतर आणि खडतरता, पालखीसहचा पहिला प्रयत्न या साऱ्याचा तणाव होताच... आणि प्रत्यक्ष तो दिवस उजाडला; १५ फेब्रुवारी २०२० पुण्ययात्रा सिंहगड ते उमरठ धारातीर्थ ते समाधी! पहाटे सिंहगडावरच्या डोणागिरी कड्याच्या माथ्यावरच्या धारातीर्थापाशी आम्ही उभे होतो. थंडी फारशी नव्हती. सिंहगडाच्या पायथ्याचा आसमंत पथदिव्यांनी उजळला होता, तरी सिंहगडाची चढण, दक्षिण-पश्चिम आणि काही प्रमाणात उत्तरेचीसुद्धा डोंगरबाजू पहाटेच्या अविरत अंधारात लुप्तच होती. या अंधाराच्या साथीनंच आम्हाला सिंहगड उतरायचा होता आणि नुसताच उतरायचा नाही, तर नरवीरांच्या संजीवन पालखीसह उतरायचा होता. नरवीरांचा अर्धपुतळा, शेजारचं स्मृतिशिल्प आज फुलांच्या माळांनी सजलं होतं. एक वेगळं अनाकलनीय चैतन्य त्या परिसरात भरून राहिलं होतं. आमचे पुणेकर दुर्गमित्र भल्या पहाटे येऊन पोचले. आज ही मंडळी डोणगिरीच्या कड्यावर चढाई-उतराई करणार होती. भारलेल्या त्या वातावरणात नरवीरांची पालखी त्या धारातीर्थावर ठेवली. धारातीर्थाला साष्टांग दंडवत घातला. भरलेल्या अंतःकरणानं श्री शिवराय आणि नरवीरांचा जयघोष केला. जणू हा जयघोष आकाश भेदून गेला. पालखी उचलून खांद्यावर घेतली. नरवीरांच्या वंशजांनीही खांद्यावर घेतली. जणू इतिहासाची प्रेरणाच आमच्या खांद्यावर विराजमान झाली. डोळे भरून आले. मनात काहूर माजलं, ‘कोणतं पुण्य फळाला आलं? आज हा योग घडला. नरवीरांची पालखी वाहण्याचं भाग्य मिळालं!’ पहाटेच्या त्या मंद प्रकाशात, माथ्यावरच्या वाऱ्यात ही पालखी कल्याण दरवाजाकडं निघाली. अविस्मरणीय अनुभव! सिंहगडावर असं काही अनुभवायला मिळेल हे ध्यानीमनीही नव्हतं. त्याच भारावलेपणात पहिल्या कल्याण दरवाजाशी पोचलो, पायऱ्यांच्या उतरंडीनं दुसरा कल्याण दरवाजाही पार केला आणि सुरू झाला सुभेदार तानाजीच्या पुण्ययात्रेचा खडतर व रोमांचकारी पुण्य प्रवास. 

एव्हाना पूर्व क्षितिजाकडील रक्तवर्ण उजळू लागला होता. सिंहगडाच्या दक्षिण आणि पश्चिमेच्या डोंगररांगासुद्धा प्रकाशमान होऊ लागल्या होत्या. दक्षिणेकडच्या त्या अफाट डोंगरधारा ओलांडून आमची पालखी जाणार होती, दक्षिणेकडे राजगडाच्या बाजूला. उजव्या हाताला सिंहगडाचा बेलाग कडा आणि त्यावरची तटबंदी. पश्चिमेला अगदी पाबेखिंडीपर्यंतच्या खोल दऱ्या आणि या साऱ्या सह्याद्री शिल्पामधून राजगड पायथ्याच्या दिशेचा पालखीप्रवास. डोंगरदांडांवरची ती अंतहीन वाट, कधी छातीवरची चढाई, कधी दरीच्या काठावरची जेमतेम पाऊलवाट, साऱ्या परिसराला स्थानिक नावंही रोमांचकारी. मन नकळत साडेतीनशे वर्षं मागं गेलं. खंडूजी नाईक... घेरे सरनाईक, का कुणास ठाऊक आठवले. या डोंगरदऱ्यांवर त्यांचीच हुकूमत. नरवीरांना उत्तुंग डोणागिरी कडा चढून जाण्यास त्यांनीच तर मदत केली. मावळ्यांच्या डोणागिरी चढून जाण्याच्या कल्पनेनं मन थरारून उठलं. एका मागून एक डोंगरमाथ्यांची चढाई-उतराई सुरूच होती. आता दूर दक्षिणेला डोंगरापलीकडं राजगड दिसू लागला. त्याचा बालेकिल्ला, पद्मावती माची आणि संजीवनीची धार दिसू लागली होती. अजून चढाई आणि तेवढीच घसाऱ्याची उतराई सुरूच होती. आता सूर्य चांगलाच वर आला होता. उजवीकडचा तोरणाही आता दिसू लागला होता. खाली डावीकडं विंझरची धनगरवाडीही ठिपक्यासारखी दिसू लागली होती. आता पालखीचा पुण्यप्रवास तीव्र उताराचा सुरू झाला होता. विराण डोंगरउतार, त्या डोंगरउतारावर वाळलेल्या गवताची दुलई आणि मधून उतरणारी घसाऱ्याची डोंगरवाट. पाठीमागचा सिंहगड डोंगररांगांच्या आड केव्हाच दडून गेला होता. आता वाडीतील लगबग जाणवू लागली होती. आम्ही अजूनही डोंगराच्या उंच माथ्यवरच होतो. जमलेले गावकरी या पालखी यात्रेकडं विस्मयानं पाहत होते हे दिसत नव्हतं, पण जाणवत मात्र होतंच. तीव्र डोंगरउतार संपून आता विरळ झाडीची वाडीची वाट सुरू झाली होती. तीव्र नसला तरी अजूनही उतार होताच. फक्त पायाखाली घट्ट जमीन होती. पालखी वाडीच्या पंढरीत पोचली.  

भातखाचरांच्या उतारानं वाडीच्या दिशेनं उतरू लागलो. दिवस बराच वर आला होता. उन्हाचे चटके नसले, तरी उष्मा मात्र जाणवत होता. डोंगर उतरून वाडीत जाणाऱ्या मातीच्या कच्च्या रस्त्यावरून चालू लागलो. क्षणभर मागं वळून पाहिलं. डोंगराचा उतार, उंच माथ्यावरचा वृक्षविहीन सडा सारं नजरेत मावत नव्हतं. यासारख्या डोंगरांना ओलांडूनच तर इथपर्यंत आलो होतो. लहान पोरासोरांसह वाडीतल्या बायाबापड्यांची लगबग मनाला भिडत होती. वाडीतली सारी माणसं पालखीभोवती गोळा झाली. पाट आणला, त्यावर उभं केलं, पायावर पाणी घातलं, पालखीला ओवाळलं. नकळत डोळे भरून आले. काही क्षणांचा विसावा घेऊन पालखी पुढच्या टप्प्यासाठी मार्गस्थ झाली. धनगरवाडीतून विंझर गाव, मग वेल्हा रस्ता, डावीकडं राजगडाचा पायथा, पाल, खंडोबाच्या माळाची खालची बाजू, पासली गावाची बगल, भुतोंडे उजव्या हाताला ठेवून केळदच्या वाटेला लागलो. डावीकडं तोरणा किल्ल्याचं अफाट दर्शन छाती दडपून टाकत होतं. उजवीकडं हरपूड, मोहरी, सिंगापूरला जाणारा रस्ता सोडला आणि केळद घाटाच्या उतारानं केळदच्या पुढ्यात येऊन पोचलो. पुन्हा तीच लगबग, पायावर पाणी, पालखीला ओवाळणं. जणू प्रत्येकाच्या घरात आज नरवीर पोचले होते. केळद हे देशावरचं पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्‍यातल्या पार टोकाचं कोकणाच्या बाजूच्या उत्तुंग कड्यावरचं गाव. या कड्याला केळद कडा असंच म्हणतात. या कड्यातून अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरतात. खाली सांप्रतच्या रायगड जिल्ह्यातला महाड तालुका. अर्धवर्तुळाकार अफाट केळद कड्यातून अनेक घाटवाटांनी खाली उतरलो आणि तसाच वरही आलो. आज मढे घाटातून उतरायचं होतं. दोन टप्प्यातला तीव्र उताराचा हा राबता घाट. सूर्य कलतीकडं झुकू लागला होता. लगबग करणं आवश्‍यक होतं. पालखी घेऊन मढे घाटाच्या दिशेनं निघालो. कड्यात उतरण्यापूर्वी विस्तीर्ण मैदान लागतं. तिथल्या विरळ झाडीत घाटतोंडाच्या अलीकडं विखुरलेल्या दगडांच्यामध्ये एका चौथऱ्याचं अस्तित्व गावकरी सांगतात. परंपरेनं त्यांच्यापर्यंत पोचलेली श्रद्धा एवढाच काय तो पुरावा. नरवीरांचा देह पुण्य प्रवासात इथं क्षणभर ठेवला होता ही त्यांची श्रद्धा. 

पालखीसह मढे घाटाच्या मुखात उतरलो. तीव्र उताराची, दगडधोंड्यांची, डोंगर बेचक्‍यातली वाट ती... कधी कड्याला घासून तर कधी कड्यापासून दूर, काही ठिकाणी फरसबंद दगडी वाटेसदृश अशी ही दाट झाडीतली वाट. पालखीसह उतरताना भावना आणि प्रेरणा यांनी मन भरून येत होतं. डोंगर पोटातल्या या वाटेवरून खाली उतरताना पाठीवरचा कडा अधिक उत्तुंग होत होता. मढे घाटाचा पहिला उतार उतरून आलो. मागं वळून पाहिलं. त्या अफाट कड्यातून कोसळणारा मढे घाटातला धबधबा इवलासा दिसत होता. मढे घाटाच्या मध्यावर गवताळ पठारावर पालखीसह उभे होतो. डावीकडच्या गुगुळशीच्या उत्तुंग डोंगरापासून ते उजवीकडच्या आंब्याच्या नळीच्या वाटेपर्यंतचा अवाढव्य केळद कडा नजरेत मावत नव्हता. विस्मयचकीत होऊन मढे घाटाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उताराला लागलो. खाली दूरवर कोकणातल्या वाकी, कर्णवाडी, रानवडी अशा वाड्यांच्या जाणिवा दिसू लागल्या. मढे घाट खाली कोकणात रानवडी गावच्या गावठाणात पडवळ कोंडापाशी बावीच्या विहिरीजवळ गुळंबे वस्तीजवळ संपतो. आम्हाला त्या विहिरीजवळ नरवीरांची पालखी पंचक्रोशीतल्या माणसांकडं सोपवायची होती. पडवळ कोंडाकडं येणारा मढे घाटाचा दुसरा उतार जरा जास्तच तीव्र आहे. अखंड रात्रंदिवस सुरू असणारी पुण्ययात्रेच्या पालखीसह आमची चाल थकली नसली, तरी थोडी मंदावली होती एवढं नक्की. पालखी गुळंबे वस्ती ओलांडून विहिरीजवळ पोचली. पंचक्रोशीतली शेकडो मंडळी पुण्ययात्रेला सामोरी आली होती. थकलो असलो तरी मन उचंबळून येत होतं. आपलं माणूस रानावनातून, दऱ्याखोऱ्यांतून जपून आणल्याचा भाव मनात होता. पालखी गावकऱ्यांकडं सोपविली. एकदम मनाचा बांध फुटल्यासारखा झाला. दिवस रात्र डोंगरदऱ्यातून जपून आणलेलं चैतन्य कोणाकडं तरी सोपवत होतो. आपलं माणूस सोपविल्याचा कातरपणा मनात दाटून आला होता. आता पालखी उमरठपर्यंत मूळ मार्गाच्या आजूबाजूच्या गाव, वाड्यावस्त्यांमधून फिरणार होती. पालखी सोपविली तरी पालखी मागून आमचा पुण्यप्रवास सुरूच होता. रानवडीजवळून शेतवडीतून काळ नदीच्या पात्रापर्यंत पोचलो. अंधारात काळ नदीचं पात्र ओलांडलं. वाकी आणि इतर वाड्यांना बगला देऊन आम्ही पारमाचीच्या दिशेनं चालू लागलो. पारमाची देशाइतक्‍या उंचीवर. तिथून शिवथरघळ जवळ. पारमाचीला पोचण्यासाठी आता आणखी एक डोंगराची चढण होती. चहूकडं अंधार मी म्हणत होता. आकाशात ताऱ्यांची रांगोळी शुभ्र दिसू लागली होती.

घामानं भिजलेल्या अंगाला वाऱ्याची शितलता उभारी देत होती. पारमाची आता टप्प्यात आली होती. आज पालखीचा मुक्काम पारमाचीत होता. रात्र बरीच वर चढली होती. आम्ही पारमाचीतल्या मंदिराजवळ पोचलो. भूमिपुत्रांच्या अमाप प्रतिसादात पालखी मंदिरात विसावली. मात्र, पालखीसाठी गावकऱ्यांचा जागर होता. सह्याद्रीतल्या त्या दूर वाडीतले भजनाचे सूर उंच कडेकपाऱ्यांवर विसावत होते. त्या सुरांबरोबर आमच्या मनातली कृतज्ञतेची भावना आम्हाला एका वेगळ्याच समाधानापर्यंत नेत होती. डोंगर कुशीतलं उमरठ आम्हाला खुणावत होतं. उमरठमधल्या त्या चिरंजीव समाधीवर माथा टेकण्यासाठी मन ओढ घेत होतं. आमच्या समवेत हजारो पालखीचे भोई आता पंचक्रोशीत होते. आता पालखी सुभेदार तानाजींच्या कर्मभूमीतल्या शिलेदारांकडं सोपविली होती. गाव, वाडी, वस्तीवरच्या प्रत्येक गावकऱ्याला वाटत होतं सुभेदारांची पालखी माझ्या गावातून जावी, माझ्या दारातून जावी. अवघ्या पंचक्रोशीत नरवीरांची पालखी फिरणार होती. उमरठच्या मूळ पुण्यमार्गाच्या आजूबाजूच्या या गावांमध्ये जाऊन वारंवार मूळ मार्गावर येत राहणार होती. आम्ही पालखीचे भोई रानवडी, पडवळकोंड-वाकी-दहिवद-बिरवाडी अशा पुण्यस्पर्शाच्या वाटेनं उमरठकडं धाव घेत होतो. आसमंतात पालखीचा जागर दिवस-रात्र सुरूच होता. जणू चिरंजीव चैतन्यानं केळद कड्यापासून शिवथरपर्यंत आणि रानवडीपासून ढवळ्यापर्यंत सारं सह्याद्री मंडळ भारून गेलं होतं.

रात्र सरली, दिवसही मागं पडला, पुन्हा रात्र सामोरी आली, तरीही आमचा पुण्यप्रवास सुरूच होता... उमरठच्या दिशेनं आणि अखेरीस डोंगर कुशीतल्या उमरठला पोचलो. समाधी दृष्टिपथात आली. वेगानं नरवीरांच्या राहत्या वाड्याच्या जागेवर पोचलो. तिथला प्राचीन आम्रवृक्ष, त्या पुण्यप्रतापी वास्तूची साक्ष देत आजही नतमस्तक झालो. भावनांचा एकच कल्लोळ मनात दाटला. तो कल्लोळ मनात आणि शरीरात मावेना. त्याच भारावलेपणात नरवीरांच्या समाधीपाशी पोचलो. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. जाणवत इतकंच होतं, की प्रत्येकाचे डोळे भरून आलेत. आजूबाजूचं भान मुळीच नव्हतं. जणू वर्तमानात नव्हतोच आम्ही. नरवीरांच्या समाधीवर माथा टेकला, त्या भूमीला साऱ्यांनी साष्टांग दंडवत घातला. आमच्या अबोलपणातच सारं काही सामावलं होतं. मिटलेल्या पण डबडबलेल्या डोळ्यांसमोर सिंहगड ते उमरठ ही पुण्ययात्रा आणि पुण्ययात्राच होती.  

संबंधित बातम्या