गोरखगडाची चढाई 

डॉ. अमर अडके  
गुरुवार, 3 जानेवारी 2019

किल्ले भ्रमंती
किल्ल्यांवर फिरायला कोणाला आवडत नाही? पण त्यासाठी लागतो प्रचंड उत्साह, फिटनेस, संयम.. किल्ले आपल्याला केवळ इतिहासच शिकवत नाहीत, त्या काळातच नेत नाहीत; तर अनेक गोष्टी शिकवतात. सकारात्मक वृत्तीने जगायलाही शिकवतात.. किल्ले भ्रमंतीतील अनुभव. 

बागळाणातला रौद्रसुंदर उत्तुंग साल्वेह सालोट्यापासून ते बेळगावजवळच्या घनगर्द जंगलातल्या भीमगडापर्यंत; सह्याद्रीतल्या दुर्गांपासून ते यावलच्या उत्तर अंगाने सातपुड्याला स्पर्शून मेरुघाटातल्या नरनाळ्यापर्यंत आणि त्याच्याही पुढे मनमुराद भटकलो. उघड्या बोडक्‍या प्रचंड कातळकड्यापासून ते अरण्याने वेढलेल्या या साऱ्या किल्ल्यांनी अक्षरशः वेड लावले... 
तीन तपे होऊन गेली. ही सौंदर्यानुभुती घेतो आहे. 
आपल्याच पावलांचा लयबद्ध आवाज, 
कधी पायतळीचा पालापाचोळा तुडविल्याचा, 
कधी पाण्याच्या झुळझुळणाऱ्या प्रवाहातून चालतानाचा, 
तर कधी चिखलात पावले रुतवत चालण्याचासुद्धा. 
कधी वाळलेल्या तर कधी ओल्या गवतातून चालतानाचा, 
तर कधी सड्यावरच्या दगडांवरून चालताना घुमणारा, 
कधी भोवती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याचे संगीत, 
कधी झोडपणाऱ्या पावसाचा ताल, 
कधी कळाकळा तापणाऱ्या उन्हात समोर धावणारे मृगजळ, 
भोवतीच्या पानांची लयबद्ध सळसळ, 
तर कधी आसमंत भरली निःस्तब्ध शांतता, 
त्या शांततेचा भंग करणाऱ्या पक्ष्यांचे आवाज, 
कधी उरावरली चढाई, 
कधी पाय ठरू न देणारी घसरण, 
आणि मग या साऱ्यात 
गवसतात प्रेरणादायी गडकोट, 
रहाळातली प्राचीन मंदिरे, 
जातिवंत अरण्य, वन्यजीव, 
भूमिपुत्रांच्या लोभसवाण्या संस्कृतीच्या वाड्यावस्त्या. 

हे अनुभवले ते शब्दांत पकडणे कठीण आहे. पण या साऱ्यांसह गडकोट जसे भावले तसे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. हे अपरिचित गडकोट त्यांच्या संवेदनांसह आपल्याला भेटविण्याचा हा प्रयत्न. 

दूर अज्ञातात असणारे हे गडकोट मनाला इतके का भावतात कुणास ठाऊक? त्यातलाच एक ‘गोरखगड.’ 

जानेवारी २०१६. उत्तररात्री थोडी लवकरच जाग आली. म्हटले, इतक्‍या लवकर उठून काय करायचे? तसाच पडून राहिलो. ना धड झोप ना जाग. अर्धवट काहीतरी एखादी डुलकी लागली असावी. डोळ्यासमोर सह्याद्रीच्या बेलाग रांगा आणि खोल दऱ्या दिसू लागल्या. ते काळ्या पाषाणाचे अफाट कडे दिसू लागले. एवढ्यात जाग आली. पण डोळ्यासमोरून सह्याद्रीचे ते रौद्रसौंदर्य हलेना. त्या दऱ्या, ते सुळके, ते कडे सारे ओळखीचे होते. अस्पष्ट स्वप्न ताणताणून जुळवले आणि अंगावर रोमांच उभे राहिले. 

अरे! हा तर सिद्धगड, पलीकडे साखरमाची, त्याही पलीकडे आहुपे घाट, तो दुर्गम गोरखगड आणि पलीकडचा आकाशात घुसलेला सुळका - मच्छिंद्रगड. खूप दिवस झाले जाऊन. खरेतर नाशिक सोडल्यानंतर जाणे झालेच नव्हते.. आणि आज स्वप्नच पडले. म्हणजे हे किल्ले आणि घाट बोलावतायत. जायलाच हवे.. अखेर गोरखगड-सिद्धगड मोहीम नक्की झाली. तीन दिवसांचा सारा संसार पाठीवर बांधून मोहिमेला निघालो. 

मोहिमेस सुरवात 
कोल्हापूर - पुणे मार्गे खालापूर-खोपोली-चौक-कर्जतमार्गे मुरबाड रस्त्यावर ‘म्हसा’ या गावी पोचलो. हे गाव तसे मोक्‍याचे. मुरबाडच्या जवळ, पण भीमाशंकरच्या डोंगररांगांच्या पश्‍चिमेकडच्या सौंदर्यशाली पर्यटनाच्या वाटेवर असल्यामुळे चांगलेच वाढले आहे. गावच्या म्हसोबाची यात्रा ही ठाणे जिल्ह्यातील एक मोठी यात्रा. इथे नाश्‍ता उरकून मोहिमेच्या मार्गाला लागलो. 

‘म्हसा’ मग जांबुर्डे फाटा, नारिवली फाटा, उचले, देहरी असे करत अखेर खोपोलीत पोचलो. सिद्धगड तसा गोरखगडाच्या किंचित दक्षिण-पश्‍चिमेला. आधी तो करून मग गोरख असा प्रघात. पण यावेळी गोरखगड पहिल्यांदा मग सिद्धगड असे करायचे ठरले. म्हणून खोपोलीपर्यंत आलो. 

गोरखगडाला उचले, देहरी आणि खोपिवली अशा तीनही ठिकाणांहून जाता येते. त्यापैकी उचलेपासूनचा मार्ग तसा लांबचा आणि पायथ्यापर्यंत पोचायला बरीच पायपीट, म्हणून फारसे कोणी जात नाही. देहरीचा तसा दुर्गारोहींसाठी रुळलेला, पण दांडावरची चढण डोक्‍यावर सूर्य घेऊनच चढावी लागते. पल्लाही मोठा. म्हणून खोपिवली निवडली. मार्ग चढाचाच पण झाडीतून जाणारा आणि माचीपर्यंत अंतर कमी. तशा रानात याव्यतिरिक्त अनेक पायवाटा आहेत. पण कोणत्याही रानवाटेने चढून शेवटी गडपायथ्याच्या गोरखमाचीवर यावेच लागते. 

थंडी तशी कमीच. सकाळ असल्यामुळे वातावरण आल्हाददायक. उचले फाटा ओलांडून खोपिवलीत पोचलो. रेखीव घरांचे कोकणी गाव. भीमाशंकर डोंगररांगांच्या पश्‍चिम पायथ्याचे. 

हॅवरसॅक पाठीला लावल्या आणि मान वर केली.. समोर चोहोबाजूंनी सुटलेल्या कातळात कोरून काढल्यासारखा गोरखगड आणि त्याच्या पश्‍चिम अंगाला वाडीच्या बाजूला आकाशात घुसलेला मच्छिंद्रगडाचा सुळका आणि मधली खिंड. सह्याद्रीचे केवढे विलोभनीय रूप! या पाषाण शिल्पावर चढून जायचे! अंग मोहरून गेले! 

एव्हाना सूर्य बराच वर आला होता. घाई करणे भाग होते. कारण ऊन वाढू लागले होते. जोरात आरोळी दिली, ‘बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय’ आणि गड चढायला सुरुवात झाली. 

भातखाचरांतला टप्पा 
पहिला टप्पा भातखाचरांमधला. कणाकणाने चढ सुरू झाला. वाळलेली भातखाचरे मागे पडली आणि चढाची जंगलवाट सुरू झाली. चढ अगदीच उभा नसला तरी झपाट्याने उंची गाठणारा होता. नशीब एवढेच, की डोंगरउतारावरचे जंगल त्यामुळे ऊन थेट अंगावर येत नव्हते. चढाला डबे मागे पुढे होऊ लागले. पुनःपुन्हा मोट आवळावी लागली. एक - दोन थांबे अपरिहार्य ठरले. 

जंगलवाटेने दुर्ग पायथ्याच्या माचीवर पोचलो. आता खालचे पिवळ्या घराचे, मोकळ्या भातखाचरांचे कोकण वेगळेच दिसत होते. या माचीवर नाथपंथीय साधकांची वस्ती आहे. एका जुन्या मंदिराच्या अवशेषांतच थोडी डागडुजी करून नवीन मंदिर उभारले आहे. त्या जंगलझाडीतच उत्तम बाग फुलवली आहे. नैसर्गिक स्रोतांद्वारे पाण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. माचीवरच थोड्या मोकळ्या जागी अर्धवट तुटलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण वीरघळी दिसतात. एक रंगविलेला नंदीही दिसतो. या झाडीतून थोडे वर गेल्यावर एका दगडी चौथऱ्याशेजारी एक जुनी शिवपिंड आणि त्याच्याच शेजारी शेंदरी रंगाने रंगविलेली नवीन पिंड आणि घडीव दगड आहेत. शेजारीच पत्र्यांनी बंदिस्त केलेले मंदिर आहे. आता मूळ मंदिर ढासळलेय. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत मंदिराची कमरेएवढी दगडी भिंत अस्तित्वात होती. 

आता बारीक चढाने झाडी ओलांडून गडपायथ्यापर्यंत पोचायचे. समोर उत्तुंग पाषाणातला गोरखगड उभा. चिंतामणी खरे विचारतो, ‘सर, हे चढून जायचे?’ मी ‘हो’ म्हटल्यावर सगळ्यांच्याच नजरा प्रश्‍नार्थक. कोणीच काही बोलले नाही. सगळे माझ्या मागून चालू लागले. दुर्गमतेची, खड्या चढाची, दरीच्या बाजूच्या एक्‍स्पोजरची कल्पना आधीच दिली होती. आता प्रत्यक्ष वस्तुस्थितीच समोर आली होती. नाही म्हटले तरी साऱ्यांना दबून गेल्याचे जाणवत होते. 

आता झाडी संपली. खडा चढ सुरू झाला. पहिला टप्पा अस्ताव्यस्त पसरलेल्या कातळांमधून जाणारा, उभे चढत जायचे. काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्यांमुळे अधिकच दुर्गम झालेला. त्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. 

भवानी आणि शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्यासह सह्याद्रीला वंदन करून दगडांच्या खोबणीत हातापायांची बोटे रुतवत, कधी तुटलेल्या पायऱ्या तर कधी उभा कातळ असे नेटाने वर चढू लागलो. आता कातळातच कोरून काढलेला बालेकिल्ल्याचा पहिला छोटेखानी दरवाजा आला. अलीकडे भगव्या ऑईलपेंटने रंगवला आहे. इथून गडाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश.

दरवाजातून आत येऊन वर चढाला लागावे. इथे मात्र सुस्थितीतल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून छोटेखानी मोकळ्या माळावर पोचावे. समोर छाती दडपून टाकणारा अवघा कातळ उभा चढून जावा लागणारा एकमेवाद्वितीय बालेकिल्ला! कातळाच्या पायथ्याला सर्व बाजूंनी गुहा मंदिरे आणि पाण्याची टाकं आहेत. त्यातले एक गुहालेणे औरस - चौरस आणि प्रशस्त आहे. गडावरची ही उत्तम मुक्कामाची जागा. 

पण तिकडे जाण्यापूर्वी या उत्तुंग कड्याच्या डाव्या बाजूला एका पायवाटेने जावे. दगडी भिंतीत कोरलेल्या दोन अश्‍वारूढ मोठ्या मूर्ती आणि एक छोटी खांद्यावर कावड घेतलेली श्रावण बाळाची मूर्ती आहे. दोन मूर्तींपैकी डावीकडील शालिवाहन राजा याची आहे, असे मानतात. अश्‍वारूढ मूर्तीच्या हातात विचवा हे शस्त्र असून डोक्‍यावर वैशिष्ट्यपूर्ण शिरस्त्राण आहे. उजवीकडची मूर्ती काहीशी अशीच असून तिच्या हातातही खंजीर हे शस्त्र आहे. परंतु परंपरेने त्यास शालिवाहन राजा आणि त्याची पत्नी ‘नागणिका’ असल्याचे स्थानिक लोक सांगतात. 

थरारक चढाई 
हे वैशिष्ट्यपूर्ण लेणे पाहून पुन्हा माघारी यावे. कातळ कडा डाव्या हाताला ठेवून काही पायऱ्या उतरून प्रशस्त गुंफा डावीकडे ठेवून थोडा चढ चढून कातळाला डावीकडे भिडावे. इथूनच खरा थरारक चढाईचा टप्पा सुरू होतो. 

कातळाकडे तोंड करून वर बघितल्यास थोड्या उंचीवर कातळातच कोरून काढलेल्या अरुंद कातळ पायऱ्या दिसतात. पण तिथपर्यंत तरी या उभ्या कातळावरून चढायला हवे. तुटलेल्या कातळाच्या आधाराने ज्याला रॉक क्‍लाइंबिंग विदाऊट रोप म्हणावे असे चढून वर पायऱ्यांपर्यंत गेलो. हळूहळू एकेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत, सारे पणाला लावून थोडे पुढे - मागे होत वर पोचत गेले. सगळे या टप्प्यावर आले. खालच्या सरळसोट दरीकडे काही जणांना पाहवेना. 

इथून पुढे काही सुस्थितीतल्या पायऱ्या - पण बाजूला दगडी कठडा नाही, काही ठिकाणी उद्‌ध्वस्त पायऱ्यांमुळे तयार झालेला छोटेखानी कडा, सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांचा कोन सरळ, धोकादायक वळणे, खाली जवळजवळ दोन हजार फूट खोल दरी अशा अवघड परिस्थितीतून दुर्गचढाई सुरू झाली. प्रत्येक सवंगड्याला आळीपाळीने हाक मारून त्यांची मानसिकता आणि सुरक्षितता यांची खात्री करू लागलो. अखेरीस सर्वांसह गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोचलो. माथा तसा छोटेखानीच. बांधकामाचे अवशेषही फारसे नाहीत. अलीकडेच उभे केलेले एक छोटेखानी शिवमंदिर माथ्यावर आहे. लाल भडक रंगविलेले हे मंदिर आजूबाजूच्या दऱ्या, पठारे आणि अगदी सिद्धगडावरूनसुद्धा चटकन नजरेस पडते. त्या सर्वोच्च माथ्यावर कळाकळा तापणाऱ्या उन्हात उभे होतो. घामाने चिंब भिजलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दुर्गचढाईचे समाधान मात्र स्पष्ट दिसत होते. त्या गडमाथ्यावरून आजूबाजूच्या सह्याद्री काय विलोभनीय दिसत होता! शब्दांत सांगणे कठीणच. 

पूर्वेला उत्तुंग कड्यांची भीमाशंकराची अनेक पदरांची डोंगररांग त्यातून पायऱ्यांच्या उतारासारखा दिसणारा प्राचीन आहुपे घाट, पश्‍चिमेला सिद्धगडाची माची, त्यावरचा अवाढव्य कातळभिंतीचा सिद्धगड आणि बालेकिल्ला, तळातले कोकण... किती सुंदर! नजरेत मावत नव्हते. त्या माथ्यावर थोडे विसावलो. डोके टेकून माथ्याला वंदन केले. 

आता निघायला हवे होते. कारण दोन-एक म्हणजे गोरखचा बालेकिल्ला चढणे जेवढे अवघड, त्याहीपेक्षा उतरणे जोखमीचे. उभा कातळ उतरणे चढण्यापेक्षा जास्त अवघड आणि दुसरे कारण म्हणजे खाली उतरून पुन्हा सिद्धगडाची माची गाठायची होती.

संबंधित बातम्या