मसाईचे पश्चिमरंग

डॉ. अमर अडके  
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

भ्रमंती

किमान चाळीस वर्षं झाली मसाई डोंगररांग आणि पठारांशी एक नातं जुळून गेलंय... या नात्याचं निमित्त ‘पन्हाळगड ते विशाळगड’ प्रेरणा मार्ग. म्हणूनच हे नातं निसर्गाचं जसं आहे, तेवढंच भावनेचंही आहे. या मार्गाच्या आखणीच्या निमित्ताने या डोंगररांगेत, त्यातल्या वाड्या-वस्त्यांत आणि अंगाखांद्यावरच्या अरण्यात खूप फिरलो. मग जशी पन्हाळा-पावनखिंडीची प्रतिवर्षी वारी सुरू झाली, तशी या डोंगररांगेच्या अंतरंगातली भटकंती कमी होऊ लागली. अधूनमधून उबळ आली की जाणं व्हायचं, पण कमीच. पण मसाईच्या पूर्वेबरोबरच पश्चिमेचं अंतरंग सारखं खुणवायचं. पन्हाळगड-पावनखिंड संग्राम यात्रेच्या निमित्तानं मसाई डोंगररांग अवघ्या महाराष्ट्राला परिचित. पण त्या मार्गापलीकडचे तिचे अज्ञात पैलू मात्र अपरिचितच. ते निसर्गसौंदर्य अपरिचितच... त्या अज्ञात दऱ्याखोऱ्याही श्री शिवचरित्राच्या साक्षीदारच...

मसाईचं अंतरंग मनात खोल रुतून बसलेलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भटकण्याची आरोग्यबंधनं तर आटोकाट पाळतोच आहोत. पण या साऱ्या बंधनांचा आदर राखून जीवनाचा श्वास झालेले ते डोंगर, ती अरण्यं जवळ करण्याचा प्रयत्न करायला हवा, हेही तितकंच खरं. कारण त्याशिवाय आपण जगू शकत नाही हे त्याहून खरं. म्हणूनच आरोग्य नियमांच्या मर्यादेत डोंगर अरण्यं जवळ करावीत अशी मनानं उचल खाल्ली. चार-दोनजणांनी निसर्गाचा एक भाग होऊन दऱ्या डोंगरांत अनिर्बंध फिरणं ही खरी भटकंती. मसाईच्या पश्चिम रंगानं मनात फेर धरला. त्या जुन्या वाड्या, ते देव, त्या इरल्यातल्या आया, कांबळ्याच्या बंडीतले बाप्ये गडी नव्यानं आठवू लागले... आणि बोलावणं आल्यासारखा चारच बिनीचे सवंगडी घेऊन मसाईच्या पलीकडच्या पायथ्याला जाऊन उभा राहिलो. डोंगर कड्याला ओरडून सांगितलं, आलोय!

आज थोरल्या बांदीवड्यात भोसल्यांच्या जुन्या वाड्याच्या दारात उभा आहे. इथूनच पाठीवर सॅक लावायची आणि समोरच्या डोंगरात शिरायचं. भोसल्यांच्या भावकीचा हा मूळ वाडा तसा शेकडो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार... वाड्याच्या चौकातल्या घोडी बांधायच्या कड्या अभिमानानं दाखविणारी... इतकंच नव्हे तर शिवाजी महाराज विशाळगडाला, कोकणात जाताना इथंच राहायचे असंही मानणारी ही भोसल्यांची माणसं. मी कधी विश्लेषणात पडलो नाही, फक्त त्यांच्या प्रामाणिक भावनांना मनोमन नमस्कार केला. या वाड्याच्या मागे अत्यंत देखण्या बांधणीची, पायऱ्यांची, सुबक पाटाची एक विहीर आहे. पाणी इतकं नितळ की तळ अगदी स्वच्छ दिसतो. या वाड्याची शतकापूर्वीची एक गोष्ट नेहमी सांगितली जाते ती म्हणजे, वाजत गाजत घातलेल्या दरोड्याची आणि वाडा कसा वाचला याची. मग त्या दरोडेखोरांनी किसरूळच्या वाड्यावर कसा दरोडा घातला याची. मसाईच्या खांद्यापायथ्याशी असणाऱ्या अनेक गावांत असा अज्ञात इतिहास दडून बसलाय.

भोसल्यांच्या घरच्या चहाला नाही म्हणता आलं नाही. मग युवराज मोऱ्यांच्या चुणचुणीत सुयशसह डोंगर चढाला लागलो. बांदीवड्याच्या समोर उजव्या हाताला मसाईचं मूळ पठार. त्यावर अनादी कालापासून मसाईचं वास्तव्य. त्याच्या डाव्या हाताच्या डोंगरापलीकडे म्हणजे उत्तर पूर्वेला खोतवाडी. त्याच्या आधी पठार पायथ्याला कुंभारवाडी. खरंतर ही खोतवाडी मूळची चाफेवाडी, पण खोतांची घरं जास्त म्हणून हल्ली खोतवाडी म्हणतात. खोतवाडी आणि बांदीवड्याच्या वरच्या उत्तर अंगाला डोंगराच्या कुशीत रहाळाचं श्रद्धास्थान असणारा एक देव बसलाय. ‘भैरी’ म्हणतात त्याला. खोतवाडीचा भैरी. 

बांदीवड्यातनं जरा चढ्या पठारानं जायला लागतं. पण खोतवाडीतनं सोप्या वाटेनं येता येतं. उंच देवराईत वसलेला हा भैरी सगळ्या वाड्यावस्त्यांचं श्रद्धास्थान. देवाचा तांदळा गर्भगृहात. पूर्वी उघड्यावरच असलेल्या देवासाठी हल्ली प्रशस्त मंदिरही बांधलंय. मंदिराच्या प्रांगणात बारमाही पाण्याचं टाकं, तेही बांधून काढलंय. त्याच्या पुढे स्वच्छ पाण्याचा प्रवाह. करंजफेणातली, पिशवीतली, बांदीवड्यातली, खोतवाडीतली आणखी वाड्या-गावातली माणसं इथं आपापल्या गावातले देव नेण्यासाठी येतात. पंचक्रोशीतली पालखी येळवण जुगाईला म्हणजे देवाच्या बहिणीला भेटायला इथनंच निघते. मग मसाईच्या डोंगर-अरण्यातून वाट काढत चालत पोचते. श्रावणातल्या सोमवारांचं आणि वाड्या वस्त्यांच्या परंपरांचं फार जवळच नातं. अमावास्येच्या दर्शनाची आणि खाऱ्या नैवेद्याची ही एक वेगळी परंपरा. या देवासमोर कोणी खोटं बोलत नाही. परंपरांचा बाज आणि निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेलं हे श्रद्धास्थळ मसाईच्या अंतरंगातलं एक लेणं आहे. बांदीवड्यातून इथपर्यंतची पठारावरची भटकंती म्हणजे निसर्गसौंदर्यांची अप्रतिम अनुभूती. या पठारावरनं मसाई मंदिरापासून ते मुड्यापर्यंत आणि तुमजाई, सातेरीपासून ते कासारी नदीच्या बाकदार प्रवाहापर्यंत आणि अणुस्कुऱ्याच्या डोंगररांगेपर्यंत विलोभनीय सह्याद्रीचे दर्शन होते. अशी स्थळं म्हणजे मसाई डोंगररांगेची आभूषणंच.

खोतवाडीच्या या भैरीपासून पूर्वेला म्हणजे खोतवाडीच्या बाजूला मातीच्या चांगल्या रुंद वाटेनं उतरायचं मग चढाचा घुंगुरकडे जाणारा डांबरी रस्ता आडवा येतो. त्या सडकेनं थोडं वर चालत जायचं. मग उजवीकडे खाली उतरणारी एक मळलेली वाट आहे. ती वाट पकडायची. जांबेश्वराकडे जाणारी ही वाट! जांबेश्वर? होय! मसाई डोंगररांगेच्या मांडलाईवाडीवरच्या पठारापर्यंत जाणारी ही पठार वाट. या वेगळ्या वाटेनंही आजच्या पन्हाळगड पावनखिंड मार्गावरच्या मांडलाईवाडीत उतरता येतं. चाळीस वर्षांत या वाटेवरच्या जंगलात पडलेला फरक सुन्न करणारा आहे, असो! या वाटेवर एक कडक देव आहे... या देवाच्या स्थानाइतकं निसर्गरम्य स्थळ शोधून सापडायचं नाही. जांब ऋषींची तपोभूमी असणारी ही जागा एका वटवृक्षाच्या सन्निध्यात आहे. ही जागा आणि हा देव फार कडक. इथं रहाळातल्या माणसांची खरं खोटं करायला यायची परंपरा. या देवासमोर खरं तेच खरं आणि खोटं तेच खोटं होतं ही श्रद्धा. बारमाही पाण्याचा स्रोत या जागेवर आहे. स्वच्छ पाणी इतकं उदंड की खालच्या खोतवाडी आणि पिशवी या दोन गावांना बारमाही पुरतं. इथून हल्ली तशा दोन जलवाहिन्याच गेल्यात या गावात. इतकं निसर्गरम्य स्थळ, पण माणसाच्या बेफिकिरीची अस्वच्छता इथंही वाढू लागलीय.

या स्थानासमोरच एक शिवपिंड आणि नंदी आहे, पण हे अलीकडचं त्याच्या समोरच छोटेखानी तळं आहे. इथून वाहणाऱ्या पाण्यावर चक्क एक लघु पाटबंधारे प्रकल्प साकारलाय!

मसाई डोंगररांगेच्या अंतरंगातला हा आणखी एक दागिना!

इथून बांदीवड्याच्या पुढ्यातल्या पाषाण स्तंभांपर्यंत भैरीमार्गे पठाराच्या माथ्यावरून पायी भटकंती करत उतरूनही पोचता येतं. तसंच कोल्हापुरातून पन्हाळा रस्त्यानं कोतोली फाट्यानं किंवा वाघबीळाच्या वरच्या अंगाच्या घुंगुर फाट्यानं बांदीवड्यात पोचून शेतवडीच्या सोप्या वाटेनंही पोचता येतं. हे पाषाण स्तंभ गेली चाळीस वर्षं माझं कुतूहल जागतं ठेवताहेत. उतरत्या डोंगर दांडावरचे दख्खन पठारावरील कठीण अशा पाषाणाचे हे स्तंभ नैसर्गिक असून जणू काही मुद्दाम तयार करून एकमेकांवर रचलेत अशा अप्रतिम रचनेचे आहेत. पण अवघ्या दख्खन पठाराच्या आणि सह्याद्रीच्या निर्मितीचे हे साक्षीदार म्हणजे मसाईच्या डोंगररांगेचं वैभवच आहे!

सह्याद्री हा पर्वतांचा आजोबा ज्या दख्खन पठारावर आहे, तेच मुळी गोंडवन काळ ते इओसिन काळ (सुमारे १८.५ ते ६ कोटी वर्षे) इतकं प्राचीन आहे. याच्या निर्मिती काळात किंवा पूर्वीही लाव्हा रसाची उलथापालथ होतच होती. दरम्यान काही प्रवाही मॅग्मा थंड होणाऱ्या भूरचनेच्या भेगांमध्ये शिरला. त्याचे अश्मीभवन झाले, कालांतराने तो ज्या यजमान भूरचनेच्या भेगांमध्ये शिरला त्या भूभागाचे मृत्तिकाकरण झाले. मृदा कालौघात निघून गेली आणि पाहुणा अश्मीभूत मॅग्मा दिमाखात उभा राहिला... कुठे स्तंभांच्या रूपात, कुठे सुळक्यांच्या, तर कुठे अजस्र भिंतींच्या रूपात. तो सह्याद्रीचं सौंदर्य बनला. त्यांना ‘डाईक’ म्हणतात! इतकं बांदीवड्याच्या पाषाण स्तंभांचं प्राचीन आणि शास्त्रीय मूल्य आहे. मसाई डोंगररांगेतले ते मोती आहेत. स्थानिक भाषेत त्यांना ‘कुवाँर खांब’ म्हणतात. या नावाची एक दंतकथाही सांगितली जाते. या स्तंभांच्या खालच्या अंगाला एक दगडी तांदळा आहे. त्याला ‘क्वार देवी’ म्हणतात. कधी काळी एक लग्नाचं वऱ्हाड डोंगर पार करत होतं. नवरदेवानं या क्वार देवीचा अपमान केला. संतापलेल्या देवीनं अख्ख्या वऱ्हाडालाच शाप दिला आणि वऱ्हाडी माणसांचे असे स्तंभ झाले. अशी ही दंतकथा. आजही लग्न झालं की नवदाम्पत्य क्वार देवीच्या दर्शनाला येतं, हा या दंतकथेचा धागा. 

या स्तंभामध्ये आणखी एक गंमत दडलीय. अनेक उभ्या स्तंभांमध्ये एका डाईकचा उभा तुटलेला भाग तिरका टेकलाय. त्याची जाडीही कमी आहे, त्यामुळे मधे पोकळी तयार झाली आहे. त्या दगडात धातूंचा अंश जास्त असावा. त्यावर दगडाने आघात केल्यावर कर्णमधुरध्वनी येतो. तो फक्त त्याच दगडातून येतो, तो ज्यावर टेकलाय त्या स्तंभातूनही येत नाही! निसर्गाची कमाल! अहो आश्चर्यम्!

अशा अनेक वैशिष्ठ्यांची ही मसाई डोंगररांग आणि तिची विलोभनीय पठारं! तिच्या पश्चिम रंगात आज तर आपण कसेबसे मांडलाईवाडीच्या पश्चिमेच्या पठारापर्यंत पोचलो. अजून असे अनेक पश्चिम रंग उलगडायचे आहेत. कित्येक दशकं झाली या मसाईच्या डोंगररांगांत फिरतोय, अनेक नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करतोय, कधी पठाराच्या वरच्या अंगानं, कधी सड्या खालच्या जंगलातनं, कधी खांद्यावरच्या वाड्या वस्त्यांमधनं, कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे तर कधी पश्चिमेकडून पूर्वेकडे जंगल तुडवतोय. कधी दोन पठारांमधल्या दऱ्या चढण्या-उतरण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळी ही डोंगररांग नव्या सौंदर्यानं सामोरी येतीय. म्हणूनच तिच्या अज्ञात पश्चिम रंगाचा हा शब्दवेध मांडावासा वाटला.

 

संबंधित बातम्या