प्रेरणादायी रायरेश्‍वर 

डॉ. अमर अडके  
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

किल्ले भ्रमंती
 

रायरेश्‍वर! अगदी लहानपणापासून मनाच्या गाभाऱ्यात निनादणारा शब्द. 
रायरेश्‍वराची शपथ, स्वराज्याची शपथ या शब्दांचा इतिहास आणि भूगोल जपणारं प्रेरणादायी नाव! 
हा रायरेश्‍वर मला बोलावतो. अचानक, स्वप्नात अवतीर्ण होतो. मग स्वस्थ बसवत नाही. रायरेश्‍वरी जावंच लागतं. 
असा किती वेळा रायरेश्‍वरला गेलो कुणास ठाऊक? 

भल्या पहाटे, गच्च धुक्‍यात, भर माध्यान्ही, मिट्ट काळोखात, पाझरणाऱ्या चंद्रप्रकाशात, चिंब भिजविणाऱ्या पावसात, गारठणाऱ्या थंडीत साऱ्या ऋतूत रायरेश्‍वरी गेलो. प्रत्येक वेळेची अनुभूती वेगळी. 

रायरेश्‍वराची इतकी ओढ का आहे? सांगता येणार नाही. पण त्या रायरेश्‍वराच्या इवल्याशा गाभाऱ्यात बाल शिवाजी आणि त्यांचे सवंगडी असल्याचा भास मला होतो.. ‘हर हर महादेव’ अशी गर्जना मला ऐकू येते. पिंडीवर चाफ्याचं फूल कुणीतरी ठेवतंय असा भास होतो. कितीतरी वेळ शांतपणं त्या गाभाऱ्यात बसतो. मन भरूनही येतं आणि हलकंही होतं. डोळे भरून येतात. तिथल्या जंगमांनाही आता हे माहीत झालंय. 

खरंतर रायरेश्‍वर हा किल्ला नाही. सह्याद्री मंडळातलं एक विस्तीर्ण पठार आहे. माणसांच्या जगण्यानं सजीव बनलेलं. या विस्तीर्ण पठारावरच्या दूरवरच्या कोपऱ्याकोपऱ्यात, भूमिपुत्रांच्या वाड्या-वस्त्या इथला इतिहासही जपताहेत आणि सह्याद्रीही साऱ्यांची श्रद्धा जपतो आहे. 

गेले वर्षभर बेत आखत होतो. रायरेश्‍वराची तयारी सुरू झाली. पाहता पाहता बत्तीस सहकारी जमले. बेत नक्की झाला. यावेळी जरा वेगळं करायचं, असं मनानं घेतलं. त्याच विचारात झोपलो. अर्धवट निद्रेत पठारावरच्या टोकावरचं नाखिंद्याचं दगडातलं छिद्र दिसू लागलं. त्याच्या पायतळीची पाताळाचा वेध घेणारी खोल दरी दिसू लागली. त्याच्या पलीकडची अस्वलखिंड जाणवू लागली. मग ठरलं रात्री रायरेश्‍वरी मुक्काम. सकाळी नाखिंदा, मग प्रचंड उतरंडीनं कोकणातलं कुदळे गाव गाठायचं आणि मग अस्वलखिंड चढून उमरठ चंद्रगडाच्या बेचक्‍यात कामथे गाव गाठायचं. मोहीम तशी अवघड, दीर्घ चालीची, घसाऱ्याच्या उताराची, खड्या चढाची; असा कस लावणारी. पण सह्याद्रीच्या अंतरंगातली! 

खरंतर आजकाल रायरेश्‍वरापर्यंत पोचणं सोपं झालंय. पूर्वी भोरच्या बाजूनं रोहिडेश्‍वर पायथा, बाजारवाडी या मांढरदेवीच्या मार्गानं रायरेश्‍वर-केंजरूगडाच्या मधल्या खिंडीत पोचून मग रायरेश्‍वरी जावं लागायचं. पण हल्ली वाईमधून मेणवलीच्या रस्त्यानं खावलीपर्यंत जाऊन पुढं एक किमी अंतरावर उजवीकडं वळून नव्यानं तयार केलेल्या घाटरस्त्यानं घेरा केंजळगड, केंजळमाची असं करून केंजळगड रायरेश्‍वराच्या मधल्या खिंडीतून थेट रायरेश्‍वराच्या पायथ्याच्या पायऱ्यांपर्यंत पोचता येतं. मग शिडीवरून रायरेश्‍वर पठारी. 

कोल्हापुरातून आम्हाला निघायला अंमळ उशीरच झाला. खरंतर रायरेश्‍वराच्या पायथ्याशी सूर्यास्तापूर्वीच पोचायचा मानस होता. रायरेश्‍वराच्या पठारावर उभं राहिलं, की पश्‍चिमेकडचा सूर्यास्त किती विलोभनीय असतो हे तिथं जाऊनच पाहायला हवं. त्या सोनेरी लाल प्रकाशात समोरच्या केंजळगडाचा उत्तान कडा, डाव्या हाताला दूरवर असणारा कमलगड, दक्षिणेचा पांडव गडाचा माथा आणि पश्‍चिमेला दूरवर अस्पष्ट दिसणारा मधुमकरंद गडाचा माथा आणि या साऱ्यांच्या मधे पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, त्यात भरून राहिलेली सायंप्रभा हे डोळ्यात न मावणारं रूप रायरेश्‍वराच्या कड्यावरून पाहणं म्हणजे निसर्गाच्या अलौकिक आविष्काराची अनुभूती. पण आमचा हा सूर्यास्त कऱ्हाडच्या पुढं वसंतगडाच्या साक्षीनंच झाला. वाईत पोचेपर्यंत चांगलीच रात्र झाली. पुढचा रस्ता तसा एकेरी आणि अंधाराच्या वेळी शोधत शोधत जावा लागणारा. खावली गावच्या पुढं केंजळगडाच्या डोंगराचा घाट सुरू झाला. या खड्या घाटानं केंजर रायरेश्‍वराच्या खिंडीत पोचलो. तेव्हा चांगलीच रात्र झाली होती. सर्व बाजूला भरून राहिलेला अंधार, सह्याद्रीच्या एका उंच पठाराच्या पायथ्याशी आम्ही उभे. सारेच नवखे. रायरेश्‍वरी पहिल्यांदाच येणारे. पाठीवर पिशव्या चढवून हातात बॅटरी घेऊन सगळे माझ्या मागं. खरंतर सगळंच कातर झालं होतं. अंतहीन अंधारात फक्त माझ्या मागं चालायचे एवढंच! पायऱ्या चढून पठाराच्या दिशेला लागलो. रायरेश्‍वरासाठी नव्यानं रस्ता करतायेत. त्यामुळं मधेच पायऱ्या गायब. वाळलेल्या मातीचा फुपाटा घसरवणारा आणि दमवणाराही, त्यातून उतारावरची झाडी. यातून मार्ग काढत शिडीपर्यंत पोचलो. गोपाळला जोरात हाक मारली. तो कड्यावरून ओरडला, ‘डॉक्‍टर आलोय!’ गोपाळशी आधीच बोलून ठेवलं होतं, ‘उशीर होतोय कड्यापर्यंत ये.’ ओळीनं बॅटऱ्या चमकू लागल्या. सगळे एकामागोमाग एक पठारावर पोचलो. त्या अंधारात गोपाळला कडकडून भेटलो. किती दिवसांनी गोपाळ भेटला! गोपाळचं आणि माझं रायरेश्‍वरावरचं मैत्र; आठवत नाही किती वर्षं झाली त्याला. हा जंगम रायरेश्‍वराचा पुजारी. पहिल्यांदा मंदिराच्या गाभाऱ्यातच भेटला. रायरेश्‍वराच्या पिंडीवर माथा टेकला. त्यानं विभूती कपाळाला लावली तेव्हापासून आजपर्यंत हे मैत्र तसंच आहे. 

आज त्याचा आग्रह आहे, डॉक्‍टर सगळ्यांनी माझ्या घरीच राहायचं. खरंतर रायरेश्‍वराच्या समोरच्या मंडपात उघड्यावर झोपण्याची माझी रीत. मी गोपाळला म्हटलं, ‘गोपाळ सारे घरात झोपतील मी इथं मंदिरासमोर झोपतो..’ 

तसं शिडी चढून पठारावर आल्यानंतर मंदिर आणि जंगमांची वस्ती काही जवळ नाही. सारेच दमले होते. भूकही लागली होती. महिना मार्चचा, पण पठारावर थंडी मी म्हणत होती. गोपाळच्या घरात उबदार वाटत होतं. सॅक उतरवून सारे जेवायला बसलो. तत्पूर्वी काही नवीन मंडळी होती, त्यांच्यासाठी खरंतर सर्वांसाठीच परस्परपरिचय करून घेतला. रायरेश्‍वराचा रोमांचकारी इतिहास सांगताना त्या अंधाऱ्या रात्री मीही भारावून गेलो. लोकांची दमछाक कुठल्याकुठं पळून गेली. एकमुखानं पठार दुमदुमलं, ‘बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय..’ 

जेवण झालं. पहाटे लवकर उठायचं होतं. सगळ्या सूचना देऊन मी मंदिराच्या प्रांगणात झोपायला आलो. रायरेश्‍वराचा प्रचंड पठार. मंदिराच्या समोर आम्ही पथारी पसरली. मध्यरात्र येऊन ठेपली होती. उन्हाळ्याचे दिवस असूनही थंडी मी म्हणत होती. स्लिपिंग बॅगमध्ये शिरलो, तरीही थंडी जात नव्हती. खरंतर मला किल्ल्यावर रात्री कधीच झोप येत नाही. सह्याद्रीच्या अशा माथ्यावरची रात्र किती अवर्णनीय असते ते अनुभवायलाच लागतं. पूर्ण चंद्रापासून ते चंद्रकोरीपर्यंतचा चंद्र आपल्या पुढ्यात असतो. चंद्र असतानाही आणि नसतानाही ताऱ्यांमधील अंतर जाणवायला लागतं. पहाटेच आकाश वरून नाही, तर खालून लाल होऊन उठतं. ही भगवी प्रभा मग सुवर्णमयी होते. अवघा डोंगर सोन्यासरखा पिवळाधमक होतो. डोंगर फक्त हिरवेच सुंदर दिसतात असं नाही. वाळलेल्या गवताचे अलंकार ल्यालेले डोंगर कोवळ्या प्रकाशात झळाळून उठतात. त्यांचं सौंदर्य काही औरच असतं. मग हे सगळं पाहायचं असेल तर झोप कुठली येईल? डोंगरावर मी जागाच असतो. 

पहाटेचे चार वाजले असतील, उठलो. एकेकाच्या नावानं हाका मारू लागलो. कसचे उठतायत, एकेकाला उठवून आवरू लागला. गोपाळच्या घरातून स्वयंपाकाचा सूर ऐकू येऊ लागला. त्याची बायको आणि आई आधीच उठून तयारीला लागल्या होत्या. निम्मी-अर्धी मंडळी तयार झाली. रायरेश्‍वराचं दर्शन सगळ्यांनाच हवं होतं. ज्याच्याकडं आता पूजा होती तो जंगम, खालच्या वाडीत राहायला होता. गोपाळच्या मुलाला बरोबर घेतलं आणि वाळलेली नाचणीची खाचरं तुडवत त्याच्या घरी पोचलो. तो आवरून येतो म्हणाला. माघारी मंदिरात आलो. तोपर्यंत बरीचशी मंडळी मंदिरात पोचली होती. 

नाखिंद्याकडं जाण्याची नियोजित वेळ टळून गेली होती. आकाश फटफटू लागलं होतं. रायरेश्‍वराचं दर्शन घेऊन गोपाळच्या घरी नाश्‍ता करून जेवणाचे डबे बांधून बाहेर पडायला चांगलाच उशीर झाला होता. 

नाखिंद्याकडं निघालो. वाटाड्या नामदेवचा अजून पत्ता नव्हता. नाखिंद्याच्या अर्ध्या वाटेवर नामदेव भेटला. आज काय कुणास ठाऊक तो यायलाच तयार नव्हता. नाखिंदा, कुदळे, अस्वलखिंड सारं परिचयातलं होतं. पण स्थानिक माणूस बरोबर घेणं हा माझा कटाक्ष असतो. कसाबसा तो तयार झाला. ‘चार पैसे जास्त देतो पण चल’ असंही विनवलं आणि त्याला बरोबर घेतला. पण या साऱ्यांत वेळ मात्र फुकट गेला. 

समोर लक्ष गेलं, भानावर आलो. समोरचं चित्र म्हणजे सह्याद्रीचा सर्वांगसुंदर देखणा आविष्कार. पूर्वेच्या क्षितिजापर्यंत सह्याद्रीच्या सुंदर रांगा. तो पलीकडं राजगड, त्याच्या अलीकडं तोरणा.. रायरेश्‍वराच्या पायतळी देवघर जलाशयाचं निळं पाणी. उत्तरेच्या बाजूला नाखिंद्याचा भव्य पहाड आणि या साऱ्यांच्या कोंदणात आम्ही उभे! स्तिमित होऊन सह्याद्रीचं हे रांगडं सौंदर्य पाहात उभे होतो. रायरेश्‍वरावरून दिसणारा राजगड आणि तोरणासुद्धा इतका सुंदर कुठूनही दिसत नाही. ते रूप नजरेत मावत नाही. आम्ही भारावल्यासारखे नाखिंद्याकडं निघालो. परंतु, राहून राहून उजव्या हाताच्या या सह्याद्री मंडळातील दुर्गसौंदर्याकडं नजर जात होती. 

कमरेपर्यंत वाढलेल्या गच्च झाडाझुडुपांमधून पायतळीची वाट शोधत नाखिंदा टोकाकडं जात होतो. डावीकडं शंभू महादेवाच्या डोंगररांगा, त्यावर वसलेलं क्षेत्र महाबळेश्‍वर, उत्तुंग डोंगररांगांच्या पलीकडचा प्रतापगड, दऱ्यादऱ्यांमधून उठलेले डोंगरमाथे.. हे सारं विलोभनीय दृश्‍य पाहात नाखिंद्याच्या कड्यापर्यंत पोचलो. खरंतर यातला निम्मा प्रवास खोल दरीच्या कडेनं ढवळे चंद्रगड डाव्या हाताला ठेवून करावा लागतो. चाल अवघड आहे, पण निसर्गाचं हे विलक्षण रूप नाखिंद्याच्या कड्यापर्यंत घेऊन जातं. नाखिंद्याच्या पायथ्याच्या अर्धचंद्राकृती दरीच्या माथ्यावर उभं राहिलं, की कळतं सह्याद्रीची खोल दरी म्हणजे काय! या रौद्ररूप दरीचं सौंदर्य म्हणजे सह्याद्रीच्या बेलाग, उत्तुंग, खोल असं हृदयाचा डाव घेणारं मर्दानी रूप. नजर हटतही नाही ठरतही नाही, वास्तवात रायरेश्‍वराच्या पठाराचं उत्तर पश्‍चिमेकडचं टोक म्हणजे नाखिंदा! या टोकाला पाषाणात तयार झालेलं नैसर्गिक छिद्र आहे. म्हणून नाखिंदा. याच्याभोवती सर्व बाजूनं अक्राळविक्राळ दऱ्या आहेत. 

अशा खोल दऱ्यांच्या कड्यावर भर दुपारी तापणारं ऊन, दऱ्यांच्या गर्तेमधून येणारा वारा कधी अंगभर फिरत असतो, कधी सारं शांत असतं. सह्याद्रीच्या त्या भव्यतेत आपल्या क्षुद्रपणाची जाणीव अधिकच होते. अशा कितीतरी अफाट दऱ्याखोऱ्या अजूनही मानवी स्पर्शापासून दूर असतील. पण दूरवर नजर जाते आणि त्या दरीच्या खोलीत चार-दोन घरांची छपरं दिसू लागतात. भोवती रेखीव बांधांची भातखाचरं दिसतात. खरंतर आपल्यापेक्षाही सुंदर आनंद इथं फुलतो. टवटवीत जीवन उमलतं. या घरांच्या सारवलेल्या पडवीत काढलेली रात्र स्वर्गीय आनंदाची अनुभूती देते. इथला पहाटवारा नवचेतनेची ऊर्जा देतो. किमान गरजांनिशी, किमान साधनांनिशी आनंदमयी जगण्याचं जीवनरहस्य याच चंद्रमौळी घरात कळतं. जणू सुंदर जगण्याचं हे अबोल परंतु, जिवंत तत्त्वज्ञानच!

फोटो फीचर

संबंधित बातम्या