‘सातमाळा-कांचनबारी’ची चढाई

डॉ. अमर अडके  
सोमवार, 18 मार्च 2019

किल्ले भ्रमंती
 

कांचना किल्ल्याच्या बाजूनं कांचनबारी ओलांडायची. मग हंड्या, लेकुरवाळा, इखारा या शिखरांची डोंगररांग ओलांडायची आणि दरीच्या बाजूनं, मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पूर्वेच्या बाजूनं धोडप माचीवर प्रवेश करायचा.. हा अपूर्व डोंगरसोहळा असतो... 

छोटा बंड्या, मोठा बंड्या या शिखरांच्या आड अस्ताचलाला जाणारा सूर्य. त्या रक्तवर्णी आकाशात अधिकच अजस्र भासणारा धोडपचा कातळ कडा, हे सारंच अवर्णनीय आहे... आज तो योग जुळून आला होता. सूर्यास्त होऊन क्षितिज काळवंडलं तेव्हाच भानावर आलो... 

एव्हाना अंधार पडू लागला होता. काळसर होत जाणाऱ्या त्या संधिप्रकाशात माचीवरल्या फरसबंद वाटेनं माचीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाताना कित्येक वर्षं मागं जाऊन इतिहासाच्या पानात पोचल्याचा आभास निर्माण झाला. खरंतर धोडप माची हा एक परिपूर्ण किल्लाच आहे. बालेकिल्ल्याच्या कातळकड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या माचीवर जागोजागी असणाऱ्या अनेक बांधीव विहिरी, इमारतींचे जोते, मंदिर, तट बुरूज यांचे उद्‌ध्वस्त अवशेष दुर्गाच्या भव्यतेची ऐतिहासिक काळातल्या वैभवाची जाणीव करून देतात. धोडपची माची किंवा बालेकिल्ल्यावरील रवळ्या-जवळ्या आणि सप्तशृंगीच्या बाजूनं होणारा सूर्यास्त अनुभवणं याला उपमाच नाही. सूर्यास्ताच्या लालीमध्ये मिसळून गेलेल्या धोडपच्या बालेकिल्ल्याचा कातळ किती विलोभनीय दिसतो, हे सांगायला शब्दच नाहीत.

आता माचीवर अंधार दाटून आला होता. बालेकिल्ल्याच्या अफाट कातळाला आणि भोवतीच्या दऱ्यांना अंधारानं पोटात घेतलं होतं. आज आकाशात चंद्राचा पत्ता नाही, कारण अमावस्या - नभातलं तारांगण ताऱ्यांमधल्या अंतरासह लख्ख चमकू लागलं. अमावस्येच्या रात्री किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारं नभांगण न्याहाळणं हा अपूर्व सौंदर्य सोहळा असतो. 

फार कडाक्‍याची नसली, तरी बोचरी थंडी जाणवू लागली होती. माचीवरच्या कड्याला लागून असलेल्या पाण्याच्या जागेजवळ थोड्याशा प्रशस्त जागेत आमची मोहीम विसावली. एक जुनं घर - त्याचा ओबडधोबड कट्टा, हेच आमचे आश्रयस्थान! हॅवरसॅकला पाठ टेकून पाय पसरून, पाय दुमडून मंडळी विसावली. लालभडक ज्वाळात चुलीवर चहा उकळत होता. तो लाल प्रकाश अनेकांच्या चेहऱ्यावर पसरला होता. दिवसभराची दमछाक जाणवत होती. भोजनाची तयारी शांतारामनं सुरू केली होती आणि इकडं धोडपच्या त्या प्रचंड माचीवरच्या एका कोपऱ्यात नभांगणाच्या साक्षीनं डोंगर आणि गडकोटांच्या गप्पा रंगल्या होत्या. परस्परांच्या ओळखीच्या कार्यक्रमांतून भटकंतीचे मनस्वी धागेदोरे उलगडत होते. चुलीवर शिजलेल्या जेवणाची चवच वेगळी होती. रात्र चढू लागली तरी गप्पा संपेनात. थंडी सगळ्या बाजूंनी अंगात शिरू लागली होती. एकेक सहकारी आपला बाडबिस्तरा उचलून गारठलेल्या स्थितीत वनविभागानं नुकत्याच बांधलेल्या विश्रांतिस्थळात शिरत होता. आकाशातले सप्तर्षी, मृग आता अधिकच जवळ भासत होते. सकाळी लवकर उठून बालेकिल्ल्यावर जायचं होतं. त्या गार वाऱ्यात माचीवरच्या शांततेत केव्हा डोळा लागला कळलंच नाही. 

पहाटवाऱ्यानं जाग आली. तारांगण अजूनही तेवढंच तजेलदार दिसत होतं. एकेका सहकाऱ्याला उठवू लागलो. काहीजणांची चुळबूळ आधीच सुरू झाली होती. पहाटेच्या त्या गारव्यात आजूबाजूचा आसमंत आणि जाग्या होऊ लागलेल्या पायतळीच्या वाड्या-वस्त्या न्याहाळत बालेकिल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली. एव्हाना अंधाराची जागा संधिप्रकाशानं घेतली होती. बालेकिल्ल्याचा कातळकडा अंधाराच्या गर्भातून वर येऊ लागला होता. धोडप माथ्यापर्यंतची चढाई अवघड नसली, तरी दमाची होती हे नक्की. 

पूर्वेच्या क्षितिजाच्या आकाशाच्या पोटातून लाल वर्णाची उधळण सुरू झाली होती. सारा आसमंत उजळू लागला होता. बालेकिल्ल्यावर जाणारी अनगड, खोदीव पायऱ्यांची आणि फरसबंदीची वाट अजूनही काळाशी सामना करत अस्तित्वात आहे. तुटलेल्या कातळपायऱ्यांच्या अवघड टप्प्यासाठी आता लोखंडी जिनाही केला आहे. बालेकिल्ल्याच्या कमानी दरवाजाजवळ येईपर्यंत कांचन्याच्या बाजूनं डोंगर-शिखरं उजळत सूर्य डोकावू लागला होता. अपूर्व दृश्‍य! सूर्य, तेजाळलेली डोंगरशिखरं, लाल सोनेरी प्रकाशात उजळू लागलेली पठारं... हे सौंदर्य कसं वर्णावं? धुक्‍याच्या दुलईमधून डोकावणारी ही डोंगरशिखरं सूर्याच्या कोवळ्या प्रकाशात न्हाऊन निघाली होती. निःशब्द शांतता! कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. ते अनुपम सौंदर्य डोळ्यात तर मावत नव्हतंच, हृदयातही भरून ओसंडत होतं. अंगभर पाझरत होतं. सूर्य आता हळूहळू पांढरा झाला होता. त्या स्वप्नातून जागं झालो आणि बालेकिल्ल्याची उरलेली चढाई पूर्ण करून अजस्र कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहांपाशी पोचलो. काही पाण्याची टाकी, काही निवासाचे विहार, काही कोरडी पडलेली पाण्याची टाकी, माथ्यावर बेलाग कातळ चढाईची धोडपची शेंडी, समोर दूरवर सप्तशृंगीचा डोंगर, त्याच्या अलीकडं मार्कंडेय आणि डावीकडं थोडे दडलेले रवळ्या-जवळ्या किल्ले. सूर्योदयावेळी एखाद्या उत्तुंग किल्ल्यावरून आजूबाजूची डोंगरशिखरं पाहणं हा निसर्गसोहळा शब्दातीत आहे. धोडपच्या बालेकिल्ल्यावर वेड्यासारखे फिरत होतो. पण आता उतरणं भागच होतं. कारण बालेकिल्ला उतरायचा, नंतर माचीवरील डोंगरदांड्यावरूनच रवळ्या-जवळ्याच्या कुशीत उतरायचं आणि ते किल्ले चढायचे होते. पुनःपुन्हा मागं वळून पाहात धोडपचा बालेकिल्ला उतरू लागलो. 

धोडपचा बालेकिल्ला उजव्या हाताला ठेवून छोटा बंड्या, मोठा बंड्या ही डोंगरशिखरं डावीकडं ठेवून प्रशस्त डोंगर पठार पार करत रवळ्या-जवळ्याच्या बाजूला एका रुंद डोंगरदांड्यावर पोचलो. या बाजूला धोडपचं एक प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून डोंगर पठारावर आलो, की उजवीकडचा धोडप बालेकिल्ल्याचा कातळकडा थोडा खाली येत संपतो. तिथं कातळकडा आणि डोंगर उताराच्या बेचक्‍यात एक भक्कम बुरूज आजही उभा आहे. त्याच्या समोर डोंगरपठारावर डाव्या बाजूला कधी काळी बांधलेलं एकाकी दगडी घर आहे. पठार ओलांडून डोंगरदांडातून दरीतील घसाऱ्याच्या वाटेनं रवळ्या-जवळ्याच्या पायथ्याच्या वडाळा (वणी) गावात उतरलो. एव्हाना चांगलाच उशीर झाला होता. भुकेसरशी पोहे आणि देशी गाईच्या दुधाचा खवा चापून खाल्ला. 

आता भर दुपारी रवळ्या-जवळ्याचं आव्हान होतं. रवळ्या-जवळ्याच्या प्रशस्त माचीच्या दक्षिण बाजूनं खिंडीतून चढायचं ठरलं. भर उन्हात भरलेल्या पोटानं खिंडीत पोचेपर्यंत चांगलीच दमछाक झाली. आता अवघड कातळ टप्पा. हे शिलारोहण एक रोमांचकारी अनुभूती देतं. कातळ टप्पा चढून वर आलं, की घसाऱ्याची नागमोडी वाट मग प्रशस्त पठार, या पठारावर जागोजागी वस्तीच्या खुणा. आता मात्र निर्मनुष्य. लांबच लांब पठार ओलांडून पुन्हा झाडीत शिरायचं. झाडीतल्या चढाच्या वाटेनं किल्ल्याचा कातळ पायथा गाठायचा. मग दीर्घ चढाचे तुटलेले कातळकडे, मधूनच कातळातल्या अनगड पण तुटलेल्या पायऱ्या वळणावळणाच्या चढ्या कातळटप्प्याच्या उजव्या बाजूची खोल दरी मग घसरून आलेल्या मातीनं बुजलेल्या पायऱ्यांचा अवघड चढ आणि शेवटी अरुंद पायऱ्यांनी बालेकिल्ल्याचं द्वार.

रवळ्याच्या या प्रवेशद्वाराची एक गंमत आहे. उभं द्वार ओलांडून जायचं नाही. दरवाजा डोक्‍यावर आहे. तो चढून पठारावर जायचं. याच्या उजव्या हाताला एक पर्शियन शिलालेख आहे. रवळ्याची अवघड चढाई चढून माथ्यावर प्रचंड रान माजलेल्या पठारावरून प्रशस्त पाण्याच्या टाक्‍यांपर्यंत पोचायचं. माथ्यावर दुर्गाचे अवशेष काय ते एवढेच. या माथ्यावरून कण्हेर सप्तशृंग मार्कंडेयापासून ते धोडप कांचन्यापर्यंत सातमाळ्याची डोंगररांग खूप सुंदर दिसते. भान हरपून ते विलोभनीय दृश्‍य डोळ्यात साठवत होतो. या माथ्यावरून समोरचा उपड्या तव्याच्या आकाराचा तवा डोंगर फार सुंदर दिसतो. आता उतरायला हवं. कारण रवळ्याच्या कातळकड्यांची आणि घसाऱ्याची चढाई जितकी अवघड त्याहीपेक्षा उतराई अधिक कठीण. दरीच्या खोलीचं आणि कातळ कड्याच्या उताराचं आव्हान पेलत पुन्हा माचीवर परतलो. 

रवळ्याचा अजस्र कातळकडा डावीकडं ठेवून जवळा समोर ठेवून मार्कंडेयाच्या दिशेनं चालू लागलो. या पठारावर एक गंमत आहे. जणू माती कमी आणि गायीचं वाळलेलं शेणच जास्त. गाईंचे कळप मोकळे. गाई रानभर विखुरलेल्या. संध्याकाळी न बोलावता या पठारावर एकत्र येतात. त्यांना कुणी बांधून ठेवत नाहीत. आमचा वाटाड्या शांतारामला विचारलं, ‘का बांधत नाहीत?’ शांताराम म्हणतो, ‘बांधून काय करायचं? वाघाचं काम सोपं? बांधलेलं जनावर कुठं पळून जाणार? म्हणून गाई मोकळ्या..’ या पठारावरच शांताराम गावितचं घरही आहे. वर्षातला बराचसा काळ तो तिथंच असतो. अशा वैरण पठारावरचं त्याचं ते घर, त्याच्या गाई.. हे जगणं मला उमगेना. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यावर, दऱ्याखोऱ्यांत दुर्गम पठारांवर माणसं कुठं कुठं आणि कशी कशी राहतात! हे भूमिपुत्र त्यांच्या जगण्याच्या वेगळ्या धाटणीसह सह्याद्रीत जागोजाग भेटतात. 

आता दुपार कलतीकडं जाऊ लागली होती. कांचनबारीच्या लढाईच्या इतिहासाचा भूगोल असा अनुभवताना आता शेवटचा टप्पा गाठायचा होता. समोर मार्कंडेय आणि त्याच्या पलीकडं सप्तशृंग उभा होता. मार्कंडेयाच्या बारीत पोचायचं होतं. कांचनबारीच्या युद्धावेळी महाराजांनी शत्रूला हूल देण्यासाठी सुरतेचा खजिना सातमाळ्याच्या डोंगररांगेच्या आधारानं मार्कंडेय - सप्तशृंगापर्यंत सुखरूप पाठवला होता. कांचनवारीच्या या संग्रामाचा भूगोल गेले दोन दिवस अनुभवत होतो. महाराजांच्या युद्धनीतीच्या कौशल्याची उंची आकाशापलीकडं पोचल्याची अनुभूती घेत होतो. दुर्गमतेतला तो दुर्दम्य इतिहास त्याच्या भूगोलच्या रूपानं आमच्या बरोबर वावरत होता. 

रवळ्या शांतारामच्या घरापासून त्याच्या अजस्र कड्यासह केवढा प्रचंड भासत होता! नजर ठरत नव्हती. रवळ्या-जवळ्याच्या माचीवरून समोर दिसणाऱ्या मार्कंडेयाच्या दिशेनं आमची पावलं पडू लागली. डोंगरमाथ्यावरची ही प्रदीर्घ चाल, मनात कांचन्यापासूनची डोंगरशिखरं फेर धरत होती. डोंगर पठारावरून जाताना जागोजागी कातळात कोरलेल्या अनगड पायऱ्या, खाचा आढळत होत्या. जणू आपल्या पूर्वजांनी सातमाळ्याचे हे डोंगर आपल्या पावलांनी जोडले होते. मार्कंडेयापलीकडचा सप्तशृंगाचा डोंगर आता जणू हलू लागला होता. डोंगरदांड्यावरून मार्कंडेयाच्या पायथ्याला बारीत उतरलो. मागं वळून पाहिलं, सारी गिरीशिखरं आकाशाच्या गर्भात लुप्त झाली होती. डोळे मिटले.. का कुणास ठाऊक, डोळ्यांच्या कडा ओलावल्या. गिरीशिखरांसह डोंगर पठारं आणि किल्ले डोळ्यांत गर्दी करू लागले. नकळत हात जोडले गेले. त्या साऱ्या सह्याद्रीमंडळाला साष्टांग नमस्कार केला. मन हळवं झालं. या साऱ्या गडकोट, डोंगरदऱ्यांशी माझं काय नात आहे, हे मला अजूनही उमगलेलं नाही. किल्ल्यापासून दूर जाताना कातर झाल्यासारखं का वाटतं, कळत नाही. परतीच्या प्रवासात सारा सातमाळा मनात घुमत होता. पुन्हा येण्याची साद घालत होता.

फोटो फीचर

संबंधित बातम्या