पेंच व्याघ्र प्रकल्प....

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 24 जानेवारी 2022

किल्ले भ्रमंती

यावेळी पेंचच्या जंगलाचं रूपडं पाहून मी तर वेडावूनच गेले होते अगदी. या वर्षी सर्वत्र पाऊस धो धो बरसला होता. अगदी ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत बरसणं चालूच होतं. त्यामुळे जंगल अक्षरशः हिरवंकंच होतं. तजेलदार,गर्भरेशमी हिरवाईनं नटलेली वृक्षराजी डोळ्यात भरत होती. त्या सकाळी संपूर्ण जंगल धुक्याच्या अलवार अवगुंठणात लपेटलेलं होतं.

आत्तापर्यंत बऱ्‍याच वेळा पेंचच्या जंगलाला भेट दिली आहे. खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा ताडोबाचं जंगल खुणावतं, तेव्हा आपोआप पेंचच्या जंगलाची भेटही ओघाओघानं होऊनच जाते. गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा मी पेंचच्या जंगलात गेले, तेव्हा प्रत्येक वेळेस या जंगलाचं, पानगळ झाल्यानंतरचं कोरडं, शुष्क, भगभगीत रूपच पाहायला मिळालं. घनदाट वृक्षराजीनं नटलेलं पेंचचं जंगल त्याच्या हिरव्याकंच रूपात कधी पाहायला मिळालं नव्हतं. एकतर जानेवारी-फेब्रुवारीच्या पानगळीच्या सुमारास, नाहीतर रणरणत्या उन्हाळ्यातच जंगलभेटीला जाणं व्हायचं. कारण या काळात पाण्यासाठी बाहेर येणारं ‘मोठं’ जनावर हमखास नजरेला पडतं...! विशेष म्हणजे पहिल्या दोनचार जंगल भेटीत, जीपमधून केलेल्या भटकंतीमध्ये वाघ, बिबट असं मोठं जनावर काही कधी नजरेला पडलं नव्हतं. त्यातही, सपाट भागाची उणीव असल्यामुळे गवताळ कुरणं किंवा त्यात चरणारे, नजरेला मोहात पाडणारे चितळ हरणांचे किंवा गव्यांचे कळप अशी जनावरं चटकन नजरेला पडायची नाहीत. त्यामुळे मन खट्टूच होऊन जायचं. पण ताडोबासाठी तिथवर गेल्यानंतर पेंच अभयारण्याची भेटही ठरलेली असायचीच...! निदान दोन तीन सफारी घेऊन मगच पुण्याला परतायचं हे ठरलेलं असायचं....!

यावर्षी कमालीच्या लांबलेल्या पावसाळ्यानंतर नेहमीप्रमाणे एक ऑक्टोबरला जेव्हा भारतातील सर्व अभयारण्यांचे दरवाजे निसर्गप्रेमींसाठी उघडले गेले, तेव्हा खरंतर आश्‍चर्यच वाटलं होतं. आम्ही उभयता पंढरीच्या वारकऱ्‍यांप्रमाणे जंगलांच्या वेशीवर पोहोचलोच. यावेळी माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण आणि तिचे यजमानही होते. पेंच व्याघ्र अभयारण्य नागपूरपासून फक्त सत्तर कि.मी. अंतरावर आहे. जंगलात जायचं असल्यास आपल्याला सिल्लारी गेटजवळ मुक्कामासाठी राहता येतं. वनखात्याचं ‘अमलताश’ या नावाचं संकुल आहेच, त्याशिवाय एमटीडीसीचं एक रिसॉर्टही आहे. जंगलाच्या अगदी सीमारेषेजवळच ही दोन्ही हॉटेल्स आहेत. स्वच्छ व अत्यंत सोयीची आहेत. ‘अमलताश’च्या परिसरातच वनखात्याचं जीप आरक्षण केंद्र आहे. आम्ही सफारीचं ऑनलाइन बुकिंग केलेलं होतं. त्यामुळे जीप ठरताच आम्ही पटकन सिल्लारी गेटमधून जंगलात प्रवेश करण्यासाठी निघालो. 

सकाळच्या वातावरणात, निरव प्रहरी पेंचचं जंगल कसं टवटवीत आणि गर्द हिरवं दिसत होतं. नेहमीप्रमाणं एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, ती म्हणजे बरोबर येणारा गाइड आणि ड्रायव्हर चांगले असले की जंगल सफारी खूप छान होते. 

खरं सांगू? यावेळी पेंचच्या जंगलाचं रूपडं पाहून मी तर वेडावूनच गेले होते अगदी. सर्वत्र पाऊस धो धो बरसला होता. अगदी ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत बरसणं चालूच होतं. त्यामुळे जंगल अक्षरशः हिरवंकंच होतं. तजेलदार,गर्भरेशमी हिरवाईनं नटलेली वृक्षराजी डोळ्यात भरत होती. त्या सकाळी संपूर्ण जंगल धुक्याच्या अलवार अवगुंठणात लपेटलेलं होतं. पाहावं तिकडं मोठमोठाले वृक्ष धुक्याची तरल, तलम दुलई पांघरून निस्तब्ध उभे होते! पेंचच्या जंगलाचं हे असं रूप मी पहिल्यांदाच पाहत होते... मोहात पाडणारं... टच्च् हिरवं...! काही वेळातच रविकिरणांनी धुक्याची चादर भेदून हिरवाईला सोनेरी वर्ख चढवायला सुरुवात केली. सातपुड्याच्या उंचसखल डोंगररांगातून सुवर्ण किरणांची झळाळी हिरव्यागार घनगर्दतेला छेदून हळूहळू अवघ्या जंगलावर पसरू लागली. जिकडे नजर जाईल तिकडे झाडाच्या आडून भुईवर उतरणारे उन्हाचे तिरपे, झोत धुक्याच्या अलवार पडद्याशी खेळताहेत, असं दृश्य दिसत होतं. काही वेळातच जंगलानं पांघरलेली दुलई अलगद विरून गेली. पाहता पाहता अवघं जंगल उन्हाच्या तिरिपांनी उजळून उठलं... हे सारं पाहताना मन नकळत पाखरू होऊन गेलं...! 

खरंतर अशा अनवट प्रहरी जंगलात प्रवेश केला, की डोळे नेहमी आडव्या काळ्या पट्ट्यांचं सोनेरी जनावर कुठं दिसतंय का, हे पाहण्यासाठी धांडोळा घेत भिरभिरत राहतात... पण आज पेंचमधल्या हिरवाईनंच मला इतकं संमोहित करून टाकलं, की वाघ दिसेल की नाही हा विचारही त्याक्षणी मनात आला नाही...! गाइडच्या म्हणण्यानुसार बखारी तलावाच्या परिसरात आपल्या पिलांसह वाघिणीचा मुक्त संचार चालू होता. त्यामुळे आम्ही त्या बाजूला गेलो होतो. पेंचमधील हा तलाव खूप सुरेख आहे. नुकताच पाऊस होऊन गेलेला होता. त्यामुळे तलावात पाणी काठोकाठ भरलेलं होतं. चोहोबाजूंनी उंच हिरवेगार वृक्ष हारीनं उभे होते... पाण्यात थोडेफार पाणपक्षीही होते. खूप साऱ्‍या पिलांना घेऊन लेसर व्हिसलिंग डकची मादी मोठ्या दिमाखात इकडून तिकडं विहरत होती... त्यामुळे पाण्यात उठणारे तरंग फार सुरेख दिसत होते. जलाशयाच्या पाण्यावरही धुक्याची अलवार चादर पसरलेली होती. ते दृश्यच मनोहारी होतं. निसर्गाची विविध रूपं नजरेला सुखावत होती. पण वाघिणीचा मात्र पत्ता नव्हता. अर्थातच जलाशयाच्या चोहोबाजूंनी इतकी घनगर्द हिरवाई होती, की वाघ बसलेला असेल तरी नजरेला पडणं केवळ अशक्यच होतं. तो सुंदर बखारी जलाशय पाहून मन मात्र संतृप्त होऊन गेलं. 

त्यानंतर मात्र नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वाघाच्या दर्शनासाठी काही जागा धुंडाळल्या. पेंच नदीवरील धरणाच्या बॅकवॉटरचा खूप मोठा जलाशय आहे. यावेळी जंगल परिसरातील सर्व जलाशय अगदी तुडुंब भरलेले होते. त्यामुळेच जंगलाचं हे ‘सुशेगात’ रूपडं मनाला भावत होतं! ‘बारस’ या नावानं ओळखली जाणारी वाघीण तिच्या तीन बच्चांना घेऊन बखारी तलावाच्या आजूबाजूलाच आहे, हे माहीत असल्यामुळे गाइड आम्हाला पुन्हा एकदा त्याच भागात घेऊन गेला. हिरव्यागार वृक्षांनी वेढलेल्या उतारावर जीप लावून आम्ही शांतपणे वाट पाहत राहिलो, पण वाघीण काही आली नाही. नदीच्या पात्रात वाघिणीच्या आणि पिलांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसत होते, पण वाघ मात्र दिसत नव्हते. मधूनच उंच झाडावर बसलेली माकडं खीऽऽ खीऽऽ करून उगाचच शांतता भंग करत होती. बाकी इतर कुठलाही अलार्म कॉल ऐकू येत नव्हता. जवळपास कुठंतरी वाघ होता हे नक्की! अखेरीस कंटाळून तेथून परतायचं ठरवलं आणि अचानक रस्त्याच्या कडेला गवतात बसलेला वाघ गाइडच्या नजरेस पडला. ते बारसचं पिल्लूच होतं. वर्ष-सव्वावर्ष वयाची वाघीण होती. कमालीची देखणी.  झुडुपांच्या आडून जीपमध्ये बसलेल्या आम्हा मनुष्य प्राण्यांचं निरीक्षण करत होती. आमची जीप तिच्यापासून फारतर दहा फुटांवर होती. पण झुडुपांच्या आड दडून ती अतिशय कुतूहलपूर्ण नजरेनं आम्हाला पाहत होती. किती सुंदर आणि भावपूर्ण असते वाघाची नजर... भेदक पण तरीही स्नेहशील... मी कित्येकवेळा वाघ अगदी जवळून पाहिला आहे. कित्येक वेळा नजरानजर झाली आहे. वाघाच्या नजरेत क्रौर्य कधीच पाहायला मिळालं नाहीय हे नक्की...! पण ही भेदक नजर आपल्या काळजाला आरपार चिरत जाते ही गोष्ट देखील खरीच...!! 

पेंचचं जंगल अगदी परिपूर्ण जंगल आहे. जंगलात प्रामुख्यानं साग वृक्षांची दाटीवाटी असली तरी त्याच्या जोडीनं ऐन, धावडा, हलदू, लेंडी, कलम, गरारी, सलाई, मोवई, कुलू, तेंदू, मोह, अर्जून, वड, बेल, बांबू, हिरडा, साल, बेहडा, अचर, अमलताश, आपटा, आवळा, अंजन असे असंख्य प्रकारचे वृक्ष आणि लतावेली आहेत. विविध प्रकारची झुडुपं, गवत आणि वेलींचे असंख्य प्रकार असल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्याही भरपूर आहे. त्यामुळे वाघ आणि बिबट यांची संख्याही भरपूर आहे. सांबर, चितळ, भेकर, नीलगाय, गवा, ढोल, रानडुक्कर, चौशिंगा, कोल्हा, लांडगा, तरस असे प्राणी पेंचच्या जंगलात आहेत. या जंगलात जवळपास १६४ प्रकारचे विविध पक्षी असल्याची नोंद केलेली आहे. यात मलबार पाईड हॉर्नबील, ग्रे हॉर्नबील, नवरंग म्हणजेच इंडियन पिट्टा यांचाही समावेश आहे. मोर तर भरपूर आहेत या जंगलात. पण या काळात त्यांचे पंख झडलेले असतात. 

पेंचच्या जंगलात प्रवेश करण्यासाठी तीन गेट आहेत. त्याच दुपारी सिल्लारी गेटमधून घेतलेल्या सफारीमध्ये फारसं काही पाहायला मिळालं नाही. दुसरे दिवशी सकाळी खुरसापार गेटमधून जंगलात गेलो, तेव्हाही फारसं काही दिसलं नाही. एक मोठा वाघ ओझरता पाहायला मिळाला तेवढंच. पण मनासारखं व्याघ्रदर्शन झालं नव्हतं. त्यामुळे मन थोडं खट्टू झालं होतं. अलार्म कॉल येत होते. आमच्या गाइडच्या सांगण्यानुसार आम्ही त्याच जागी वाट पाहत होतो, वाघ बाहेर येण्याची... पण वाघोबा काही बाहेर आलेच नाहीत. ती सफारी वाया गेली... काही म्हणता काहीच पाहायला मिळालं नाही. फक्त जंगलाचं हिरवंकंच रूप समोर होतं.

चवथी सफारी पुन्हा खुरसापार रेंजमध्येच होती. जंगलातून फिरताना अतिशय आनंद होत होता. पण वाघाचे ठसे दिसूनही वाघ काही दिसत नव्हता. खूप जागा धुंडाळल्या. पण निराशाच पदरात पडत होती. अशातच दुसऱ्‍या जीपकडून कळले, की एका ठिकाणी वाघीण झोपलेली आहे... मग काय...! दामटली जीप त्या दिशेनं... आणि धापा टाकत त्या ठिकाणी पोहोचलो! इथे जीपमध्ये बसल्या बसल्या धाप लागते. कारण डोंगराळ... खडकाळ जंगलात कच्च्या रस्त्यानं सुसाट वेगानं जाणाऱ्‍या जीपमध्ये बसायचं म्हणजे दम लागतोच! एका पाणवठ्याच्या जवळ, झाडांच्या सावलीत वाघिणीनं मस्त ताणून दिलेली होती. तिनं त्याच ठिकाणी आदल्या दिवशी शिकार केली होती. शिकार सोडून वाघ फारसा लांब जात नाही. बहुधा तिनं शिकार जवळच लपवलेली असावी. बऱ्‍याच जीप तिथं वाट पाहत होत्या. आम्हीही त्यात सामील झालो. बऱ्‍याच प्रतिक्षेनंतर वाघीण उठली. आळोखे पिळोखे देत बसून राहिली. समोर लागलेल्या जीप पाहून तिला काहीही फरक पडला नव्हता. तिच्या सोयीनुसार ती थोड्यावेळानं उठून पाणी पिण्यासाठी पाणवठ्याशी आली. पाणी पिऊन होताच पाठमोरी होऊन झाडीत अदृश्य झाली. त्या वाघिणीची पिल्लंसुद्धा जवळपासच असावीत. पण आम्हाला काही ती दिसली नाहीत. असो... तासभराचं ते नाट्य संपवून वाघीण आमच्या नजरेआड झाली आणि आम्ही परतीची वाट धरली.

आम्ही जंगलाच्या या भागात हे वाघिणीचं नाटक पाहत असताना दुसरीकडे बारस तिच्या तीन पिल्लांसह मोकळ्या जागेत आली होती. नशीबवान पर्यटकांना तिनं मनमुराद दर्शन दिल्याचं कळलं आणि असूयेनं आमच्या काळजात तीव्र कळ उठली! दुसरे दिवशी पुण्याला परतायचं होतं. परंतु पुन्हा एक सफारी घ्यायचा मोह झाला आणि भल्या पहाटे आम्ही पुन्हा सिल्लारी गेटमधून जंगलात शिरलो. बारस तर नाही दिसली... परंतु कटुंब नाला ओलांडून पुढे काही अंतरावर डोंगरमाथ्यावर असताना माकडं अशातऱ्‍हेनं खीऽऽ खीऽऽ करत होती, की लक्षात आलं जवळच कुठे तरी ‘मोठं मांजर’ नक्कीच आहे... बहुतेक बिबट...!! आमचा अंदाज खरा ठरला. क्षणभरातच जीपच्या पाठीमागच्या बाजूनं रस्ता ओलांडून गवतातून दबकत जाणारा बिबट नजरेस पडला. मात्र सुदैवानं तो वळसा घालून अगदी आमच्या जीपच्या समोर आला. हा बिबट इतका देखणा आणि तरणाबांड होता, की मन अगदी हरखून गेलं. खूप वेळ तो आमच्या नजरेसमोर होता. त्यानंतर काही वेळातच आम्हाला रानकुत्र्यांचा एक कळपही दिसला. मस्त सूर्यप्रकाशात चारपाच रानकुत्रे एकत्र पाहायला मिळाले. आमची शेवटची समारोपाची सफारी आम्हाला मस्त आनंद देऊन गेली. छान फोटो मिळाले की अस्मादिक हरखून जातात... आणि पुन्हा कधी जंगलात परत यायचं या स्वप्नरंजनातच रमून जातात! असो... म्हणतात ना कुणाला कशाचे... तर पायलीला पशाचे...!

यावेळची पेंचभेट मला प्रचंड आवडली हे सांगणे न लगे...! मनापासून लिहावंस वाटलं आणि अनुभव कागदावर उतरला...!  

संबंधित बातम्या