विशाळगडाच्या पलीकडे 

डॉ. अमर अडके  
सोमवार, 1 एप्रिल 2019

किल्ले भ्रमंती
 

पावनखिंड मोहीम संपली, की दरवर्षी एक विचार मनात फेर धरायचा. छत्तीस वर्षं झाली पावनखिंडीच्या वाटेवरून अथक, अखंड चालतो आहे. पण हा विचार पाठ सोडत नाही. मोहीम संपली, की भर पावसाळी पाताळदऱ्यातल्या बाजी-फुलाजींच्या समाधीसमोर नतमस्तक होताना श्री शिवाजी महाराज पावनखिंडीच्या युद्धानंतर विशाळगडावरून राजगडी कसे गेले असतील? मनात या विचारांचे काहूर माजायचे... आणि मग पावलं विशाळगडापलीकडच्या डोंगररांगांमध्ये शिरायची. या उर्मीपोटी डोंगर अन्‌ डोंगर भटकलो. ऐतिहासिक संदर्भ साधनात कुठं तपशील मिळतो का ते शोधू लागलो. पदरी निराशाच आली. अनेक गडकोट भटक्‍यांशी संवाद साधला, पण ठोस काही हाती लागेना. नामवंत गिर्यारोहण संस्थांशी बोललो. मधले मधले काही भौगोलिक तपशील मिळाले. पण मार्गाची संदिग्धता कायम राहिली. मग एक निर्णय घेऊन टाकला. स्वतःच प्रयत्न करायचा. 

आणखी एक हळवं कारण मनात घर करून बसलं होतं. श्री संभाजी महाराज संगमेश्‍वरी पकडले गेले, तेव्हा ते विशाळगडावरूनच खाली उतरले होते. सह्याद्रीच्या डोंगररांगामधली त्यांची शेवटची पावले याच दऱ्याखोऱ्यांत उमटली होती. मग हा राजा सह्याद्रीत परत कधीच आला नाही. ती संजीवन आठवणही स्वस्थ बसू देत नव्हती. मग सुरू झाली विशाळगडा पलीकडची भटकंती. 

घाटवाटा, रानवाटांची जुळवणूक सुरू झाली. असंख्य वाटांनी फिरलो. पण सलगता जोडता येईना. गेली कित्येक वर्षं हा विशाळगडापलीकडचा सह्याद्री भटकतो आहे; श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजीराजे यांच्या पाऊलखुणांचा शोध घेत! 

विशाळगड तसा अवघ्या महाराष्ट्राला परिचित. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका, पावनखिंडीचा संग्राम आणि विशाळगडाच्या पातळदऱ्यातील बाजी आणि फुलाजींच्या समाध्या हा अवघा रोमांचकारी इतिहास साऱ्यांचे प्रेरणास्थान. विशाळगड विशाळशैल या नावानंही ओळखला जातो. नावाप्रमाणंच हा विशाल पर्वत आहे. विशाल डोंगरमाथ्यावर वसलेला हा प्राचीन किल्ला केवळ दक्षिण आणि उत्तर बाजूला अरुंद खिंडीनं मुख्य भूमीशी जोडलेला आहे. सर्व बाजूंनी खोल दऱ्या आणि उत्तुंग कडे आहेत. म्हणूनच देशाकडील बाजूनं विशाळगडी जाण्यासाठी दक्षिण बाजूनं आणि कोकणात उतरण्यासाठी अथवा कोकणातून येण्यासाठी उत्तर बाजूनं असणाऱ्या नैसर्गिक आणि अरुंद खिंडीचा वापर करावा लागतो. 

तसा विशाळगड किल्ला हा पठार आणि दऱ्यांचा आहे. विशाळगडाच्या उत्तरेला आणि पश्‍चिमेला अनेक डोंगररांगा आहेत. त्यातल्या सर्वांत जवळच्या डोंगररांगेला ‘माचाळ’ म्हणतात. खरंतर त्यावर दुर्गाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. ना तटबंदी, ना बुरूज, ना महाद्वार! तरीसुद्धा या माचाळच्या देखण्या डोंगरात ‘वाडी माचाळ’ आणि ‘दुर्गमाचाळ’ असे संदिग्ध भाग आहेत. काही ऐतिहासिक नोंदीतही ‘दुर्गमाचाळ’ असं संबोधलं आहे. या माचाळच्या डोंगरावर जाण्यासाठी दक्षिणेकडून विशाळगडावर यायचं. नागरी वस्ती ओलांडून रणमंडळाच्या बाजूनं नरसिंह मंदिर, महाराणी अहिल्याबाई समाधी डावीकडं ठेवून गडसदरेच्या ‘माळ’ नामक पठारावरून बावन्न सती, वाघजाई मंदिराच्या भग्नावशेषाच्या जवळून गडाच्या उत्तर - पश्‍चिम तटबंदीमधल्या भग्न कोकण दरवाजा अर्थात काळ दरवाजापाशी यावं लागतं. ही तटबंदी ओलांडून विशाळगड आणि माचाळचा डोंगर यामधल्या अरुंद दरीत उतरावं लागतं. मग त्या दरीतूनच वर चढून जंगलवाटेनं माचाळच्या पठारावर पोचता येतं. 

विशाळगडावरून कोकणात उतरण्यासाठी इथपर्यंत या मार्गाशिवाय इतर जवळचा पर्याय नाही. माचाळच्या डोंगरावरून सह्याद्रीच्या अनेक डोंगररांगांचं विलोभनीय दर्शन होतं. याच डोंगरांगांमधून खाली कोकणात उतरणाऱ्या अनेक घाटवाटा आहेत. 

या डोंगररांगा कधी कोकणातून चढून वर आलो, तर कधी माचाळच्या बाजूनं कोकणात उतरलो. मग लक्षात आलं, विशाळगडापासून कोकणात उतरणाऱ्या देवडा, साखरप्यापासून ते केळवली प्रभानवल्लीपर्यंत अनेक रानवाटा आहेत. गेली कित्येक वर्षं या डोंगरवाटांवरून फिरतो आहे. त्या आसमंतात श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजीराजे यांचे श्‍वास आणि पाऊलखुणा शोधतो आहे. 

विशाळगडाच्या उत्तर - पश्‍चिमेच्या पायथ्याला प्रभानवल्ली केळवलीपासूनचा विस्तृत कोकण आहे. इथून विशाळगडावरील अनेक स्थापत्य नजरेस येतात. अगदी मालिक रेहान दर्ग्यातील अजानसुद्धा ऐकू येते. 

एकदा ठरलं, माचाळ ते प्रभानवल्ली अशी अरण्य-उतराई करायची. पण विशाळगडाहून माचाळला न जाता कोकणातून माचाळची चढाई करून प्रभानवल्लीत उतरायचं. हेतू, शिवशंभू पदस्पर्शाची ओढ. मुक्काम माचाळ. विशाळगडाच्या पलीकडच्या डोंगररांगा पुनःपुन्हा खुणावू लागल्या. माचाळच्या वाडीतल्या मुक्कामाच्या कल्पनेनं अंग मोहरून आलं

आणि कोकणच्या कुशीतल्या वाड्यांकडं निघालो. आंबाघाट उतरून साखरपा गाठला. साखरप्याच्या पुढं पाली - गणपतीपुळेकडं जाणाऱ्या रस्त्यावर साखरप्यापासून सहा - सात किलोमीटर अंतरावर दाभोळे फाटा आहे. इथून डावीकडं लांजा-राजापूरकडं जाणारा एक रस्ता आहे. या रस्त्यानं केळवली फाट्यापर्यंत डोंगरझाडीतून जाणारा निसर्गसुंदर रस्ता आहे. या रस्त्यानं केळवली फाट्यापर्यंत यावं. इथून डावीकडं डोंगराला भिडणारा आणि डोंगरात शिरणारा माचाळच्या दिशेनं जाणारा रस्ता आहे. अर्थात याच्या आधीही माचाळचा एक फाटा लागतो. तो सोडून पुढं केळवली फाट्यापर्यंत यावं. मग डोंगरात जाणाऱ्या कच्च्या - पक्‍क्‍या रस्त्यानं वाटेतल्या वाड्या ओलांडत माचाळ अलीकडच्या डोंगरमाथ्यावरील वाडीपर्यंत यावं. वाडी उजव्या हाताला ठेवून कच्च्या रस्त्यानं निघावं. डोंगरकड्याच्या कुशीत दरीच्या वरच्या अंगाला माचाळच्या पायथ्याशी कच्चा रस्ता अचानक संपतो. मग सुरू होतो वाडीमाचाळपर्यंतचा डोंगरवाटेवरला विलक्षण प्रवास! एव्हाना अस्ताचलाला चाललेल्या सूर्याची पिवळी किरणं डोंगरकडे आणि झाडी उजळून टाकत होती. तो पिवळा प्रकाश पाठीवर घेऊन डोंगरकड्यांना भिडणाऱ्या पाऊलवाटेवरून आम्ही माचाळाकडं निघालो. संध्येच्या अंतरंगातला हा प्रवास किती विलक्षण आनंददायी असतो हे सांगणं शब्दापलीकडचं आहे. वाडी माचाळकडं जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या दऱ्यांना छेदत जाणारा दगडाच्या चढाईचा हा मार्ग सूर्यास्ताची किरणं अंगावर झेलणाऱ्या कड्यांच्या सौंदर्यामुळं विलक्षण आनंददायी होता. 

या पिवळ्या-सोनेरी प्रकाशात न्हाऊन गेलेले कडे पार करून पठारावरच्या वाडीच्या वाटेला लागतो. तोपर्यंत अंधार दाटून आलेला होता. चांदण्याची महिरप डोक्‍यावर खुलू लागली होती. अंतहीन पठारावरचे गार वारे अंगाला झोंबू लागले होते. पायतळी नजर जाईपर्यंत अंधार आणि मस्तकावर तारकांचा सडा या वातावरणातून चालताना दूरवर वाडीतले दिवे अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागले. स्वच्छ सारवलेल्या अंगणाच्या त्या वाडीत पोचलो. दूर डोंगरांवरच्या अशा वाड्यांमधला मुक्काम अनुभवावा असाच असतो...

संबंधित बातम्या