वाघ बारसं

डॉ. अमर अडके, दुर्गअभ्यासक
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

किल्ले भ्रमंती

पावसाळा संपला असला तरी अधून मधून तो बरसतच होता. डोंगरदऱ्यांमधलं धुकं अजून हललं नव्हतं. फुलांचा सरता बहर अजूनही कुठंकुठं होता, गवताचा हिरवा रंग पात्याच्या टोकापर्यंत ताजा होता. अशा वेळी आठवण झाली ती विशाळगडापलीकडच्या माचाळची. खरंतर दसराही ओलांडून गेला होता. पण यंदा पावसाळा जरा जास्तच लांबला होता. 

भर दुपारी कोल्हापूरहून निघालो तेव्हा उघडीप होती. यावेळी असं ठरवलं, विशाळगडाच्या बाजूनं माचाळला न जाता खाली कोकणातून प्रभानवल्लीच्या बाजूनं माचाळला चढायचं. अंबा घाट ओलांडून खाली साखरप्याला पोचलो, तेव्हा कलती दुपार होती. आज कसं कुणास ठाऊक पण आकाश निरभ्र आणि निळं होतं. साखरपा ओलांडून पाली रस्त्याला दाभीळ फाट्यापर्यंत आलो. इथं पाली-रत्नागिरी रस्ता सोडून डावीकडं लांजा रस्त्याला लागतो. पुढं तोही सोडला आणि शिपोशीमार्गे प्रभानवल्लीकडं शिरलो, ते थेट केळवली फाट्यापर्यंत. इथं डावीकडं वळून माचाळच्या डोंगर चढाईला लागलो. वरच्या वाडीपर्यंत वाहन कसंबसं पोचलं. आता पायपीट...

वाडी माचाळला पोचेपर्यंत अंधार होणार होताच, पण मधल्या कड्यांमधून जाताना सूर्यास्ताचं विहंगम दृश्‍य अनुभवता येणार होतं. मधला कातळ टप्पा ओलांडून गाई गुरांच्या शेणाचा, लाल मातीचा, दोन्ही बाजूच्या कुंपणांचा वाडीचा रस्ता लागला तेव्हा आकाश अंधारलेलं होतं. वाडीतल्या घरांचे दिवे तेवढाच परिसर उजळत होते. शिवाजीच्या घरात आमचं सारं बिऱ्हाड टाकलं. कोपऱ्यातल्या चुलीवर त्याची बायको तांदळाच्या भाकरी थापत होती. जेवायला अजून वेळ होता. तोपर्यंत वाडीच्या टेपावरच्या मंदिराकडं निघालो. उंच गिरिशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या अशा मंदिरांची स्वतःची एक संस्कृती असते. त्यांचे स्वतःचे काही नीतिनियम असतात, स्वतःच्या काही कथा असतात. देवळात मूर्तीही असते आणि तांदळेही असतात. क्वचित आखीव-रेखीव मूर्ती असते, पण बहुधा ओबडधोबडच देव असतात. देवांची संख्याही दोनचार असतेच. त्यांची नावंही चटकन लक्षात राहत नाहीत. वाडीगणिक ही नावं बदलतात आणि देवाच्या परंपराही तेवढ्याच वेगवेगळ्या...

वाडीतल्या मंदिरात पोचलो. मधे दगडी चौकात एका चौथऱ्यावर एक घडीव मूर्ती... ती देवीची, डाव्या हाताला एक गुळगुळीत गोल दगड... हा बामणदेव, उजव्या हाताला चौथऱ्याच्या खालच्या बाजूला एका घुमटीत एक तांदळा... हा मूळपुरुष; आणखीन काही अशाच मूर्ती आणि चौथऱ्याच्या भोवती लाकडी मंडपासारखी महिरप. त्या आडव्या मंडपावर मिळतील ती फळं, करंज्या, कडाकण्या, मोठी रानफुलं टांगलेली. ही गणपतीनंतरची दसऱ्याची सजावट, पण याही पलीकडच्या एका गोष्टीवर माझी नजर खिळून राहिली. तशी ही गोष्ट डोंगरदऱ्यांतल्या अनेक वाड्यावस्त्यांवर पाहिलेली, पण नेहमीच मला त्याचं आकर्षण आणि कुतूहल वाटतं. हल्लीच्या टेक्‍नोसॅव्ही माणसांना त्याचं अप्रूप वाटणार नाही, पण या वाड्यावस्त्यांच्या जगण्याच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे तो...

मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणातली ही अपूर्वाईची गोष्ट म्हणजे एका दगडावरचं वाघाचं शिल्प...

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत अशी शेकडो शिल्पं मी पाहिली आहेत. त्या उंच गिरिशिखरावर चंद्रप्रकाशात शिवाजी सांगू लागला, ‘हा आमचा वाघदेव. अमुक दिवशी, अमुक वेळेला येतो, त्याला वाईट वंगाळ चालत नाही. त्याची पथ्य लई..!’ थोड्याफार फरकानं सह्याद्रीच्या सर्वदूर कडेकपाऱ्यात अशा कथा मी ऐकता ऐकता खानदेश-बागलाणापासून ते सह्याद्री-सातपुड्याच्या कडेकपाऱ्यात फिरू लागलो. या वाघदेवाला आठवू लागलो. रानावनातल्या या वाघांपासून संरक्षण मिळावं, जणू या वाघांनीच याचं रक्षण करावं म्हणून हा वाघदेव.

हा वाघदेव मला अनेक वेळा भेटला. मीही त्याला नमस्कारच केला. डोंगर, अरण्य भटकंतीला हा वाघदेव आज माझ्या मनात फेर धरू लागला.

आपली दिवाळी संपली की तीन आठवड्यांनंतर अरण्य, डोंगरदऱ्यांमध्ये दीपोत्सव होतो त्याला देवदिवाळी म्हणतात. पश्‍चिम घाट आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये महामूर पाऊस उणावून लालभडक रस्ते वाळायला आपली दिवाळी ओलांडून जाते मग टवटवीत अरण्यं देवदिवाळी साजरी करतात. या देवदिवाळीच्याही काही वेगळ्या प्रथा मी वाड्यावस्त्या आणि किल्ल्यांवर पाहिल्या आहेत. काही किल्ल्यांवरच्या देवदेवतांना देवदिवाळीच्या उत्तररात्री तेवणारे दिवे घेऊन जातानाही मी पाहिलं आहे. अगदी रायगडावरसुद्धा अशी  

दिव्यांची रांग पाहिल्याचं मला स्मरतं.

खानदेश-बागलाण या उत्तर महाराष्ट्रातील प्रदेशाची गोष्ट तर आणखीनच वेगळी. तसा हा कमी पावसाचा आणि उजाड प्रदेश, पण इथल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा मात्र अवाढव्य. बागलाणात लांबच लांब पठारावर उंच उंच डोंगरावर अफाट कड्यांचे उत्तुंग किल्ले. साल्हेर सालोट्यासारखे. हा प्रदेश आदिवासी बहुल. इथला दिवाळीचा पहिला दिवस अगदी वेगळाच असतो. मी कितीतरी वेळा हा दिवस अनुभवलाय. ती पारंपरिक पूजा, ती स्थानिक बोलीतील गाणी, या दिवसाला ‘वाघ बारसं’ म्हणतात. हा दिवस जसा मी बागलाण खानदेशात अनुभवला, तसा महाराष्ट्रातल्या सर्वदूर आडवाटांवर अनुभवला.

हल्ली कदाचित संख्या कमी असेल पण गत शतकानुशतकं महाराष्ट्राच्या अरण्य दऱ्यांत वाघाचा सार्वभौम संचार होता. वाघ मांसाहारी. अरण्य श्‍वापदांवर याचा उदरनिर्वाह. तृणभक्षी वन्यजीव हे जसं त्याचं अन्नसाधन तसं क्वचित विपरीत परिस्थितीत वाड्यावस्त्यांवरची गाई गुरं हेही त्याची शिकार. क्वचित रानावनातल्या एकट्या माणसांवर हल्लादेखील नित्याचा. मग या वाघदेवालाच साकडं घालायचं, ‘बाबा, आम्हाला सांभाळ. आमचं रक्षण कर. आमच्या गाई-गुरांवर हल्ला करू नकोस. आम्हालाही त्रास देऊ नकोस. आम्ही तुझी पूजा करतो...’ आणि याच भावनेतून सुरू झाली वाघदेव पूजा आणि वाघ बारसं.

महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांतल्या निव्वळ वाड्यावस्त्यांवरच नव्हे तर अगदी भर अरण्यातसुद्धा मी अशी व्याघ्रशिल्प पाहिली आहेत. काही दुर्गम भागात तर वाघाची मंदिरंसुद्धा पाहिली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातला पश्‍चिमेकडचा अकोले तालुका म्हणजे सह्याद्रीतल्या दुर्ग सौंदर्याचा रौद्र आविष्कार. शेजारच्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीचंही हेच चित्र. अलंग-मदन-कुलंगापासून ते हरिश्‍चंद्र कळसुबाईपर्यंत सह्याद्रीचं उत्तुंग दुर्ग सौंदर्य या परिसरात सामावलेलं आहे. हे दोन्ही तालुके तिथल्या वाड्यावस्त्यांवर मला नेहमी भावतात. अकोले तालुक्‍यातल्या अनेक वाड्यावस्त्यांवर आणि आदिवासी भागात अगदी काही गावातसुद्धा वाघोबाची मंदिरं आहेत. दुर्गम भागातल्या अनेक गावच्या वेशींवर वाघोबा मंदिरं आहेत.

देश आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्रीतील अनेक घाटवाटांवर वाघोबाच्या मूर्ती ओट्यावर किंवा चौथऱ्यावरच्या घुमटीत विराजमान झालेल्या आपल्याला दिसतात. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्‍यात पोखरी गावाजवळच्या वैदवाडी वस्तीत वाघोबाची मंदिरं आहेत. जुन्नर जवळ तळमाचीलाही वाघोबा मंदिर आहे. ठाणे जिल्ह्यात दुर्गम भागात अनेक मंदिरात आडव्या तुळ्यांवर किंवा उभ्या खांबांवर वाघाची चित्रं कोरून त्यावर शेंदूर फासलेला असतो. 

रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडी, हरिश्‍चंद्रगड पायथा, अकोले तालुक्‍यात पिंपरकणे, बिताका, खिरविरे, शेणीत, हरिश्‍चंद्राच्या पायथ्याच्या पाचनई गावाजवळ कोड्याचा कुंड हा एका झऱ्याचा जलाशय आहे. तिथं पांचनईच्या वरच्या अंगाच्या कलाडगडावर, कलाडच्या पायथ्याच्या पेठ वाडीत, या परिसरातल्या भैरवनाथच्या ठिकाणी या शिवाय म्हैसवळण घाट, देवगाव, झुल्याची सोंड अशा कितीतरी ठिकाणी दिवाळीच्या पहिल्या दिवशी किंवा अगदी दिवाळीनंतरसुद्धा वाघ बारसं करतात.

आपल्याकडं धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आश्विन वद्य द्वादशीला ‘वसुबारस’ साजरी करतात. त्याचा हेतू मूलतः गोकुळातील प्राण्यांविषयी आदर, मातृत्व, संतान आणि या साऱ्यांच्या जीवन आणि आरोग्याशी असतो. तर दऱ्या डोंगरातले अरण्यपुत्र, आदिवासी बांधव ‘वाघ बारसं’ साजरं करतात ते याच दिवशी.

बहुतांश वाड्यावस्त्यांवर वाघ बारसं दिवाळीच्या पहिल्या दिवशी असतं. दिवाळी वसुबारसापासूनच सुरू होते, तोच दिवाळीचा खरंतर पहिला दिवस. अर्थात वाघ बारशाची पद्धत जागोजागी वेगवेगळी असते. पण या दिवशी वाघाच्या मंदिरात जाऊन पूजा करणं, वर्षभरातले नवस फेडणं आणि नैवेद्य दाखवणं सर्वत्र असतं. काही ठिकाणी कोंबडा-बोकड असा मांसाहारी तर काही ठिकाणी तांदळाची खीर, डांगर असा शाकाहारी नैवेद्य असतो.

अकोले तालुक्‍याच्या दुर्गम भागात एक गंमतशीर दंतकथा मी ऐकलीय. नवसाच्या कोंबड्याचा जर बळी दिला नाही तर रात्री वाघ कोंबडं पळवून नेतो किंवा वाघाच्या संचार क्षेत्रात कुणी झाड तोडून लाकडं आणली तर वाघ दारात येऊन गुरगुरतो.

आदिवासी वाड्यांवर ‘वाघ बारसं’ हा मोठा उत्सव असतो. या दिवशी संध्याकाळी पाड्यावरील लोक सर्व गाईगुरांसह वाघोबाच्या मंदिरासमोर एकत्र येतात. दिवसभरात वाडीतून तांदूळ, गूळ जमा केलेला असतो. जमेल तेवढी वर्गणीही जमा केलेली असते. मंदिराचा परिसर गोमयानं स्वच्छ सारवून त्यावर गोमूत्र शिंपडलं जातं. स्थानिक कलेल्या रांगोळ्याही घालतात. फुलांनी आणि माळांनी मंदिर सजवतात. यावेळी विविध वन्य प्राण्यांची सोंगं सजविली जातात. त्यात हमखास वाघ असतोच.

मंदिराभोवती पळणाऱ्या या वाघाला पाठीमागून पळणारे गावकरी विचारतात, ‘आमच्या शिवारी, आमच्या वेशीला येशील का?’ वाघाचा सोंग घेतलेला गावकरी ‘नाही..... नाही...’ असं म्हणत पुढं पळत असतो. जोगोजागच्या व्याघ्रशिल्पांची पूजा करून नारळ फोडला जातो. वाघ देवासमोर प्रार्थना केली जाते, मागणं मागितलं जातं... ‘आमचे, गव्हाऱ्यांचे... गोरा-ढोरांचे जनावरांपासून रक्षण कर... आम्हाला चांगलं पीक दे... आजारांना दूर ठेव.’

या प्रथा आणि प्रार्थनांमध्येच वाघ बारशाचं सार सामावलेलं आहे. मध्यभागी एक दिवटी घेतलेला गावकरी, त्याच्या दोन्ही बाजूला मोर पिसं अशा वेगळ्याच प्रकाशात त्या डोंगरपायथ्यांच्या वाड्यांवर गायल्या जाणाऱ्या पारंपरिक गाण्यांच्या नादात दिवाळीची पहाट अनुभवणं हा प्रकाश आणि लोकसंगीताचा स्वर्गीय आनंद सोहळा असतो. उगवत्या सूर्याच्या लालीबरोबर उलगडत जाणाऱ्या डोंगररांगा विश्‍वरूपाचं दर्शन देतात अशी दिवाळीची पहाट डोंगरभटक्‍यांच्या आयुष्यात अनपेक्षित किंवा ठरवून किमान एकदा तरी यावीच.

जनावरांचे गोठेही या दिवशी अधिकच स्वच्छ करून इथं रांगोळ्या काढतात. गोठ्यात दिवे लावतात. पशुधनाची पूजा करतात आणि गाईगुरांना गोडाचा नैवेद्यही भरवला जातो. ही रात्र रंगीबेरंगी, पारंपरिक कपडे घालून नृत्यात कधी सरते हे कळतच नाही. ही नृत्यं त्यांच्या पारंपरिक ठेक्‍यावरच चालतात. त्यांच्या चालीही वेगळ्या आणि या चालींवरच नृत्यही वेगळी. कुलंगाच्या पायथ्याच्या आंबेवाडीतला पिंट्या असो, कलाडगडाच्या पायथ्याचे गावकरी असोत, हरेरगडाच्या पायथ्याच्या बेचक्‍यातल्या वाडीतले आदिवासी असोत त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठेक्‍यांची, चालींची ऐकलेली गंमतशीर नावे आठवतात, ‘मुऱ्हाचाली - टाळ्यांची चाल - बदक्‍या चाली - बायांची चाल - देवांची चाल - नवऱ्याची चाल इ.’

अर्थात या साऱ्या अनुभवाला आता दशकं होऊन गेलीयत, वाड्याही बदलल्या आहेत, वाडीतल्या पोरांच्या आवडीही बदलल्या आहेत. पूर्वीची पारंपरिक बाज जीर्ण होऊ लागलाय. जुना ठेका रिमिक्ससारखा जाणवू लागलाय. वाघाची शिल्पही पूजेविना भकास दिसताहेत. वाघ बारसं वाड्यावस्त्यांवरून हद्दपार होऊ लागलंय. ‘वाघच जिथं हद्दपार झालाय तिथं बारशाचं काय घेऊन बसलाय!’

वाघ बारसं ही महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांतली शतकांची लोकपरंपरा आहे, ती लोप पावतेय का काय? अशी भीती वाटायला लागलीय. मागच्या वर्षी बेलपाड्यातून सादडे घाट चढून मुद्दाम या दिवशी कलाडगडाच्या पायथ्याशी पोचलो. वाडीत सर्वत्र सामसूम बघून सुन्न वाटलं. वाघाच्या मंदिरात संध्याकाळी पूजा तर झाली. मंदिराबाहेर बसून होतो, वाघाचं सोंग पाहण्यासाठी, मागणं ऐकण्यासाठी, नृत्याचा ठेका बघण्यासाठी. रात्र चढली सर्वत्र सामसूम. केव्हा डोळा लागला कळलंच नाही. स्वप्नात मात्र सारखा वाघ येत होता. मंदिराभोवती फेर धरून नाचत होता. कुणी न विचारताच म्हणत होता, आता कधीच वाडीच्या वेशीत येणार नाही. वाघ आमच्यावर इतका का रुसलाय कळलंच नाही.

संबंधित बातम्या